Thursday, January 29, 2026

"महाराष्ट्राचे लोकनेते,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्र शोकसागरात; बारामतीचे हृदय हरपले, शोकाकुल वातावरणात 'महाराष्ट्राच्या लाडक्या अजितदादांवर' शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; सहकारातील शिलेदार ते महाराष्ट्राचे सत्ताकेंद्र ते शब्दाला जागणारा लोकनेता,विकासपुरुष; बारामतीकरांनो आपल्या अजितदादांचे "हे" स्वप्न पूर्ण करा"...

बारामती,दि.२९ : महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी विमान अपघातात निधन झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राभर  शोककळा पसरली. महाराष्ट्राचे दिलखुलास, लोकप्रिय नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यातील लाखो - करोडो लोकांना धक्का बसला. लोकनेते अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे बारामतीकरांचे हृदय हरपले.

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावाती नेतृत्व, राज्याचे उपमुख्यमंत्री,लोकनेते अजित पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी एका भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. बारामती येथील गोजुबावी परिसरात झालेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली. एका कार्यक्षम प्रशासकाचा, लोकनेत्याचा असा अकाली अंत होणे, ही राज्याच्या राजकीय इतिहासातील मोठी पोकळी मानली जात आहे.

​लोकनेते अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी येत असताना बुधवारी 'लिअरजेट ४५' या खाजगी विमानाने प्रवास करत होते. सकाळी ८:४५ च्या सुमारास बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना दाट धुक्यामुळे वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज आला नाही. 'गो-अराउंड' (पुन्हा हवेत उडणे) करण्याच्या प्रयत्नात तांत्रिक बिघाड झाल्याने, विमान शेतात कोसळले आणि क्षणात आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या भीषण दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांनी प्राण गमावले.

या दुर्दैवी घटनेने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली. 29 जानेवारी रोजी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानावर बारा वाजून आठ मिनिटांनी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ व जय पवार यांनी अजित पवारांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी जमलेल्या लाखो लोकांनी व बारामतीकारांनी अश्रूंचा बांध फोडत,आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक प्रमुख नेते त्यावेळी उपस्थित होते.

"ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये महत्त्वाचे योगदान असणारे लोकनेते, राज्याच्या प्रशासनावर उत्तम पकड असलेले ध्येयवादी नेते अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्यातील लाखो लोकांचा काळजाचा ठोका चुकला. हजारो बारामतीकर, लाखो अजितदादा प्रेमी शोकसागरात बुडून गेले."

"माझ्या बारामती शहराला देशातील क्रमांक एकचे विकसित शहर बनवायचे आहे." हे लोकनेते अजित पवार यांचे स्वप्न आता बारामतीकरांनाच पूर्ण करावे लागणार आहे. बारामतीकर जनता ही योग्य नेतृत्वाची निवड करून, बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नेत्यांच्या  पाठीशी खंबीरपणे उभी राहते. 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांची राजकीय कारकीर्द ही केवळ एका व्यक्तीची यशोगाथा नसून, महाराष्ट्राच्या राजकारणातील एका प्रगल्भ आणि कार्यक्षम नेतृत्वाचा प्रवास आहे. सहकार क्षेत्रापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास सत्तेच्या सर्वोच्च शिखरापर्यंत जनसेवेतून पोहोचला.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

महाराष्ट्राच्या राजकारणात 'दादा' या नावाने लोकप्रिय असलेले अजित पवार हे एक असे नेतृत्व होते, ज्यांच्या नावाशिवाय राज्याच्या राजकारणाची चर्चा पूर्ण होऊ शकत नाही. निर्भीड,स्पष्टवक्तेपणा, प्रशासकीय पकड आणि वेळेचे पक्के नियोजन या गुणांच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्राच्या सत्तेत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले.

महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, लोकनेते अजित पवार यांची प्रभावशाली राजकीय कारकीर्द ​: -

सहकारातून सत्तेच्या मुख्य प्रवाहात :

लोकनेते ​अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. राजकारणाचे बाळकडू त्यांना त्यांचे काका आणि भारताचे ज्येष्ठ नेते,माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडून मिळाले. १९८२ मध्ये एका सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून येऊन त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा श्रीगणेशा केला. १९९१ मध्ये ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (PDCC) अध्यक्ष झाले, जिथे त्यांनी सलग १६ वर्षे आपली पकड कायम ठेवून सहकार क्षेत्रात स्वतःचे वर्चस्व निर्माण केले.

संसदीय आणि विधानसभा कारकीर्द : 

​अजित पवार यांनी १९९१ मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. मात्र, काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले. १९९१ पासून ते आजतागायत त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. गेल्या सात दशकांपासून बारामती आणि पवार कुटुंब हे समीकरण त्यांनी आपल्या विकासकामांच्या जोरावर घट्ट केले.

​विक्रमी 'उपमुख्यमंत्री' आणि अर्थमंत्री : 

​अजित पवार यांच्या नावावर एक अनोखा विक्रम आहे – त्यांनी सहा वेळा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा विविध मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात त्यांनी ही धुरा समर्थपणे सांभाळली.

​अर्थमंत्री म्हणून दबदबा : राज्याचा अर्थमंत्री म्हणून त्यांनी ११ वेळा अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्राच्या आर्थिक नियोजनावर त्यांची करडी नजर असायची. कामाचा उरक इतका की, सकाळी ६ वाजल्यापासून त्यांचे दौरे आणि बैठका सुरू व्हायच्या.

महत्त्वाची पदे आणि योगदान :

​अजित पवार यांनी जलसंपदा, ऊर्जा, नियोजन, ग्रामीण विकास आणि वित्त अशा महत्त्वाच्या खात्यांचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

१. सिंचन क्षेत्र : राज्याच्या सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी त्यांनी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावले.

२. पायाभूत सुविधा : बारामती, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचा कायापालट करण्यात, पुणे मेट्रो आणि रिंग रोडसारख्या प्रकल्पांना गती देण्यात अजित पवार यांचा सिंहाचा वाटा होता.

३. प्रशासकीय शिस्त : "फाईलवरची सही आणि जनतेचा प्रश्न" यात विलंब न लावण्याची त्यांची शैली अधिकाऱ्यांमध्ये धाक निर्माण करणारी होती.

​कोणत्याही मोठ्या नेत्याप्रमाणे लोकनेते अजित पवार यांची कारकीर्द वादांपासून, धक्कादायक राजकीय वळणांपासून दूर राहिली नाही. सिंचन घोटाळ्याचे आरोप असोत किंवा पहाटेचा शपथविधी, त्यांनी अनेकदा राजकीय वादळांचा सामना केला. २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेली फूट आणि त्यानंतर त्यांनी भाजप-शिवसेना युतीसोबत सत्तेत जाण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. राजकीय आयुष्यात कितीही मोठी संकटे, अडचणी आल्या तरी आपण घेतलेल्या राजकीय निर्णयाशी ठाम राहून अजित पवार यांनी लोकांसाठी विकास कामांच्या माध्यमातून प्रामाणिकपणे पोहोचण्याचा प्रयत्न केला.

​अजित पवार हे केवळ बारामतीचे नेते नव्हते, तर ते विकासाची दूरदृष्टी असलेले महाराष्ट्राचे  लोकनेते होते. 'नियोजन' आणि 'अंमलबजावणी' यांचा संगम त्यांच्या कामात दिसायचा.

२८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विमान अपघातात त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक असा नेता गमावला आहे, जो शेवटच्या श्वासापर्यंत राज्याच्या विकासाचा, जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा विचार करत होता.

अजित पवार यांची कार्यशैली ही 'शब्द दिला तर तो पाळायचाच' आणि 'कामात कसलीही तडजोड नाही' यावर आधारलेली होती. 

अजित पवार यांनी राबवलेल्या ऐतिहासिक योजना :

पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा कायापालट : आज आपण जे आधुनिक पुणे आणि पिंपरी-चिंचवड पाहतो, त्याचे नियोजन अजित दादांनीच केले होते. विशेषतः 'नदी सुधार प्रकल्प' आणि मेट्रो रेल्वे प्रकल्पांना त्यांनी आर्थिक बळ दिले.

