रणरागिनी तू,
प्रकाशाचा किरण तू,
क्रांतीज्योती सावित्री तू,
प्रेरणास्त्रोत जिजाऊ तू,
कुटुंबाची ढाल तू,
मायेची ऊब तू,
संस्कारांची खान तू,
घराण्याची शान तू,
खरच अशा कितीही उपमा दिल्या तरी स्त्रीसाठी त्या कमीच आहेत. स्त्री हा समाजाचा कणा आहे. मंदिरातील तेजस्वीपणे तेवणारी ज्योत आहे, आणि त्या तेजस्वी प्रकाशाने मंदिराचा गाभारा फुलून दिसतो, तशी स्त्री सर्वत्र सर्वांच्यासाठी स्वतः जळून इतरांना प्रकाश देणारी आहे.
आई, बहीण, पत्नी, मुलगी अशा अनेक भूमिका निभावते ही स्त्री. स्त्रीची प्रतिष्ठा फक्त वीर माता किंवा वीर पत्नी होण्यात नाही. तर वीर स्त्री होण्यात आहे. पूर्वीच्या काळी स्त्रियांपुढे वेगळ्या समस्या व आव्हाने होती. त्या पार पाडून ती पुढे आली. आणि आता त्यांचे स्वरूप बदलले आहे. आजची स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहे. आजची स्त्री आर्थिक, वैचारिकरित्या स्वावलंबी आहे.
कर्तृत्व, कर्तव्य या जबाबदाऱ्या ती अतिशय प्रामाणिकपणे पार पाडते. नोकरी, कुटुंब या दोन्ही तारेवरच्या कसरती पार पाडते. हे सर्व करत असताना तिची होणारी ससेहोलपट कोणी पाहते का? त्याचा कोणी विचार करते का? घड्याळाच्या काट्या बरोबर ती पळत असते यातून तिला थोडी उसंत मिळते का?
महिला आज अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत. सर्व क्षेत्रे तिने पारंगत केली आहेत. स्त्री म्हणून कोठेही मागे पडली नाही. पण एक स्त्री म्हणून तिला योग्य सन्मान मिळतो का? स्त्री उच्च पदावर असो की, कनिष्ठ पदावर, एक स्त्री म्हणून कामाच्या ठिकाणी त्यांच्या समस्या सारख्याच आहेत.
स्त्रियांवर होणारे अन्याय, अत्याचार, स्त्री भ्रूण हत्या, स्त्री - पुरुष तुलना, समाजाचा, पुरुषांचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, तिची होणारी घुसमट, कुटुंबात होणारा त्रास, स्त्री नोकरी करणारी असली की तिला कुटुंब, नातेवाईक यांच्याकडून मिळणारी वागणूक, नोकरी करून घरच्यांचे ही सगळे नीटनेटके स्त्रीने केलेच पाहिजे. असे अनेकांच्या बाबतीत घडते.
कुटुंबासाठी, मुलांसाठी अनेक स्त्रियांना नोकऱ्याही सोडाव्या लागतात. अशा अनेक गंभीर समस्या या पुढारलेल्या समाजापुढे दिसून येतात. या समस्या एका जादूच्या कांडीने फिरवून सुटणाऱ्या नाहीत. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमीच सकारात्मक ठेवला पाहिजे. या सर्व गोष्टींना सामोरे जाऊन आजची स्त्री झाशीची राणी, ताराबाई, लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी अशा कर्तृत्ववान स्त्रियांच्या पावलावर पाऊल ठेवून आपापल्या क्षेत्रात ती आपले कर्तृत्व गाजवत आहे. तिच्यातला कणखरपणा, मौलिकता जगाला दाखवून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न ती नेहमीच करत आहे.
हमसे है जमाना सारा,
हम जमाने से कम नही,
ऊंची है उडान हमारी,
ऊंचे हे सपने अपने.
स्त्रियांना आपले कुटुंब चालवण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी नोकरी, व्यवसाय करावा लागतो. तिला महागाई, वाढती बेकारी, मंदी या समस्यांशी संघर्ष करून, अनेक वाईट आमिषे जी आपल्या मुलांना आकर्षित करतात. या सर्व वाईट संस्कारांपासून दूर ठेवून योग्य दिशा, चांगले संस्कार करून यश, कीर्ती याकडे वाटचाल करून, तिला एक आदर्श माणूस घडवायचा असतो.
नोकरी किंवा व्यवसाय करत असताना आपल्या लहान मुलांना घरी किंवा पाळणाघरात सोडून जावे लागते. बाहेर पडताना तिच्या जीवाची होणारी घालमेल पाहिली का? आपलं मूल आजारी असताना सुद्धा तिला नोकरीच्या ठिकाणी वेळेवरच जावे लागते. त्यावेळी तिच्या अंतर्मनात होणाऱ्या वेदना शब्दात मांडता येणार नाहीत. अशावेळी तिला शक्य असेल तेवढी सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे.
कुटुंबातील लोकांनीसुद्धा तिला आधार देणे गरजेचे आहे. या सगळ्यांमध्ये ती स्वतःला हरवून बसते. सगळ्यांचे करत असताना, नोकरी, कुटूंब या दोन्ही बाजू समर्थपणे पेलत असताना, स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. स्वतःच्या आहाराकडे तिने लक्ष दिले पाहिजे. स्वतःचे छंद जोपासले पाहिजेत. स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे.
प्रत्येक जबाबदारी अतिशय सोशिकतेने सांभाळून, सर्वांना आपल्या कर्तृत्वाने पुढे नेणारी, आजची स्त्री काळ बदलेल, पण ती मात्र माघार न घेता, पुढे पुढे जात राहील. आपल्या कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा, राष्ट्राचा विचार व विकास घडविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहील.
झुगारून सारी बंधने,
तोडून सर्व शृंखला,
भेद सारे संपवून,
अन्यायाला वाचा फोडून,
दूर करून अज्ञान,
वाढव आपला सन्मान,
धर मनी हिम्मत,
होऊन तू कणखर,
घे उत्तुंग भरारी आकाशी,
स्वर्ग ही लाजे तुला पाहशी,
कर सिद्ध तू स्वतःला,
दाखवून दे साऱ्या जगाला...
लेखिका : - आदर्श शिक्षिका, कवयित्री स्मिता निंबाळकर. बारामती.
No comments:
Post a Comment