8 मार्च 2021 - जागतिक महिला दिन विशेष लेख...
" आपण संघर्ष करायचायं, लढायचयं, संकटांना धाडसाने सामोरे जायचयं "
महिला दिन म्हटले की महिला सन्मानाचे हजारो कार्यक्रम या दिनानिमित्त घेतले जातात. निश्चितच घेतले पाहिजेत, परंतु दररोज आपल्या आयुष्यात येणाऱ्या महिलांचा सन्मान कायमस्वरूपी करावा अशी मात्र अजूनही मानसिकता निर्माण झालेली नाही.
एक महिला म्हणजे तिला आयुष्यात अनेक भूमिका साकाराव्या लागतात. ती कोणाची तरी आई असते, मावशी असते, सासू असते, पत्नी असते, तर कोणाची तरी बहीण, मामी, काकी, आजी असते. पुरुषाच्या बरोबरीनेच सर्व क्षेत्रात ती काम करण्यात यशस्वी आहे. आपल्या देशात स्त्री-पुरुष समानता हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. परंतु अजूनही स्त्री पुरुष समानता यावी यासाठी लढावे लागते हेच दुर्दैव.
" शनिशिंगणापूर येथील चौथरा प्रवेश, हाजीअली येथील दर्ग्याचा मजार प्रवेश, अंबाबाई मंदिर आणि त्रंबकेश्वर मंदिर तसेच केरळ येथील शबरीमला मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी केलेली आक्रमक आंदोलने "स्त्री-पुरुष समानतेचा अधिकार" अमलात आणण्यासाठी होती.
परंतु महिलांनी महिलांसाठी आक्रमक आंदोलन केले तर ते बदनाम करायचे, दडपण्याचा प्रयत्न करायचा. जी महिला नेतृत्व करते, संघर्ष करते त्यांचे चारित्र्यहनन करायचे.
तिला धमक्या द्यायच्या, जीवघेणे हल्ले करायचे आणि महिलांनाच विरोधात उभे करायचे असा प्रयत्न केला जातो. मला या सर्वांमधून जावे लागले. "चांगले काम करीत असताना इतका त्रास द्यायचा की त्या महिलेने हे क्षेत्र सोडले पाहिजे अन्यथा या मानसिक त्रासाने तिने स्वतःला संपवून घेतले पाहिजे असे केले जाते."
माझ्या बाबतीत हे सर्व घडले. अनेक वेळेला या त्रासाला सामोरे जाताना खूप वेळा डोळ्यातून अश्रू आले. आत्महत्येचे विचार आले. हे सगळं काम आपण सोडून देऊ असेही वाटले परंतु त्याच वेळेला धाडसी मनाने हे ठरवले की आपण जो विचार करतोय तेच तर पाहिजे पुरुषी मानसिकतेला, आणि मग या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून "आपण संघर्ष करायचायं, लढायचं आहे आणि संकटांना धाडसाने सामोरे जायचयं" हा निश्चय केला.
आधीपासूनच असलेला "धाडसी स्वभाव, आक्रमकता, वक्तृत्व गुण, आणि नेतृत्वगुण" यामुळे सर्वांना लोकशाही मार्गाने जिंकायचय असच ठरवलं आणि जिंकत गेले. यशस्वी होत गेले.
महिलांवर होणारे अन्याय - अत्याचार, बलात्कार यांची पहिल्यापासूनच भयानक चीड. त्यामुळे या घटना घडू नयेत यासाठी जे जे प्रयत्न करता येतील ते करत असते. परंतु सध्या महाराष्ट्रात आणि भारतात महिला असुरक्षिततेचे प्रमाण खूप वाढले आहे. अल्पवयीन मुलींवरील बलात्कार, सामूहिक बलात्कार, महिलांचा होणारा छळ हे ऐकून, पाहून मन सुन्न होते.
अजूनही स्त्रीभ्रूणहत्या, हुंड्याची समस्या पूर्णपणे नष्ट व्हायला तयार नाही आणि या सर्वच कारणांमुळे हजारो निर्भयांचे प्राण जातात. हे थांबणं खूपच गरजेचे आहे. सरकार "बेटी बचाओ बेटी पढाओ" अभियान राबवत आहे. परंतु "बेटी बचाओ - बेटी पढाओ और अपने बेटे को भी समझाओ" असे नाव अभियानाला करा अशी मी मागणीसुद्धा केली आहे.
महिलांना आरक्षण मिळाले. महिला सध्या सर्वच क्षेत्रात चांगले काम करताहेत. अनेक राजकीय पक्षात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या महिला पार पाडत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे. परंतु सध्या "मंत्री, आमदार, पक्षाचे पदाधिकारी पुरुष यांच्यावर बलात्कार, विनयभंगाचे आरोप झाले तर मात्र याच महिला त्यांच्या पक्षातील नेत्यांसाठी शांत बसतात. पक्षनिहाय महिला सबलीकरणाचे काम करतात" हे चित्र धोकादायक आहे.
सरकार कोणाचेही येऊ, आपल्या देशात, राज्यात महिला सुरक्षित असल्याच पाहिजेत. यासाठी सरकारने हमी दिली पाहिजे. या देशात, राज्यात महिलांवर अत्याचार झाले नाही पाहिजेत. यासाठी "आता मोठी चळवळ उभी करणे गरजेचे आहे आणि ती चळवळ उभी करून आपला देश महिलांसाठी सुरक्षित असला पाहिजे." यासाठी यापुढे "आम्ही जिवाचे रान करणार आहोत पण साथ तुमच्या सर्वांची पाहिजे." सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
लेखिका : - महाराष्ट्राच्या व भारतातील सामाजिक चळवळीतील निर्भिड, आक्रमक, प्रामाणिक, अभ्यासू सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती ताई देसाई.
No comments:
Post a Comment