पुणे,दि.२५ : महाराष्ट्रातील गणेशोत्सव मंडळांसाठी प्रेरणादायी कार्य करणारे पुण्यातील प्रसिद्ध एकता मित्र मंडळ नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून गणेशभक्तांची मने जिंकत असते. समाजातील विविध घटकांसाठी प्रामाणिकपणे कार्य करणारे पुण्यातील अरणेश्वरनगर येथील एकता मित्र मंडळ ट्रस्ट नेहमीच प्रेरणादायी उपक्रम राबवून पुणेकरांची मने जिंकत असते.
गुरुवारी एकता मित्र मंडळ ट्रस्ट व वंचित विकास, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वस्तीभागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच युवा वर्गासाठी ‘उद्योजकता विकास, व्यवसाय वृद्धी’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
चूल आणि मुल ही संकल्पना मागे टाकत महिला आपल्या संसाराला हातभार लावण्यासाठी छोटे - मोठे व्यवसाय करताना आपल्याला दिसून येतात.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
पण व्यवसाय करत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी, भेडसावणारे प्रश्न, कायदेशीर कागदपत्रे व शासकीय योजनांच्या माहिती अभावी अनेक संभ्रम त्यांच्या मनात उत्पन्न होतात आणि त्यांच्या या सर्व समस्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी वस्तीपातळीवरील महिला व युवा वर्गासाठी या उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन केले.
यावेळी कॉसमॉस बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक जितेंद्र जाधव व नितीन डिंबळे यांनी उपस्थित महिलावर्ग व युवा वर्गाला मार्गदर्शन केले.
लघु व्यावसायिकांना भांडवल उभारणीसाठी बँकेच्या विविध कर्ज योजना त्यासाठी लागणारी कागदपत्रे, प्रपोजल बनवणे, मार्केटिंग आणि ट्रेडिंग, पॅकेजिंग आणि ब्रॅन्डिंग, शासकीय योजना व व्यवसायाच्या संधी, इ. बाबत उपस्थितांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे तज्ञांकडून देण्यात आली व पाहुण्यांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती करून कार्यक्रमाची सांगता झाली.
"आज आमचे एकता मित्र मंडळ हे नुसते गणेशोत्सव मंडळ म्हणून मर्यादित काम करत नाही, तर समाजातील प्रत्येक महत्त्वाच्या घटकाचा सर्वांगीण विकास व सर्व स्तरावर चांगले काम करून आपला ठसा उमटविण्याचा सकारात्मक प्रयत्न करीत आहे. मंडळ हे नुसते मंडळ नसायला पाहिजे तर मंडळाच्या माध्यमातून नव नव्या गोष्टी घडवत समाज हित कसे साधता येईल, हे एक उत्तम उदाहरण समाजामध्ये रुजवण्यासाठी एकता मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते धडपड करीत आहेत. महिला व बाल विकास,युवावर्ग यांच्यासाठी गेली ४ वर्षे मंडळाचे विशेष काम चालू आहे आणि त्यांना सक्षम करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांना प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्याचा सकारात्मक प्रयत्न शेवटपर्यंत आम्ही सर्वजण करणार आहोत." अशी प्रतिक्रिया एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते सुधीर ढमाले यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
एकता मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष सुधीर ढमाले, वंचित विकासच्या तेजस्विनी थिटे तसेच मंडळाचे पदाधिकारी योगेश मांढरे, शुभम बाणखेले, जयेश ढमाले, हिरेन गायकवाड, महेश लोभे, आशुतोष अमराळे, सुशांत सुभेदार, संकेत मिरघे, चेतन ढमाले, सनी तिवाटणे, दूर्वांकुर ढमाले, संकेत आढाव, आदिनाथ नाईक, आदर्श चावट यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या उद्योजकता विकास कार्यशाळेत ४० हून अधिक महिला व युवा वर्गाने लाभ घेतला. महिलावर्ग व युवा वर्गासाठी मार्गदर्शन करणारा व प्रेरणा देणारा हा कार्यक्रम झाला.
पुण्यातील प्रसिद्ध एकता मित्र मंडळ नेहमीच महाराष्ट्रातील शेकडो - हजारो गणेशोत्सव मंडळांनी आदर्श घेऊन, चांगले काम करण्यासाठी, विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून दिशा देण्याचे काम करत असते.
आजच्या काळातील तरुण पिढीची ताकद खूप मोठी आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी तरुण पिढीने महत्त्वाचे योगदान देणे गरजेचे आहे. गणेशोत्सव मंडळातील तरुण कार्यकर्त्यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment