महाराष्ट्र वाचवा... कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख ४७ हजार पार...
जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाने हाहाकार माजलेला आहे. भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा १२ लाखांपेक्षा जास्त वाढलेला आहे. 30 हजार ५०० पेक्षा जास्त लोकांचा भारतात कोरोना संसर्गामुळे बळी गेलेला आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 23 जुलै पर्यंत 3 लाख ४७ हजार पेक्षा जास्त वाढलेला आहे. महाराष्ट्रात दररोज ९००० पेक्षा जास्त कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे 23 जुलै पर्यंत 12 हजार ८५४ लोकांचा मृत्यू झालेला आहे. 22 जुलैला एका दिवसात १०५७६ कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला. 23 जुलैला एका दिवसाचा हाच कोरोनाग्रस्तांचा आकडा ९८९५ ने वाढला.
महाराष्ट्रातील दररोजचा कोरोनाग्रस्तांचा ९००० - १०००० ने वाढणारा आकडा खूप चिंता वाढवणारा आणि गंभीर परिस्थिती दर्शवणारा आहे. महाराष्ट्र सरकारने लवकर लॉकडाऊन जाहीर करून अनेक चांगल्या उपाययोजना राबवल्या. मुंबईमधील धारावी पॅटर्न तर जगप्रसिद्ध झाला.मागील चार महिन्यात आरोग्य यंत्रणा,पोलीस प्रशासन,महसूल प्रशासन आणि सर्वच सरकारी यंत्रणा कोरोना विरोधातील लढाईत खूप चांगले काम करत आहेत. पण रोजचा कोरोनाग्रस्तांचा वाढणारा आकडा नक्कीच जनतेच्या छातीत धडकी बसवणारा आहे.
कोरोनाच्या या महाभयंकर संकटामुळे संपुर्ण देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. कष्टकरी, कामगार, शेतकरी, मजूर, कारागीर, छोटी - मोठी नोकरी करणारा मध्यमवर्गीय सामान्य माणूस, छोटे - मोठे व्यावसायिक अशा समाजातील सर्वच घटकांना मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्रातील सामान्य माणूस एक तर कोरोनाच्या महामारीने मरेल किंवा उपासमारीने मरेल एवढी वाईट अवस्था झाली आहे.
तीन महिन्यांपेक्षा जास्त असणाऱ्या लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य लोकांची आर्थिक परिस्थिती खूप वाईट झाली आहे.सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे.पुणे शहरात कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. 23 जुलै पर्यंत पुणे शहरातील वाढलेला कोरोनाग्रस्तांचा ४५ हजार ४४६ हा आकडा खूप चिंता वाढवणारा आहे. पुणे शहरात रोज पंधराशे पेक्षा जास्त कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. 1100 पेक्षा जास्त लोकांचा पुणे शहरात कोरोनामुळे बळी गेला आहे.
पुणे शहरातील आरोग्य यंत्रणा कोलमडलेली दिसत आहे. कोरोनाग्रस्त गंभीर रुग्णांना पुण्यात ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड मिळत नाहीत, ही फार गंभीर परिस्थिती आहे.पुणे शहरातील वडगाव धायरी परिसरातील 33 वर्षाच्या कोरोनाग्रस्त गंभीर आजार असणाऱ्या तरुणाला संपुर्ण पुणे शहरात फिरवूनही एकाही रुग्णालयाने दाखल करून घेतले नाही. व्हेंटिलेटर बेड उपलब्ध झाला नाही. तरुणाच्या नातेवाईकांनी, मित्रांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अलका चौकात ॲम्ब्युलन्स मधील गंभीर तरुण रुग्णाची भयानक अवस्था सोशल मीडियावर दाखवली आणि अलका चौकातच ठिय्या आंदोलन केले.
यानंतर खूप उशिराने त्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालय मिळाले पण दुसऱ्या दिवशी त्या 33 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. पुणे शहरात सामान्य माणसाला गंभीर आजारावरील उपचारासाठी रुग्णालय मिळण्यासाठी एवढा संघर्ष करावा लागत असेल, आणि निष्क्रिय लोकप्रतिनिधी, प्रशासन यामुळे जर गंभीर आजार असणाऱ्या तरुणाला तडफडत असताना उपचारांसाठी रुग्णालय मिळत नसेल, योग्य उपचार मिळत नसतील आणि आपला मौल्यवान जीव त्या तरुणाला गमवावा लागत असेल तर पुणे शहरातील आरोग्य यंत्रणा कोलमडून पडून सामान्य माणसाला मृत्यूच्या दाढेत घेऊन चालली आहे.
