Friday, July 31, 2020

कोरोना काळातील मिशन बिगिन अगेनचा पुढचा टप्पा नियमावली जाहीर...काय आहे नवीन नियमावली?




मुंबई, दि. 30 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढवण्यात आला असला तरी मिशन बिगिन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी काही सुधारणा जाहीर करण्यात आल्या आहेत.  काही सवलतींमध्ये वाढ करत राज्यातील मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सेस काही अटींच्या अधीन राहून 5 ऑगस्ट 2020 पासून सुरु करण्यास संमती देण्यात आली आहे. तसेच खेळाडुंचा संघ नसलेल्या काही आऊटडोअर खेळांना काही अटींच्या अधीन राहून 5 ऑगस्ट 2020 पासून संमती देण्यात आली आहे. 


या कालावधीत विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आणि महानगर पालिका आयुक्त त्यांच्या क्षेत्रात आवश्यक निर्बंध घालू शकतील. अत्यावश्यक नसलेल्या कामांसाठी तसेच नागरिकांच्या चलनवलनास प्रतिबंध घालू शकतील. लोकांनी या काळात सामाजिक अंतर, व्यक्तिगत स्वच्छता या बाबींचे पालन करणे आवश्यक राहील.


कोवीड विषाणू नियंत्रणासाठी राष्ट्रीय स्तरावरील सूचना

  • मास्कचा वापर- सार्वजनिक ठिकाणे, कार्यस्थळे या ठिकाणी तसेच प्रवासादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक आहे.
  • सामाजिक अंतर पाळणे (सोशल डिस्टंसिंग) : प्रत्येक व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी वावरताना इतरांपासून किमान 6 फुटाचे (दो गज की दूरी) अंतर राखावे.
  • ग्राहक सुरक्षित अंतर राखतील याची दुकानदारांनी काळजी घ्यावी, दुकानांमध्ये एका वेळी 5 व्यक्तिंपेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देऊ नये.
  • जमावाबाबतची बंधने : मोठ्या प्रमाणावर जमाव होऊ शकणारे समारंभ/सभा आदींना यापुढेही प्रतिबंध राहील. विवाह सोहळ्याला 50 पेक्षा अधिक अधिक अभ्यागतांना आमंत्रित करता येणार नाही. अंत्यसंस्कार आणि त्यासंबंधित विधींना 20 पेक्षा अधिक व्यक्तींना सहभागाची परवानगी नसेल.
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकणे शिक्षापात्र असून त्यासाठी संबंधित प्राधिकरणाचे कायदे, नियम, नियमनानुसार असलेला दंड लागू राहील.
  • सार्वजनिक ठिकाणी मद्य, पान, तंबाखू इ. चे सेवन करण्यास प्रतिबंध राहील.

कामाच्या ठिकाणी पाळावयाच्या मार्गदर्शक सूचना :

  • घरातून काम (वर्क फ्रॉम होम) :  शक्यतोवर  घरातूनच काम करण्याची पद्धत अवलंबली पाहिजे.
  • कार्यालये, कामाची जागा, दुकाने,  बाजारपेठ, औद्योगिक तसेच व्यावसायिक आस्थापनांमध्ये कामाचे/ व्यवसायाच्या वेळेचे विभाजन करण्याचा नियम पाळला पाहिजे.
  • तपासणी व स्वच्छता - कार्यालयाच्या सर्व प्रवेशद्वारांवर तसेच  बाहेर पडण्याच्या दरवाज्याजवळ थर्मल स्कॅनिंग (शरीराचे तापमान मोजणे), हात धुणे आणि सॅनिटायझर ची व्यवस्था करावी.
  • संपूर्ण कामाची जागा, सामान्य सुविधा आणि मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व गोष्टींची/ वस्तूंची वारंवार स्वच्छता करण्यात यावी. शिफ्टमध्ये काम करताना प्रत्येक शिफ्टनंतर दरवाज्याचे हॅन्डल इत्यादी गोष्टींची स्वच्छता राखणे आवश्यक आहे.
  • सुरक्षित अंतर :- कामाच्या ठिकाणी असलेले सर्व कर्मचारी / कामगारांमध्ये प्रत्येक  शिफ्टच्या वेळांमध्ये पुरेसे अंतर ठेऊन काम करतील. तसेच भोजनाच्या वेळांमध्ये सुयोग्य अंतर राहील याची दक्षता संबंधित आस्थापना प्रमुखांनी घेणे आवश्यक आहे.

मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील महापालिकापुणेसोलापूरऔरंगाबादमालेगावनाशिकधुळेजळगावअकोलाअमरावती आणि नागपूर क्षेत्रात खालील कामांनायाआधी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांमध्ये सूचित केलेल्या निर्बंधांच्या अधिन राहून संमती देण्यात येत आहे. या कामाच्या नियमावली संबंधीत स्थानिक प्राधिकरणामार्फत निर्गमित केल्या जातील.

