सवाई सर्जाचं चांगभलं... वीरच्या म्हस्कोबाचं चांगभलं...
श्री क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरी माता हे जागृत देवस्थान आहे.म्हस्कोबा मनोकामना पूर्ण करणारा देव म्हणून अनेकांना त्याची प्रचीती आली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस श्री क्षेत्र वीर येथे येणा-या भाविकांचा ओघ वाढतच आहे. या ठिकाणी माघ शुध्द पोर्णिमा ते माघ वद्य दशमि या काळात लाखो भाविक यात्रेसाठी हजेरी लावतात.माघ शुध्द पोर्णीमेस देवांचे लग्न व माघ वद्य दशमीस मारामारी(रंगांचे शिंपन)हे दोन दिवस मुख्य असतात.
यात्रा काळात मानकरी, सालकरी,दागिनदार,गुरव यांना विशेष महत्व असते.मनोभावे भक्ती करणा-या भक्तां करिता सोनारी, जावली, म्हसवड, बोरवन(घोडे उड्डान)श्री क्षेत्र वीर या ठिकाणी काळभैरवांनी अवतार धारण केले आहेत.
श्री क्षेत्र वीर येथे पूर्णगंगेच्या काठी म्हस्कोबांचे सुंदर, रेखीव असे देवालय आहे.कमळाजी धनगराच्या भक्ती मुळे काळभैरव तेथे आले.अशी अख्यायिका आहे.कमळाजी गुरे, शेळ्या, मेंढ्या घेऊन बेळगाव जिल्ह्यातील काळभैरवांचे स्थान असलेल्या सोनारी परिसरात फिरत असे. त्या ठिकाणच्या भैरवाची तो नित्यनियमाने पूजा करी. जवळच्या भाकरीचा नैवद्य देवाला दाखविल्या शिवाय अन्नग्रहन करित नसे.पुढे तो फिरत फिरत निरा नदी काठी, घोडेउड्डान - बोरवन या ठिकाणी आला.
या ठिकाणीही त्याने आपला भैरवनाथांच्या पुजेचा नित्यनियम अखंडपणे चालू ठेवला. ठरलेल्या दिनक्रमाप्रमाणे आपली गुरे, शेळ्या मेंढ्या, बक-या वाड्यात, कोंडाव्यात व सोनारिच्या भैरवनाथांचे स्मरण करावे. मनोभावे पूजा करावी असा त्याचा नित्यनियम असे. कमळाजीची भक्ती पाहून सर्प रूपाने भैरवनाथांनी त्याला दर्शन दिले ते ठिकाण म्हणजे बोरवन घोडेउड्डान होय.
या ठिकाणीही भव्य रेखीव असे सुंदर देवालय आहे. त्या देवरूपी सर्पास कमळाजीने जवळ बाळगले. त्यास नंतर त्याने वारूळात सोडले. ज्या ठिकाणी सोडले ती जागा म्हणजे आजची श्री क्षेत्र वीर येथील देऊळवाड्याची जागा होय.ते शेत राऊतमाळी यांचे होते, म्हणून यात्रा काळात राऊतांना लग्नात वरपक्ष म्हणून हळदीचा व छबिन्याच्या पुढे चालावे असा मान दिला आहे.
ज्या ठिकाणी वारूळ होते त्या ठिकाणी स्वयंभू तांदळा सापडला. देवाचे खालचे बाजूस ज्या ठिकाणी मुखवटा बसविला आहे तेच मुळ स्थान होय. कमळाजीस पाच मुलगे होते. त्यांनी ज्या वेळी देवांची स्थापना केली त्या वेळी मोठ्या भावाने तोंडाने शिंग फुंकल्या सारखा आवाज केला ते शिंगाडे. दुस-या मुलाने तरवडाच्या झाडाचा पाला व फुले आणली ते तरडे. तिस-या मुलाने बुरणूस आणून त्यास दो-या लावून देवास सावली केली ते बुरूंगले. चवथ्या मुलाने ओठ हाताच्या बोटाने वाजविले म्हणून त्यास व्हटकर व पाचव्या मुलाने हाताने ढिंगाव ढिंगाव असे वाजविले ते ढवाण म्हणून ओळखले जाऊ लागले.
आजही या नावाचे वंशज आहेत.लग्नाच्या दिवशी त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालुन त्यांचा सन्मान केला जातो.नाथ भक्त कमळाजीचे स्थान मंदिराच्या उत्तर बाजूस आहे, पौष शुध्द पोर्णिमा (चुडी पोर्णिमा), माघ शुध्द पोर्णिमेच्या दिवशी व नवरात्रीच्या उत्सव काळात तिस-या व सातव्या माळेच्या दिवशी नाथांची पालखी व छबिना कमळाजी मंदिरात जातो.
