Tuesday, September 22, 2020

महाराष्ट्रात कोविडसंदर्भात २ लाख ६३ हजार गुन्हे दाखल; २५ कोटी ८५ लाख रुपयांची दंड आकारणी – गृहमंत्री अनिल देशमुख



 मुंबई दि. २१ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार  २ लाख ६३ हजार गुन्हे, तसेच १३४७ वाहनांवर अवैध वाहतुकीचे गुन्हे दाखल तर २५ कोटी ८५ लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आली, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

 


राज्यात दि. २२ मार्च ते २० सप्टेंबरपर्यंत कलम १८८ नुसार २,६३,४८१ गुन्हे नोंद झाले असून ३५,८८० व्यक्तींना अटक करण्यात आली. ९६,१७४ वाहने जप्त केली. यातील विविध गुन्हांसाठी २५ कोटी ८५ लाख ९४ हजार ०६४ रु. दंड आकारण्यात आला.

 

कडक कारवाई

 

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दृष्टप्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या ३५९ घटना घडल्या. त्यात ८९४ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

 


१०० नंबर- १ लाख १३ हजार फोन

पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर  १,१३,११६ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३४७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर ९६,१७४ वाहने जप्त करण्यात आली.

 


पोलीस कोरोना कक्ष

 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने राज्यातील १९९ पोलीस व २३ अधिकारी अशा एकूण २२२ पोलिस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

 

नागरिकाचा सहभाग

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment