Monday, November 30, 2020

छावा स्वराज्य सेनेचा विधानपरिषद पुणे पदवीधर निवडणुकीसाठी; महाराष्ट्राचे प्रसिद्ध व्याख्यानकार, इतिहास अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे यांना जाहीर पाठींबा

 

पुणे, दि. 29 : महाराष्ट्र विधानपरिषद पुणे पदवीधर मतदार संघाची निवडणूक अपक्ष लढविणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्यानकार, इतिहास अभ्यासक, उच्चविद्याविभूषित उमेदवार डॉ.श्रीमंत शिवाजी कोकाटे यांना छावा स्वराज्य सेना या सामाजिक संघटनेने जाहीर पाठींबा दिला. 




छावा स्वराज्य सेना महाराष्ट्र राज्य                  संस्थापक/अध्यक्ष राम घायतिडक(पाटील) यांनी डॉ. श्रीमंत कोकाटे यांची सदिच्छा भेट घेऊन  पुणे पदवीधरसाठी श्रीमंत कोकाटे निवडणूक लढवीत आहेत यामुळे त्यांचे अभिनंदन केले व निवडणुकीबाबत काही महत्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करून छावा स्वराज्य सेना,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने डॉ. श्रीमंत कोकाटे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. 

      

या जाहीर पाठिंब्याचे पत्र डॉ. श्रीमंत कोकाटे यांना देताना छावा स्वराज्य सेना,महाराष्ट्र राज्य संस्थापक/अध्यक्ष राम घायतिडक(पाटील),प्रदेश कार्याध्यक्ष श्री.अरीफभाई शेख तसेच श्री.अमित हातवळणे,श्री.उमेश चांदणे, श्री.नितीन पवार व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




पुरोगामी चळवळीतील अभ्यासू व्यक्तिमत्त्व, विचारवंत, इतिहास अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे पदवीधरांचे प्रश्न नक्कीच सोडवतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे असे छावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष राम घायतिडक(पाटील)यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूज शी बोलताना सांगितले.


महाराष्ट्राच्या 'या' नेत्याने पदवीधरांसाठी वर्षभरापूर्वीच केले होते यशस्वी उपोषण; आता पदवीधरांच्या प्रश्नांवर मतदारांशी हायटेक पद्धतीने थेट संवाद साधून, विधानपरिषद पुणे पदवीधर निवडणूक लढवून प्रचारातही आघाडीवर..

 

पुणे, दि. 29 : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी प्रबळ उमेदवारांमुळे चांगलीच गाजत आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात सर्वच प्रमुख उमेदवार जरी व्यवस्थित रणनीती आखून प्रचार करत असले तरी, पदवीधर मतदार नोंदणी ऑनलाइन व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते, पुणे पदवीधर अपक्ष उमेदवार युवराज पवार यांनी मागील वर्षीच 25 ते 27 नोव्हेंबर असे 3 दिवस यशस्वी उपोषण केले आणि पदवीधर मतदार नोंदणी ऑनलाइन झाली.




युवराज पवार यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातील पदवीधर मतदारांशी आधुनिक तंत्रज्ञानाचा साहाय्याने झूम मिटिंगच्या माध्यमातून संवाद साधून पदवीधरांचे प्रश्न जाणून घेण्याचा,निवडणूक उद्दिष्टे सांगण्याचा प्रयत्न केला यावेळी तरुण पदवीधरांचा  खूप चांगला प्रतिसाद मिळाला असे युवराज पवार यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना सांगितले.




धनाढ्य राजकीय सरंजामदारांचे पुनर्वसन करण्यापेक्षा पदवीधरांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर लढणाऱ्या माझ्यासारख्या विधिमंडळ कामकाजाचा 9 वर्षांचा अनुभव असणाऱ्या अपक्ष उमेदवाराला संधी दिली तर पदवीधरांचे सर्व प्रश्न मी प्रामाणिकपणे सोडवून पदवीधरांच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन असे युवराज पवार यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना सांगितले.




युवराज पवार यांना पदवीधर मतदारांनी का निवडून द्यावे? याची 12 प्रमुख कारणे महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना युवराज पवार यांनी सांगितली.




पदवीधरांनी अपक्ष उमेदवार युवराज पवार यांना का निवडून द्यावे?  या महाराष्ट्र गर्जना न्यूजच्या प्रश्नाचे उत्तर देताना युवराज पवार म्हणाले की, 

मला निवडून देण्याची १२ कारणं खालीलप्रमाणे आहेत.


" १) पदवीधरांच्या सोयीसाठी, स्वतःच्या प्रचारासाठी, प्रचाराची दिशा बदलणार मोबाईल ॲप्लिकेशन तयार करून कार्यकर्त्यां शिवाय तंत्रज्ञानाचा वापर करून सामान्य व्यक्ती तळागाळापर्यंत पोहोचतो हे सिद्ध केले.

२) होय, निवडणूक लढवणारे अनेक पदवीधर उमेदवार युवराज पवार यांचे ॲप,  मतदार यादीत नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी वापरतात. 

३) पदवीधर मतदार नोंदणी ऑनलाइन व्हावी, म्हणून यशस्वी उपोषण केले आणि मतदार नोंदणी ऑनलाईन झाली.

४) पुणे पदवीधर मतदार यादीतील अनेक चुका दुरुस्त करून घेतल्या,  सातत्याने पाठपुरावा केला.

५) मतदार यादी मध्ये नाव शोधण्यासाठी सर्वाधिक  वापरले जाणारे एकमेव मोबाईल ॲप्लिकेशन हे युवराज उत्तम पवार यांचे आहे

६) भाजप उमेदवाराने युवराज पवार यांच्या संकल्पना स्लोगन चोरून स्वतःचे ट्विटर अकाउंट बनवले, तसेच युवराज पवार यांच्या अभ्यासपूर्ण उद्दिष्ठाची नक्कल इतर उमेदवार करत आहे.

७) युवराज पवार यांनी भाजपचे स्लोगन चोर उमेदवार आणि राष्ट्रवादीचे 73 वर्षीय आजोबा उमेदवार यांना पदवीधरांचे प्रश्न आणि विधीमंडळाचे कामकाज यावर चर्चा करण्यासाठी खुले आव्हान दिले

८) कोणत्याही राजकीय वारसा नसताना, राजकीय पाठबळ नसताना, तसेच आर्थिक पाठबळ नसताना अपक्ष उमेदवार असताना सुद्धा पाच जिल्ह्यातील बहुतांश पदवीधरांना त्यांचे नाव माहित आहे. आधार नसताना पदवीधर मतदारांपर्यंत पोचू शकतो तर आमदार झाल्यावर कार्यक्षमता किती वाढेल. 

९) कोविड काळामध्ये पदवीधर मतदारांना घरीच राहण्याचा सल्ला देऊन जनजागृती केली

१०) 417 पदवीधरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करून केले

११) जानेवारी 2020 पासून पदवीधर मतदारांच्या संपर्कात राहणारा एकमेव उमेदवार

१२) विधिमंडळ कामाचा ९ वर्षांचा अनुभव असलेला एकमेव उमेदवार. तुमच्यातला आणि तुमच्यासारखा उमेदवार आहे. स्लोगन चोर भाजप उमेदवार आणि राष्ट्रवादीचे ७३ वर्षीय आजोबा उमेदवार यांचं पुनर्वसन करण्यात आपलं बहुमूल्य मत वाया घालवू नका. पदवीधरांच्या संघर्षाचा आवाज बुलंद करा."

असे युवराज पवार यांनी सांगितले.


विधानपरिषद पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार युवराज पवार यांच्या हायटेक प्रचाराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. पदवीधरांच्या प्रश्नांविषयी झूम मिटिंगच्या साह्याने केलेला व्हिडिओ 1 लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.



