Friday, July 30, 2021

'मेट्रो' मुळे पुण्याला नवी, आधुनिक ओळख मिळणार – उपमुख्यमंत्री अजित पवार; "पुणे मेट्रोचे 'ट्रायल रन' यशस्वी; पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाची 'ही' खास वैशिष्ट्ये वाचा सविस्तर"...



पुणे, दि. 30 : - पुणे ही महाराष्ट्राची शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी आहे. औद्योगिक राजधानी म्हणूनही पुण्याने ओळख निर्माण केली आहे. ऐतिहासिक नगरी म्हणूनही पुण्याकडे बघितले जाते,  या ऐतिहासिक नगरीचा, आधुनिक इतिहास लिहिताना पुणे मेट्रो रेल्वेच्या कामाचा, आजच्या ट्रायल रनचाही उल्लेख करावा लागेल. 'मेट्रो'मुळे  पुण्याला नवी, आधुनिक ओळख मिळणार आहे. पुण्याच्या विकासाचे आणखी एक स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर येऊन पोहोचले असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले. पुणे मेट्रोने उर्वरित काम जलद गतीने पूर्ण करावे. कोणत्याही परिस्थितीत मेट्रोच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशीही ग्वाही त्यांनी दिली.





पुणे महानगरपालिका क्षेत्रातील वनाज ते रामवाडी कॉरिडॉरमधील पूर्ण झालेल्या मार्गिकेवरील पुणे मेट्रोच्या ईस्ट-वेस्ट कॉरिडॉरच्या ट्रायल रनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून सकाळी सात वाजता केले. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम  गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सभागृह नेते गणेश बिडकर, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, जिल्हाधिकारी  डॉ.राजेश देशमुख, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आमदार चंद्रकांत पाटील व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित होते.


अत्याधुनिक, आरामदायी प्रवासाचे  जलद व वेळेवर पोहोचवणाऱ्या वाहतूक व्यवस्थेचे  स्वप्न पूर्ण करणारी ट्रायल रन ठरणार असल्याचे सांगून उपुमख्यमंत्री श्री अजित पवार म्हणाले, "पुणेकरांना निर्धारित वेळेत इच्छित ठिकाणी पोहोचवणाऱ्या  वाहतूक व्यवस्थेसोबतच पुणेकरांचे वेळेचे  गणित जुळवून आणणाऱ्या वाहतूक आधुनिक व्यवस्थेची ही ट्रायल रन आहे."


या ट्रायल रनच्या निमित्ताने पुणेकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न लवकरच  पूर्ण होईल. महामेट्रोच्या माध्यमातून पुणे शहरात सुरु असणारे मेट्रो रेल्वेचे  काम निर्णायक टप्प्यावर आहे. लॉकडाऊनच्या काळातही काम सुरु होते. 60 टक्के काम आजच्या घडीला पूर्ण झाले आहे. अत्यंत वेगाने, विश्वासाने, निर्धाराने,कोणताही अपघात न होता, हे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. यात महामेट्रोच्या, पुणे मेट्रोच्या सर्व इंजिनियर, अधिकारी, कर्मचारी बांधवांची मोठी मेहनत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.




उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "पुणे मेट्रोची, सगळ्या मार्गांची कामे  पूर्ण होऊन, ही मेट्रो सेवा पूर्ण क्षमतेनं सुरु झाल्यानंतर, सायकल, मोटरसायकल, दुचाकीचं शहर अशी ओळख असणारं पुणे शहर, हे मेट्रो वाहतुकीचं शहर म्हणून ओळखलं जाईल. पुणे मेट्रोमुळे रस्त्यांवरचा वाहनांचा, वाहतुकीचा, प्रदूषणाचा ताण कमी होईल. वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल. पुणेकर त्यांच्या निर्धारित ठिकाणी, निर्धारित वेळेत पोहचू शकतील, दुसऱ्याला दिलेली वेळ आणि वेळेचं गणित, पुणेकर भविष्यात पाळू शकतील,  असा विश्वास व्यक्त करतानाच मेट्रो रेल्वेसेवा ही प्रदूषणविरहीत सेवा असल्याने  प्रदूषण होणार नाही."


 


रस्त्यांवरची वाहने  कमी झाल्याने, त्या माध्यमातून होणारे प्रदूषणही कमी होईल.  पुणे शहर आणि परिसरातली वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी पुण्याभोवती रिंग रोडचे नियोजन आहे. वाहतुकीची समस्या हीच पुणे शहराची प्रमुख समस्या आहे. पुणे मेट्रोच्या माध्यमातून ती काही प्रमाणात निश्चितच सुटेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


कोणत्याही परिस्थितीत पुणे मेट्रोच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,पुणे मेट्रो पुणे शहरातून ३३.२० किलोमीटर अंतर धावणार आहे. या मेट्रोलाईनवर ३० मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. या एकूण लांबीपैकी, २७.२८ किलोमीटर मेट्रो रस्त्याच्या समांतर पुलावरुन धावणार आहे. तर पुण्याच्या खालून बोगद्यातून ६ किलोमीटर मेट्रो धावणार आहे. आतापर्यंत पुणे मेट्रोचं एकूण काम जवळपास ६० टक्के पूर्ण झालं आहे. पुणे मेट्रोनं उर्वरित काम जलद गतीनं पूर्ण करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.



