Wednesday, April 29, 2026

"फाटकी चड्डी घालून शिक्षण घेणारा मुलगा ते दिव्यावर अभ्यास करून, वयाच्या पंधराव्या वर्षी समाज मंदिर बांधण्याचे साहस करणारा तरुण ते पुण्यात उपजीविकेसाठी कंपनीमध्ये काम करणारा सामान्य कामगार ते वयाच्या 24 व्या वर्षी बांधकाम क्षेत्रातील तरुण बिल्डर बनण्याचा प्रवास ते 100 कोटीची वार्षिक उलाढाल करणाऱ्या बांधकाम क्षेत्रातील नामांकित कंपनीचा मालक, प्रेरणादायी शिलेदार विकास शिंदे"....



महाराष्ट्राच्या या महान भूमीत अनेक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व जन्माला आले. महाराष्ट्रातील तरुण पिढी प्रचंड कष्ट व मेहनत घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात चांगले काम करताना दिसत आहे. महाराष्ट्राची तरुण पिढी ही प्रगतशील महाराष्ट्राचे भविष्य आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी, संकटे येत असतात परंतु त्या अडचणी, संकटांना संधी समजून तुमच्या आवडीच्या क्षेत्रात मनापासून झोकून देऊन काम केलं तर नक्कीच चांगले यश मिळते. 


पुरंदर तालुक्यातील गरीब कुटुंबातील फाटक्या चड्डीवरती, दिव्याखाली अभ्यास करून  शिक्षण घेण्यासाठी संघर्ष करणारा मुलगा ते वयाच्या पंधराव्या वर्षी गावात समाजमंदिर बांधण्याचे साहस करणारा मुलगा ते पुण्यासारख्या शहरात उपजीविकेसाठी कमी वयात एका छोट्या कंपनीत सामान्य कामगार म्हणून काम करणारा तरुण ते अवघ्या 24 व्या वर्षी एक चांगला गृहप्रकल्प बांधून कर्तुत्व गाजवणारा बिल्डर ते  100 कोटीची उलाढाल करणारी बांधकाम क्षेत्रातील एक मोठी कंपनी यशस्वीपणे चालवणारा उद्योजक असे पुणे शहरातील यशस्वी उद्योजक विकास शिंदे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील पिंगोरी या गावात शेतकरी कुटुंबात झाला. गरिबीचे चटके सहन करत विकास शिंदे यांनी पिंगोरी गावात प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.


पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंगोरी गावात गरीब कुटुंबात, अत्यंत हलाकीच्या परिस्थितीशी झुंज देत विकास शिंदे यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण पिंगोरी गावातील जीवन शिक्षण विद्यामंदिर या शाळेत पूर्ण केले.

फाटकी चड्डी घालून शाळेत जाणारे विकास शिंदे, दिव्याखाली अभ्यास करणारे विकास शिंदे, गरीब परिस्थितीचे चटके सहन करून, शिक्षण पूर्ण करण्यासाठी धडपडत होते. अल्पभूधारक, गरीब शेतकरी कुटुंबातील मुलांना जन्मापासूनच संघर्ष करावा लागतो. भात शिजवुन दिवस काढावा लागला तरी शिक्षणामध्ये विकास शिंदे यांनी खंड पडून दिला नाही.


कुठल्याही व्यक्तीची आई ही जगातील फार मोठी ताकद व प्रेरणा असते. विकास शिंदे यांच्या आई इंदुबाई शिंदे यांनी प्रचंड कष्ट व मेहनत घेऊन, हलाखीच्या परिस्थितीशी तोंड देत, मुलांना चांगले शिक्षण देऊन, चांगले संस्कार करून, एक आदर्श असे शिंदे कुटुंब घडविले.


"माझ्या आईची प्रेरणा माझ्या आयुष्यात खूप मोठी आहे. माझ्या बालपणापासून माझ्या आईने जे कष्ट केले, आमचे संगोपन केले व गरिबीशी व  प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत आम्हाला चांगले शिक्षण व चांगले संस्कार देऊन घडवलं त्यामुळेच मला माझ्या आयुष्यात बांधकाम क्षेत्रात चांगले काम करता आले. फाटक्या चड्डीवरती शाळेत जाताना, दिव्याखाली अभ्यास करताना गरिबीचे चटके बसत असले तरी आमच्या आईची ताकद आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. आम्ही अगदी लहान वयात असतानाच आमच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर, आमच्या आईने प्रचंड कष्ट व मेहनत घेऊन आमच्या कुटुंबाला घडवले. आईचे कष्ट मेहनत व प्रामाणिकपणा आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी आहे." असे  उद्योजक विकास शिंदे यांनी सांगितले.


लहानपणीच गरिबीशी व प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या विकास शिंदे इयत्ता नववीत शिक्षण घेत असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. शिंदे कुटुंबियांसाठी हा खूप मोठा धक्का होता.


"लहानपणीच वडिलांचे निधन झाल्यामुळे आमच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला. या दुर्दैवी प्रसंगामुळे माझ्या आईला खूप मोठा मानसिक धक्का बसला. प्रचंड मोठ्या मानसिक धक्क्यातून आमच्या कुटुंबाला सावरायला वेळ गेला परंतु त्यानंतर आमच्या आईने या दुःखातून सावरून, कुटुंब चालवण्यासाठी ग्रामीण भागात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून, प्रचंड कष्ट व मेहनत करून, आम्हाला चांगले शिक्षण देऊन, चांगले संस्कार करून घडवले. आमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ व प्रेरणा असणारी आई नेहमीच मार्गदर्शक म्हणून आमच्यासाठी उभी राहिली." असे उद्योजक विकास शिंदे यांनी सांगितले.


पुरंदर तालुक्यातील दुष्काळी गाव असणाऱ्या पिंगोरी गावात बालपण जगत असताना विकास शिंदे व त्यांचे भाऊ संतोष शिंदे लहानपणी अत्यंत हलाकीच्या परिस्थितीशी तोंड देत होते. आई आजारी असताना फक्त भात शिजवून खाऊन त्यावरच दिवस काढून, त्या काळात शिक्षण पूर्ण केले. सणाच्या दिवशी पोळ्याचे जेवण खायला नाही मिळाले तरी गावातील मंदिरातील गुरवांकडून मिळालेले नैवेद्याचे पोळीचे जेवण मिळाले तरी त्यातच आनंद मानून, हलाकीच्या परिस्थितीची कुणाकडे तक्रार केली नाही.


"गरीब परिस्थितीशी, प्रतिकूल परिस्थितीशी लहानपणीच असणारा संघर्ष माणसाला खूप भक्कम बनवतो. विकास शिंदे यांच्या लहानपणीचा संघर्ष भविष्यातील प्रगतशील जडणघडणीचा एक भक्कम पाया होता. गरिबीचे चटके बसल्यानंतरच कुठल्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्व सलाखून,तलाखून  निघते व मोठ्या ध्येयासाठी संघर्ष करायला मजबूत बनवते."


लहानपणीचा संघर्ष मोठा असला तरी विकास शिंदे यांच्या बालपणी त्यांच्या आई इंदुबाई शिंदे कधी खचल्या नाहीत. कुटुंबाचे चांगले पालन पोषण करण्यासाठी इंदुबाई शिंदे यांनी भाजीपाला विक्री व्यवसायासाठी आठवडे बाजारात पुरंदर तालुक्यातील वाल्हे, जेजुरी, सासवड, निरा या ठिकाणी जाऊन प्रामाणिकपणे भाजीपाला विक्री करून, कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला. मुलांच्या लहान वयातच नवऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर एवढ्या मोठ्या दुःखातून सावरून, ग्रामीण भागामध्ये कष्ट व मेहनत करून कुटुंब चालवणे त्याकाळी सोपी गोष्ट नव्हती. विकास शिंदे यांच्या आई इंदुबाई शिंदे यांनी मुलांवरती सत्य, प्रामाणिकपणा, माणुसकीचे संस्कार करून,एक आदर्श कुटुंब घडविले.


शालेय जीवनामध्ये मित्रांचे डबे खाऊन, शिक्षण घेणारे विकास शिंदे  गरीब परिस्थितीशी संघर्ष करत असताना, आपल्या कुटुंबाला थोडा आर्थिक आधार मिळण्यासाठी शेतातील मोलमजुरीच्या कामापासून ते  गावातील समाज मंदिराचे बांधकाम चालू असताना पाणी मारण्याचे कामही त्यांनी प्रामाणिकपणे केले. वाल्हे गावातील आरसीसी कॉन्ट्रॅक्टर मोरे साहेब यांचे पिंगोरी गावात समाजमंदिर बांधण्याचे काम चालू असताना त्यांनी विकास शिंदे व त्यांच्या मित्रांना या बांधकामावरती पाणी मारण्याचे काम देले. पाणी मारण्यासाठी मिळालेले त्या काळातील पन्नास रुपये विकास शिंदे यांना शाळेची फी भरण्यासाठी उपयुक्त ठरले.


लहान वयातील जबाबदारी माणसाला खूप चांगल्या पद्धतीने घडवते. वयाच्या पंधराव्या - सोळाव्या वर्षी गावातील समाजमंदिर बांधण्याचे आव्हानात्मक काम विकास शिंदे यांनी त्या काळात नुसतच घेतलं नाही तर ते मित्रांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पूर्ण केले. शालेय शिक्षण घेण्याच्या वयात सार्वजनिक एवढे मोठे समाज मंदिर बांधण्याचे काम हातात घेऊन ते पार पडणे त्याकाळी सोपे नव्हते.


"आयुष्यात कधी कधी असे प्रसंग येतात ज्यामुळे तुमचं आयुष्य बदलते. वाल्हे गावचे मोरे कॉन्टॅक्टर यांनी समाजमंदिर बांधण्याचं काम घेतले होते परंतु कामगार अचानक पळून गेल्यामुळे ते समाजमंदिर बांधण्याचं काम आम्हाला पूर्ण करण्याची संधी मिळाली. त्याकाळी आमचं वय कमी असताना देखील मोरे कॉन्ट्रॅक्टर यांनी आमच्यावरती पूर्ण विश्वास ठेवला व चार-पाच मित्रांच्या साह्याने मी अकरावीत असताना पिंगोरीतील समाज मंदिर बांधण्याचे काम यशस्वी पूर्ण केले. सेंट्रींग, कॉलम, फुटींग, हाताने आम्ही स्लॅप भरला सुरुवातीच्या टप्प्यात आम्हाला त्या कामातून पाचशे रुपये नफा झाला त्याचा खूप मोठा आनंद होता. काम पूर्ण झाल्यानंतर त्यातून आम्हाला नफा झाला नाही परंतु कमी वयात आम्हाला एक चांगले समाजमंदिर बांधण्याचा अनुभव मिळाला ही आमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट ठरली." असे विकास शिंदे यांनी सांगितले.


कॉलेज जीवनात शिक्षण घेत असतानाच विकास शिंदे यांनी अकरावी व बारावीमध्येच दोन समाजमंदिर बांधण्याचे काम केले. कुठलाही यशस्वी व्यवसायिक घडण्यामागे त्यांची जडणघडण खूप महत्त्वाची असते. विकास शिंदे यांनी पिंगोरे येथे दुसरे समाज मंदिर बांधल्यानंतर त्या कामांमध्ये त्यांना तीन हजार रुपये नफा झाला त्यातून त्यांनी शेतीसाठी डिझेल इंजिन घेतले. गावाकडे सात - आठ महिने ओढ्याला पाणी असताना पाईपलाईनच्या माध्यमातून त्यांनी त्याकाळी शेतामध्ये झेंडू, भाजीपाला लागवड करून, कष्टाने शेती करण्याचाही प्रयत्न केला.


पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील महर्षी वाल्मिक विद्यालयात विकास शिंदे यांनी दहावीचे शिक्षण पूर्ण केले त्यांना दहावीला त्याकाळी 68 टक्के गुण मिळाले. विकास शिंदे यांना बारावीला कॉमर्स शाखेतून त्याकाळी 74% गुण मिळाले व कॉमर्स शाखेच्या एसपी, ओसी अर्थशास्त्र या विषयांमध्ये शंभर पैकी 98 मार्क्स मिळाले होते. गरिबीची, प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत विकास शिंदे यांनी दहावी व बारावीचे शिक्षण घेऊन परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवून त्याकाळी उत्तुंग यश मिळवले होते.


पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील पिंगोरी हे दुष्काळी गाव, गावाकडे पाण्याचा गंभीर प्रश्न असल्यामुळे उपजीविकेची त्याकाळी साधने नव्हती. बारावी चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाल्यानंतर विकास शिंदे हे त्यांचे चुलत भाऊ तानाजी शिंदे यांच्या सहकार्याने पुणे येथे नोकरी करण्यास आले. पुण्यात कर्वेनगर येथील नामांकित कमिन्स कंपनीमध्ये विकास शिंदे स्टोर डिपार्टमेंटला 7 ते 3.30 सामान्य कामगार म्हणून काम करायचे आणि दिवसभराचे काम झाल्यानंतर संध्याकाळी रात्रशाळेमध्ये प्लंबिंगचा आयटीआय करत होते. त्याकाळी त्यांना साडेपाच हजार रुपये पगार होता.


पुण्यातील कोथरूड येथील कमिन्स कंपनीमध्ये सहा महिने विकास शिंदे यांनी नोकरी केल्यानंतर, प्लंबिंगच्या व्यवसायामध्ये चांगला जम बसवला. पुण्यातील वारजे माळवाडी परिसरातील छोटी घरे, बंगले यांची प्लंबिंगची कामे करायला सुरुवात केल्यानंतर विकास शिंदे यांना नवीन व्यवसायाचा चांगला अनुभव मिळाला.


"पुण्यातील कमिन्स कंपनीमध्ये स्टोअर डिपार्टमेंटला काम करत असतानाच प्लंबिंगचा आयटीआय केल्यामुळे त्याकाळी नोकरीचा वेळ संपल्यानंतर प्लंबिंगची छोटी - छोटी कामे करायला सुरुवात केली. बंगल्यांचे, घरांचे टॉयलेट, बाथरूम, सेफ्टी टँक, चेंबर ही प्लंबिंगची सगळी कामे आम्ही करायला सुरुवात केली. त्याकाळी स्नेहा कन्स्ट्रक्शनचे मालक व बिल्डर असलेले नंदु रजपूत साहेब यांनी प्लंबिंगच्या कामामध्ये आम्हाला खूप सहकार्य केले. 25 लोकांच्या टीमच्या मदतीने आम्ही अनेक बिल्डिंगची प्लंबिंगची कामे त्याकाळी वॉटरप्रूफ पासून ते सेफ्टी टँक, चेंबर सर्व प्रकारची प्लंबिंगची कामे खूप चांगल्या प्रकारे करत होतो. आठवड्याला बिल्डर कडून मिळणारे लेबर पेमेंट 4 हजार, 5 हजार मिळाल्यानंतर कामगारांना पैसे वाटप झाल्यानंतर, दोनशे रुपये शिल्लक राहिले तरी त्यावेळेस खूप आनंद व्हायचा. व्यवसाय माणसाला खूप चांगले घडवतो." असे विकास शिंदे यांनी सांगितले.


पुणे शहरात प्लंबिंग व्यवसायात जम बसल्यानंतर विकास शिंदे यांनी 2001 साली वारजे माळवाडी परिसरात पहिल्यांदाच स्वतःच घर, पुण्यातील चांगल्या सोसायटीत एक चांगला फ्लॅट विकत घेतला. एवढ्या कमी वयात पुण्यासारख्या शहरात व्यवसायात कष्ट, मेहनत करून स्वतःचे घर घेणे त्याकाळी सोपी गोष्ट नव्हती.


माळकरी कुटुंब आणि निर्व्यसनी तसेच प्रचंड कष्ट करणारे व जिद्दीने, चिकाटीने, प्रामाणिकपणे काम करणारे व्यक्तिमत्त्व असल्यामुळे विकास शिंदे यांना कमी वयातच व्यवसायात मोठी झेप घेता आली.


"पुणे शहरात उपजीविकेचे साधन शोधण्यासाठी आल्यानंतर व्यवसायात प्रामाणिकपणे काम करून, पुण्यात नवीन घराचे स्वप्न पूर्ण करता आले. त्याकाळी वारजे माळवाडी परिसरात एक प्रशस्त फ्लॅट विकत घेण्यासाठी मला रजपूत साहेबांचे खूप सहकार्य लाभले. त्या काळात व्यवसायात उत्पन्न कमी असताना घर घेण्याचे साहस करणे एवढे सोपे नव्हते परंतु रजपूत साहेबांचे सहकार्य व पैसे टप्प्याटप्प्यात देण्याची सुविधा तसेच पुना मर्चंट बँकेचे मंजूर झालेले गृहकर्ज यामुळे मला माझ्या नवीन घराचे स्वप्न पूर्ण करता आले. आमच्या पुण्यातील नवीन घरामुळे माझ्या आईच्या चेहऱ्यावरील आनंद खूप मोठा होता. आमच्यासाठी तीच  खूप मोठी ऊर्जा आणि प्रेरणा आहे." असे विकास शिंदे यांनी सांगितले.


आजच्या तरुण पिढीने निर्व्यसनी राहून, कुठल्याही क्षेत्रात झोकुन देऊन व प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. असे उद्योजक विकास शिंदे यांना वाटते. पुणे शहरात शून्यातून विश्व निर्माण करून एक यशस्वी उद्योजक झाल्यानंतरही ते कधीच कुठल्याही व्यसनाच्या विळख्यात सापडले नाही. व्यायाम, मेडिटेशन चांगली पुस्तके वाचणे हे त्यांचे छंद आहेत.


"आमचे वडील माळकरी असल्यामुळे पहिल्यापासूनच वारकरी संप्रदायाचे संस्कार आमच्यावरती झालेले आहेत. निर्व्यसनी राहून, आमच्या आवडीच्या क्षेत्रात प्रामाणिकपणे, जिद्दीने, चिकाटीने काम करणे हीच माझी आवड आहे. तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. व्यवसायिक क्षेत्रात आमच्या मित्रांनी, मोठया लोकांनी पार्टीमध्ये मद्यपेय करण्याचा आग्रह केला तरी मी कधीच त्याला बळी पडलो नाही.  मोठया - मोठया हॉटेलचे बिल मी भरले परंतु मी कधीच कुठले व्यसन केले नाही. आमच्या व्यावसायिक क्षेत्रात लोकांना चांगली सेवा देण्यासाठी, निर्व्यसनी राहून प्रामाणिकपणे काम करणे हीच माझी ताकद आहे.' असे विकास शिंदे यांनी सांगितले.


पुणे शहरात प्लंबिंगच्या व्यवसायात विकास शिंदे यांचा जम बसत असतानाच त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाचे शिक्षण ही काम करत असताना पूर्ण केले. पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात त्यांनी 400 - 450 स्क्वेअर फुटची अशी शेकडो घरे लोकांना बांधून दिली.


"गावाकडे समाज मंदिर बांधण्याचा अनुभव असल्यामुळे तसेच पुणे शहरात आल्यानंतर प्लंबिंग, बांधकाम क्षेत्रातील अनुभवामुळे मी वारजे माळवाडी परिसरात 400 - 450 स्क्वेअर फुटची छोटी - छोटी अशी 150 घरे बांधली. प्लंबिंगच्या व्यवसायात प्रगती करत असतानाच, सिविल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पुण्यात पूर्ण केला त्याचा मला भविष्यात खूप फायदा झाला. कुठल्याही व्यवसायात चांगल्या लोकांची साथ मिळणे खूप गरजेचे असते." असे विकास शिंदे यांनी सांगितले.


कुठलाही व्यवसायात काम करत असताना प्रगतीच्या नवनवीन संधी शोधणे खूप गरजेचे असते. 2007 साली विकास शिंदे यांनी गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टरचे लायसन्स काढून नवीन व्यावसायिक जीवनाला सुरुवात केली. पुणे जिल्ह्यातील शिरूरला पहिला नळ्यांचा पूल (पाईप कलवर्ट) विकास शिंदे यांनी बांधला त्यासाठी स्वतः त्यांच्या भावाबरोबर खांद्याला खांदा लावून, सेंट्रिंग पासून काँक्रीट पर्यंतची सर्व कामे त्यांनी स्वतः कामगारांच्या मदतीने केली. त्याकाळी दोन लाख 89 हजाराचे ते काम होते. या पहिल्या पुलाच्या बांधकामानंतर त्यांनी शेकडो पुलांची दर्जेदार कामे खेड व शिरूर तालुक्यामध्ये केली. यानंतर विकास शिंदे यांनी बांधकाम व्यवसाय क्षेत्रात कधीच मागे वळून पाहिले नाही. मोठमोठ्या पुलांच्या कामापासून ते नामांकित कॉलेजच्या इमारतीची कामे, सरकारचे विविध विभागांचे मोठे मोठे प्रकल्प त्यांनी यशस्वी पूर्ण केले.


"मला नेहमीच आव्हानात्मक कामे करायला आवडतात. 2007 साली गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरचे लायसन काढल्यानंतर आम्ही नळ्यांच्या पुलाची (पाईप कलवर्ट) तसेच आरसीसी साकव पूल, मोठया पुलाची शेकडो कामे खेड तालुक्यात व शिरूर तालुक्यात तसेच पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात केली. महाराष्ट्रातील नामांकित अभियांत्रिकी विद्यालय कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे त्या कॉलेजची खास डिझाईन असलेले दगडी भिंतीचे कामही आम्ही 2007 साली केले. 2011 साली पुसेसावळी येथे भारती विद्यापीठचे मोठे कॉलेज बांधले. अशी अनेक मोठी आव्हानात्मक कामे केल्यानंतर खूप ऊर्जा मिळायची." असे बांधकाम व्यवसायिक विकास शिंदे यांनी सांगितले.


कुठल्याही व्यवसायात प्रगती करत असताना चढ-उतार असतो. अनेक संकटांचा, विविध अडचणींचा सामना करावा लागतो. 2007 साली कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे यांच्या दगडी भिंतीचे काम केल्यानंतर त्याचे पेमेंट मिळायला खूप वेळ लागला या काळामध्ये आर्थिक अडचणींचा सामना विकास शिंदे यांना करावा लागला.


"आम्ही 2007 साली महाराष्ट्रातील नामांकित असणाऱ्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यांच्या दगडी भिंतीचे काम खूप चांगल्या प्रकारे केले परंतु त्याचे पेमेंट मिळायला खूप वेळ लागला. या काळामध्ये खूप आर्थिक अडचणींना आम्हाला सामोरे जावे लागले. घरातील सोने गहाण ठेवून, आम्हाला अडचणीतून बाहेर पडावे लागले. व्यवसाय करत असताना अशा अडचणी येतात परंतु संयम ठेवला तर त्यातून नक्कीच मार्ग निघतो." असे विकास शिंदे यांनी सांगितले.


"पुणे शहरातील कंपनीत स्टोअर डिपार्टमेंटला सामान्य कामगार म्हणून काम करणारा तरुण, प्लंबिंगचे काम करणारा मेहनती तरुण, प्रचंड कष्ट व मेहनत घेऊन वयाच्या 24 व्या वर्षी पुणे शहरात एक चांगला गृहप्रकल्प बांधून बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील बिल्डर बनला. विकास शिंदे यांनी वयाच्या 24 व्या वर्षी पुणे शहरात  प्रथमा हाईट्स हा गृहप्रकल्प त्यांच्या ओम कन्स्ट्रक्शन या फर्मच्या माध्यमातून यशस्वीपणे उभा केला. फाटक्या चड्डीवरती गावाकडे शिक्षण घेणारा मुलगा पुणे शहरात येऊन कंपनीत सामान्य कामगार म्हणून काम करून त्यानंतर प्लंबिंगचे काम करून, नवनवीन आव्हाने स्वीकारून जिद्दीने, चिकाटीने, मेहनत करून वयाच्या 24 व्या वर्षी कन्स्ट्रक्शन क्षेत्रात बिल्डर बनतो हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता."


"आयुष्यात तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं तर तुम्हाला नक्कीच चांगल्या संधी मिळतात. पुण्यात प्लंबिंगचे काम करत असताना तसेच छोट्या - छोट्या घरांची काम करत असताना, मला 2008 साली प्रथमा हाईट्स हा एक चांगला गृहप्रकल्प बांधण्याची संधी मिळाली. पुणे शहरातील मध्यमवर्गीय लोकांना कमी दरामध्ये चांगल्या सुविधा असलेले त्यांचे घर मिळवून देण्याची जबाबदारी आमच्या ओम कन्स्ट्रक्शनने चांगल्या प्रकारे पार पाडली. वयाच्या 24 व्या वर्षी बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील बिल्डर बनल्यानंतर पुणे शहरात आम्हाला प्रथमा हाईट्स, सह्याद्री, सह्याद्री व्हीला हे गृह प्रकल्प आमच्या ओम कन्स्ट्रक्शन कंपनीने उभे केले. पुण्यातील कोंडवे - धावडे येथे लक्ष्मी हेरिटेज हा जॉईंटवेंचर असलेला गृहप्रकल्प आम्ही खूप मेहनतीने पूर्ण केला. एक बिल्डर म्हणून मध्यमवर्गीय लोकांना चांगल्या गृहप्रकल्पाच्या माध्यमातून चांगली घरे देता आली याचे खूप समाधान आहे." असे बांधकाम व्यावसायिक विकास शिंदे यांनी सांगितले.


वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी बिल्डर म्हणून काम करत असताना विकास शिंदे यांना पहिल्या गृहप्रकल्पासाठी पुण्यातील शाहू बँकेने खूप सहकार्य केले. शाहू बँकेचे चेअरमन आबासाहेब शिंदे यांनी विकास शिंदे यांना त्यावेळेस मोलाचे सहकार्य केले. विकास शिंदे यांनी पुणे शहरात अल्पावधीतच प्रथमा हाईट्स, सह्याद्री, सह्याद्री व्हीला हे गृहप्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले परंतु त्यानंतर पुण्यातील कोंढवे - धावडे येथील लक्ष्मी हेरिटेज या जॉईंट व्हेंचर असलेल्या गृहप्रकल्पावेळी त्यांना खूप आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.


"कुठल्याही व्यावसायात मोठी संकटे आल्याशिवाय माणसाची मोठी जडणघडण होत नाही. पुणे शहरातील कोंढवे - धावडे येथील जॉईंट व्हेंचर असलेल्या लक्ष्मी हेरिटेज गृहप्रकल्प पूर्ण करण्यासाठी आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्याकाळी आमची जेसीबी, डंपर होती. काम चालू होतं. बिल्डिंगसाठी स्टील आणलेलं होते. परंतु नवीन गृहप्रकल्पाचे बुकिंग लवकर होत नव्हतं त्यामुळे आर्थिक अडचणीचा सामना आम्हाला करावा लागत होता. आमचा गृहप्रकल्प पूर्ण होण्यासाठी वेळ लागत होता. स्टील वाले व्यापारी, ग्राहक घरी येऊन शिव्या देत होते. आमच्यासाठी तो खूप वेदनादायी काळ होता. परंतु माझ्या घरातील महिलांनी त्या काळात खूप साथ दिली. घरातील सोने गहाण ठेवून आर्थिक अडचणींवरती मात करावी लागली. काही कालावधीनंतर, आम्ही सर्व अडचणींवरती मात करून, तो लक्ष्मी हेरिटेज गृहप्रकल्प आम्ही यशस्वी पूर्ण केला याचे समाधान आहे." असे बांधकाम व्यावसायिक विकास शिंदे यांनी सांगितले.


पुणे शहरात घराच्या किमती खूप गगनाला भिडलेल्या आहेत. सर्वसामान्य लोकांनी पुणे शहरात घर विकत घेणे प्रचंड महागाईमुळे व गृहप्रकल्पांचे वाढलेले अवाजवीदर यामुळे घर घेणे जनसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले आहे. परंतु पुणे शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसाय विकास शिंदे यांनी सर्वसामान्य लोकांना घर घेता यावे , पुण्यात स्वतःचे घर घेण्याचे सामान्य लोकांचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी खूप कमी किमतीत, दर्जेदार व घराचे पैसे टप्प्याटप्प्यात जनसामान्यांच्या आर्थिक उत्पन्नानुसार देण्याची सुविधा देऊन, शेकडो लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण केले. पुणे शहरातील नारळ विक्रेत्या लोकांपासून, छोट्या - छोट्या व्यवसाय करणाऱ्या सामान्य वर्गालाही विकास शिंदे यांनी त्यांच्या बजेटनुसार, मासिक कमी हप्त्यांची सुविधा देऊन, दर्जेदार घरे चांगल्या गृहप्रकल्पातून दिली.


पुणे शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक म्हणून विकास शिंदे चांगले गृहप्रकल्प करत होते तसेच गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून विविध सरकारी विभागांचे चांगले मोठे प्रकल्प, शिक्षण क्षेत्रातील चांगले प्रकल्प यशस्वीरित्या करत होते. व्यावसायिक प्रगती करत असताना अचानक मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो. विकास शिंदे यांच्या ओम कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या प्रगतशील प्रवास सुरू असताना 2016 - 17 मध्ये एका खूप मोठ्या आर्थिक संकटाला त्यांना सामोरे जावे लागले. ओम कन्स्ट्रक्शन या विकास शिंदे यांच्या कंपनीवरती इन्कम टॅक्स विभागाने छापा टाकला. त्या कठीण काळात विकास शिंदे यांना खूप संयमाने, सचोटीने अडचणीतून मार्ग काढावा लागला.


"आमच्या ओम कन्स्ट्रक्शन कंपनीची बांधकाम क्षेत्रात प्रगतशील वाटचाल सुरू असताना 2016 - 17 च्या दरम्यान खूप मोठ्या आर्थिक संकटाला आम्हाला सामोरे जावे लागले. इन्कम टॅक्स विभागाची आमच्या कंपनीवरती रेड पडली. आम्ही आमच्या कंपनीचा दरवर्षी नियमित टॅक्स भरत असताना देखील या अचानक रेड मुळे खूप मोठ्या संकटांना आम्हाला सामोरे जावे लागले. 55 लाख रुपयांचा दंड भरून आम्ही इन्कम टॅक्स विभागाच्या कारवाईतून मुक्त झालो पण त्यासाठी या मोठ्या आर्थिक अडचणीच्या काळात आम्हाला आमचे पुणे शहरातील महत्वाच्या ठिकाणचे दोन प्लॉट्स विकावे लागले. घरचे दागिने गहाण ठेवावे लागले. या कठीण काळात आमच्या घरातील महिला वर्गांनी खूप खंबीरपणे साथ दिली. तो दोन वर्षांचा खूप वाईट काळ होता आमच्यासाठी. परंतु संयमाने, प्रामाणिकपणे,जिद्दीने, चिकाटीने  आम्ही संकटावरती मात करून आमच्या बांधकाम क्षेत्रात भविष्यात चांगले प्रकल्प करू शकलो याचे मात्र नक्कीच समाधान आहे." असे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विकास शिंदे यांनी सांगितले.


"कुठल्याही तरुण उद्योजकाने ज्यावेळेस शून्यातून विश्व निर्माण केलेले असते आणि एक मोठे संकट येते ज्याच्यामुळे तुमचं उद्योग साम्राज्य उद्ध्वस्त होण्याचे चित्र दिसते अशा वेळेस अनेक उद्योजक आत्महत्या करतात. निराशेने खचून जाऊन, उद्ध्वस्त होतात परंतु बांधकाम व्यावसायिक विकास शिंदे यांच्या व्यावसायिक आयुष्यात अनेक मोठ - मोठे संकटे आली परंतु खचून न जाता, निराश न होता त्यांनी जिद्दीने, चिकाटीने प्रचंड मेहनत घेऊन, संयमाने सर्व संकटांवरती व अडचणींवरती मात केली हे महाराष्ट्रातील तरुण उद्योजकांसाठी खूप प्रेरणादायी आहे.


"व्यवसायिक क्षेत्रामध्ये आव्हानात्मक काम करत असताना अनेक मोठ - मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो. आमच्या ओम कन्स्ट्रक्शन कंपनीचे बांधकाम क्षेत्रातील मोठ - मोठे करोडो रुपयांची उलाढाल असलेले प्रकल्प यशस्वी पूर्ण करत असतानाही आम्हाला अनेक मोठ्या संकटांचा, अडचणींचा सामना करावा लागला. मोठ्या आर्थिक संकटावेळी आत्महत्येचे विचार आले परंतु आमच्या कंपनीने केलेले चांगले काम, आमच्या आई-वडिलांचे आशीर्वाद, आमचे चांगले सहकारी व माझ्या घरातील महिला वर्ग व आमचे बंधू ,आमचे सर्व मार्गदर्शक, चांगले मित्र या सर्वांचे सहकार्य मिळाल्यामुळे सर्व संकटांवरती मात करून, आम्हाला आमच्या बांधकाम क्षेत्रात खूप चांगले काम करता आले. व्यायाम, मेडिटेशन,सात्विक आहार व निसर्गाच्या सानिध्यात घालवलेले चांगले दिवस यामुळे आम्हाला नेहमीच ऊर्जा मिळते. माझा चांगल्या कर्मावर खूप विश्वास आहे. व्यावसायिक क्षेत्रात मोठी संकटे आल्याशिवाय माणूस मोठा होत नाही." असे बांधकाम व्यवसायिक विकास शिंदे यांनी सांगितले"


भारतामध्ये जो व्यावसायिक प्रामाणिकपणे सरकारला टॅक्स देत  असतो त्या प्रत्येक व्यावसायिकाला सरकारने चांगल्या सुविधा देणे अपेक्षित आहे. टॅक्स प्रणाली अनेक वेळा गुंतागुंतीचे असल्यामुळे व्यावसायिक लोकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. अशा भावना नवीन उद्योजक लोकांकडून व्यक्त केल्या जातात.


"आम्ही प्रामाणिकपणे आमच्या व्यावसायाच्या उत्पन्नावरती सरकारला टॅक्स देत असतो. सरकारने आम्हाला चांगल्या सुविधा देणे अपेक्षित आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी जी व्यवसायिक मंडळी टॅक्स देऊन सेवा करत असतात त्यांना सरकारने मोफत जीवन विमा व मेडिक्लेम सुरक्षा देणे गरजेचे आहे. व्यवसाय करत असताना आम्हाला अनेक मोठ मोठ्या संकटांना, अडचणींना तोंड द्यावे लागते त्यामुळे कुटुंबाची सुरक्षाही खूप महत्त्वाची आहे" असे बांधकाम व्यवसायिक विकास शिंदे यांनी सांगितले.


मुलांच्या प्रगतीसाठी त्यांच्यावरती चांगले संस्कार करणे खूप गरजेचे असते विकास शिंदे यांनी त्यांच्या मुलांवरती चांगले संस्कार करून, चांगले उच्च शिक्षण दिले. मुलांना गावाकडील शेतीचे महत्व, निसर्गाचे महत्व, प्राणायाम, योगासन व्यायामाचे महत्त्व त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले.