Monday, November 23, 2020

काँग्रेस पक्ष मरणासन्न आहे; अशी काँग्रेस मोदींशी कशी लढणार? राहुल - प्रियंकाचा भातुकलीचा खेळ - निखिल वागळे; काँग्रेस प्रेमींना जेष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी दिलेले खणखणीत, वास्तववादी, परखड उत्तर वाचा या विशेष लेखात...

 


गेल्या आठवड्यात जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी काॅंग्रेसबाबत घेतलेल्या आक्षेपांना अजित जोशी (Anushashi) यांनी उत्तर दिलं होत. त्याचा हा प्रतिवाद - 


राहुल - प्रियांकाचा भातुकलीचा खेळ


प्रिय अजित जी, 


सुरवातीलाच तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही मुद्दयाला मुद्दयाने उत्तर दिलंत. इतर काही काँग्रेस समर्थकांप्रमाणे मला ट्राेल केलं नाहीत, शिवीगाळ केली नाहीत की संघी एजंट ठरवलं नाहीत. अजूनही लोकशाहीचा संस्कार तुमच्यावर शिल्लक आहे हे पाहून मन गदगदून गेलं. 


अर्थात, आपल्या या युक्तीवादाशी मी सहमत नाही.  तुम्ही काॅंग्रेसप्रेमी आहात आणि त्याच त्रोटक नजरेतून बघत आहात. मी एक पत्रकार म्हणून हे सविस्तर उत्तर देत आहे.

 



१.आपल्या मुद्दयांकडे वळण्याआधी सांगतो, काॅंग्रेस पक्ष मरणासन्न आहे हे माझं मत कायम आहे. आपले नेते कपिल सिबल आणि गुलाब नबी आझाद यांनी हीच टीका केली आहे. राहुल गांधींच्या धरसोड वृत्तीवर त्याचा रोख दिसतो. गेल्या ६ वर्षात भाजपशी मुकाबला करण्यात पक्षाचं नेतृत्व अपयशी ठरलं आहे. राहुल गांधी यांच्यात सातत्य नाही हे त्यांनी आपल्या वर्तनाने सिद्ध केलं आहे. आज जनतेला नव्हे, तर काॅंग्रेस कार्यकर्त्यांनाही पक्षाबद्दल विश्वास वाटत नाही.




२.पंतप्रधान मोदी हे हुकूमशाही वृत्तीचे आहेत यात काही शंका नाही. अनेक लोकशाही संस्थात त्यांनी हस्तक्षेप केला आहे. पण त्यांनी निवडणूक आयोग भ्रष्ट केलाय या आपल्या आरोपात काही तथ्य नाही. आयोगावर दबाव आहे, पण त्याने मोदींपुढे पूर्ण शरणागती पत्करलेली नाही.अजूनही भारतीय निवडणूक प्रक्रिया बऱ्यापैकी नीट पार पडते आहे. पराभूत पक्ष नेहमी आरोप करतात, पण आजवर कुणीही न्यायालयात गेलेलं नाही. बिहार निवडणुकीनंतर  तेजस्वी यादव आणि काॅंग्रेस यांनी आरोप केले, पण पुरावा दिला नाही. हे सर्व आरोप आयोगाने फेटाळून लावले. काॅंग्रेसला आक्षेप होता तर याविरुद्ध आंदोलन का उभारलं नाही? कोर्टात का अर्ज केला नाही? आता रडीचा डाव कशासाठी ? 




२०१४ ते २० या काळात भाजपपाठोपाठ काही राज्यात काॅंग्रेस आणि विरोधकांना विजय मिळाला आहे. त्यावेळी निवडणूक प्रक्रिया निर्दोष होती काय? वस्तुस्थिती ही आहे की मोदी-शहांच्या निवडणूक मशिनचा मुकाबला काॅंग्रेस करु शकत नाही. तेवढी जिद्द आणि दृष्टी काॅंग्रेसच्या नेतृत्वात नाही. म्हणून तुम्ही रडता आहात. इव्हीएमबाबत तोच प्रकार. या यंत्रात दोष असतील, पण ती हॅक केली जातात या आरोपाला दुजोरा मिळालेला नाही. २००९ ला काॅंग्रेस सत्तेत आली तेव्हा हाच आरोप भाजपने केला होता. मोदी ईव्हीएमच्या हेराफेरीतून जिंकतात या आक्षेपात तथ्य नसल्याचं प्रणव राॅय आणि सुहास पळशीकर यांनी वारंवार  स्पष्ट केलं आहे. तेव्हा या रुदालीत काही दम नाही. तुम्हाला निवडणूका जिंकता येत नाहीत हे कबूल करा. 