पीएमआरडीए विकास आराखड्याचे प्रारूप मान्यता

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे महानगर विकास प्राधिकरण व महानगर नियोजन समितीच्या बैठकीत, पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या प्रारूप विकास आराखड्याच्या प्रसिध्दीसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी  मान्यता दिली आहे. त्यामुळे  पुण्याला, सर्वोत्तम महानगर विकसित करण्याच्या दिशेने  वाटचाल सुरु झाली आहे. या विकास आराखड्यात २ रिंगरोड, हायस्पीड रेल्वे व क्रिसेंट रेल्वे, १० मेट्रो मार्गिका, १३ मल्टी मॉडेल हब, ४ प्रादेशिक केंद्रे, १५ नागरी केंद्रे, १२ लॉजिस्टिक केंद्रे, ५ पर्यटन स्थळ व ३ सर्किट्स, ५ शैक्षणिक केंद्रे, २ वैद्यकीय संशोधन केंद्रे व ७ अपघात उपचार केंद्रे, जैव विविधता उद्यान, कृषी प्रक्रिया संशोधन व विकास केंद्रे, १ क्रिडा विद्यापीठ, ८ ग्रामीण सबलीकरण केंद्रे, ५९ सार्वजनिक गृह प्रकल्प, २६ नगर रचना योजना, ४ कृषि उत्पन्न बाजार केंद्रे, ५ प्रादेशिक उद्याने, ८ जैव विविधता उद्याने व १६ नागरी उद्याने, ४ अक्षय उर्जा निर्मिती केंद्रे, ३० अग्निशमन केंद्रे, २ औद्योगिक संशोधन व प्रशिक्षण केंद्र, १ व्यवसाय केंद्र असे महत्वाचे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत.पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे एकूण क्षेत्र ६ हजार ९१५ चौ.कि.मी. असून हे क्षेत्र राज्यातील सर्वात मोठे  आणि देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे क्षेत्र असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.


विधान परिषदेच्या उपसभापती  डॉ नीलमताई  गोऱ्हे  यावेळी म्हणाल्या, "पुणे मेट्रोमुळे पुणेकरांचा प्रवास सुलभ व सुरक्षित होणार आहे, आयटीचे क्षेत्र म्हणून पुणे शहर प्रभाव वाढवते आहे, त्यात मेट्रोची भर पडणार आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो निश्चितपणे महत्त्वपूर्ण ठरेल,  दिल्ली, नागपूरकरांचा मेट्रोचा अनुभव चांगला आहे, आता हाच अनुभव पुणेकरांना अनुभवण्यास मिळणार असल्याचा उल्लेख त्यांनी केला."



महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, "पुणे महानगरात मेट्रो ट्रायल रन हा ऐतिहासिक क्षण आहे. केंद्र व राज्य शासनाने मेट्रोच्या कामाला गती दिल्याने हा क्षण आज अनुभवता आला. पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विचार करता आजची मेट्रो ट्रायल रन महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले."


आमदार चंद्रकांत पाटील यांनी  "पुणे महानगरात मेट्रो ट्रायल रन हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे.  डिसेंबर 2022पर्यंत मेट्रोचे सर्व मार्ग सुरू होतील, वाहतूक कोंडी कमी होईल. असे त्यांनी सांगितले."


प्रास्ताविक महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी केले. यावेळी कोरोनाचे निर्बंधाचे पालन करून मेट्रोचे अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.




पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये : -


देशातील सर्वात हलके मेट्रो कोच :


1)कमी वजनाच्या अ‍ॅल्युमिनियम बॉडीसह बनलेले.

2)डिझाइन गती 95 किमी प्रतितास.

3)प्रवासी क्षमता 975 पॅक्स / 3 कार ट्रेन (6 कारसाठी विस्तारित करण्याची क्षमता)


सुरवातीपासून सौर ऊर्जेचे एकत्रीकरण :


1)11.19 मेगावॅटएकूण सौर उर्जा स्थापित करण्याची योजना.

2)त्यामुळं प्रति वर्षी 20 कोटींची बचत.

3)दर वर्षी अंदाजे 25 हजार टन कार्बनडायऑक्साईड उत्सर्जनापासून सुटका.


नाविन्यपूर्ण यूजी स्टेशनची रचना : एनएटीएम (न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड)


1)दोन मेट्रो स्थानके: मंडई व बुधवारपेठ मेट्रो स्थानकांना या तंत्रज्ञानाचा वापर करून बांधणार.

2)या तंत्रज्ञानाच्या वापरामुळं जागेची बचत झाली.

3)शहरातील सुमारे 200 रहिवाशांचे पुनर्वसन टाळले.



‘कचरे से कांचन तक’डम्पिंग साइटचे डेपोमध्ये रूपांतर :


1)कोथरूड कचरा डम्पिंग साइट १२.२ हेक्टर क्षेत्रामध्ये पसरली आहे.

2)3 लाख 80 हजार घनमीटर कचरा असणाऱ्या या जागेची रुपांतर सुंदर परिसरात होणार.


कार्यक्षम पाणी व्यवस्थापन :


1)सांडपाण्यावर 100 टक्के प्रक्रीया करण्यासाठी ‘अनॅरोबिक बायोडायजेस्टर तंत्रज्ञाना’चा वापर करण्यासाठी ‘डीआरडीओ’सोबत सामंजस्य करार.

2)बहुतांश स्थानकांमधून मनपाच्या गटारलाईनमध्ये सांडपाणी सोडण्यात येणार नाही.

