असे श्रद्धा ज्याचे उरी, त्यासी दिसे श्रीनाथ जोगेश्वरी....
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाने व छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेला हा पुणे जिल्हा, आणि श्री संत ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या संस्काराने समृद्ध झालेला हा परिसर सबंध विश्वाला वंदनीय आहे. आणि याच पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील, श्रीक्षेत्र वीर हे गाव भक्तीचे आणि शक्तीचे प्रतीक म्हणून उभ्या महाराष्ट्राला अवगत आहे.
श्री पूर्ण गंगेच्या काठी असलेले आणि श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेले वीरगाव आणि वीर चा म्हस्कोबा म्हटले की कपाळाला गुलाल, गळ्यात देवाची दोरी असं समीकरण ठरलेलं असतं.
खरंतर छत्रपती शिवाजी महाराज कि.. म्हटलं कि.. आपल्या तोंडून आपसूकच जय... येतं अगदी तसंच सवाई सर्जाचं म्हणताच तोंडातून आपसूकच चांगभलं आल्याशिवाय राहत नाही.
तसं पाहिलं तर हे श्रीनाथ म्हस्कोबा महाराज काळभैरवनाथ यांचे अवतार म्हणूनच की कोण्या कवींनी म्हणून ठेवले आहे.
"खोट्या भ्रष्ट जनावरी, काळभैरव कोप करी,
अहंकार जो करी, श्रीनाथ त्यावर कोप करी."
तसं पाहिलं तर कोणीही मनुष्य पूर्ण नाही. प्रत्येक जण काम, क्रोध, द्वेष, मत्सर आणि अहंकाराने ग्रासलेला आहे.
परंतु आपल्याला आत्तापर्यंत अनेक संत, महंत, महात्मे सांगून गेले की जर तुम्हाला परमेश्वराची कृपा व्हावी असे वाटत असेल तर प्रथम तुम्ही नम्र व्हा. सात्विक आहार घ्या.
सात्विक विचारांच्या लोकांचाच सहवास मिळवा. कानाने चांगले ऐका. डोळ्यांनी चांगले पहा. मनामध्ये सदैव पवित्र आणि निर्मळ विचार ठेवा.
आणि तुमच्या मनाला अहंकाराचा वाराही लागू देऊ नका. पण आपण असे वागतो का. तर मुळीच नाही. आणि म्हणूनच प्रत्येकाने स्वतःला ओळखण्याची गरज आहे.
कधीतरी शांतचित्ताने स्वतःमधील दुर्गुण शोधण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करण्याची गरज आहे. आज अनेक जण पैशाच्या मागे धावत सुटले आहेत. जितका पैसा जास्त मिळेल तेवढीच त्यांची भूक जास्त वाढत आहे. कोणी खोट्या प्रतिष्ठेच्या मागे धावत आहे. स्वतःबद्दल आणि समाजाबद्दल त्याला कुठलाच विचार करायलाच वेळ नाही.
आणि म्हणूनच आज श्रीनाथांच्या नामस्मरणाने आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची आहे. कारण देव भक्तीचा भुकेला असतो. त्याला हवे असते तुमचे निर्मळ मन. त्याला हवे असते तुमची प्रेमळ ओढ, प्रेमळ भावना.
खरंतर संतांनी भक्तीच्या तीन पायर्या सांगितल्या आहेत. पहिली पायरी मूर्तिपूजा की जी आपण सर्वजण करतो. दुसरी पायरी मानव पूजा ज्यांचा अनेकांना गंध नाही की, ज्या मानव पूजेत आपल्याला परमेश्वर दुसऱ्या मनुष्य रूपात दिसायला लागतो.
पण आपण काम, क्रोध, द्वेष मत्सर आणि अहंकाराने एवढे भरलेलो असतो की आपल्याला दुसऱ्या पायरीवर भक्तीची कधीच प्रचिती येत नाही. त्यामुळे तिसऱ्या पायरीला आणि आपल्या मरेपर्यंत संबंध येतच नाही. आणि ती भक्तीची तिसरी पायरी म्हणजे स्वतःमध्येच देवत्वाची अनुभूती अनुभवणे.
तर असो असा हा भक्तीचा मार्ग प्रत्येकाने आपल्या आयुष्यात चालण्याचा प्रयत्न करावा. आणि आपणच आपला उद्धार करून घ्यावा. आणि तशी सुबुद्धी श्रीनाथांनी प्रत्येकाला द्यावी हीच श्रीनाथ चरणी प्रार्थना.
लेखक : - दैनिक पुढारीचे निर्भीड, अभ्यासू पत्रकार, सर्जनशील कवी, प्रतिभावंत लेखक शिवदास शितोळे.
No comments:
Post a Comment