३.मोदीविरोधी लढण्यात सर्व विरोधी पक्षांना अपयश आलेलं असताना काँग्रेसचीच का चर्चा होते, असा आपला प्रश्न आहे. काॅंग्रेसकडून अपेक्षा आहेत म्हणून ही चर्चा होते. गांधी-नेहरुंचा वारसा सांगणारा हा पक्ष फॅसिझमचा पद्धतशीर मुकाबला करण्यात करंटेपणा दाखवतो तेव्हा लोकांच्या पदरी निराशा येते.आपण म्हणता राहुल लढतात, पण कुठे? ट्विटरवर ? हाथरससारखा गेस्ट परफाॅरमन्स ते किंवा प्रियांका देतात आणि गायब होतात. बिहार निवडंणुकीच्या वेळी ते पिकनिकला निघून गेले. मग कार्यकर्त्यानी काय करायचं? मोदी-शहा २४ तास राजकारण करतात. राहुल यांच्याकडे ती तडफ नाही. मी राहुलना भेटलो आहे. मला ते सुस्वभावी वाटतात, पण राजकीय धमक त्यांच्या दिसत नाही. इंदिराजीही उच्चभ्रू होत्या, पण संघर्षात त्यांनी कधी हार मानली नाही. आता तर राहुल यांची पक्षावरची पकड सुटली आहे.




४.आपण अण्णा आंदोलनाबद्दल विचारलं आहे. अण्णांवर तुमचा विशेष राग दिसतो.पण ते एक उत्स्फूर्त जनआंदोलन होतं हे विसरु नका. त्याला पाठिंबा दिल्याबद्दल मला खंत वाटत नाही. अण्णांच्या आंदोलनात सगळे पक्ष होते. पण त्याचा फायदा उठवला भाजपने. कारण संघाकडे तशी यंत्रणा होती. खरं तर अण्णांना अटक करुन काॅंग्रेस नेत्यांनी हिरो बनवलं. तुमच्या पक्षातल्या बेबंदशाहीमुळे अण्णांचं उपोषण चिघळलं. एकमेकांचे पाय खेचणारे तुमचे नेते अण्णांना भाजपच्या ताब्यात देऊन गेले. तीच गोष्ट रामदेव बाबाची. यावर मी लवकरच सविस्तर लिहीणार आहे.




५.काॅंग्रेस सेक्युलॅरिजम मिरवते असं आपण म्हणता. म्हणजे नेमकं काय करते? किती काॅंग्रेसी नेत्यांना सेक्युलॅरिजमची व्याख्या स्पष्ट आहे? की निवडणुकीपुरती काॅंग्रेसला सेक्युलॅरिजमची आठवण येते? नेहरुंना अभिप्रेत असलेला सेक्युलॅरिजम आज टिकलाय का? भाजपने काॅंग्रेसवर केलेल्या स्युडो सेक्युलरिजमच्या आरोपाला आजवर उत्तर मिळालेलं नाही. मुस्लीम व्होटबॅकसाठी राजीव गांधींनी शहाबानो खटल्याचा निकाल फिरवला हे सत्य आहे. राममंदिराचे दरवाजे उघडून त्यांनी संघाला मदत केली. १९८४, १९९२-९३ आणि २००२ च्या दंगलीबाबतची काॅंग्रेसची भूमिका सेक्युलर तत्वांचं रक्षण करणारी होती काय? साचर आयोगाची अंमलबजावणी काॅंग्रेस सरकारने का केली नाही? आता काॅंग्रेसवर हिंदू-मुस्लीम दोघांचाही विश्वास राहिलेला नाही. डाॅ. आंबेडकरांचा काॅंग्रेसने सातत्याने अपमान केला. पाठोपाठ दलित दूर गेले. मंडलमुळे ओबीसी फटकून वागू लागले.ही परिस्थिती का निर्माण झाली? १९९१ पासून काॅंग्रेसची सातत्याने अधोगती का होते आहे याचा विचार करा.पक्षात भ्रष्टाचार,लाचारी, दलाली यांचं सुरु झालेलं थैमान सत्ता गेली तरी थांबलेलं नाही. लोक काॅंग्रेसवर विश्वास ठेवायला का तयार नाहीत, त्यामुळे भाजपचं कसं फावतय याचाही लेखाजोखा घ्या जरा. सेक्युलॅरिजमच्या रक्षणाचं घाऊक कंत्राट काॅंग्रेसला देण्याची माझी तयारी नाही. भाजपशी लढायला इतर पक्षही आहेत.या देशातला नागरिक पक्षांपलिकडे जाऊन सेक्युलॅरिजम वाचवेल. काॅंग्रेस मेली तर नवा पर्याय उभा राहील.चिंता नसावी.