  • या आदेशापूर्वी संमती देण्यात आलेली सर्व अत्यावश्यक दुकाने खुली राहतील.
  • अत्यावश्यक नसलेली दुकाने सुरु ठेवण्यास ३१ मे, ४ जून आणि २९ जून रोजीच्या आदेशांमधील शिथिलता आणि मार्गदर्शिकेनुसार तसेच संबंधीत महापालिकेने निश्चित केलेल्या धोरणाच्या अधीन राहून संमती देण्यात येत आहे. अत्यावश्यक नसलेल्या वस्तुंचे मार्केटस्, मार्केट क्षेत्र आणि दुकाने ही सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली राहतील. मद्याची दुकाने ही संमती देण्यात आली असल्यास किंवा होम डिलीव्हरी (घरपोच सेवा) सुरु राहील.
  • ऑगस्ट २०२० पासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सेस सुरु राहतील. तथापी, याठिकाणी असणारे थिएटर्स, फूड कोर्टस्, रेस्टॉरंटस् यांना सुरु करण्यास संमती नसेल. तथापि, या मॉल्समधील रेस्टॉरंट आणि फूड कोर्टसमधील किचनला होम डिलीव्हरी (मोठ्या वाहनांमार्फत (अग्रेगेटर्स) घरपोच सुविधा) देण्यासाठी सुरु ठेवण्यास संमती असेल.    
  • अत्यावश्यक तसेच अत्यावश्यक नसलेल्या वस्तु व साहित्यांच्या ऑनलाईन खरेदीसाठी ई-कॉमर्स व्यवस्था सुरु राहील.
  • सध्या सुरु असलेले उद्योग सुरु राहतील.
  • संमती देण्यात आलेली सर्व सार्वजनिक तसेच खाजगी बांधकामे सुरु राहतील. संमती देण्यात आलेली सर्व मान्सुनपूर्व सार्वजनिक तसेच खाजगी कामे सुरु राहतील.
  • होम डिलीव्हरी (घरपोच सेवा) रेस्टॉरन्ट्स आणि किचन (स्वयंपाकगृहे) सुरु राहतील.
  • ऑनलाईन दूरशिक्षण आणि त्याच्याशी संबंधीत कामे सुरु राहतील. 
  • सर्व सरकारी कार्यालये (अत्यावश्यक सेवा, आरोग्य आणि वैद्यकीय, कोषागारे, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, एनआयसी, अन्न आणि नागरी पुरवठा, एफसीआय, एनवायके, महापालिका सेवा यांना वगळून) १५ टक्के कर्मचारी किंवा १५ कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या क्षमतेसह सुरु राहतील.
  • सर्व खासगी कार्यालये ही १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या क्षमतेसह सुरु राहतील.
  • स्वयंरोजगाराशी संबंधित व्यवसाय उदा.  प्लंबर, इलेक्ट्रिशियन, कीटक-नियंत्रण (पेस्ट कंट्रोल) आणि तंत्रज्ञ यांची कामे सुरु राहतील.
  • गॅरेजेस, वर्कशॉपमधील कामे नियोजित वेळ घेऊन पूर्वसंमतीसह सुरु ठेवता येतील.
  • मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रात अत्यावश्यक कामांसाठी तसेच कार्यालयीन कामासाठी अंतर्गत वाहतुकीस परवानगी असेल.  लोकांनी खरेदीसाठी फक्त जवळपास/ शेजारच्या बाजारपेठामध्ये जाणे अपेक्षित आहे. अनावश्यक वस्तू खरेदीसाठी लांब पल्ल्याच्या प्रवासांना परवानगी दिली जाणार नाही.
  • 23 जून 2020 च्या आदेशानुसार मोकळ्या जागा, लॉन, वातानुकूलित नसलेल्या हॉलमध्ये लग्नाशी संबंधित कार्यक्रमांना परवानगी राहील.
  • काही निर्बंधांसह मोकळ्या भागात शारीरिक व्यायामांना (फिजिकल अॅक्टिव्हिटी) परवानगी राहील.
  • वर्तमानपत्रांचे मुद्रण व वितरण व त्यांचे घरपोच सेवा (होम डिलिव्हरी) यांना संमती असेल.
  • शैक्षणिक संस्था (विद्यापीठे/महाविद्यालय/शाळा) मधील कार्यालये, कर्मचाऱ्यांना             ई-सामग्रीचा विकास, उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन आणि निकाल जाहीर करणे आदी कामांसारख्या अशैक्षणिक कामांसाठी परवानगी असेल.
  • राज्य शासनाने परवानगी दिलेली केशकर्तनालये, स्पा, सलून, ब्यूटी पार्लर यांना २५ जून २०२० रोजीच्या शासन  आदेशातील निर्बंधांच्या अधीन राहून संमती असेल.
  • गोल्फ कोर्सेस, आऊटडोअर फायरिंग रेंज, आऊटडोअर जिम्नॅस्टीक, आऊटडोअर बॅडमिंटन आणि मल्लखांब अशा सांघिक नसलेल्या खेळांना ५ ऑगस्ट २०२० पासून संमती असेल. यात शारीरीक अंतर, स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. जलतरण तलावाला (स्विमींग पुल) परवानगी नसेल.
  • टॅक्सी, कॅब, ॲग्रीगेटर यांना फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक ३ या प्रवासी क्षमतेनुसार, रिक्षा फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक २ या प्रवासी क्षमतेनुसार, चारचाकी फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक ३ या प्रवासी क्षमतेनुसार तर दुचाकी फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक १ प्रवासी क्षमतेनुसार (हेल्मेट आणि मास्कसह) चालवण्याची परवानगी राहील.
  • कोणत्याही विशिष्ट / सामान्य आदेशाद्वारे परवानगी दिलेली अन्य कोणतीही कामे यांना संमती असेल.

उर्वरित राज्यभरात पुढील बाबींना वेळोवळी निर्गमित केलेल्या अटी-शर्तींवर परवानगी देण्यात आली आहे.

  • या आदेशापूर्वी संमती देण्यात आलेली सर्व अत्यावश्यक दुकाने खुली राहतील.
  •  जिल्हाअंतर्गत बस वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. बसमध्ये एकूण प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी सामाजिक अंतर आणि सुरक्षेची काळजी घेऊन प्रवास करू शकतील.
  • आंतरजिल्हा प्रवास नियंत्रित स्वरुपाचा राहील.
  • अत्यावश्यक नसलेली मार्केटस्, दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहतील.
  • मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सेस ही ५ ऑगस्ट २०२० पासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली राहू शकतील. त्यातील थिएटर्स, फूड कोर्टस्, रेस्टॉरंटस् यांना संमती नसेल. तथापि, रेस्टॉरंट आणि फूड कोर्टसमधील किचनला होम डिलीव्हरी (घरपोच सेवा) देण्यासाठी सुरु ठेवण्यास संमती असेल. संबंधित नागरी किंवा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था याबाबत नियमावली (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) ठरवून देतील.
  • खुल्या जागा, लॉन्स आणि वातानुकूलित नसणाऱ्या सभागृहातील विवाह सोहळ्यासाठी २३ जून २०२० च्या निर्णयानुसार परवानगी असेल.
  • निर्बंधासह खुल्या जागेतील व्यायाम व इतर शारीरिक हालचाली यांना संमती असेल.
  • छपाई आणि वृत्तपत्रांच्या घरपोच वितरणास परवानगी असेल.
  • विद्यापीठे/महाविद्यालये/शाळा यांची कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांचे अशैक्षणिक   कामांसाठी असणारे कर्मचारी यांना ई कंटेट तयार करणे, उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करणे. परीक्षेचे निकाल घोषित करण्यासाठी परवानगी असेल संशोधक आणि शास्त्रज्ञ यांना उपस्थित राहण्यास परवानगी राहिल.
  • केशकर्तनालये, स्पा, सलून्स, ब्युटी पार्लर्स यांना दि. २५ जून २०२० रोजीच्या शासन आदेशानुसार काही अटींवर परवानगी.
  • गोल्फ कोर्सेस, आऊटडोअर फायरिंग रेंज, आऊटडोअर जिम्नॅस्टीक, आऊटडोअर बॅडमिंटन आणि मल्लखांब अशा सांघिक नसलेल्या खेळांना ५ ऑगस्ट २०२० पासून संमती असेल. यात शारिरीक अंतर, स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. जलतरण तलावाला (स्विमींग पुल) परवानगी नसेल.
  • सार्वजनिक आणि खाजगी वाहनांमध्ये प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी असेल. दुचाकीमध्ये हेल्मेट आणि मास्कसह १ अधिक १ प्रवासी, तीन चाकी वाहनामध्ये चालक आणि २ प्रवासी तर चार चाकी वाहनामध्ये चालक आणि ३ प्रवासी फक्त अत्यावश्यक कामासाठी प्रवास करु शकतील. प्रवासात मास्क परिधान करणे अनिवार्य असेल.
  • याशिवाय ज्या बाबींना परवानगी देण्यात आलेल्या असतील त्या बाबी.

राज्यभरात प्रतिबंधित बाबी नियमावली व कार्यप्रणालीचा (स्टँडर्ड ओपरेटिंग प्रोसिजर) अवलंब करुन टप्प्याटप्याने सुरु केल्या जातील किंवा निर्बंध उठवले जातील.



Thursday, July 30, 2020

कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे



* पुणे जिल्ह्यातील कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

* उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती

* जिल्ह्यातील मंत्री व लोकप्रतिनिधींची उपस्थिती

पुणे, दि. 30 : कोरोनाचा रुग्ण दर व मृत्यू दर कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.


