Friday, March 5, 2021

"लोकांचे कष्ट व संघर्षमय जीवन बघून मला झोप लागत नाही - शरद पवार साहेब"; संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी लोकनेते शरद पवार यांच्याविषयी सांगितलेल्या खास आठवणींचा खास लेख....

 


"मला झोप लागत नाही - शरद पवार साहेब"

          

     संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांचा खास लेख...


१६ डिसेंबर २०२० रोजी भोर - वेल्हे येथे माजी आमदार स्व. संपतराव जेधे यांच्या घरी सांत्वनपर भेटीस मी पवार साहेबांसोबत गेलो होतो तेव्हाचा हा प्रसंग. खूप दिवसांपासून तुम्हा सगळ्यांना सांगायचा होता पण काही ना काही कारणाने राहून जायचं. आज तो भावनिक प्रसंग शेअर करतोय...



पुण्यातून भोरच्या दिशेने जात असताना अनेक लोक पवार साहेबांना पाहण्यासाठी किंवा भेटण्यासाठी रस्त्यावर आले होते. एक दीड तासाच्या प्रवासादरम्यान साहेब खिडकीतून बाहेर बघत लोकांना हात करायचे. ते केल्यानंतर तिथे लोकांमध्ये लगेचच उत्साहाचे वातावरण निर्माण होयचं. पुढे ठिक ठिकाणी साहेब गाडी थांबवायचे, काच खाली घ्यायचे, एक-दोन मिनिटांचा संवाद साधायचे अन् पुढे निघायचे. मला साहेबांची प्रचंड ऊर्जा पाहून कायमच कुतुहल वाटत आलं आहे. 





मग मी साहेबांना प्रश्न विचारला, “साहेब तुमचं वय ८० वर्ष, तुम्ही एवढं कसा प्रवास करता, का करता?” तर त्यांनी त्याला असं उत्तर दिलं, “ही जी माणसं आहेत, यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर असं दिसतं की त्यांना माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्यांचे निरागस चेहरे बघून मला अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा येते.” 




साहेबांनी त्यांच्या आयुष्यात लाखो किलोमीटरचा प्रवास केला असेल पण साहेब अजिबात थकत नाही. त्यात मला साहेबांसोबत काही हजारो किलोमीटरचा प्रवास करता आला. त्यांचा सहवास लाभला व नेहमी लाभतो याचा मला आनंद तर आहेच व खूप समाधान ही वाटतं.




मला नेहमी साहेबांचे समाजाप्रती असलेले प्रेम, प्रश्न जाणून घेण्याची भूमिका, प्रामाणिकपणा, आपुलकी आणि आस्था जास्त भावते व महत्वाची वाटते. “साहेब तुम्हाला समजून घेणं तसं अवघड आहे, पण तुम्ही सतत एवढं काम कसं करत राहता?” असे मी त्यांना पुढे विचारले. साहेब त्यावर क्षणात म्हणाले की, “कधी कधी या सगळ्या लोकांचे प्रश्न बघून, त्यांचे कष्ट व संघर्षमय जीवन बघून मला झोप लागत नाही!” हे ऐकताच माझ्या अंगावर काटा आला. अक्षरश: त्यांनी मला सांगितलं की त्यांना झोप लागत नाही आणि मी थक्क झालो. या प्रसंगाचा जो फोटो मला टिपता आला तो ही शेअर करतोय. खरंच, साहेब समजून घेताना मला जे समजलं ते येथे मांडलं... 


लेखक - पुरोगामी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते, संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड.




No comments:

Post a Comment