६.आपण म्हणता त्याप्रमाणे मी आणीबाणीची मांडणी अर्धवट करत नाही. कुमार केतकर तसं करतात. मी वस्तुस्थिती तोडत मोडत नाही. कारण ती माझी वृत्ती नाही. आपण गेल्या ४० वर्षातलं माझं लिखाण वाचलं नसावं बहुतेक. हल्ली लोकांना न वाचताच बोलायची सवय लागली आहे. इंदिरा गांधींनी आणाबाणीबद्ल माफी मागितली, एकदा नव्हे दोनदा,मग त्यांचे समर्थक या घटनात्मक हुकूमशाहीचं प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थन आजही का करत आहेत? इंदिरा गांधीनी आणीबाणी लोकशाही वाचवण्यासाठी आणली, असं विनोदी विधान काॅंग्रेस खासदार कुमार केतकर यांनी अलिकडेच केलं. ते आपणांस मान्य आहे काय? मोदींवर खोटं बोलायचा आरोप करण्याचा नैतिक अधिकार या मंडळींना आहे काय? 




७.१९७३-७५ या काळात इंदिरा गांधीविरुद्ध झालेली आंदोलनं घटनाबाह्य होती हा शोध आपण लावला आहे. गुजरात, बिहार येथे जयप्रकाशांच्या नेतृत्वाखाली झालेली आंदोलनं पूर्णपणे लोकशाहीवादी होती. जेपींनी लष्कराला आदेश पाळू नका असं सांगितलं हीसुद्धा काॅंग्रेसची लबाडी. बेकायदेशीर आदेश पाळू नका हे जेपींचं आवाहन होतं. त्यातला बेकायदेशीर हा शब्द तुम्ही आज ४५ वर्षांनंतरही काढून टाकत आहात. याला लबाडी म्हणायचं की अज्ञान? ७३-७५ या काळात आणि नंतर आणीबाणीत संजय गांधीनी घातलेला हैदोस विसरु नका. लाचारी, लोकशाही संस्थांचा विनाश यासाठी हा काळ प्रसिद्ध आहे. आज मोदी आणीबाणी न आणता इंदिरा गांधींचंच अनुकरण करत आहेत. काॅंग्रेसवाले याचा मुकाबला करु शकतील असं मला वाटत नाही. अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयानंतर इंदिरा गांधी बिथरल्या आणि स्वत:ची खुर्ची वाचवायला त्यांनी हुकूमशाही लादली हे सत्य काॅंग्रेसला आजही पचताना दिसत नाही. अशी काॅंग्रेस मोदींशी कशी लढणार? 




