वीर, दि. 3 : - पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्र वीर येथे आज पंचमी निमित्त श्रीनाथ म्हस्कोबा देवाची भाकणूक करण्यास पारंपारिक पद्धतीने सुरुवात झाली. प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील भाविक भक्त देवाच्या भाकणूकीची आतुरतेने वाट पाहत असतात. आज भविष्यवाणी ऐकण्यासाठी देऊळवाड्यात कोवीड १९ पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून, श्रीनाथ म्हस्कोबा देवाचे ठराविक मानकरी, सालकरी यांच्या उपस्थितीत देवळातील धार्मिक विधी 'सवाई सर्जाचं चांगभलं ' जयघोष करत भाकणूक पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली.
पंचमीनिमित्त पहाटे श्रीनाथ म्हस्कोबांची महापूजा करण्यात आली. मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला. सकाळी सहा वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. ठराविक प्रवेश पात्र मानकरी, सालकरी यांच्या उपस्थितीत शासनाचे सर्व नियम पालन करून विधी करण्यात आले. यावेळी कोडीत, कन्हेरी, थोपटेवाडी ,सोनवडी, राजेवाडी, कसबा पेठ (पुणे) सर्व फुलांनी सजवलेल्या पालख्या मध्ये उत्सव मूर्ती ठेवण्यात आल्या. देवाची धुप आरती झाल्यावर छबिन्याला सुरुवात झाली. वस्त्र परिधान केलेल्या मानाच्या काठ्या व पालख्यांची एक मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर देवाचे मानकरी तात्याबा बुरुंगले यांनी भविष्यवाणी सांगितली.
"मृगाचे पाऊस चार खंडात पडेल. बाजरीचे पीक चांगले येणार असून मगा दोन खंडात व उत्तरा पूर्वा चार खंडात पडून शेतकरी समाधानी होईल. हत्तीचे पाणी चार खंडात समाधानकारक पडणार आहे. जनतेचे समाधान होईल उत्तर पूर्वा पाऊस तीन खंडात पडेल. रोगराई जनावरांना नसून माणसामागे आहे." अशा प्रकारे परंपरेने भाकणूक संपन्न झाली .भाकणूक झाल्यावर पालखीच्या तीन मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर छबिन्याची सांगता झाली.
भाकणूकी साठी मंदिरामध्ये प्रवेश पात्र मानकरी,सालकरी, दागिनदार मंडळी उपस्थित होते. शासनाचे सर्व नियम पालन करून मंदिरात धार्मिक विधी करण्यात येत असल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी सांगितले. त्यावेळी व्हाईस चेअरमन रवींद्र धुमाळ, विश्वस्त हनुमंत धुमाळ, अभिजीत धुमाळ, अमोल धूमाळ, नामदेव जाधव, शिवाजी कदम, संजय कापरे, सल्लागार रामचंद्र धुमाळ, बाळासाहेब धुमाळ तसेच सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र धुमाळ इत्यादी मंडळींनी ट्रस्टतर्फे व्यवस्था पाहिली तसेच सासवड पोलिस स्टेशनच्या वतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वच नागरिकांनी व भाविकांनी शासनाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे.
No comments:
Post a Comment