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहराची अवस्था खूप भयानक आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करून प्रश्न सुटत नसतात. पुणे शहराचे पालकमंत्री, आमदार, खासदार,नगरसेवक, सर्व लोकप्रतिनिधी यांनी विशेष लक्ष घालून, योग्य उपाययोजना राबवून कोरोना महामारीची परिस्थिती नियंत्रणात आणली पाहिजे. मुंबईमधील कोरोना महामारीची भयंकर परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते तर पुणे, ठाणे यासारख्या महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या शहरातील कोरोना महामारीची भयंकर परिस्थिती का नियंत्रणात येऊ शकत नाही?...
भारतात इतर राज्यांची कोरोनाग्रस्तांची आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्रापेक्षा खूप कमी आकडा आहे. भारतातील इतर राज्यांपेक्षा सहा पटीने जास्त कोरोनाग्रस्तांची आकडेवारी महाराष्ट्राची आहे ही गोष्ट अत्यंत गंभीर आणि चिंतेची आहे.महाराष्ट्रातील सामान्य माणूस अत्यंत भयभीत झाला आहे. मागील काही महिन्यांच्या लॉकडाउनमुळे एकीकडे मोठे आर्थिक संकट आणि कोरोना महामारीचे हाहाकार माजवणारे महाभयंकर संकट यामुळे प्रचंड वेदनादायी आयुष्य सामान्य माणूस जगत आहे.महाराष्ट्रात कोरोनाचे महाभयंकर संकट कधी कमी होणार? कोरोनाची लस कधी येणार?कोणालाच माहिती नाही. दिवसेंदिवस वाढणारा कोरोनाचा आकडा पाहून कधी लॉकडाऊन, कधी शिथिलता, कधी कंटेन्मेंट झोन, कधी बफर झोन या चक्रव्यूहात महाराष्ट्रातील सामान्य जनता अडकलेली आहे. अभियंता, कामगार, शेतकरी, नोकरदार, छोटे - मोठे व्यावसायिक यासारख्या शेकडो लोकांनी लॉकडाऊनच्या काळात आत्महत्या केली ही खूप गंभीर गोष्ट आहे.
महाराष्ट्रातील रोजचा वाढणारा कोरोनाग्रस्तांचा, चिंता वाढवणारा आकडा, पाहून या महाभयंकर संकटापासून जनतेला वाचवण्यासाठी प्रशासनाबरोबर सर्व राजकिय पक्षांच्या नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने,योग्य उपाययोजना करून या संकटा विरोधात लढा दिला पाहिजे. महाराष्ट्रातील सामान्य जनता कोरोनाच्या संकटात प्रशासन आणि सरकारला योग्य ते सहकार्य करत आहे.
प्रशासन आणि सरकारने येणाऱ्या काळात आरोग्य यंत्रणा सक्षम करून योग्य नियोजन,योग्य उपाययोजना राबवून या कोरोना महामारीपासून महाराष्ट्राच्या जनतेला वाचवले पाहिजे. युगपुरुष छत्रपती शिवाजीराजे यांच्या महान पराक्रमाने, महान इतिहासाने पावन झालेला हा आजचा महाराष्ट्र शिवाजीराजे यांच्या जगाला प्रेरणा देणाऱ्या महान कार्यातून प्रेरणा घेऊन कोरोनाच्या या महाभयंकर संकटावर नक्कीच मात करेल....
लेखक, पत्रकार - अजित श्रीरंग जगताप
संपादक - महाराष्ट्र गर्जना न्यूज
Nice
ReplyDeleteखुपच भयान वास्तव आहे,राज्याच्या या भयानक परीस्थितीबद्दल माहीती दील्याबद्दल धन्यवाद
ReplyDeleteखुपच भयान वास्तव आहे,राज्याच्या या भयानक परीस्थितीबद्दल माहीती दील्याबद्दल धन्यवाद
ReplyDeleteThank u for valuable information
ReplyDeleteखुपच भयान वास्तव आहे,Very nice and Updated information which should be in control in next few days, if people support and follow all rule regarding Covid 19 prevention.
ReplyDelete