पुण्यातील विधान भवन सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. बैठकीत जिल्ह्यातील मंत्री महोदय व लोकप्रतिनिधींकडून सूचना जाणून घेतल्या. बैठकीला कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ व पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, खासदार सर्व श्री गिरीश बापट, श्रीरंग बारणे, वंदना चव्हाण, डॉ.अमोल कोल्हे, माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती जाणून घेवून लोकप्रतिनिधीच्या अडचणी व सूचना जाणून घेतल्या. यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, कोविड 19 चा संसर्ग जिल्ह्यात किती दिवसात वाढत आहे, हे पाहून त्यादृष्टिने जिल्ह्यात उपाययोजना कराव्यात. शासकीय यंत्रणा प्रभावी होणे आवश्यक असून आरोग्य सुविधा सक्षम करावी. कोरोना रुग्णांसाठी अद्याप ठोस औषध अथवा लस उपलब्ध नसल्याचे सांगतानाच अशा परिस्थितीत  प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. वाढता रुग्ण दर व मृत्यू दर कमी करणे हे आव्हान असून यासाठी लोकप्रतिनिधींच्या सहकार्याची गरज आहे, असे सांगून कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या हिताचे निर्णय घेताना सर्वांनी शासनाच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी केले.


राज्यात व्हेंटिलेटर, पी पी ई किट, एन 95 मास्क पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून गरजेनुसार त्या-त्या भागात पुरवठा करण्यात येत आहे. महापालिकांना कोरोना प्रतिबंधाच्या अनुषंगाने आर्थिक मदत देण्यात आली असून यापुढे ही मदत देण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स बनविण्याच्या सूचना दिल्या असून त्यानुसार टास्क फोर्स निर्माण होत आहेत. यामुळे कोरोना उपाययोजनामध्ये सुसुत्रता येईल.

व्हेंटिलेटर, पी पी ई किट, एन 95 मास्कचा पुरवठा 1 सप्टेंबर नंतरही  केंद्राकडून करण्यात यावा, अशी  विनंती प्रधानमंत्री महोदयांना केली असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, सर्व लोकप्रतिनिधींनी देखील आपआपल्या स्तरावर याबाबत विनंती करावी, जेणेकरुन राज्याला याचा लाभ होईल. कोरोना रुग्ण संख्येच्या परिस्थितीनुसार लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येत आहेत. तथापि, प्रतिबंधित क्षेत्रात नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.

तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेले रुग्ण बऱ्याचदा रुग्णालयात जायला टाळाटाळ करतात. त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आढळून येत आहे. असे  होवू नये यासाठी खाजगी प्रयोगशाळांनी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांना परस्पर तपासणी अहवाल न देता संबंधित महापालिका यंत्रणेला द्यावा, जेणेकरुन रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध होईल. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर व पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग यामध्ये एकसुत्रीपणा आणून सर्वांनी मिळून काम करावे, असे मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सांगितले.


पुण्यात वाढत्या रुग्णांवर उपचार होण्याच्या दृष्टिने बेडची संख्या वाढविणे गरजेचे आहे. यामध्ये महानगरपालिकेने पुढाकार घ्यायला हवा. पुण्यासह नाशिक, औरंगाबाद महानगरपालिकांनीही बेडची संख्या वाढविण्यासाठी नियोजन करुन त्याप्रमाणे अंमलबजावणी करावी यासाठी राज्यशासन महापालिकांना आर्थिक मदत निश्चित देईल, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले,  राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सामना करताना सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे असून गाफील राहता कामा नये. यात लोकसहभाग महत्त्वाचा असून मास्कचा वापर, सोशल डिस्टंन्सिंग, स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्याबाबत महापालिकेने नागरिकांमध्ये जनजागृती करावी. नागरिकांची गैरसोय होवू नये तसेच उपचारापासून रुग्ण वंचित राहू नये, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावी राबविण्यासाठी  विकेंद्रीकरण करावे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पुण्यात उभारण्यात येणाऱ्या जम्बो रुग्णालयाचे काम गतीने करावे. संगणकीय प्रणालीमध्ये बेड व्यवस्थापन व अन्य आवश्यक माहिती अद्ययावत ठेवावी. तसेच याचा आढावा वेळोवेळी वरिष्ठ प्रशासकीय यंत्रणेने घ्यावा.  झोपडपट्टी परिसरात छोटी घरे असल्यामुळे याठिकाणी  गृह अलगीकरणापेक्षा संस्थात्मक अलगीकरणांवर भर द्यावा. ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू होवू नये यासाठी ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका तयार ठेवाव्यात.

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी दर आठवड्याला पुण्यात प्रशासकीय यंत्रणेसोबत बैठका घेवून आढावा घेत असल्याचे सांगितले.  त्याचबरोबर आतापर्यंत पुण्यात राबविण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. भोर तालुक्यातील भूस्खलन होत असणाऱ्या गावांचे माळीणच्या धर्तीवर पुनर्वसन करण्याच्या दृष्टिने सविस्तर प्रस्ताव शासनाकडे सादर  करावा, अशा सूचना दिल्या.


यावेळी खाजगी रुग्णायालयांच्या शुल्क आकारणीवर नियंत्रण ठेवावे, कोरोनाच्या रुग्णांना अतिदक्षता विभागातील खाटा, व्हेटिंलेटरची कमतरता भासू नये यासाठी प्रयत्न करावेत. राज्य शासनाने महापालिकेला अर्थसहाय्य करावे. ससून रुग्णालयात तपासणी  क्षमता वाढवावी अशा सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केल्या. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पिंपरीतील शासकीय रुग्णालयामध्ये चांगल्या सुविधा  मिळत असल्याच्या प्रतिक्रिया रुग्णांकडून आल्याचे सांगितले.

विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे म्हणाल्या,  कोरोनाच्या रुग्णांना औषधे माफक दरात उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत.  डॅश बोर्डवरील माहिती गतीने उपलब्ध करुन द्यावी. सोसायट्यांनी  कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना चांगली वागणूक द्यावी यावर प्रशासनाने नियंत्रण ठेवावे,अशा सूचना केल्या.


खासदार सर्व श्री गिरीश बापट, श्रीरंग बारणे, वंदना चव्हाण, डॉ.अमोल कोल्हे यांच्यासह लोकप्रिनिधींनी पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली,  तसेच सूचना केल्या. पुण्यासाठी व्हेंटिलेटर, रुग्णवाहिका, औषधसाठा उपलब्ध करुन द्यावा. खाजगी रुग्णालयांचे बेड उपलब्धतेची माहिती अद्ययावत ठेवावी, कोविड केअर सेंटर मधील भोजनाचा दर्जा चांगला ठेवावा. प्रतिबंधात्मक नियम पाळण्याबाबत जनजागृतीवर भर द्यावा. माहिती, शिक्षण आणि संवाद यावर भर द्यावा.  कोरोना तपासणीसाठी फिरते तपासणी केंद्र सुरु व्हावे, ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक  आरोग्य केंद्रामध्ये अद्ययावत वैद्यकीय उपकरणे व प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे, अशा सूचना उपस्थित लोकप्रतिनिधींनी केल्या. 

प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे जिल्ह्यातील आतापर्यंतची कोरोना बाधित रुग्णांची सद्यस्थिती,  कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या,  बाधित रुग्णांची क्षेत्रनिहाय  माहिती, नमुना तपासणी प्रयोगशाळा आदि विषयी माहिती दिली.



कोविडसंदर्भात राज्यात २ लाख १४ हजार गुन्हे दाखल; ३१ हजार व्यक्तींना अटक - गृहमंत्री अनिल देशमुख



मुंबई दि.२९ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख १४ हजार ५९४ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३१ हजार ९९५ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.


राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते २८ जुलै या कालावधीत

अत्यावश्यक सेवेसाठी ६ लाख ६२ हजार ४३३ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.

पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३२२ (८८१ व्यक्ती ताब्यात)

१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०८ हजार ७३२

राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा ८२४ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.

अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४६


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस -

(मुंबईतील ५० पोलीस व ४ अधिकारी अशा एकूण ५४, ठाणे शहर १०  व ठाणे ग्रामीण २ व १ अधिकारी, रायगड २, पुणे शहर ३, नाशिक शहर १,सोलापूर शहर ३, अमरावती शहर १, मुंबई रेल्वे ४, नाशिक ग्रामीण ३,जळगाव ग्रामीण १,जालना एसआरपीएफ १ अधिकारी,नवी मुंबई  एसआरपीएफ १, पालघर ग्रामीण २ व १ अधिकारी,ए.टी.एस. १,उस्मानाबाद १, औरंगाबाद शहर १, जालना ग्रामीण १, नवी मुंबई १, सातारा१, अहमदनगर १,औरंगाबाद रेल्वे १)

कोरोना बाधित पोलीस – २०६ पोलीस अधिकारी व १६९३ पोलीस कर्मचारी.




Tuesday, July 28, 2020

रक्षाबंधनाला चंद्रपूर जिल्ह्यातील आशा वर्कर्सना सन्मानित करणार – मंत्री विजय वडेट्टीवार