​जलयुक्त शिवार व सिंचन प्रकल्प : जलसंपदा मंत्री असताना त्यांनी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक प्रलंबित धरणांची कामे मार्गी लावली. 'कृष्णा खोरे विकास महामंडळा'च्या माध्यमातून त्यांनी सिंचनाचे जाळे विस्तारले.

महिलांसाठी विशेष धोरण : अर्थमंत्री म्हणून काम करताना त्यांनी महिलांच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात (Stamp Duty) १% सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता, ज्यामुळे राज्यातील हजारो महिलांना फायदा झाला.


पुणे जिल्हा परिषद शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना अमेरिकेतील जगप्रसिद्ध नासाला - अवकाश संशोधन संस्थेला भेट उपक्रम : महाराष्ट्रातील पहिला असा कार्यक्रम आहे ज्यात ग्रामीण शाळांतील विद्यार्थ्यांना थेट नासा भेटीची संधी दिली जाते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील अधिकारी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत असतात. २०२५ मध्ये निवडलेल्या २५ विद्यार्थ्यांनी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेला भेट दिली, ज्यात नासाच्या कॅनेडी स्पेस सेंटर, स्मिथसोनियन नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियम आणि सॅन फ्रान्सिस्कोतील टेक कंपन्यांचा समावेश होता. डिसेंबर २०२५ पर्यंत ते परतले. इस्रो भेटीही ऑक्टोबर २०२५ मध्ये आयोजित करण्यात आल्या.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

बारामती विकास मॉडेल : बारामतीला सौर ऊर्जेवर चालणारे शहर बनवणे, तिथे अत्याधुनिक रस्ते आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्था (विद्या प्रतिष्ठान) उभारणे, शिक्षण, आरोग्य, उद्योग क्षेत्रातील प्रगतशील वाटचाल हे त्यांच्या विकासाचे 'मॅजिक मॉडेल' मानले जाते.

अजित पवार यांचे भाषण म्हणजे रोखठोक आणि थेट संवाद असायचा. त्यांच्या भाषणाचे काही खास पैलू :

वेळेचे भान : ते भाषणांमध्ये कधीही वेळ वाया घालवत नसत. त्यांच्या भाषणाची सुरुवात आणि शेवट नेहमी वेळेतच होत असे.

​अधिकाऱ्यांना सज्जड दम : "काम करा, अन्यथा खुर्च्या खाली करा," अशा शब्दांत ते भरसभेतून अधिकाऱ्यांना तंबी द्यायचे, ज्यामुळे जनतेमध्ये त्यांची 'काम करणारा नेता' अशी प्रतिमा तयार झाली.

हजरजबाबीपणा : पत्रकारांनी कितीही अवघड प्रश्न विचारले तरी ते आपल्या खास शैलीत आणि कधीकधी विनोदी अंगाने त्याचे उत्तर देत. "माझं चुकलं तर मी जाहीरपणे मान्य करतो," ही त्यांची वृत्ती त्यांच्या भाषणांमधून अनेकदा दिसून आली.

सकाळी ६ ची वेळ : राजकारणात 'पहाटेचा शपथविधी' जितका गाजला, तितकीच त्यांची 'सकाळी ६ ची वेळ' प्रसिद्ध होती. ते पहाटे ६ वाजता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करायचे. पुण्यातील पुलांची कामे असोत किंवा रस्त्यांची, अधिकारी त्यांच्या भेटीमुळे नेहमी सतर्क असायचे.

​शिस्तप्रिय स्वभाव : एकदा मंत्रिमंडळाच्या बैठकीत उशिरा येणाऱ्या मंत्र्यांना त्यांनी जाहीरपणे टोकले होते. "जर आपल्याला जनतेने सेवा करण्यासाठी पाठवले असेल, तर आपण वेळेवर पोहोचलेच पाहिजे," असे त्यांचे मत होते.

बारामती ते मंत्रालय : विकासाचा वस्तुपाठ

​बारामतीचा विकास हे अजित पवारांच्या कल्पकतेचे प्रगतशील रूप आहे. रस्ते, पाणी, शिक्षण आणि उद्योग या चतु:सूत्रीवर त्यांनी बारामतीचा कायापालट केला. पण त्यांचे कर्तृत्व केवळ बारामतीपुरते मर्यादित नव्हते. राज्याचे अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी त्यांच्याकडे असताना, त्यांनी राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यात निधी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मेट्रो असो वा समृद्धी महामार्ग, दादांच्या सहीशिवाय आणि त्यांच्या पाठपुराव्याशिवाय प्रकल्पांना गती मिळणे कठीण असायचे.

