Wednesday, April 23, 2025

"महाराष्ट्रातील हजारो भाविक - भक्तांना भक्तीची ऊर्जा देणारी, भक्तिमय वातावरणात मंत्रमुग्ध करणारी, ३०० वर्षांपेक्षा जास्त ऐतिहासिक परंपरा असलेली, सातारा जिल्ह्यातील, फलटण तालुक्यातील "जिंती गावची ऐतिहासिक बगाड यात्रा" उत्साहात, भक्तिमय वातावरणात 'जितोबाच्या नावानं चांगभलं' च्या गजरात संपन्न"


फलटण, जिंती, दि. २३ : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील जिंती गावात श्री जितोबा देवाची ऐतिहासिक बगाड यात्रा ३०० वर्षांहून अधिक काळाची परंपरा जपत, उत्साह आणि भक्तिमय वातावरणात मंगळवारी संपन्न झाली.

"जितोबाच्या नावानं चांगभलं" च्या गजरात, गुलाल-खोबऱ्याच्या उधळणीत आणि ढोल-ताशांच्या निनादात पार पडलेल्या या सोहळ्याने हजारो भाविकांना मंत्रमुग्ध केले.

"सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध जिंती गावच्या बगाड उत्सवाची ऐतिहासिक परंपरा सुमारे 300 पेक्षा जास्त वर्षांपासून जिंती गावच्या ग्रामस्थांनी व महाराष्ट्रातील हजारो भाविक - भक्तांनी भक्तीभावाने, श्रद्धेने जोपासली आहे. अठरापगड जातीतील भाविक भक्तांना  भक्तीच्या धाग्याने जोडणाऱ्या या जितोबा देवाच्या बगाडाचे दर्शन, देवाच्या बगाडाला नारळाचे तोरण अर्पण करून, जितोबा देवाच्या पारंपरिक बगाड सोहळ्यात उपस्थित राहून, ऊर्जा देणाऱ्या भक्तीची अनुभूती घेणे हा विलक्षण सोहळा महाराष्ट्रातील हजारो भाविक - भक्त प्रत्येक वर्षी अनुभवतात."

चैत्र शुद्ध कालाष्टमीला सुरू झालेला हा पारंपारिक यात्रेचा सोहळा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, विशेषत: पुणे, सांगली आणि सातारा जिल्ह्यातून आलेल्या भाविकांनी गजबजला. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

या यात्रा सोहळ्यात पहिल्या दिवशी रविवारी श्री जितोबा देवाचा आणि जोगेश्वरी देवीचा हळदी समारंभ  संपन्न झाला. सोमवारी जितोबा देवाचा व जोगेश्वरी देवीचा  लग्न समारंभ पारंपरिक पद्धतीने, हजारो भाविकांच्या उपस्थितीत, भक्तिमय वातावरणात संपन्न झाला .

या यात्रा सोहळ्यातील तिसऱ्या दिवशी मंगळवारी जितोबा देवाच्या ऐतिहासिक बगाड सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक भक्त उपस्थित होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भाविक - भक्त या जितोबा देवाच्या बगाड उत्सवाची वर्षभर वाट पाहत असतात.

हराळी वैष्णव मठापासून सुरू झालेल्या या पारंपारिक बगाड सोहळ्यात वाकी गावातील भक्ताद्वारे बगाडी मानकऱ्यांना पोशाख परिधान करण्यात आला. 

सनई-चौघड्याच्या नादात, फटाक्यांच्या आतिषबाजी आणि भक्तांच्या गजरात १५-२० मिनिटांचा हा पारंपरिक बगाड सोहळा अविस्मरणीय ठरला. बगाडी मागे झुकून भक्तांनी त्यांना झेलण्याची प्रथा आणि सनईच्या नादाने जागे करण्याची रीत यांनी सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी वर्षभराचा पारंपरिक भाकणूक सोहळा संपन्न झाला.

जिंती गावची ही यात्रा अठरापगड जातींना एकत्र आणते, ज्यामुळे सामाजिक सलोख्याचा संदेश पसरतो. जिंती ग्रामस्थ,पोलीस प्रशासन, तालुका प्रशासन आणि जिंती गावच्या यात्रा कमिटीच्या उत्कृष्ट नियोजनामुळे हा यात्रा सोहळा यशस्वी ठरला. 

या यात्रा सोहळ्यात गोसावी समाजाचे नातपंथाचे पद, ढोल-ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण यांनी सांस्कृतिक वारसा जपला गेला.

"महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा जिंती गावच्या बगाड यात्रेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक - भक्तांची उपस्थिती होती. आमच्या जिंती गावच्या बगाड यात्रेला 300 पेक्षा जास्त वर्षांची परंपरा आहे. प्रत्येक वर्षी आम्ही या पारंपारिक बगाडाच्या भक्तिमय सोहळ्याची वाट पाहत असतो. जिंती गावच्या ग्रामस्थांना व तरुण पिढीला एकत्र करणारी ही आमची जितोबा देवाची ऐतिहासिक यात्रा नेहमीच आम्हाला ऊर्जा देते." अशी प्रतिक्रिया जिंती गावचे ग्रामस्थ, भक्त सागर रणवरे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

जिंती गावची बगाड यात्रा केवळ धार्मिक उत्सव नसून, सामाजिक एकता आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक आहे. भक्तीच्या धाग्याने सर्वांना जोडणारा हा सोहळा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समृद्धीला उजाळा देतो.

पश्चिम महाराष्ट्रातील हजारो भाविक - भक्त प्रत्येक वर्षी जिंती गावच्या जितोबा देवाच्या बगाड यात्रेसाठी आवर्जून उपस्थिती लावत असतात.