८.गेल्या ६ वर्षात मी किती वेळा तुरुंगात गेलो असा प्रश्न आपण विचारता. मी पत्रकार आहे. याआधी तुरुंगात गेलो ते आपल्याच सत्तेच्या काळात. मोदी-शहांविरूद्ध उघड भूमिका घेऊनही अजून मी बाहेर आहे. ते जेव्हा अटक करतील तेव्हा आनंदाने गजाआड जाईन.भीमा कोरेगाव, सीएएविरोधी आंदोलनात मी सामिल झालो आहे. एल्गार परिषदेच्या स्थानबद्ध कार्यकर्त्यांसाठी सभा घेतल्या आहेत. तुमच्या पक्षाचा कोणी तरी महान नेता यात होता काय? राहुल- प्रियांका आंदोलन करत नाहीत, भातुकलीचा खेळ खेळतात असं माझं मत आहे. गेल्या ६ वर्षात आपल्या पक्षाने कोणतं मोठं आंदोलन केलं हेही सांगावं. स्थलांतरीत मजुरांसाठी काही करायची संधीही काँग्रेसने गमावली. म्हणूनच आज मोदी डोईजड झाले आहेत.




९.काॅंग्रेसने नेहरुंच्या काळापासून संघाला कशी मदत केली याविषयी मी लवकरच एक लेख प्रसिद्ध करतोय. १९४९ साली बाबरी मशिदीत रामलल्ला मूर्ती कुणी आणि कशा ठेवल्या, त्यात काॅंग्रेसच्या स्थानिक नेत्यांची भूमिका काय होती हे तपासा. संघावरची पहिली बंदी नेहरुंच्या काळात उठली. हिंदू कोड बिलाच्या वेळी नेहरुंनी हिंदुत्ववादी शक्तींपुढे माघार घेतल्याने डाॅ. आंबेडकरांनी राजीनामा दिला हे विसरता येणार नाही. १९८०च्या निवडणुकीत इंदिरा गांधीनीही संघाची मदत घेतली. पंतप्रधान नरसिंह राव यांनी तर बाबरी पाडणाऱ्याना खुली छूट दिली. मग इतर पक्षांवर आरोप करण्याचा अधिकार आपल्याला कसा पोचतो? संघाला प्रमाणपत्र जेपींसह इतर अनेक नेत्यांनी दिलं. ते संदर्भांसकट बघितलं पाहिजे. गांधीजीही यातून सुटले नाहीत. प्रणव मुखर्जी हे ताजं उदाहरण. संघाचा धोका आपल्या नेत्यांना कळला नाही असं म्हणावं लागेल. संघाने अशा बावळट प्रमाणपत्रांचा वापर करुन घेतला आहे. संघाशी लढायचं असेल तर संघटना बांधणी करावी लागेल. दीर्घ पल्ल्याचं काम करावं लागेल. तेवढी चिकाटी राष्ट्र सेवा दलात नाही की काॅंग्रेस सेवा दलात. 




१०.शेवटी, तुम्ही मला काॅंग्रेसमध्ये सामिल होण्याचं आवाहन केलं आहे. असला धंदा मी करत नाही. मी पत्रकार आहे, मला पत्रकारच राहू द्या. कोणत्याही राजकीय पक्षात मी जांणार नाही, काॅंग्रेससारख्या रोगग्रस्त पक्षात तर नाहीच नाही. मला १९९६ ला काॅग्रेसने ( प्रभाकर कुंटे) तर २०१४ ला केजरीवाल यांनी लोकसभा तिकीट देऊ केलं होतं. ते मी विचारपूर्वक नाकारलेलं आहे. 


एक विनंती. ही चर्चा काॅंग्रेसजनांनाही वाचायला द्या. फारसा परिणाम होणार नाही कदाचित, पण प्रयत्न करा. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. फुटेल कधी तरी दगडाला पाझर. 


 धन्यवाद. काळजी घ्या. 


तुमचा मित्र, 

निखिल वागळे


 लेखक - महाराष्ट्राचे जेष्ठ पत्रकार, जेष्ठ राजकीय विश्लेषक : निखीलजी वागळे.


Saturday, November 21, 2020

मराठा समाजाच्या गरीब मजुराच्या मुलाला MBBS वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षमय प्रवासात 'या' तहसीलदार व वकिलांनी; दिली अनमोल साथ..