कार्यकर्त्यांचा 'दादा' : 

​अजित पवार हे कार्यकर्त्यांसाठी निव्वळ नेते नव्हते, तर ते त्यांचे पालक होते. कार्यकर्त्याच्या घरातील लग्न असो वा दु:खाची घटना, दादांची उपस्थिती तिथे असायचीच. गराडा घालून बसणाऱ्या नेत्यांपेक्षा, थेट फोन उचलून "काय म्हणतोय, काय अडचण आहे?" असे विचारणारे दादा कार्यकर्त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहिले.

कधीही न भरून निघणारी पोकळी : 

​अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक 'अघोषित पर्व' संपले आहे. संकटाच्या काळात निर्णय घेण्याची क्षमता आणि प्रशासकीय पकड असलेला असा नेता मिळणे कठीण आहे. विमान अपघाताच्या त्या काळ्या दिवसाने महाराष्ट्राचा एक हिरा हिरावून नेला असला, तरी त्यांनी उभ्या केलेल्या विकासकामांच्या माध्यमातून 'अजित दादा' हे नाव महाराष्ट्राच्या मातीत सदैव जिवंत राहील.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गुरुवारी शोकाकुल वातावरणात, शासकीय इतमामात बारामती येथे अखेरचा निरोप देण्यात आला. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण करून, अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.

याशिवाय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रताप जाधव, रक्षा खडसे, खासदार मुरलीधर मोहोळ, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, आंध्र प्रदेशचे शिक्षण मंत्री नारा लोकेश, खासदार निरज चंद्रशेखर, मंत्री गणेश नाईक, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, दत्तात्रय भरणे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, मंगल प्रभात लोढा, संजय राठोड, कु.आदिती तटकरे, शंभूराज देसाई, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, प्रा. डॉ. अशोक उईके, नरहरी झिरवाळ तसेच राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, आकाश फुंडकर उपस्थित होते.

प्रशासनाच्या वतीने राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राज्यभरातील खासदार, आमदार, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

अंत्यसंस्कारापूर्वी अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी विद्या प्रतिष्ठान परिसरात पहाटेपासूनच जनसागर उसळला होता. सामान्य नागरिक, शेतकरी, युवक, महिला तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी यांनी शांतपणे रांगेत उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली.

महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, लोकनेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर, लाखो लोकांनी  बारामती येथे येऊन त्यांच्या लाडक्या अजितदादांचे अंत्यदर्शन घेऊन,अखेरचा दंडवत केला. 

"विकासाची दूरदृष्टी असलेला जननायक, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणारा लोकनेता हरपल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम करणारा, प्रमाणिकपणे कार्य करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून कार्यकर्त्यांना बळ देणारा लोकनेता हरपल्यामुळे राज्यातील हजारो कार्यकर्त्यांनी साश्रू नयनांनी हळहळ व्यक्त केली. जनसामान्यांचा विकास केंद्रबिंदू  ठेवून प्रचंड कष्ट व मेहनत करणारा महाराष्ट्राचा लोकनेता, राजकारणातील जनसामान्यांच्या विकासासाठी लढणारा कोहिनूर हिरा हरपल्याची भावना हजारो लोकांनी व्यक्त केली."

"दादा परत या"... "अजितदादा अमर रहे"... या हृदय हेलावून टाकणाऱ्या आक्रोशात बारामतीत हजारो कार्यकर्त्यांनी अश्रूंचा बांध फोडला. लोकनेते अजित पवार यांच्यावरती मनापासून प्रेम करणाऱ्या हजारो - लाखो लोकांचे प्रेम, दुःख, आक्रोश आज संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला.

Sunday, January 18, 2026

"निवडून आलात,जिंकलात आता पाणी प्रश्न सोडवा; पुणे महानगरपालिकेच्या सर्वात मोठया प्रभाग क्रमांक 38 मध्ये पुण्यातील मातब्बर नेते वसंत मोरे यांचा पराभव करून भाजपचे व्यंकोजी खोपडे कसे ठरले जायंट किलर? मा. महापौर दत्तात्रय धनकवडे यांचा पराभव करणारे संदीप बेलदरे यांचा कसा झाला रोमहर्षक विजय? भाजपच्या प्रतिभा चोरघे यांना प्रभागात मोठे मताधिक्य; प्रभाग 38 चा संपूर्ण निकाल, विश्लेषण वाचा सविस्तर"...

पुणे,दि.१८ : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपने महापालिकेत 119 जागा जिंकून खूप मोठे यश मिळवुन, बाजी मारलेली आहे. पुणे महानगरपालिकेतील सर्वात मोठा  पाच सदस्य असलेल्या, बालाजीनगर - कात्रज - आंबेगाव या प्रभाग क्रमांक 38 मध्ये भाजपने तीन जागांवरती विजय मिळवून, बाजी मारलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन उमेदवारांनी या प्रभागामध्ये विजय मिळवून, पक्षाला या प्रभागात दोन जागेवरती यश मिळवून दिलेले आहे. प्रभाग क्रमांक 38 मधील पाण्याची समस्या गंभीर आहे. निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांनी, लोकप्रतिनिधींनी पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशा भावना या प्रभागातील लोकांनी व्यक्त केलेल्या आहेत.

पुणे शहरातील सर्वात मोठया, पाच सदस्य असणाऱ्या प्रभाग क्रमांक 38 बालाजीनगर - आंबेगाव - कात्रज प्रभागामध्ये भाजपचे संदिप बेलदरे, व्यंकोजी खोपडे व प्रतिभा चोरघे यांनी विजय मिळवत बाजी मारलेली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्मिता कोंढरे व सीमा बेलदरे यांनी या प्रभागात विजय मिळवून पक्षाची ताकद दाखवून दिलेली आहे.

पुणे शहरातील सर्वात मोठा प्रभाग असलेल्या प्रभाग क्रमांक 38 मध्ये एक लाख 47 हजार 532 मतदार आहेत. 15 जानेवारीला झालेल्या पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभागातील 54.1% लोकांनी मतदान केल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

बालाजीनगर - आंबेगाव - कात्रज या मोठी लोकसंख्या असणाऱ्या प्रभागामध्ये पाणी समस्या,वाहतूक कोंडी, रस्ते, ड्रेनेज संदर्भात विविध प्रश्न असल्याने जनतेचा कौल काय असेल? याबाबत उत्सुकता होती.

पुणे शहरातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मातब्बर नेते वसंत मोरे यांचा भाजपचे व्यंकोजी खोपडे यांनी 1011 मतांनी पराभव करून, ते जायंट किलर ठरले आहेत. पुणे शहरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वसंत मोरे त्यांच्या सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहेत. पुणे शहरातील हायव्होल्टेज लढत ठरलेला प्रभाग क्रमांक 38 - इ  गटामध्ये पुण्यातील लोकप्रिय, कार्यक्षम नेते वसंत मोरे यांचा झालेला पराभव लोकांसाठी धक्कादायक ठरताना दिसत आहे.

भाजपचे व्यंकोजी खोपडे यांना 21 हजार 878 मते मिळाली तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांना 20 हजार 867 मते मिळाली. भाजपचे व्यंकोजी खोपडे 1011 च्या मताधिक्याने या प्रभाग क्रमांक 38 मधील  इ गटात चुरशीच्या लढाईत विजयी झाले. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली जडणघडण झालेले व्यंकोजी खोपडे यांनी गुजरवाडी - निंबाळकरवाडी गावचे सरपंच म्हणून चांगले कार्य केलेले आहे.ते गोरक्षस्मृती फाउंडेशनचे संस्थापक आहेत, ज्याद्वारे सामाजिक उपक्रम राबवले जातात.

वसंत मोरे यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावरती, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरती संशय व्यक्त करून, नाराजी दर्शवलेली आहे. प्रभाग क्रमांक 38 मधील मतदाना दिवशीचे एकूण मतदान व मतमोजणीच्या दिवशीचे एकूण मतदान याच्यामध्ये विसंगती असल्याचे आरोप वसंत मोरे यांनी केलेले आहेत.