3)प्रत्येक स्टेशनवर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविणार.


वृक्षारोपण आणि पुनर्रोपण :


1)शक्यतो झाडे तोडायची नाहीत ही महामेट्रोची पॉलिसी आहे, नाईलाजाने झाडे काढण्याची वेळ आल्यास ती न तोडता त्या झाडांचं ‘रुट बॉल’ पध्दतीनं पुनर्रोपण करण्यात येते.

2)पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत 1 हजार 698 झाडांच पुनर्रोपण तर 11 हजार 683 नवीन झाडांची लागवड करण्यात आली.


‘पीपीपी’ तत्वावर पार्किंग कम कमर्शियल डेव्हलपमेंट नियोजित ठिकाण :


1)स्वारगेट मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब – 2.10 दशलक्ष चौरस फूट क्षेत्र.

2)सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्टेशन - 1.02 दशलक्ष चौरस फूट क्षेत्र.

3)रेंज हिल डेपो -2.09 दशलक्ष चौरस फूट क्षेत्र.

4)हिल व्ह्यू कार पार्क डेपो, कोथरूड –1.87 दशलक्ष चौरस फूट क्षेत्र.





Monday, July 26, 2021

"बारामती तालुक्यातील 'वाकी' येथील 'कोरोना चाचणी शिबिरात' चार गावांमधील सापडले '5 कोरोनाबाधित रुग्ण'; आजच्या कोरोना चाचणी शिबिरात 'वाकी गावात शून्य रुग्ण'...

 

बारामती, दि. 26 : - बारामती तालुक्यातील वाकी येथे पंचायत समिती बारामती, आरोग्य विभाग यांच्या वतीने आज घेण्यात आलेल्या कोरोना चाचणी शिबिरात 116 लोकांची अँटीजन (ANTIGEN) चाचणी व 25 लोकांची आरटीपीसीआर (RTPCR) चाचणी करण्यात आली. या कोरोना चाचणी शिबिरात चार गावांमधील पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळले.



या कोरोना चाचणी शिबिरात बारामती तालुक्यातील जोगवडी गावचे 2, सोरटेवाडी गावचा 1, मगरवाडी गावचा 1 व  होळ गावचा 1 असे एकूण 5 कोरोना बाधित रुग्ण सापडले अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अतुल उबाळे यांनी दिली.




या कोरोना चाचणी शिबिरासाठी आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अतुल उबाळे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर सलीम मुलानी, आरोग्य सेवक किशोर काळोखे, आरोग्य सेविका कारंडे सिस्टर व सर्व आरोग्य कर्मचारी तसेच वाकी गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.



"आज झालेल्या कोरोना चाचणी शिबिरात वाकी गावातील एकही कोरोना बाधित रुग्ण सापडला नाही. भविष्यात कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे अशी प्रतिक्रिया वाकी गावचे पोलीस पाटील हनुमंत जगताप यांनी दिली.



कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी बारामती तालुक्यातील सर्वच नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.


"कोकणसह पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन आर्थिक मदतीबाबत घोषणा करणार" – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


रत्नागिरी दि.  25 :- "केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच नुकसानभरपाई संदर्भात मदत जाहीर करण्याचा निर्णय घेतला जाईल" असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना चिपळूण येथे सांगितले."  वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा विचार करून जिल्ह्याच्या स्तरावर याबाबत यंत्रणा उभारण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.   "प्रश्न केवळ आर्थिक मदत पुरवणे असा नसून मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभा करणे याला प्राथमिकता असेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले."




मुख्यमंत्री आज चिपळूण दौऱ्यावर आले होते. त्यांनी चिपळूण शहरात व्यापारी तसेच नागरिकांशी संवाद साधला. आपल्या या भेटीदरम्यान त्यांनी बाजारपेठेत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यानंतर झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी प्रशासनाकडून झालेल्या आतापर्यंतच्या बचाव व मदत कार्य याबाबत माहिती जाणून घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.



यावेळी पालकमंत्री ॲङ अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार सर्वश्री भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम, मुख्य सचिव सिताराम कुंटे, माजी मंत्री रविंद्र माने, विभागीय आयुक्त विलास पाटील, जिल्हाधिकारी डॉ.बी.एन. पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड आदी उपस्थित होते.





"उद्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी करणार आहे.  त्यानंतर दोन ते तीन दिवसात आर्थिक नुकसानीचा आढावा घेतला जाईल.  दरम्यानच्या काळात तातडीची मदत म्हणून अन्न तसेच औषध कपडेलत्ते व इतर अत्यावश्यक बाबी पुरवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत" असे मुख्यमंत्री म्हणाले. मदत पुरवताना कोणत्याही तांत्रिक मुद्दयांवर अडचणी येऊ नये यासंदर्भात प्रशासनाला सूचना केल्या आहेत असेही ते म्हणाले.  "केंद्र सरकारकडून आपल्याला व्यवस्थित मदत मिळत आहे. माझे पंतप्रधान तसेच गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री यांच्याशी बोलणे झाले आहे. एनडीआरएफ, लष्कर तसेच हवाई दल यांच्या तुकड्या राज्य सरकारला पूर परिस्थितीत मदत करत आहेत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्राकडून आर्थिक मदतीबाबत पूर्ण आढावा घेतल्यानंतरच मागणी केली जाणार आहे."