"कुठलाही व्यवसाय वाढवण्यासाठी भांडवलाची, कर्जाची आवश्यकता असते. व्यवसायातील उत्पन्न वाढल्यानंतर, व्यवसाय वाढवण्यासाठी योग्य प्रमाणात कर्ज घेतले तर ते गैर नसते. व्यवसायाचे कर्ज वेळेत फेडून, व्यवसायाच्या माध्यमातून लोकांना चांगली सेवा दिल्यानंतर निश्चितच प्रगतीचे पुढचे टप्पे गाठता येतात. असे बांधकाम व्यवसायिक विकास शिंदे यांनी सांगितले.


"आमच्या ओम कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांसाठी विकास आराखड्यातील मोठमोठे प्रकल्प करता आले. पुणे एअरपोर्ट, केंद्र सरकारच्या मिलिटरी विभागाचे आर्मी इंजीनियरिंग कॉलेज,भारती विद्यापीठ यांच्यासाठी चांगले प्रकल्प करता आले. भारतातील नामांकित अशा बीजी शिर्के ग्रुप व टी अँड टी इन्फ्रा ग्रुप या नामांकित कंपनीसाठी आम्हाला चांगले प्रकल्प करता आले याचे खूप समाधान वाटते." असे बांधकाम व्यावसायिक विकास शिंदे यांनी सांगितले.


महाराष्ट्रात सरकारने विविध जिल्ह्यांमध्ये विविध सरकारी विभागांचे कामे करत असताना, सरकारी ठेकेदारांची बिले वेळेवर दिली पाहिजेत. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे कार्य संपूर्ण देशासाठी विकास कामांच्या बाबतीत दिशादर्शक आहे. असे मत विकास शिंदे यांनी व्यक्त केले.


"आमच्या ओम कन्स्ट्रक्शन कंपनीला पुरंदर तालुक्यातील पालखी महामार्गाचे काम करण्याची संधी मिळाली याचा खूप आनंद आहे. नीरा नदीवरील मोठा पूल, सासवड ते दिवे घाट दरम्यानचे उड्डाणपूल, सासवड बायपास, पुण्यातील नदी सुधार प्रकल्प संगमवाडी घाटाचे 30 कोटीचे काम अशी आव्हानात्मक कामे आमच्या कंपनीला करता आली याची खूप समाधान आहे. पुणे एअरपोर्टचा प्रकल्प, आर्मी इंजिनिअरिंग कॉलेजचे ट्रेनिंग सेंटर, रयत शिक्षण संस्थेची बिल्डिंग,भारती विद्यापीठ, सणस विद्यालय, आंबेडकर कॉलेज, पिंपरीचे वाघिरे कॉलेज, एमबीए कॉलेज, शिक्षण क्षेत्रातील खूप चांगले प्रकल्प आमच्या ओम कन्स्ट्रक्शन कंपनीला करता आले. याचे खूप समाधान आहे." असे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विकास शिंदे यांनी सांगितले.


"पुणे रिंग रोडचा 125 कोटीचा महत्त्वाचा प्रकल्प आमच्या कंपनीला मिळालेला आहे. ते काम प्रगतीपथावर आहे. दीड किलोमीटरच्या दोन लेन, फ्लायओव्हर इंटरचेंज हे खूप उत्तम दर्जाचे  काम असणार आहे. पुणे शहराच्या प्रगतशील वाटचालीमध्ये पुणे रिंग रोडचे खूप महत्त्वाचे योगदान असणार आहे. कोल्हापूर मधील ब्लॅक स्पॉट असणाऱ्या 624 मीटर उड्डाणपुलाचे काम आमच्या कंपनीने यशस्वीपणे पूर्ण केलेले आहे. आमच्या ओम कन्स्ट्रक्शन कंपनीची उत्तम टीम सर्व प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करते याचा खूप आनंद आहे." असे प्रसिद्ध व्यावसायिक विकास शिंदे यांनी सांगितले.


"महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम भागातही आमच्या ओम कन्स्ट्रक्शन कंपनीने चांगले प्रकल्प केले आहेत. कोयना धरणाच्या डोंगराळ, दुर्गम भागात आमच्या ओम कन्स्ट्रक्शन कंपनीने पुनर्वसनाचे प्रकल्प खूप यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत. ज्या ठिकाणी वाघ, बिबटे, गवे येतात. मोबाईल रेंज नसते अशा ठिकाणी एक सुंदर असे काहीर गाव पुनर्वसन प्रकल्पांतर्गत आमच्या ओम कन्स्ट्रक्शन कंपनीने वसवले आहे. उत्तम दर्जाची चाळीस रो हाऊसेस त्या गावात आम्ही बांधली. अजून एका आदर्श गावाचे काम पुनर्वसन प्रकल्पांतर्गत त्या दुर्गम ठिकाणी चालू आहे. त्यामध्ये रेन वॉटर, टॉयलेट, शाळा, मंदिर, कंपाऊंड, समाजमंदिर,  तटबंदी अशा प्रकारचा सर्वांग सुंदर महत्वकांक्षी प्रकल्प आम्ही दुर्गम भागात यशस्वीरित्या करत आहोत याचा आम्हाला अभिमान आहे." असे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विकास शिंदे यांनी सांगितले.


प्रचंड कष्टाने व मेहनतीने उभ्या केलेल्या ओम कन्स्ट्रक्शन या बांधकाम क्षेत्रातील कंपनीचा टर्नओव्हर वार्षिक उलाढाल यावर्षी शंभर कोटीच्या घरात गेलेली आहे. ओम कन्स्ट्रक्शन कंपनीच्या ऑफिसमध्ये 80 कर्मचारी आहेत तसेच मोठ्या प्रकल्पांच्या साईट वरती लेबर, ड्रायव्हर, कॉन्ट्रॅक्टर, कामगार असा अडीचशे लोकांचा कामगार वर्ग आहे. या सर्वांच्या एकजुटीमुळेच आम्हाला प्रकल्प यशस्वी करता येतो. असे विकास शिंदे यांनी सांगितले.


निर्व्यसनी, प्रामाणिक, होतकरू असणाऱ्या विकास शिंदे यांच्यावरती त्यांचे सासरे निगडे साहेब यांनी विश्वास ठेवून, त्यांच्या मुलीचा लग्न सोहळा, पुण्यात खूप थाटामाटात करून, शिंदे कुटुंबात त्यांची मुलगी दिली. विकास शिंदे यांच्या पत्नी मंजुषा शिंदे यांचे विकास शिंदे यांचे व्यावसायिक प्रगतीमध्ये खूप महत्त्वाचे योगदान आहे.


"माझ्या व्यावसायिक प्रगतीसाठी माझे सासरे निगडे साहेब हे माझे गुरु, मार्गदर्शक आहेत. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील होतकरू मुलावरती त्याकाळी विश्वास ठेवून, त्यांच्या उच्चशिक्षित मुलीची लग्नगाठ माझ्याशी बांधली. माझ्या आयुष्यात व्यावसायिक प्रगतशील वाटचालीमध्ये माझी पत्नी मंजुषा हिचे खूप महत्त्वाचे योगदान आहे. तिने अडचणीच्या काळात खूप खंबीरपणे मला साथ दिलेली आहे." असे बांधकाम व्यावसायिक विकास शिंदे यांनी सांगितले.


"माझ्या संपूर्ण कुटुंबाची साथ माझ्या व्यावसायिक प्रगतीमध्ये मला खूप मिळाली. माझ्या आई-वडिलांचे आशीर्वाद व प्रेरणा, माझा भाऊ संतोष याची खंबीर साथ, माझा मित्रपरिवार, नातेवाईक व आमच्या ओम कन्स्ट्रक्शन कंपनीतील सर्व कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग, माझे सर्व मार्गदर्शक यांची मला खूप साथ मिळाली." असे बांधकाम व्यावसायिक विकास शिंदे यांनी सांगितले.


"माझा भाऊ संतोष यांचे माझ्या व्यावसायिक प्रगतशील वाटचालीमध्ये व कुटुंबाच्या प्रगतशील वाटचालीमध्ये खूप महत्त्वाचे योगदान आहे. माझा भाऊ माझ्यासाठी फक्त भाऊच नाही तर मित्रासारखे आमचे खूप सुंदर नाते आहे. कुठल्याही संकटात, अडचणीच्या वेळी माझ्याबरोबर खंबीरपणे तो उभा असतो. कुठल्याही व्यावसायिक क्षेत्रात मोठी झेप घ्यायची असेल तर तुमचे संपूर्ण कुटुंब तुमच्याबरोबर असल्यावरती ती तुमची खूप मोठी ताकद असते." असे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विकास शिंदे यांनी सांगितले.


"कुठल्याही व्यवसायात मोठे यश मिळण्यासाठी चांगल्या मार्गदर्शकाची खूप आवश्यकता असते. आमच्या बांधकाम क्षेत्रात मला टी अँड टी इन्फ्रा कंपनीचे तांदूळकर साहेब व थोरात साहेब यांचे खूप मोलाचे मार्गदर्शन लाभले. ओम कन्स्ट्रक्शन कंपनीला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये चांगले प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी थोरात साहेब व तांदुळकर साहेबांचे खूप मोठे सहकार्य लाभले. मला त्यांच्याकडून नेहमीच प्रेरणा व बळ मिळते." असे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विकास शिंदे यांनी सांगितले.


"आजच्या तरुण पिढीने कुठलाही व्यवसाय करताना त्यातील खाचखळगे शोधले पाहिजेत. स्वतःवरती विश्वास ठेवून, योग्य दिशेने प्रचंड कष्ट व मेहनत घेऊन, तुमच्या आवडीच्या क्षेत्रात मोठे काम केले पाहिजे. मालक न बनता उत्तम सेवा देण्याचा ध्यास अंगी बाळगला पाहिजे." असे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विकास शिंदे यांनी सांगितले.


"आमच्या ओम कन्स्ट्रक्शन कंपनीचा यावर्षीचा टर्नओव्हर वार्षिक उलाढाल 100 कोटीच्या घरात आहे. महाराष्ट्र गर्जना न्यूजच्या "प्रेरणादायी शिलेदार" या उपक्रमातील मुलाखतीच्या माध्यमातून आमच्या कंपनीचा प्रेरणादायी प्रवास महाराष्ट्रातील लाखो वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच आमच्यासाठी आनंददायी आहे. या मुलाखतीतून आम्हाला मिळणारी प्रेरणा व ऊर्जा आमच्या प्रगतशील वाटचालीसाठी महत्त्वाची आहे. आम्ही निश्चितच पुढील दोन - तीन वर्षांमध्ये 500 कोटीची वार्षिक उलाढाल असणारी बांधकाम क्षेत्रातील उत्तम कंपनी बनवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू. आमचे हे स्वप्न नक्कीच आम्ही जिद्दीने, चिकाटीने, प्रचंड मेहनत करून पूर्ण करू." असे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विकास शिंदे यांनी सांगितले.


"पुरंदर तालुक्यातील सर्वसामान्य गरीब शेतकरी कुटुंबात फाटक्या चड्डीवरती प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून, शालेय शिक्षण घेणारा मुलगा ते वयाच्या पंधराव्या वर्षी गावात समाजमंदिर बांधण्याचे आव्हान पेलणारा मुलगा ते पुणे शहरात पोट भरण्यासाठी कंपनीत काम करणारा सामान्य कामगार ते प्लंबिंगचे काम करून, प्रचंड कष्ट मेहनत करून वयाच्या 24 व्या वर्षी  बांधकाम क्षेत्रातील बिल्डर ते जिद्दीने, चिकाटीने, प्रचंड मेहनत घेऊन शंभर कोटीची उलाढाल असणाऱ्या ओम कन्स्ट्रक्शन कंपनीचा मालक हा प्रेरणादायी प्रवास महाराष्ट्रातील सर्व तरुण पिढीसाठी खूपच ऊर्जा देणारा व प्रेरणादायी आहे."


महाराष्ट्रातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, प्रेरणादायी शिलेदार, विकास शिंदे यांच्या भावी प्रगतशील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा...


लेखक : अजित श्रीरंग जगताप, पत्रकार, संपादक - महाराष्ट्र गर्जना न्यूज.




No comments:

Post a Comment