प्रभाग क्रमांक 38 - इ गटात कात्रज परिसरातील तीन तुल्यबळ उमेदवार उभे राहिल्याने मत विभाजनाचा फायदा भाजपच्या व्यंकोजी खोपडे यांना झाल्याचा निवडणुकीच्या निकालावरून दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश कदम यांना 15 हजार 260 मते मिळाले तर शिवसेनेचे नेते स्वराज बाबर यांना 16 हजार 122 मते मिळाली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांना 20 हजार 867 मते मिळाली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश कदम व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांचा पराभव लोकांसाठी धक्कादायक मानला जात आहे. कात्रज परिसरामध्ये विविध विकासकामांच्या माध्यमातून तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून लोकप्रिय असलेल्या या दोन्ही नेत्यांचा पराभव आश्चर्यकारक मानला जात आहे. कात्रज विकास आघाडीच्या माध्यमातून स्वराज बाबर यांनी कात्रज परिसरातील जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळे त्यांना या प्रभागातील 16 हजार 122 लोकांनी मतदान करून, विश्वास ठेवल्याचा दिसून येत आहे.

"पुणे शहरात पाच सदस्य असलेल्या, लोकसंख्येने मोठा असलेल्या प्रभाग क्रमांक 38 - ब मध्ये भाजपचे संदिप बेलदरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांचा 4 हजार 070 मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक 38 ब गटामध्ये भाजपच्या संदिप बेलदरे यांना एकूण 24 हजार 098 मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय धनकवडे यांना 20 हजार 028 मते मिळाली."

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी पुणे शहरात मागील अनेक वर्षांमध्ये तसेच त्यांच्या महापौर कार्यकाळामध्ये पुण्याच्या दक्षिण उपनगरामध्ये लोकांसाठी खूप चांगली विकास कामे केलेली असताना देखील त्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. 

"भाजपचे संदिप बेलदरे यांचा दांडगा जनसंपर्क, पक्ष संघटनेची ताकद, विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मागील काही वर्षात लोकांशी जुळलेली नाळ, भाजपची प्रभावशाली प्रचार यंत्रणा यामुळे अतितटीच्या लढतीत भाजपच्या संदिप बेलदरे यांचा रोमहर्षक विजय झाला."

प्रभाग क्रमांक 38 - ब गटात शिवसेनेच्या अनिल कोंढरे यांना 18 हजार 174 मते मिळाली तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सुनील मांगडे यांना 10 हजार 66 मते मिळाली. या दोन्ही तुल्यबळ उमेदवारांच्या मत विभाजनाचा फायदा भाजपच्या संदिप बेलदरे यांना झाल्याचा निकालावरून दिसून येत आहे.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

"शिवसेनेचे अनिल कोंढरे यांनी आंबेगावच्या पाणी प्रश्नासाठी विविध आंदोलनाच्या माध्यमातून, जनतेचा आवाज महानगरपालिका प्रशासनापर्यंत पोहोचवलेला आहे. आंबेगावातील जनतेच्या विविध प्रश्नांसंदर्भात  त्यांनी वेळोवेळी योग्य भूमिका घेतल्यामुळेच या प्रभागात त्यांना 18 हजार 174 लोकांनी मतदान करून त्यांच्या कामगिरीवरती विश्वास ठेवलेला दिसून येत आहे."

"शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते सुनील मांगडे यांचा जनसंपर्क,विविध सामाजिक उपक्रम  यामुळे प्रभागातील 10 हजार 66 लोकांनी विश्वास ठेवून, मतदान केलेले दिसून येत आहे."


पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक असलेल्या अभिजीतदादा कदम यांना अवघी 3 हजार 922 मते मिळाली.भारती विद्यापीठ, कात्रज परिसरात वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमुळे अभिजित कदम ओळखले जातात.