बैठकीत आरंभी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी झालेल्या नुकसानीबाबत व बचाव कार्य आणि मदत याबाबतची माहिती बैठकीत सादर केली.


पालकमंत्री ॲङ अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार भास्कर जाधव आदी मुख्यमंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्यात त्यांच्या समवेत होते.



साहेब, होतं नव्हतं सर्व गेलं, आम्हाला मदत केल्याशिवाय जाऊ नका - महिलेने फोडला मुख्यमंत्र्यांसमोरच टाहो


"तुमच्या दुकानातील सामानाची नासधूस झाली. तुम्ही याची काळजी करू नका. तुम्हाला इजा झाली नाही ना. तुम्ही सर्व सुरक्षित आहात ना. तुमच्या मालाचं बघू, ते आमच्यावर सोडा", अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील व्यापाऱ्यांना दिलासा दिला. यावेळी अनेक व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडल्या. एका महिलेने तर मुख्यमंत्र्यांसमोर टाहोच फोडला. "आम्हाला आश्वासन नको, मदत हवी आहे. आम्हाला सोडून जाऊ नका, आम्हाला मदत करा", असा टाहोच एका महिलेने फोडला.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी १ वाजता चिपळूणच्या मुख्य बाजारपेठेत पोहोचले. यावेळी त्यांनी गांधी चौकातील दुकानदारांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती जाणून घेतली. मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा थांबून व्यापाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अनेक दुकानदारांनी पाणावलेल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. मुख्यमंत्र्यांनीही या व्यापाऱ्यांचे आणि स्थानिकांचं सांत्वन केलं. मुख्यमंत्री येणार म्हणून या बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती. या प्रसंगी त्यांच्यासोबत पालकमंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, मिलिंद नार्वेकर आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.



मुख्यमंत्र्यांची व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच एका महिलेने थेट मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडला. ही महिला प्रचंड रडत होती. माझ्या घराच्या छतापर्यंत पाणी गेलं. होतं नव्हतं. सर्व गेलं. तुम्ही काहीही करा पण आम्हाला मदत करा. साहेब, तुम्हीच मदत करू शकता. मदत केल्याशिवाय जाऊ नका हो, असं ही महिला मोठमोठ्याने रडत सांगत होती. मुख्यमंत्र्यांनीही थांबून या महिलेसमोर हात जोडत तिला मदत करण्याचं आश्वासन दिलं.


यावेळी आमचं सर्व नुकसान झालं. आमचा माल भिजला. होतं नव्हतं सर्व गेलं. असं काही व्यापाऱ्यांनी सांगितलं. त्यावर तुम्ही याची काळजी करू नका. तुम्हाला इजा झाली नाही ना. तुम्ही सर्व सुरक्षित आहात ना. तुमच्या मालाचं बघू, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.



Thursday, July 22, 2021

महाराष्ट्रातील "या" जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीसाठी '४९ कोटी ८३ लाख' रुपये निधीला ग्रामविकास विभागाची मान्यता; 'ग्रीन बिल्डिंग' संकल्पनेतून अद्ययावत इमारत उभारणार...

 


अमरावती, दि. २२ : - अमरावती जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी ४९ कोटी ८३ लाख रुपये निधीला ग्रामविकास विभागाने मान्यता दिली असून, जिल्हा परिषदेसाठी एक अद्ययावत इमारतीची निर्मीती होणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.




जिल्ह्यात दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अनेक प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात आली आहे. त्यासाठी शासनाकडून निधी मिळण्यासाठी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा होत आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या इमारतीसाठी निधी मंजूर झाला असून, लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.



आधीची इमारत ब्रिटिशकालीन 


जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत ब्रिटिशकालीन आहे. या इमारतीचे बांधकाम १८८९ मध्ये झाले आहे. इमारत काहीशी जीर्ण व शिकस्त झाल्याने इमारतीचे नूतनीकरण करणे शक्य नाही. 


जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम प्लॉट क्रमांक ३१/४ च्या क्षेत्रावर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली असून २९ हजार ५०० चौरस मीटर जागा जिल्हा परिषदेकडे देण्यास मान्यता दिली आहे.



जी प्लस फोर बिल्डिंग 


जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांची कार्यालये आदींसाठी सद्य:स्थितीतील जागा अपुरी पडत असल्यामुळे नवीन प्रशासकीय इमारत तळमजला अधिक चार मजल्यांची बांधण्याचा निर्णय झाला आहे. 





या इमारतीचे बांधकाम १२ हजार १९१ चौरस मीटर असेल. इमारतीच्या आराखड्याला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वास्तुशास्त्रज्ञ यांनी मान्यता दिली असून लेआऊट प्लॅन, स्थळदर्शक नकाशा आदी कागदपत्रेही सादर करण्यात आली आहेत.



इमारतीसाठी नगर रचना  प्राधिकरण व अग्निशमन यंत्रणेची मंजुरी आदी प्रक्रिया वेळेत पार पाडावी. महिला पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र आवश्यक व्यवस्था असावी, असे आदेश आहेत.


'ग्रीन बिल्डिंग' संकल्पनेचा समावेश 


ग्रीन बिल्डिंग संकल्पना अमलात आणून नैसर्गिक प्रकाश योजना व वायुविजन, पाण्याच्या व ऊर्जेच्या वापरात काटकसर, पर्जन्य जलपुनर्भरण व जास्तीत जास्त पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य व साधन सामुग्रीचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.



Friday, July 16, 2021

"लेख लिहणं खूप सोपं असतं पण हा डोळ्याने होणारा बलात्कार सहन करण खूप कठीण असतं, आपण आपली संस्कृती जपली पाहिजे आपण परदेशात राहत नाही" - सुरेखाताई माने यांचे प्रसिध्द अभिनेत्री हेमांगी कवी यांच्या "बाई, बुब्ज आणि ब्रा" या लेखाला दिलेले रोखठोक, सणसणीत उत्तर...विशेष लेख...


ह्या दोन दिवसात एक गाजलेला लेख हेमांगी कवीचा बाई ब्रा बुब्स हा लेख वाचायला खुप छान वाटला. थोड्या वेळासाठी वाटलं काय परखड मत मांडलय जबरदस्तच अंगाला सरसर शहारे आले अंगातील रक्त सळसळलं महिला असावी तर अशी अगदी परखड मत मांडणारी.


त्या लेखावर खुप साऱ्या चांगल्या वाईट प्रतिक्रिया आल्या त्या पण वाचल्या तेव्हा विचार केला कंमेट करायला कुणाच्या बापाचं काय जातंय. आपल्याला फक्त कोणताच विचार न करता कंमेट करायच्या असतात आणि आपण ती घाई करत असतो.


हेमांगी कवी वर तिच्या व्हिडिओ वर फालतु खालच्या थराला जाऊन कंमेट केल्या गेल्या. मी एक महिला म्हणुन खुप वाईट वाटलं कारण माझ्यावर असो किंवा इतर महिलावर असो राजकीय महिला असो किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील महिला असो तिने आपलं मत मांडल की तीला खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते हे खुप दुर्दैवी आहे.


हेमांगी कवीची हि पोस्ट माझ्या मते हि फक्त वाचायला चांगली पण हि खर्या जिवनात महिलांना असं वागता येत नाही. हेमांगीच मत आहे महिलांनी ब्रा न घालताच असेच वरचे कपडे घालावेत.


हेमांगी कवी तिच्या आई, बहिणी, भाऊ, वडिलां समोर ब्रा न घालता फक्त वरचे कपडे घालुनच घरात वावरत असते तरीही तिच्या घरातली पुरुष मंडळी तिच्या कडे वाईट नजरेने पहात नाही आणि तिच्या वडिलांनी तिला लहानपणी उघडी पाहीलेली आहे हे तिच्या घरातील पुरुषांचे चांगले संस्कार आहेत.


मला माझ मत मांडायचय हेमांगी मॅडम आपण एक नटी म्हणुन मला खुप आवडता पण तुम्ही तुमचं मत जे मांडलय ते मला पटलेलं नाही. तुम्ही म्हणाल तु कोण शहाणी तुला पटो न पटो कारण तुम्ही तुमच्या वर टिका करणाऱ्या महिलांचा तिरस्कार केलाय हे तुमच्या पोस्ट वरुन दिसतंय आणि मी पण एक महिला असुन तुमच्या ह्या बाई ब्रा बुब्स ह्या पोस्टशी सहमत नाही.


कारण तुम्ही आतुन काहीही न घालताच समाजात वावरलात तर ते तुम्हाला चालतं कारण तुम्ही तेवढ्या सक्षम आहात तुमच्या कडे वाकड्या नजरेने पहाणार्याला चोख उत्तर द्यायला किंवा तुम्हाला ती सवय झाली असेल तुमच्या बुब्स कडे कोणी पाहिलं तरी फरक पडत नसेल. 


पण समाजातील इतर महिलांना फरक पडतो हो कारण तुम्ही सिनेमात काम करुन करुन बोल्ड झालात. सिनेमात कित्येक तरी नट्या आहेत ज्या किसिंगचे, सेक्सचे बेडवरचे सिन करतात आणि त्यांना शुटींग वरच्या सेटवरच्या मेकअप मॅन असो, स्पाॅटबाॅय असो, कॅमेरा मॅन असो किंवा इतर कोणी असो त्यांचा जाणुन बुजुन असो किंवा नकळत स्पर्श होतो ह्याची सवय झालेली असते त्याने तुम्हाला काही फरक पडत नाही कारण तुमचं मन मेलेले असतं.


फरक पडतो तो सर्व सामान्य महिलेला तिने अगं चोपुन चापुन पुर्ण कपडे जरी घातले असतील तरी पुरुषाचीच काय हो महिलांची पण नजर सारखी  जाते त्ता महिलेच्या छातीवर तुम्हाला काही वाटतं नसेल तुमचे कोणी बुब्स पाहिले तर.... पण, 


जेव्हा इतर महिलेच्या छातीवर कुणाची नजर पडली तर लाजिरवाण वाटतं खुप अश्लिल वाटतं गिल्टी फिल होतं मग इतर महिला आहेत ज्यांना कुणाला प्रतिकार करता येत नाही बोलता येत नाही त्या बिचाऱ्या निमुटपणे सहन करतात पण हा अन्याय तुमच्या माझ्या सारख्या सहन करणार नाही पण इतर महिलांचं काय??? 


म्हणुन म्हणते लेख लिहिणं खुप सोपं असतं पण हा डोळ्याने होणारा बलात्कार सहन करण खुप कठीण असतं तुम्हाला काय वाटतं तुमचे वडील भाऊ तुमच्या कडे त्या नजरेने पहात नाही पण अहो सर्व तुमच्या घरातील पुरुषा सारखे सभ्य थोडीच असतात....