चंद्रपूर, दि. 28 : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्ग काळात गावागावात फिरून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आशा वर्कर यांचा कार्याचा एक भाऊ म्हणून मला अभिमान आहे. त्यामुळेच प्रशासनातर्फे रक्षाबंधनाच्या पर्वावर या कामाचे कौतुक म्हणून अकराशे रुपये रोख व साडी-चोळी देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे मदत पुनर्वसनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौर्‍यात सायंकाळी पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी ही माहिती दिली. गावागावांमध्ये घराघरात पोहोचून प्रशासनाला आरोग्यविषयक माहिती गोळा करून देण्यासाठी कोरोना सारख्या जोखमीच्या काळात आशाताईंनी अतिशय समर्पणाच्या भावनेतून काम केले आहे. या कामाची नोंद आणि या कामातूनच आजच्या दिवसापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना आजाराचा प्रसार मर्यादित राहिला आहे. जिल्ह्यात अद्याप एकही बाधित मृत्युमुखी पडलेल्या नाही. आरोग्य यंत्रणेच्या यशामध्ये आशाताईंचे श्रम विसरता कामा नये ,असेही त्यांनी सांगितले.
या महिन्यात रक्षाबंधनाचा भावा-बहिणीचा सण असून या पवित्र सणावर प्रत्येक आशा वर्करला सन्मानित करण्याचे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून निश्चित केले असून 3 ऑगस्टला यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमांमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात जिल्ह्यातील आशा वर्कर यांना सन्मानित करण्यात येईल.
यावेळी त्यांनी जिल्ह्यातून जवळपास  65 हजार अन्य राज्यातील कामगार आपापल्या राज्यात गेले असल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यात असलेल्या उद्योग व्यवसायामध्ये अशावेळी कौशल्यपूर्ण कामगारांची गरज भासत आहे. याशिवाय वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या खाणींमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कामगारांची आवश्यकता आहे. काही कामे कौशल्याची आहे. त्यामुळे अशा ठिकाणी महिनाभराचे प्रशिक्षण देऊन स्थानिक कामगारांना, सुशिक्षित बेरोजगारांना, भरती करण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. आज यासाठी त्यांनी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या सर्व खाणींच्या व्यवस्थापकांची बैठक घेतली होती.
आजच्या अन्य एका बैठकीमध्ये त्यांनी माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या उपस्थित वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. वन्यजीव व मानव संघर्षावर यामध्ये चर्चा झाली. तसेच शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासा बाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या बैठकीसाठी पाचारण करण्यात आले होते. वन मंत्र्यांसोबत या संदर्भात आणखी एक बैठक घेऊन निर्णय घेण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
भाताची रोवनी जिल्ह्यामध्ये जवळपास पन्नास टक्‍क्‍यांपर्यंत पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना युरिया कमी पडणार नाही. युरिया भेटत नसल्याबाबतच्या बातम्या या कृत्रिम टंचाईतून पुढे आल्या असून त्याचा शोध घेतला जात आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात युरियाची खेप पोहोचेल असे सांगितले.
दुपारच्या सत्रामध्ये विविध विभागाच्या वार्षिक योजना संदर्भात जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक झाल्याचे सांगितले. कोरोना संक्रमण काळामध्ये काटेकोरपणे प्रत्येकाने आपल्या कार्यालयाचे आर्थिक नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
महिला विकास महामंडळाच्या अनेक उपक्रमांना देखील त्यांनी सुरुवात केली असल्याचे शेवटी पत्रकार परिषदेत सांगितले.



Monday, July 27, 2020

पुणे जिल्ह्यातील संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेत तीन जम्बो रुग्णालये तातडीने उभारा - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश


‘गंभीर’ लक्षणांच्या रुग्णांना प्राधान्याने खाटा उपलब्ध करुन द्या

३१ ऑगस्टपर्यंतची संभाव्य स्थिती लक्षात घेत गतीने उपाययोजना करा

पुणे, दि. 27 : पुणे जिल्ह्यातील ‘कोरोना’ बाधित संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेऊन तातडीने तीन ठिकाणी जम्बो रुग्णालयांची उभारणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, सहकार आयुक्त अनिल कवडे, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे  संचालक कौस्तुभ दिवेगावकर, पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनु गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, शासनाचे वैद्यकीय सल्लागार डॉ. सुभाष साळुंके, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,  कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याबाबतची दक्षता घ्यावी लागणार आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील ऑगस्टअखेरची स्थिती विचारात घेत गतीने नियोजन करावे लागणार आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना सोबतच आरोग्य विषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगतानाच कोरोना प्रतिबंधक तातडीच्या उपाययोजनांसाठी तसेच मंत्रालयस्तरावरील प्रश्न तातडीने मार्गी लावणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, खासगी दवाखान्यातून कोरोना उपचाराची मोठ्या रक्कमांची बिले आकारली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. खासगी रुग्णालयाचे बिल स्वतंत्र लेखा परीक्षकांच्या माध्यमातून तपासली जातील. शासनाच्या नियमानुसार उपचारांची दर आकारणी केली आहे का, याची शहानिशा करूनच रुग्णाला बिल दिले जावे, याबाबत सबंधित यंत्रणेने दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
प्रारंभी विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठीच्या सुविधा उभारणीबाबतचे प्रशासकीय पातळीवरील नियोजन गतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांनी कोरोना उपचार व्यवस्थेबाबत तसेच उपलब्ध आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळ तसेच संभाव्य स्थिती विचारात घेत करण्यात येत असलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. कोरोना संसर्ग रोखण्यासोबतच पुणे शहरासोबतच ग्रामीण भागात आरोग्य सुविधा अद्ययावत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार व पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकाक्षेत्रात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली.






Sunday, July 26, 2020

१ कोटी ३५ लाख शिधापत्रिका धारकांना ३७ लाख क्विंटल अन्नधान्याचे वाटप – मंत्री छगन भुजबळ


मुंबई, दि. 26 :-  राज्यातील  52 हजार 435 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरू आहे. 1 जुलै ते 25 जुलैपर्यंत राज्यातील 1 कोटी 35 लाख 48 हजार 626 शिधापत्रिका धारकांना 37 लाख 3 हजार 793 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. 



प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी प्रति महिना 5 किलो (गहू + तांदूळ) मोफत देण्याची योजना आहे. दि. 15 जुलैपासून आतापर्यंत जुलै महिन्यासाठी एकूण 25 लाख 34 हजार 234 रेशनकार्डला मोफत (गहू + तांदूळ) वाटप केले आहे. या रेशनकार्ड वरील 1 कोटी 10 लाख 39 हजार 784 लोकसंख्येला 5 लाख 51 हजार 989 क्विंटल गहू आणि तांदळाचे वाटप झाले आहे. 

