पुणे, पिंपरी, दि.२२ : - बेपत्ता व्यक्तींचा शोध लावणे हे नेहमीच पोलिसांसाठी आव्हानात्मक काम असते. पुणे - पिंपरी येथील वाकड पोलिसांनी "पिंपरी येथील दहा वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणीचा तिच्या प्रियकराने खून केलेले प्रकरण उघडकीस आणण्यास यश मिळवुन चांगली कामगिरी केली."
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी पोलिस स्टेशन हद्दीत राहणारी फिर्यादी महिला सविता सत्यवान लांडगे (राहणार बलदेव नगर, पिंपरी,वय वर्ष 45) यांनी त्यांची मुलगी चांदणी सत्यवान लांडगे (वय वर्ष 22) ही किशोर लक्ष्मण घारे (राहणार डोणे, तालुका मावळ, जिल्हा पुणे) याच्या बरोबर लग्न करायचे आहे असे म्हणून घरातून निघून जाऊन बेपत्ता झाल्याची तक्रार पिंपरी पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती.
सदर बेपत्ता तरूणीच्या प्रकरणाबाबत वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांना त्यांच्या गोपनीय सूत्रांकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले.
सदर बेपत्ता झालेल्या तरुणीचा प्रियकर किशोर घारे सन 2014 पासून डोणे येथील राहत्या घरातून निघून गेल्याने हरविल्याबाबतची, बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती.
पोलिस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एम. पाटील हे सदर बेपत्ता तरुणीच्या व बेपत्ता तरुण किशोर घारे यांच्याबाबत अधिकची माहिती काढत असतानाच, त्यांना खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की "दोन महिन्यापासून सदर मुलीचा प्रियकर किशोर घारे हा मारुंजी गावात कोठेतरी भाजीचा व्यवसाय करत आहे." त्यानुसार अधिक माहिती घेऊन पोलिसांनी सापळा रचून किशोर घारे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर बेपत्ता तरुणी बाबत चौकशी केली असता, सुरुवातीला उडवाउडवीची व असंबंध उत्तर दिल्याने त्याने सदर तरुणी बाबत घातपात केल्याचा संशय आला. त्यामुळे त्याच्याकडून पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास केल्यावर त्याने सदर तरुणीचा दहा वर्षापूर्वी खून केला असल्याचे कबुली दिली.
" सदर आरोपी किशोर घारे यास पुढील कारवाई करता पिंपरी पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पिंपरी पोलीस ठाणे येथे गु.र.न. १९१/२०२१ भादंवि कलम ३०२,३६४,२०१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी किशोर लक्ष्मण घारे यास अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली दिली.
पोलीस सदर गुन्ह्याचा अधिक तपास करत असताना, मिळालेली माहिती अशी की, 'आरोपी किशोर घारे याने प्रेमसंबंधातून बेपत्ता तरुणीबरोबर ठेवलेल्या शारीरिक संबंधातून ती गर्भवती राहिल्याने तिने लग्न करण्यासाठी आग्रह धरला होता. त्यामुळे तिचा खून केला असल्याचे निष्पन्न होत आहे.' दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पिंपरी पोलिस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.
सदरची कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ - 2 आनंद भोईटे, साहाय्यक पोलीस आयुक्त - वाकड विभाग - श्रीधर जाधव, वाकड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील, तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एम. पाटील, पोलीस कर्मचारी बिभीषण कन्हेरकर, बापूसाहेब धुमाळ, दीपक भोसले, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, प्रमोद कदम, आतिश जाधव, नितीन गेंगजे यांच्या पथकाने केली.
No comments:
Post a Comment