येथे स्वताचाच बाप भाऊ मामा काका आपल्या ४ / ५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करतो ते लेकरु तर निरागस असतं तुमच्या आमच्या सारखे बुब्स पण मोठे नसतात ना हो..... का होतं असेल असं ह्याचा विचार केलाय का कधी??? 


भर यौवानात आलेल्या मुली तुमच्या सारख्या चे लेख वाचुन उत्तेजित होतात किंवा सिनेमातील अश्लील व्हिडिओ पाहुन कित्येक मुली मुलं अश्लिल व्हिडिओ बनवत आहेत तुम्ही कधी पाहिलेच नसतील असे अश्लील व्हिडिओ असं होणारच नाही.... 


अश्लिल डान्स हेपले मारल्यागत एकमेकांच्या मिठीत जसं काय आता हि पोरं पुढच्या व्हिडिओ मध्ये रियल सेक्स चे व्हिडिओ दाखवतील ह्याला कारणीभुत आपण सिनेमावाले आहात ह्या मुळे पुरुषप्राणीच काय हो तेवढ्याच महिला पण उत्तेजित होऊ लागल्या आहेत आणि महिला स्वातंत्र्य स्वावलंबी घ्या नावाखाली नंगा नाच करु लागल्या आहेत... 


हे जे आपण महिला स्वातंत्र्य बद्दल मोठमोठे लेख लिहितो म्हणतो महिलांना स्वातंत्र्य मिळालाच पाहिजे होय मी पण ह्याच मताची आहे पण महिलेला स्वातंत्र्य मिळावं म्हणुन तिने उघडी नागडी नाचावं का??? आपल्याला जे कपडे आवडतात ते जरुर घालावेत आपल्याला त्याचा पुरेपूर हक्क आहे पण हा उपदेश तुम्ही इतर महिलांना देऊ नका..... कारण,


काही ज्या चार भिंतींच्या आतल्या महिला असतील किंवा समाजातील गोर गरीब महिला आहेत त्यांच्या हातात नव्याने मोबाईल येतोय अणि त्या नव्याने फेसबुकवर व्हाटस अँपवर इंस्टाग्रामवर येतात तेव्हा तुमच्या सिनेमात्या नट्यांची नक्कल करु लागतात आणि त्यांना वाटतं आपण अश्लील डान्स व्हिडिओ टाकले तर प्रसिद्धी मिळेल आणि प्रसिद्धी साठी काहीही करतात.... आणि,


जर का अश्या महिलाची ओळख कोणत्याही पुरुषाशी होऊ लागली फेसबुक इनस्टा वर मग ते भेटतात आणि जे घडु नये ते घडत आणि फसवणुक होते आणि ही फसवणुक कुणाला सांगु शकत नाही लढु शकत कारण त्या तुमच्या एवढ्या बोल्ड आधुनिक विचाराच्या पैशाने श्रीमंत नसतात आणि जरी परिस्थिती चांगली असली तरी ती घराच्या इज्जतीचे लख्तयरै उढवले जातील म्हणुन तिचंच कुटुंब तीला साथ देत नाही....


एखाद्या महिले वर अत्याचार झालाच तर तिला न्याय मिळवुन द्यायला कोणी येत नाही दोन चार दिवस आपण पोस्ट टाकुन मेनबत्या जाळुन मोकळे होतो....पण ज्या महिलेवर अत्याचार होतो तिला काय वाटत असेल तिचं पुर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत ह्याचा कधी विचार केला आहे का???? 


हेमांगी कवी मॅडम आपण जेवढं लेख लिहुन ज्ञान पाजळलात तुमचं ऐकुन तुमचं अनुकरण करु लागल्या काही महिला आणि त्यांच्या वर कधी अत्याचार झालाच आपण जाणार आहात का त्यांना न्याय मिळवुन द्यायला??? तुम्हाला काय जातय लेख लिहुन मोकळं व्हायला??? 


आपल्या भारतातला कायदा अजुनही एवढा सक्षम नाही एखाद्या बलात्कार्याला किंवा खालच्या पातळीवर जाऊन टीका करणार्यांना फेक अकाउंट बनवुन महिलांना त्रास देणाऱ्याला शिक्षा करेल जेव्हा आपल्या भारतातील कायदा कडक होईल तेव्हा तुम्ही महिला स्वातंत्र्य बद्दल बोला किंवा लिहा....


महत्वाचं आपण आपली संस्कृती जपली पाहिजे आपण परदेशात राहत नाही आपल्या भारतातील संस्कृती अख्या जगातभरात फेमस आहे नऊवारी काष्टा सहावारी पट्टु लेहंगा पोलका घागराचोळी प़जाबी ड्रेस पुर्ण अंगभर सफेद रंगाची मिडी मुस्लिम बुर्खा ओडणी  हे सर्व पेहराव आपण विसरत चाललोय.... आणि,


आता ब्रा आणि चड्डी ( निकरवर ) यायचं बाकी राहिलं नाही तर येतंच आहेत कारण महिला स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लिल आणि फुकटची प्रसिद्धी मिळवायची हा केविलवाणा प्रयत्न आहे... 