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी प्रति महिना 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. 6 जून पासून आतापर्यंत जून महिन्यासाठी एकूण 1 कोटी 40 लाख 80 हजार 501 रेशनकार्ड धारकांना मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्ड वरील 6 कोटी 36 लाख 58 हजार 171 लोकसंख्येला 31 लाख 82 हजार 909 क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे.   
राज्य शासनाने कोविड-19 संकटावरील  उपाययोजनेसाठी 3 कोटी 8 लाख 44 हजार 076 एपीएल केसरी शिधापत्रिका असलेल्या लाभार्थ्यांना  प्रति व्यक्ती 5 किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे मे व जून महिन्यासाठी आतापर्यंत 13 लाख 4 हजार 46 क्विंटल धान्य वाटप केले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रति रेशनकार्ड 1 किलो मोफत डाळ (तूर किंवा चणा डाळ) देण्याची तरतूद आहे. आतापर्यंत या योजनेतून सुमारे 3 लाख 81 हजार 195 क्विंटल डाळीचे एप्रिल ते जून महिन्यासाठी वाटप केले आहे.  

आत्मनिर्भर भारत या योजनेचा अन्नधान्य लाभ मे व जून या 2 महिन्यांसाठी असून त्या  अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिका धारकांना प्रति व्यक्ती 5 किलो मोफत तांदूळ दिला जात आहे आतापर्यंत 1 लाख 33 हजार 517 क्विंटल मोफत तांदूळ वितरित केला आहे.
राज्यातील स्वस्त धान्य दुकानांतून सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अन्नधान्याचे वाटप सुव्यवस्थितरित्या होत असल्याबाबत संनियंत्रण करण्यात येत असून, काळाबाजार करणाऱ्या स्वस्त धान्य  दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.

Friday, July 24, 2020

महाराष्ट्र वाचवा... कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख ४७ हजार पार...

महाराष्ट्र वाचवा... कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख ४७ हजार पार...


जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाने हाहाकार माजलेला आहे. भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा १२ लाखांपेक्षा जास्त वाढलेला आहे. 30 हजार ५०० पेक्षा जास्त लोकांचा भारतात कोरोना संसर्गामुळे बळी गेलेला आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 23 जुलै पर्यंत 3 लाख ४७ हजार पेक्षा जास्त वाढलेला आहे. महाराष्ट्रात दररोज ९००० पेक्षा जास्त कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे 23 जुलै पर्यंत 12 हजार ८५४ लोकांचा मृत्यू झालेला आहे. 22 जुलैला एका दिवसात १०५७६ कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला. 23 जुलैला एका दिवसाचा हाच कोरोनाग्रस्तांचा आकडा ९८९५ ने वाढला.


महाराष्ट्रातील दररोजचा  कोरोनाग्रस्तांचा ९००० - १०००० ने वाढणारा आकडा खूप चिंता वाढवणारा आणि गंभीर परिस्थिती दर्शवणारा आहे. महाराष्ट्र सरकारने लवकर लॉकडाऊन जाहीर करून अनेक चांगल्या उपाययोजना राबवल्या. मुंबईमधील धारावी पॅटर्न तर जगप्रसिद्ध झाला.मागील चार महिन्यात आरोग्य यंत्रणा,पोलीस प्रशासन,महसूल प्रशासन आणि सर्वच सरकारी यंत्रणा कोरोना विरोधातील लढाईत खूप चांगले काम करत आहेत. पण रोजचा कोरोनाग्रस्तांचा वाढणारा आकडा नक्कीच जनतेच्या छातीत धडकी बसवणारा आहे.


कोरोनाच्या या महाभयंकर संकटामुळे संपुर्ण देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. कष्टकरी, कामगार, शेतकरी, मजूर, कारागीर, छोटी - मोठी नोकरी करणारा मध्यमवर्गीय सामान्य माणूस, छोटे - मोठे व्यावसायिक अशा समाजातील सर्वच घटकांना मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्रातील सामान्य माणूस एक तर कोरोनाच्या महामारीने मरेल किंवा उपासमारीने मरेल एवढी वाईट अवस्था झाली आहे.


तीन महिन्यांपेक्षा जास्त असणाऱ्या लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य लोकांची आर्थिक परिस्थिती खूप वाईट झाली आहे.सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे.पुणे शहरात कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. 23 जुलै पर्यंत पुणे शहरातील वाढलेला कोरोनाग्रस्तांचा  ४५ हजार ४४६ हा आकडा खूप चिंता वाढवणारा आहे. पुणे शहरात रोज पंधराशे पेक्षा जास्त कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. 1100 पेक्षा जास्त लोकांचा पुणे शहरात कोरोनामुळे बळी गेला आहे.