"पुणे शहरात लोकसंख्येने सर्वात मोठा प्रभाग असलेल्या, सर्वात जास्त पाच सदस्य असलेल्या प्रभाग क्रमांक 38 मधील - ड गटातील लढत खूप लक्षवेधी ठरली. या प्रभाग क्रमांक 38 मधील - ड गटात भाजपच्या प्रतिभा चोरघे यांनी शिवसेनेच्या उमेदवार प्राजक्ता लिपाणे यांचा 10 हजार 863 मतांनी पराभव केला. भाजपच्या प्रतिभा चोरघे यांना 28 हजार 196 मते मिळाली तर शिवसेनेच्या प्राजक्ता लिपाणे यांना 17 हजार 333 मते मिळाली. युवा शेतकरी संघ या सामाजिक संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष रोहिदास बाप्पू चोरघे यांचा दांडगा जनसंपर्क, तरुण पिढीचा पाठिंबा, लोकाभिमुख नेतृत्व, पुरंदर,भोर,राजगड (वेल्हा) तालुक्यातील या प्रभागात असलेल्या लोकांचा पाठिंबा, भाजपची प्रभावशाली प्रचार यंत्रणा यामुळे भाजपच्या प्रतिभा चोरघे यांचा विजय सुकर झाल्याचे निकालावरून दिसून येत आहे."

"राजगड(वेल्हा) तालुक्यातील वांगणी गावचे आदर्श सरपंच, युवा शेतकरी संघ या संघटनेचे नेते रोहिदास बाप्पू चोरघे मागील अनेक वर्षांपासून भारती विद्यापीठ, कात्रज, आंबेगाव परिसरामध्ये वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून कार्यरत आहेत. यामुळे रोहिदास बापू चोरघे यांच्या पत्नी, नवनियुक्त नगरसेविका प्रतिभा चोरघे यांना निवडणुकीसाठी फायदा झालेला दिसून येत आहे. युवा शेतकरी संघाचे नेते रोहिदास बाप्पू चोरघे व नवनियुक्त नगरसेविका प्रतिभा चोरघे आंबेगावातील लोकांचा गंभीर असा पाणी प्रश्न सोडवतील अशा अपेक्षा लोकांमधून व्यक्त केल्या जात आहेत."

या प्रभाग क्रमांक 38 - ड गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सारिका फाटे यांना 17 हजार 007 मते मिळाली. पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार सुवर्णा पायगुडे यांना 9 हजार 800 मते मिळाली. या दोन्ही तुल्यबळ उमेदवारांच्या मत विभाजनाचा फायदा भाजपच्या प्रतिभा चोरघे यांना विजयासाठी झालेला निवडणुकीच्या निकालावरून दिसून येत आहे.

पुणे शहरातील प्रभाग क्रमांक 38 मधील गट - अ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्मिता कोंढरे यांनी भाजपच्या अश्विनी चिंधे यांचा 9 हजार 345 मतांनी पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्मिता कोंढरे यांना 30 हजार 674 मते मिळाली तर भाजपच्या अश्विनी चिंधे यांना 21 हजार 329 मते मिळाली.

"पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेवक राहिलेल्या स्मिता कोंढरे यांनी त्यांच्या नगरसेवकपदाच्या कार्यकाळात आंबेगाव - दत्तनगर - कात्रज परिसरात केलेली विविध विकास कामे तसेच जनहित विकास मंच या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून राबवलेले सामाजिक उपक्रम, राष्ट्रवादी काँग्रेसची प्रभावशाली प्रचार यंत्रणा यामुळे राष्ट्रवादीच्या स्मिता कोंढरे यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून,त्यांचा विजय सुकर झाल्याचे दिसून येत आहे. जनहित विकास मंच या सामाजिक संघटनेचे संस्थापक,अध्यक्ष व कार्यक्षम नेते सुधीर कोंढरे मागील अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून कात्रज - भारती विद्यापीठ परिसरामध्ये कार्यरत आहेत. सुधीर कोंढरे हे  नवनियुक्त नगरसेविका स्मिता कोंढरे यांचे पती असल्यामुळे त्यांच्या सामाजिक कार्याचा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनुभवाचा निश्चितच त्यांना फायदा झाल्याचे दिसून येत आहे."

या प्रभाग क्रमांक 38 - अ गटात शिवसेनेच्या वनिता जांभळे यांना 13 हजार 995 मते मिळाली तर काँग्रेसच्या अस्मिता रानभरे यांना 6 हजार 779 मते मिळाली. या दोन्ही उमेदवारांच्या मत विभाजनाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्मिता कोंढरे यांच्या विजयासाठी झालेला निकालावरून दिसून येत आहे.