यात्रा काळात प्रतिपदे पासुन दोन वेळा छबिना निघतो. सकाळी ११ ते दुपारी ३ व रात्री ९ ते १२ वाजे पर्यंत छबिना चालतो. पंचमी पासून भाकणूक व तलवार खेळण्यास सुरूवात होते.भाकणूक म्हणजे या सालात कोणकोणत्या नक्षत्रात पाऊस पडेल? पिक पाणी कसे राहील? रोगराई उत्पन्न होईल का? कोणत्या गोष्टींची टंचाई व महागाई होईल? दुष्काळ कोठे पडेल काय? इत्यादी गोष्टी सांगितल्या जातात.
आजच्या अर्थसंकल्पीय जमान्यात आपल्या लोकसंस्कृतीने पुरातन काळापासुन भाकणूकीच्या रूपाने अर्थसंकल्प सादर करण्याची पध्दत जपली आहे.आजही पिंटू शिंगाडे, तात्याबा बूरूंगले,दादा बूरूंगले भाकणूक सांगतात. भाविक त्या प्रमाणे वागतात. त्यातील गोष्टी अनुभवतात.
"यात्रा काळात देवांचा गुलाल व रंग अंगावर पडल्या नंतर वर्षभर कशाची भिती राहत नाही अशी भक्तांची धारणा आहे." कमळाजी हा धनगर असल्याने सा-या महाराष्ट्रातून श्री क्षेत्र वीर येथे धनगर समाज यात्रे साठी येतो.यात्रा काळात घोंगड्यांची माठी विक्री वीर येथे होते.बैलगाड्यांची यात्रा म्हणूनही ही यात्रा प्रसिद्ध आहे.
शेतकरी आपल्या सर्जा - राजाला घेऊन यात्रेला येतात. स्वयंचलीत वाहनांच्या काळातही काही शेतकऱ्यांनी ही प्रथा जपली आहे.
सासवड जवळील कोडीत या गावाचे तुळाजी बडदे हे नाथांचे भक्त होते. नित्य नियमाने कोडीत वरून चालत ते नाथांच्या भेटीला येत. ते थकल्या नंतर नाथ भक्तांच्या भेटीला कोडीत येथे गेले अशी अख्यायिका आहे.
यात्रा काळात नाथांची पालखी कोडीत वरून येते. पालखी सोबत सारा गाव चालत असतो. यात्रा काळात दहा दिवस कोडीत येथील नाथ भक्त श्री क्षेत्र वीर येथे मुक्कामी असतात.दर अमावस्येला हजारो भाविक कोडीत वरून चालत वीर येथे येतात.
यामध्ये स्त्रीयांची संख्या मोठी असते.संपूर्ण महाराष्ट्रातून, कर्नाटकातून वर्षभरात लाखो भाविक वीरच्या म्हस्कोबाच्या दर्शनासाठी येत असतात.श्री क्षेत्र वीर व बोरवन घोडेउड्डान येथे मंदिराचा मूळ ढाचा तसाच राखून मंदिराच्या विकासाचे काम करण्यात आले आहे.
दहिभात पूजा,गजे जेवण,अन्नदान करणे, देवाला गुलाल वाहणे,देवांना पोषाख करणे,नंदादिप अर्पण करणे,घंटी व आरसे अर्पण करणे असे नवस येथे केले जातात.
"देवा तुझ्या पुढे दोन उदबत्त्या लावीन"असे साधे नवसही असतात.पहाटे चार वाजता पहाट पूजा होऊन गाभारा पहाटे पाच ते सहा वाजे पर्यंत बंद होतो.सहा वाजता गाभारा दर्शनासाठी खुला होतो.सकाळी नऊ वाजता भाविंकाकडून अभिषेक करण्यात येतात.
दहा वाजता भाविंकातर्फे दहिभाताच्या पूजा होतात. दुपारी बारा वाजता धुपारती होऊन गाभारा बंद होतो. या काळात मंदिर दर्शनासाठी बंद होते.तासाभरात पुन्हा गाभारा खुला होतो,सायंकाळी सात वाजता पूजा होते या ठिकाणी त्रिकाल पूजेची पध्दत आहे.सकाळी दहा वाजता व सायंकाळी सात नंतर कौल लावण्यात येतो.
भाविक आपल्या अडी अडचणींचे निराकरण महाराजांच्या माध्यमातून करतात.सकाळी व रात्री ९-३० वाजता धुपारती होऊन मंदिर पहाटे चार पर्यंत बंद असते. नवरात्र काळात व यात्रेच्या काळातील दहा दिवसात महिलांना गर्भ गृहात प्रवेश असायचा. अलीकडच्या काळात शासनाच्या नियमाप्रमाणे सर्वांना मंदिरात प्रवेश मिळतो. देवांचे लग्नांचे वेळी महिलांना देवांच्या अंगाला हळद लावता येते.या वेळी हजारो महीला हळदी साठी गर्दी करतात.