लेखिका : -  समाजातील महिलांच्या विषयांवर परखड, रोखठोक लेखन करणाऱ्या लेखिका सुरेखाताई माने 






Sunday, July 4, 2021

"ईडीची बेडी... जरंडेश्वरची खरी कहाणी... जरंडेश्वर एक ट्रेलर आहे... फिल्म अभी बाकी है दोस्त" - राजकीय विश्लेषक, जेष्ठ पत्रकार संजय जेवरीकर यांचा रविवार विशेष लेख...

  


"ईडीची बेडी... जरंडेश्वरची खरी कहाणी... जरंडेश्वर एक ट्रेलर आहे.. फिल्म अभी बाकी है दोस्त"...


माझ्या जेवरी गावाच्या मुशीत जन्मलेल्या कॉ.माणिक जाधव यांनी सुरू केलेल्या मोहिमेला काल पहिले यश आले.थोर समाजसेवक अण्णा हजारे यांना सोबत घेऊन कॉ.माणिक जाधव यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातील साखर कारखाण्याची बेभावात झालेल्या विक्रीच्या विरोधात मागच्या दहा वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू केला असून शेतकऱ्यांचे साखर कारखाने खाजगी मालकीचे करण्याचा जो घाट अनेक नामवंत राजकारण्यांनी घातला त्यांना ईडी आणि CBI च्या जाळ्यात अडकवून सहकार चळवळीची जी वाट लावली त्याचा पर्दाफाश करण्याचा माणिक जाधव यांनी चंग बांधला आहे.



मागच्या चाळीस वर्षांपासून शरद पवार आणि त्यांच्या कंपूने ही वाढत चाललेली सहकार चळवळ सहकारी बँकेच्या माध्यमातून कर्जाचे डोंगर उभे करून ते कारखाने अवसायनात आणून पुन्हा ते विक्रीला काढायचे आणि स्वतःच्या मालकीचे करून ते बँकेला गहान ठेवून पुन्हा बँक लुटायचा जो उद्योग केला त्यामुळे महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीचे खरे मारेकरी कोण? हा प्रश्न जनतेने विचार करावा लागणार आहे.


 


55 सहकारी साखर कारखाने बेकायदेशीर विक्री करून एक मोठा दरोडा सहकारी क्षेत्रावर घातला की काय अशी शंका मनाला येऊ लागली आहे. जरंडेश्वर साखर कारखाना सहकाराचा खाजगी कसा झाला? याची कथा सगळ्यांनीच अभ्यास करण्याजोगी आहे.




हा कारखाना राष्ट्रवादीच्या आमदार शालिनीताई पाटील यांच्या ताब्यात होता.हा कारखाना 2008 साली बँकेकडून जप्त करण्यात आला. त्यावर फक्त 19 कोटीचे कर्ज होते, 8 कोटीच्या ठेवी होत्या, 33 कोटींची थकहमी होती,इतकं सगळं असताना हा कारखाना राज्य सहकारी बँकेला सांगून ताब्यात घेण्यास भाग पाडले आणि विक्रीला काढला. 




2005 पासून शालिनीताईला बँकेने पैसे देण्याचे बंद केले होते हे विशेष. या दरम्यान 2005 साली सरकार पवारांच्या ताब्यात असल्याने त्यांनी सगळे कारखाने आणि बँकांचे खाजगीकरण करण्याचा ठरावही केला होता. जशी ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली तसे पवार कंपनीने ही सगळे कारखाने आणि बँका खाजगी करण्याचा ठराव केला असल्याचे पुरावे आता ईडीला लागले आहेत,याचिकाकर्ते कॉ.माणिक जाधव यांच्याकडे माहितीच्या अधिकारातून प्राप्त झाले आहेत.




25 हजार सभासद,चाळीस कोटीचे मूल्यांकन असताना या कारखान्यास केवळ खाजगी करण्यासाठी घाट घातला गेला आणि शालिनीताई याना नेस्तनाबूत करून त्याची विक्री करण्याचे कटकारस्थान शिजले गेले. हा कारखाना काही दिवस वारणा ग्रुपच्या विनय कोरे यांनीही चालवला, त्यांना मंत्रिमंडळात संधी दिली गेली आणि कारखाना सोडायला भाग पाडले,पुन्हा तो उत्तरप्रदेशातील स्नेहा शुगरला दिला.



 27/9/2010 ला एक टेंडर काढले त्यात 12 जणांनी टेंडर भरले त्यामध्ये सध्याच्या गुरू कमोडिटी प्रायव्हेट लिमिटेड यांचे टेंडर नव्हते हे विशेष. पुन्हा दुसरी आणि तिसरी संधी देण्यात आली. हे टेंडर 12/10/2010  च्या बोर्ड मिटिंगमध्ये बंगलोरच्या एस.एल.शुगरने सर्वाधिक 65 कोटीचे भरले होते मात्र तिथेच त्याला बाद करून 65 कोटी 75 लाख रुपयांचे टेंडर दाखवले गेले.




गुरू कमोडिटी या कंपनीचे भागभांडवल नगण्य असताना,त्याचा turn over अत्यल्प असताना केवळ त्याच्या हातात कारखाना देण्याचे पाप कोणी केले हा प्रश्न आज उपस्थित होतोय आणि त्याची सगळी कागदपत्रे ईडीच्या ताब्यात आली आहेत. 




खरा घाट घातला तो 7/5/2011 रोजी बोर्ड बरखास्त झाले,तिथे गोयल नावाचे प्रशासक आले मात्र त्यांचे कोणीही न ऐकता हा कारखाना प्रायव्हेट करण्याची बीजे पेरली गेली. राज्य बँकेचे 7 प्रादेशिक कार्यालये आहेत त्यापैकी एक पुण्यात आहे. 200 रुपयांच्या बॉण्डवर सेल डिड बनवण्याचा उद्योग केला गेला. तालुका निबंधक कार्यालयात या बॉण्डवर 18 कोटी 89 लाखाचे सेल डिड बनवले गेले.प्रशासकाला याचा थांगपत्ता नाही हे विशेष. आणि हे पैसेही बँकेत जमा केले नाहीत हे दुसरे विशेष.



या दरम्यान शालीनीताईची याचिका,कॉ.माणिक जाधव,अण्णा हजारे आणि अरोरा यांची हायकोर्टात याचिकेची सुनावणी झाली. 22 ऑगस्ट 2019 ला हायकोर्टाने पाच दिवसाच्या आत गुन्हे दाखल करावेत असे आदेश दिले. 26 ऑगस्ट 2019 FIR दाखल झाला,76 संचालक आणि शरद पवार यांना आरोपी केले गेले. 224/19 आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या 78/19 या कलमानुसार गुन्हे दाखल झाले. 




यानंतर सरकार बदलले,श्रीकांत परोपकारी या पोलीस आयुक्तांनी कुठलाही तपास न करता सगळ्यांना क्लीन चिट दिली. ईडीने 10 हजार पानाच्या रिपोर्टमध्ये गुन्हा सिद्ध केला मात्र आयुक्ताने दीड लाख पानाचा अहवाल असतानाही क्लीन चिट दिली,ही किमया सत्तेची आहे हे विशेष. त्यानंतर कॉ.माणिक जाधव,अण्णा हजारे,अरोरा यांनी क्लीन चिट विरोधात याचिका फेटाळावी असा दावा पुन्हा दाखल केला आणि तपास ईडी आणि CBI कडे देण्याची मागणी केली.



जिल्हा बँक पुणे यांनी जिल्ह्याबाहेर जाऊन जरंडेश्वर या कारखान्याला दहा वर्षात 700 कोटीचे कर्ज दिले हे विशेष. हा कारखाना ज्या दिवशी विकत घेतला त्याच दिवशी चालवायला दिला हा विक्रमही या कारखान्याच्या नावावावर नोंदवला गेला. 2010-11 चा सिझन BVG ग्रुपने चालवला,त्यानंतर गुरू कमोडिटी कडून जरंडेश्वर ने भाड्याने घेतल्याचे दाखवले,आणि फायनान्स मात्र जय ऍग्रोने केले,10 कोटीचे शेअर्स दाखवले.या कंपनीत 50 टक्के शेअर्स अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे आहेत.




पवार कुटुंबाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हात असा आहे,हे यावरून सिद्ध होते..या सगळ्या प्रकरणात ईडीने कसून चौकशी केली,सगळा बोगसपणा उघड केला आणि त्यांनतर कारखाना ताब्यात घेण्याची कारवाई केली. कुठलीही सुसूत्रता नाही,पुणे बँक साताऱ्यात जाऊन शेतकऱ्यांचे 700 कोटी कोणाच्या आदेशाने देते?या सगळ्याचा बोलविता धनी कोण?या प्रश्नांची उत्तरे सहकार क्षेत्राने शोधायची आहेत.


सत्ता सतत का हवी,सत्तेतून पैसा आणि पैश्यातून सत्ता मिळवण्यासाठी का प्रयत्न केले जातात? सत्ता नसताना शरद पवार का अस्वस्थ असतात? ईडीच्या चौकशीचे सगळे फास उलटवून,सहानुभूती निर्माण करून सत्ता जरी मिळवली असली तरी पुन्हा ईडीने फास आवळला आहे,हे ध्यानात घ्यायला हवे.



असे 55 सहकारी साखर कारखाने जे शेतकऱ्यांच्या मालकीचे आहेत ते कसे खाजगी केले याच्या सुरस कथा हळू हळू बाहेर यायला लागल्या तर शेतकऱ्यांचे खरे मारेकरी कोण? या प्रश्नांची उत्तरे मिळायला लागतील.


जरंडेश्वर एक सॅम्पल आहे,ज्याचे मूल्यांकन 40 कोटी दाखवले आणि बँकेकडून कर्ज घेताना मात्र 400 कोटी कसे झाले?आणखी 55 कारखाने आणि त्यांचा इतिहास बाकी आहे,अण्णा हजारे,कॉ.माणिक जाधव मागच्या दहा वर्षांपासून भूमीगत राहून या सगळ्या करखान्याची माहिती गोळा करत आहेत, माहितीच्या अधिकारात या सुरस कथा उघड होत आहेत. 




सरकार कोणतेही असो मिलीभगत करून शेतकऱ्यांना उध्वस्त करू पाहणाऱ्या सगळ्यांना त्याची जागा ईडीच्या बेडीत नक्कीच मिळणार आहे.ही सुरस कथा महाराष्ट्रातील किती कारखान्यात पाहायला मिळेल देव जाणे.सहकारातून स्वाहाकार आणि त्यातून पाहुणचार करण्याचा उद्योग,एक दिवस महाराष्ट्र विकायला लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.जरंडेश्वर एक ट्रेलर आहे.. फिल्म अभी बाकी है दोस्त..


लेखक : - राजकीय विश्लेषक, जेष्ठ पत्रकार संजय जेवरीकर.