पुणे शहरातील आरोग्य यंत्रणा कोलमडलेली दिसत आहे. कोरोनाग्रस्त गंभीर रुग्णांना पुण्यात ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड मिळत नाहीत, ही फार गंभीर परिस्थिती आहे.पुणे शहरातील वडगाव धायरी परिसरातील 33 वर्षाच्या कोरोनाग्रस्त गंभीर आजार असणाऱ्या तरुणाला संपुर्ण पुणे शहरात फिरवूनही एकाही रुग्णालयाने दाखल करून घेतले नाही. व्हेंटिलेटर बेड उपलब्ध झाला नाही. तरुणाच्या नातेवाईकांनी, मित्रांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अलका चौकात ॲम्ब्युलन्स मधील गंभीर तरुण रुग्णाची भयानक अवस्था सोशल मीडियावर दाखवली आणि अलका चौकातच ठिय्या आंदोलन केले.


यानंतर खूप उशिराने त्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालय मिळाले पण दुसऱ्या दिवशी त्या 33 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. पुणे शहरात सामान्य माणसाला गंभीर आजारावरील उपचारासाठी रुग्णालय मिळण्यासाठी एवढा संघर्ष करावा लागत असेल, आणि निष्क्रिय लोकप्रतिनिधी, प्रशासन यामुळे जर गंभीर आजार असणाऱ्या तरुणाला तडफडत असताना उपचारांसाठी रुग्णालय मिळत नसेल, योग्य उपचार मिळत नसतील आणि आपला मौल्यवान जीव त्या तरुणाला गमवावा लागत असेल तर पुणे शहरातील आरोग्य यंत्रणा कोलमडून पडून सामान्य माणसाला मृत्यूच्या दाढेत घेऊन चालली आहे.


महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहराची अवस्था खूप भयानक आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करून प्रश्न सुटत नसतात. पुणे शहराचे पालकमंत्री, आमदार, खासदार,नगरसेवक, सर्व लोकप्रतिनिधी यांनी विशेष लक्ष घालून, योग्य उपाययोजना राबवून कोरोना महामारीची परिस्थिती नियंत्रणात आणली पाहिजे. मुंबईमधील कोरोना महामारीची भयंकर परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते तर पुणे, ठाणे यासारख्या महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या शहरातील कोरोना महामारीची भयंकर परिस्थिती का नियंत्रणात येऊ शकत नाही?...


भारतात इतर राज्यांची कोरोनाग्रस्तांची आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्रापेक्षा खूप कमी आकडा आहे. भारतातील इतर राज्यांपेक्षा सहा पटीने जास्त कोरोनाग्रस्तांची आकडेवारी महाराष्ट्राची आहे ही गोष्ट अत्यंत गंभीर आणि चिंतेची आहे.महाराष्ट्रातील सामान्य माणूस अत्यंत भयभीत झाला आहे. मागील काही महिन्यांच्या लॉकडाउनमुळे एकीकडे मोठे आर्थिक संकट आणि  कोरोना महामारीचे हाहाकार माजवणारे महाभयंकर संकट यामुळे प्रचंड वेदनादायी आयुष्य सामान्य माणूस जगत आहे.महाराष्ट्रात कोरोनाचे महाभयंकर संकट कधी कमी होणार? कोरोनाची लस कधी येणार?कोणालाच माहिती नाही. दिवसेंदिवस वाढणारा कोरोनाचा आकडा पाहून कधी लॉकडाऊन, कधी शिथिलता, कधी कंटेन्मेंट झोन, कधी बफर झोन या चक्रव्यूहात महाराष्ट्रातील सामान्य जनता अडकलेली आहे. अभियंता, कामगार, शेतकरी, नोकरदार, छोटे - मोठे व्यावसायिक यासारख्या शेकडो लोकांनी लॉकडाऊनच्या काळात आत्महत्या केली ही खूप गंभीर गोष्ट आहे.


महाराष्ट्रातील रोजचा वाढणारा कोरोनाग्रस्तांचा, चिंता वाढवणारा आकडा, पाहून या महाभयंकर संकटापासून जनतेला वाचवण्यासाठी प्रशासनाबरोबर सर्व राजकिय पक्षांच्या नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने,योग्य उपाययोजना करून या संकटा विरोधात लढा दिला पाहिजे. महाराष्ट्रातील सामान्य जनता कोरोनाच्या संकटात प्रशासन आणि सरकारला योग्य ते सहकार्य करत आहे. 


प्रशासन आणि सरकारने येणाऱ्या काळात आरोग्य यंत्रणा सक्षम करून योग्य नियोजन,योग्य उपाययोजना राबवून या कोरोना महामारीपासून महाराष्ट्राच्या जनतेला वाचवले पाहिजे. युगपुरुष छत्रपती शिवाजीराजे यांच्या महान पराक्रमाने, महान इतिहासाने पावन झालेला हा आजचा महाराष्ट्र शिवाजीराजे यांच्या जगाला प्रेरणा देणाऱ्या महान कार्यातून प्रेरणा घेऊन कोरोनाच्या या महाभयंकर संकटावर नक्कीच मात करेल....

लेखक, पत्रकार - अजित श्रीरंग जगताप
संपादक - महाराष्ट्र गर्जना न्यूज