पुणे शहरातील पाच सदस्य असलेल्या, सर्वात मोठ्या प्रभाग क्रमांक 38 मध्ये सर्वात जास्त नोटाला (वरीलपैकी एकही नाही) या पर्यायाला  प्रभाग क्रमांक 38 - अ गटात 2 हजार 367 लोकांनी नोटाला( वरीलपैकी एकही नाही पर्याय) मतदान करून, सर्व उमेदवारांना नाकारलेले  निकालावरून दिसून येत आहे.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

पुणे महानगरपालिकेचा पाच सदस्य असलेल्या, लोकसंख्येने सर्वात मोठा असलेल्या प्रभाग  क्रमांक 38 मधील - क गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सीमा बेलदरे यांनी भाजपच्या राणी भोसले यांचा 7 हजार 162 मतांनी पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सीमा बेलदरे यांना 28 हजार 679 एकूण मते मिळाली तर भाजपच्या राणी भोसले यांना 21 हजार 517 एकूण मते मिळाली.

"पुणे महानगरपालिकेतील कार्यक्षम मा.नगरसेवक युवराज बेलदरे यांनी कात्रज - आंबेगाव - दत्तनगर परिसरात केलेली विविध विकास कामे तसेच स्व. संभाजीनाना बेलदरे सामाजिक ट्रस्ट या संस्थेचे माध्यमातून राबवलेले सामाजिक उपक्रम याचा नवनियुक्त नगरसेविका सीमा बेलदरे यांच्या विजयासाठी फायदा झाल्याचा दिसून येत आहे. नवनियुक्त नगरसेविका सीमा बेलदरे यांचे पती मा. नगरसेवक युवराज बेलदरे यांनी कात्रज - दत्तनगरनगर - आंबेगाव प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रामाणिक कार्य, कुशल नेतृत्व, राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचार यंत्रणा याचा फायदा नवनियुक्त नगरसेविका सीमा बेलदरे यांच्या विजयासाठी झाल्याचे दिसून येत आहे. मा. नगरसेवक युवराज बेलदरे यांच्या लोकाभिमुख कार्याचा संदेश देणारे "शब्द नाही काम बोलतयं" हे घोषवाक्य या निवडणुकीत खूप प्रसिद्ध झाले होते."

या प्रभाग क्रमांक 38 - क गटामध्ये शिवसेनेच्या संध्या बर्गे यांना 11 हजार 564 मते मिळाली तर पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका,शिवसेना उद्धव  ठाकरे गटाच्या कल्पना थोरवे यांना 10 हजार 114 मते मिळाली. काँग्रेसच्या पायल घोलप यांना 3 हजार 975 मते मिळाली. या तीनही उमेदवारांच्या मत विभाजनाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सीमा बेलदरे यांच्या विजयासाठी झालेला निकालावरून दिसून येत आहे.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

पुणे महानगरपालिकेचा पाच सदस्य असलेल्या, लोकसंख्येने मोठा असलेल्या प्रभाग क्रमांक 38 मध्ये एकूण 78 हजार 719 लोकांनी मतदान केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुप्रिया करमरकर यांनी दिली.

पुणे शहरातील, दक्षिण उपनगरातील बालाजीनगर - आंबेगाव - कात्रज या प्रभाग क्रमांक 38 मधील लोकांचा गंभीर असलेला पाणी प्रश्न, वाहतूक कोंडी, रस्ता, ड्रेनेज ,कचरा या जिव्हाळ्याच्या विषयासंदर्भातील विविध समस्या सोडवण्याचे आव्हान या सर्व नवनियुक्त नगरसेवकांसमोर आहे.

"पुणे शहरातील आंबेगाव पठार सर्व्हे नंबर 15, 16 व आंबेगाव मधील ज्वलंत पाणी प्रश्न हे सर्व भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 38 मधील नवनियुक्त नगरसेवक, लवकरच सोडवतील अशी अपेक्षा प्रभागातील लोकांकडून व्यक्त करण्यात येत आहे."

आंबेगावच्या गंभीर अश्या पाणी प्रश्नाकडे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी व नवनियुक्त नगरसेवकांनी गांभीर्याने लक्ष देऊन, पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवणे गरजेचे आहे.

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांनी पुणेकरांच्या सर्व गंभीर समस्या सोडवुन, पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत.