वीर, दि. ८ : - महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक मारामारी सोहळा ( रंगाचे शिंपण) पारंपारिक पद्धतीने, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून, मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
"महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशी क्षेत्र वीरची ऐतिहासिक यात्रा यावर्षी कोरोना सदृश्य परिस्थितीमुळे, पुणे जिल्हाधिकारी यांच्या संचारबंदीच्या आदेशामुळे रद्द केली असल्यामुळे फक्त ठराविक मानकऱ्यांच्या उपस्थितीत, कोरोनाची नियमावली पाळून, मंदिरामधील सर्व धार्मिक विधी पार पडले." अशी माहिती वीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
आज पारंपारिक मारामारीचा( रंगाचे शिंपण) उत्सव काळातील महत्त्वाचा दिवस. आज पहाटे पाच वाजता पुजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. नंतर सहा वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळी देवाला अभिषेक केल्यानंतर साडेदहा वाजता देवाला दहीभाताची पुजा बांधण्यात आली.
दुपारी बारा वाजता सर्व काठ्या, पालख्या देऊळवाड्यात आल्या. देवाची आरती होऊन छबिन्याला सुरुवात झाली. मंदिराला दोन प्रदक्षिणा होऊन श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांची अमृतवाणी झाली.
तिसऱ्या प्रदिक्षिणेवेळी जमदाडे मंडळीकडून रंगाचे शिंपण करण्यात आले. अशा पद्धतीने पारंपारिक मारामारी (रंगाचे शिंपण) सोहळ्याने पारंपारिक उत्सवाची सांगता झाली.
सदर सोहळा शासनाच्या वेळोवेळी ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार करण्यात आला. सदर धार्मिक विधी साठी पुरंदरचे लोकप्रिय आमदार संजयजी जगताप, मा.जिल्हाधिकारी पुणे, मा. तहसीलदार पुरंदर, सासवड पोलीस प्रशासन, पत्रकार, ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अशी प्रतिक्रिया वीर देवस्थान ट्रस्टचे सचिव तय्यद मुलानी यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
" कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून, सर्व वीर ग्रामस्थ, सरपंच, मानकरी, दागिनदार, सालकरी, संपूर्ण विश्वस्त मंडळ, सल्लागार मंडळ, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग कर्मचारी, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी खूप चांगले सहकार्य केले अशी प्रतिक्रिया वीर देवस्थान ट्रस्टचे सल्लागार विशाल धुमाळ यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
ठराविक प्रवेशपात्र मानकरी, सालकरी यांच्या उपस्थितीत शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून मंदिरातील विधी करण्यात आले.
यावेळी वीर देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष धुमाळ, व्हाईस चेअरमन रवींद्र धुमाळ, विश्वस्त हनुमंत धुमाळ, अमोल धुमाळ, अभिजीत धुमाळ, नामदेव जाधव, शिवाजी कदम, संजय कापरे, राजेंद्र कुरपड, सल्लागार रामचंद्र धुमाळ, विशाल धुमाळ, बाळासाहेब धुमाळ, तानाजी धुमाळ, शंकर धुमाळ व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बापू धुमाळ या सर्व मंडळींनी देवस्थान ट्रस्ट तर्फे व्यवस्था पाहिली.
"खरं तर वीरची श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांची यात्रा ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हटलं तर वावगे ठरणार नाही. कारण या दहा दिवसाच्या यात्रेत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून तसेच इतर राज्यातूनही श्रीनाथांचे लाखो भक्त दर्शनासाठी येत असतात. परंतु यावर्षी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशामुळे यात्रा रद्द करण्यात आली. त्यामुळे अनेक श्रीनाथ भक्तांनी हळहळ व्यक्त केली.
परंतु श्रीनाथ महाराजांचा लग्न सोहळा व दहा दिवसाचा उत्सव कोरोनाचे सर्व नियम पाळून, मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व धार्मिक विधी पार पडून, उत्सव संपन्न झाला. या उत्सवामध्ये शासनाने जे नियम घालून दिले होते त्याचे परिपूर्ण पालन देवस्थान ट्रस्ट बरोबरच श्रीनाथ भक्तांनी ही तंतोतंत पालन केल्यामुळे हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडला." असे सामाजिक कार्यकर्ते, दैनिक पुढारीचे पत्रकार शिवदास शितोळे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना सांगितले.
" भक्तांच्या हाकेला धावून येणाऱ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान श्रीनाथ म्हस्कोबा देवावरची ऐतिहासिक पुस्तिकेचे काम अखंडितपणे चालू आहे. लवकरच ते काम श्रीनाथ महाराजांच्या आशीर्वादाने पूर्ण होईल अशी प्रतिक्रिया इतिहास अभ्यासक, श्रीनाथ फक्त बापूसाहेब धुमाळ यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
" महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री क्षेत्र वीर येथे कोविड 19 च्या सर्व नियमांचे पालन करून, मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थित सर्व धार्मिक विधी पार पडून, ऐतिहासिक मारामारी सोहळा ( रंगाचे शिंपण) पारंपरिक पद्धतीने पार पडला. यासाठी वीर देवस्थान ट्रस्टने खूप चांगले नियोजन केले. पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, पत्रकार, ग्रामस्थ सर्वांनीच चांगले सहकार्य केले." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.
" कोरोना संकटामुळे मंदिरातील सर्व धार्मिक विधी, कोरोनाच्या नियमावलीचे पालन करून उत्साहात व भक्तिभावाने पार पडले. श्रीनाथ म्हस्कोबा महाराज सर्व भक्तांना कोरोनाच्या संकटातून मुक्त करतील." अशी प्रतिक्रिया श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरातील देवाचे पुजारी गौरव क्षीरसागर यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूज शी बोलताना दिली.
महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी तसेच भाविकांनी कोरोना नियमावलीचे व शासनाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे.
No comments:
Post a Comment