श्री क्षेत्र वीर येथील यात्रा काळात नाथ भक्तांची अलोट गर्दी महाराजांच्या दर्शनासाठी होते.माघ शुध्द पोर्णिमा ते माघ वद्य अमावस्या या काळात लाखो भाविक येथे येतात. देवांची हळद लग्नाच्या एक दिवस आधी लावण्यात येते. समस्थ राऊत मंडळी हे मानकरी असून, देवाला हळद लावण्याचा पहिला मान त्यांना दिला जातो. माघ शुध्द पोर्णिमेला कोडीत येथील काठी, पालखी सायंकाळी सहा वाजता श्री क्षेत्र वीर येथे येते. त्यांचे वाजत गाजत स्वागत करण्यात येते.देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष विश्वस्त,पाटील, मानकरी, पूजारी, दागिनदार, सालकरी, भाविक,ग्रामस्थ यांची भेट होऊन पालखी तळावर स्थानपन्न होते.
रात्री दहा वाजता कोडीतची पालखी व वीर देवांची पालखी, काठ्या, ढोल, ताश्या इत्यादी दागिनदारांसह अंधारचिंच येथे जाते.त्या ठिकाणी देवांचे पाच मानकरी (शिंगाडे,तरडे,बुरूंगले,व्हटकर,ढवाण)यांना फुलांच्या माळा घातल्या जातात या वेळी वाईची पालखी(सूर्यवंशी) व कन्हेरी (पाटणे) यांच्या काठ्यांची भेटाभेट होऊन सर्व पालख्या, काठ्या, ढोल ताश्या यासह देऊळवाड्यात येतात.या वेळी कोडीत, कन्हेरी, राजेवाडी, भोंडवेवाडी, पुणे(कसबा), वीर, वाई, सोनवडी येथील पालख्या देऊळवाड्यात असतात.
सर्व मानकरी, पाटील, ग्रामस्थ, पंचपुरोहीत(ब्राम्हण),गुरव हजर असतात.रात्री बारा वाजता लग्नसोहळा पारंपारिक पद्दतीने संपन्न होतो.पंचमी पासून देवालयात गर्दी वाढू लागते.पंचमी पासूनच मानक-यांच्या अंगात देवांचा संचार येऊन वार्षीक पिकपाण्याबाबत भविष्यवाणी सांगितली जाते.
पंचमी पासून गजे (जेवण)घालण्यात सुरूवात होते. माघ वद्य दशमी यात्रेचा मुख्य दिवस असतो या दिवशी श्री क्षेत्र वीर कडे येणारे सर्व रस्ते वाहनांनी फुलून जातात.लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात.दुपारी बारा वाजता सर्व पालख्या, काठ्या, ढोल ताश्यांसह देऊळवाड्यात येतात.दुपारी दिड वाजता मानाच्या रंगांचे शिंपन समस्थ मानकरी जमदाडे यांच्या मार्फत केले जाते.
मंदिराला तिन प्रदक्षिणा घालुन दुपारी दोन वाजता सर्व पालख्या आपआपल्या तळावर जातात.हळुहळु भाविक घराकडे परततात. दहा दिवसांच्या यात्रेची सांगता होते.वीर येथील मंदिरा शेजारी भाविकांना राहण्यासाठी दोन कोटी रूपये खर्च करून भक्त निवास ऊभारण्यात आले आहे. अमावस्या, पोर्णिमा व यात्रा काळातील भाविकांच्या सोयी सुविधांकरिता मंदिर परिसर विकासासाठी श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट व श्रीनाथ सेवा मंडळ (श्री क्षेत्र घोडे उड्डान)कार्यरत आहे. देवाची महती सांगणा-या गाण्यांच्या व अख्यायिकेच्या सिडीज् प्रसिध्द झाल्या आहेत.
श्रीनाथ म्हस्कोबांचं चांगभल, हा विठ्ठल धुमाळ निर्मित चित्रपटही प्रदर्शित झाला आहे.या चित्रपटाचे उत्पन्न म्हस्कोबा साठी आहे.
भक्तांच्या हाकेला धावून येणारा, मनोकामना पूर्ण करणारा म्हस्कोबा लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आहे. दहा दिवसांच्या यात्रा काळात वीस लाखांपेक्षा जास्त भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात.श्री क्षेत्र वीर ही एक पावन भूमी आहे. पुणे, सातारा जिल्ह्याच्या सिमेवरिल वीर गाव बागायती आहे.या ठिकाणी श्री प्रभू रामचंद्रांनी स्थापलेले श्री वीरेश्वराचे पुरातन मंदिर आहे.
लेखक : - पुरंदरचे ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, श्रीनाथ भक्त गुणशेखर बापू जाधव
No comments:
Post a Comment