बीड, दि. 20 : गरिबी माणसाला संघर्ष करायला लावत असली तरी अश्या संघर्षमय प्रवासात समाजातील काही देवमाणसं, खरे सामाजिक चेहरे मदतीला धावून येत असतात. बीड तालुक्यातील मराठा समाजातील गरीब मजुराचा मुलगा ज्ञानेश्वर पिराजी गाडे यांनी एमबीबीएस या वैद्यकीय पदवीप्रवेशासाठी आर्थिक दुर्बल, मागास प्रवर्गातुन अर्ज केल्यानंतर वैद्यकीय प्रवेश मिळवण्यासाठी गरजेचे असलेले आर्थिक दुर्बल, मागासलेपणाच्या प्रवर्गाचे प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातून मिळत नसल्यामुळे यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ज्ञानेश्वर गाडे यांना प्रवेश नाकारला जात असताना सामाजिक कार्यकर्ते, ॲड.विशाल कदम, ॲड.अतुल हावळे, तहसीलदार सुशांत शिंदे, शिवसंग्राम संघटनेचे अक्षय माने या अडचणीच्या, संघर्षाच्या काळात गाडे कुटुंबियांच्या मदतीला धावून आले.


मराठा समाजाला आर्थिक मागास प्रवर्गातील लाभ देवू नये असा शासन निर्णय 28 जुलै 2020 रोजी महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. या निर्णयामुळेच तहसिल कार्यालयातुन आर्थिक दुर्बल प्रवर्गाचे प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे ज्ञानेश्वर गाडे यांना एमबीबीएस वैद्यकीय पदवीप्रवेशासाठी यवतमाळ मेडिकल कॉलेजने प्रवेश नाकारला असे  सामाजिक कार्यकर्ते ॲड. विशाल कदम यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना सांगितले.


ज्ञानेश्वर गाडे यांच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीविषयी व एमबीबीएस वैद्यकीय पदवी प्रवेशातील अडचणींविषयी सांगताना ॲड.विशाल कदम म्हणाले, "बीड तालुक्यातील आहेर वडगाव येथील  पाराजी गाडे अत्यंत गरिबीच्या आणि हलाखीच्या परस्थिती मध्ये त्यांच्या मुलाला वैद्यकीय शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न  करीत असताना ज्ञानेश्वर गाडे यांनी एमबीबीएसला प्रवेश मिळविण्यासाठी आर्थिक मागास असलेल्या प्रवर्गा मधून अर्ज भरला. त्यांचा नंबर देखील यवतमाळ येथील शासकीय महाविद्यालयात लागला. मात्र सदरील शासन निर्णयामुळे त्यांना आर्थिक मागास असलेल्या प्रवर्गाचे प्रमाणपत्र तहसील कार्यालय देत नव्हते. शिवसंग्राम मध्ये काम करणारे अक्षय माने यांनी मला सकाळी साडेदहा वाजता फोन केला आणि सदरील विद्यार्थ्याला कॉलेजमध्ये प्रवेश नाकारला जातोय म्हणून सांगितलं. तात्काळ मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याबाबत मी याचिका दाखल करायला सांगितली. मी बीड मध्ये असल्याने न्यायालयात जाऊ शकत नव्हतो.  आमचे मित्र अँड. अतुल हावळे यांनी सदरील याचिका तात्काळ न्यायालयासमोर मेंशन करून बोर्डवर घेतली." असे ॲड. विशाल कदम यांनी सांगितले.



ज्ञानेश्वर गाडे यांच्या एमबीबीएस वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या संघर्षमय प्रवासाबद्दल सांगताना ॲड.विशाल कदम म्हणाले, "न्यायालयाने ज्ञानेश्वर पिराजी गाडे या विद्यार्थ्याला तात्काळ आर्थिक मागासलेल्या प्रवर्गाचे प्रमाणपत्र देण्याचे आदेश काढले. आदेशाची प्रत प्राप्त झाली नाही म्हणून तहसील कार्यालयात प्रमाणपत्र देता येणार नाही असे सांगितले. चार वाजता  पिराजी गाडे यांचा फोन आला की प्रमाणपत्र देत नाहीत. नायब तहसीलारांशी मी फोन वर बोललो. त्यांनी पण नकार दिला. मी तात्काळ तहसील कार्यालय गाठले. हातात कोणताच कागद नाही. सकाळपासून फक्त फोन वर पाठपुरावा सुरू होता. प्रवेश घेण्याची मुदत सायंकाळी 5 वाजेपर्यंत होती, त्यानंतर प्रवेशप्रक्रिया बंद करण्यात येणार होती.असे ॲड. विशाल कदम यांनी सांगितले.



न्यायालयाच्या प्रतीची पुढची हकीकत सांगताना ॲड. विशाल कदम म्हणाले, " मी तात्काळ सरकारी वकिलांना फोन केला, त्यांनी तोंडी सूचना तहसील कार्यालयात केल्या. पण शासन निर्णयाची अडचण असल्याने प्रमाणपत्र देता येणार नाही त्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची प्रत हवी असे सांगण्यात आले. ती आदेशाची प्रत मिळायला वेळ लागणार होता. पाच वाजून 15 मिनिट झाले होते. निवासी जिल्हाधिकारी राऊत साहेबांना जाऊन लगेच आम्ही भेटलो. याबाबत त्यांना सर्व माहिती दिली. त्यांनी देखील लेखी आदेश असल्याशिवाय प्रमाणपत्र देता येणार नाही असे सांगितले. माझी पत्नी आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या पॅनल वर असल्याने तिला फोन करून यवतमाळ येथील शासकीय मेडिकल कॉलेजला बोलायला सांगितले. प्रवेश प्रक्रिया बंद करू नये. त्याचा वेळ थोडा वाढवावा अशा सूचना तिने लगेच सदरील कॉलेजच्या डीन यांना दिल्या. पावणे सहा वाजता न्यायालयाच्या आदेशाची प्रत आम्ही ईमेल वर तहसीलदार व कलेक्टर यांना पाठविली."




तहसीलदारांच्या सहकार्याबद्दल सांगताना ॲड.विशाल कदम म्हणाले, " प्रत मिळताच तहसीलदार सुशांत शिंदे यांनी स्वतः प्रत्येक टेबलवर जावून सगळी प्रक्रिया अवघ्या दोन मिनिटांत पूर्ण केली. लागलीच प्रमाणपत्र आमच्या हातात दिले. त्यांनीदेखील मेडिकल कॉलेजच्या प्रशासनाला, मला माझ्या फोनवरून बोलून सांगितले की, त्या विद्यार्थ्याला आपण माणुसकीच्या दृष्टीकोनातून प्रवेश द्यावा. बोलताना त्यांचे डोळे पाणावले होते. त्यांच्या आवाजातून त्यांच्या भावना जाणवत होत्या. ते ज्या परिस्थितीमधून आले होते, त्या परिस्थितीला एक डॉक्टर होणार होता. आम्ही तात्काळ ते प्रमाणपत्र कॉलेजच्या ईमेलवर मेल केले. कॉलेजचे डीन यांच्याशी बोलणे झाले. जेव्हा प्रवेश निश्चित झाला, तेव्हाच पाराजी गाडे यांनी पाणी पिले. तहसील कार्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. पिराजी यांच्या डोळ्यातील पाणी आज खूप प्रेरणा देवून गेले...." असे ॲड. विशाल कदम यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना सांगितले.




गरीबाच्या मुलाला डॉक्टर करण्यासाठी मदत केलेल्या संदिप कदम, गोविंद साठे आणि सहकार्य करणाऱ्या सर्व लोकांचे ॲड.विशाल कदम यांनी आभार मानून, उच्च शिक्षण घेत असलेल्या अडचणीतील प्रत्येक तरुणाला समाजातील लोकांनी मदत केली पाहिजे असे आव्हान ॲड.विशाल कदम यांनी केले.