बीड, दि. 20 : गरिबी माणसाला संघर्ष करायला लावत असली तरी अश्या संघर्षमय प्रवासात समाजातील काही देवमाणसं, खरे सामाजिक चेहरे मदतीला धावून येत असतात. बीड तालुक्यातील मराठा समाजातील गरीब मजुराचा मुलगा ज्ञानेश्वर पिराजी गाडे यांनी एमबीबीएस या वैद्यकीय पदवीप्रवेशासाठी आर्थिक दुर्बल, मागास प्रवर्गातुन अर्ज केल्यानंतर वैद्यकीय प्रवेश मिळवण्यासाठी गरजेचे असलेले आर्थिक दुर्बल, मागासलेपणाच्या प्रवर्गाचे प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातून मिळत नसल्यामुळे यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ज्ञानेश्वर गाडे यांना प्रवेश नाकारला जात असताना सामाजिक कार्यकर्ते, ॲड.विशाल कदम, ॲड.अतुल हावळे, तहसीलदार सुशांत शिंदे, शिवसंग्राम संघटनेचे अक्षय माने या अडचणीच्या, संघर्षाच्या काळात गाडे कुटुंबियांच्या मदतीला धावून आले.
ज्ञानेश्वर गाडे यांच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीविषयी व एमबीबीएस वैद्यकीय पदवी प्रवेशातील अडचणींविषयी सांगताना ॲड.विशाल कदम म्हणाले, "बीड तालुक्यातील आहेर वडगाव येथील पाराजी गाडे अत्यंत गरिबीच्या आणि हलाखीच्या परस्थिती मध्ये त्यांच्या मुलाला वैद्यकीय शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करीत असताना ज्ञानेश्वर गाडे यांनी एमबीबीएसला प्रवेश मिळविण्यासाठी आर्थिक मागास असलेल्या प्रवर्गा मधून अर्ज भरला. त्यांचा नंबर देखील यवतमाळ येथील शासकीय महाविद्यालयात लागला. मात्र सदरील शासन निर्णयामुळे त्यांना आर्थिक मागास असलेल्या प्रवर्गाचे प्रमाणपत्र तहसील कार्यालय देत नव्हते. शिवसंग्राम मध्ये काम करणारे अक्षय माने यांनी मला सकाळी साडेदहा वाजता फोन केला आणि सदरील विद्यार्थ्याला कॉलेजमध्ये प्रवेश नाकारला जातोय म्हणून सांगितलं. तात्काळ मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याबाबत मी याचिका दाखल करायला सांगितली. मी बीड मध्ये असल्याने न्यायालयात जाऊ शकत नव्हतो. आमचे मित्र अँड. अतुल हावळे यांनी सदरील याचिका तात्काळ न्यायालयासमोर मेंशन करून बोर्डवर घेतली." असे ॲड. विशाल कदम यांनी सांगितले.
ज्ञानेश्वर गाडे यांच्या एमबीबीएस वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या संघर्षमय प्रवासाबद्दल सांगताना ॲड.विशाल कदम म्हणाले, "न्यायालयाने ज्ञानेश्वर पिराजी गाडे या विद्यार्थ्याला तात्काळ आर्थिक मागासलेल्या प्रवर्गाचे प्रमाणपत्र देण्याचे आदेश काढले. आदेशाची प्रत प्राप्त झाली नाही म्हणून तहसील कार्यालयात प्रमाणपत्र देता येणार नाही असे सांगितले. चार वाजता पिराजी गाडे यांचा फोन आला की प्रमाणपत्र देत नाहीत. नायब तहसीलारांशी मी फोन वर बोललो. त्यांनी पण नकार दिला. मी तात्काळ तहसील कार्यालय गाठले. हातात कोणताच कागद नाही. सकाळपासून फक्त फोन वर पाठपुरावा सुरू होता. प्रवेश घेण्याची मुदत सायंकाळी 5 वाजेपर्यंत होती, त्यानंतर प्रवेशप्रक्रिया बंद करण्यात येणार होती.असे ॲड. विशाल कदम यांनी सांगितले.
न्यायालयाच्या प्रतीची पुढची हकीकत सांगताना ॲड. विशाल कदम म्हणाले, " मी तात्काळ सरकारी वकिलांना फोन केला, त्यांनी तोंडी सूचना तहसील कार्यालयात केल्या. पण शासन निर्णयाची अडचण असल्याने प्रमाणपत्र देता येणार नाही त्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची प्रत हवी असे सांगण्यात आले. ती आदेशाची प्रत मिळायला वेळ लागणार होता. पाच वाजून 15 मिनिट झाले होते. निवासी जिल्हाधिकारी राऊत साहेबांना जाऊन लगेच आम्ही भेटलो. याबाबत त्यांना सर्व माहिती दिली. त्यांनी देखील लेखी आदेश असल्याशिवाय प्रमाणपत्र देता येणार नाही असे सांगितले. माझी पत्नी आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या पॅनल वर असल्याने तिला फोन करून यवतमाळ येथील शासकीय मेडिकल कॉलेजला बोलायला सांगितले. प्रवेश प्रक्रिया बंद करू नये. त्याचा वेळ थोडा वाढवावा अशा सूचना तिने लगेच सदरील कॉलेजच्या डीन यांना दिल्या. पावणे सहा वाजता न्यायालयाच्या आदेशाची प्रत आम्ही ईमेल वर तहसीलदार व कलेक्टर यांना पाठविली."
तहसीलदारांच्या सहकार्याबद्दल सांगताना ॲड.विशाल कदम म्हणाले, " प्रत मिळताच तहसीलदार सुशांत शिंदे यांनी स्वतः प्रत्येक टेबलवर जावून सगळी प्रक्रिया अवघ्या दोन मिनिटांत पूर्ण केली. लागलीच प्रमाणपत्र आमच्या हातात दिले. त्यांनीदेखील मेडिकल कॉलेजच्या प्रशासनाला, मला माझ्या फोनवरून बोलून सांगितले की, त्या विद्यार्थ्याला आपण माणुसकीच्या दृष्टीकोनातून प्रवेश द्यावा. बोलताना त्यांचे डोळे पाणावले होते. त्यांच्या आवाजातून त्यांच्या भावना जाणवत होत्या. ते ज्या परिस्थितीमधून आले होते, त्या परिस्थितीला एक डॉक्टर होणार होता. आम्ही तात्काळ ते प्रमाणपत्र कॉलेजच्या ईमेलवर मेल केले. कॉलेजचे डीन यांच्याशी बोलणे झाले. जेव्हा प्रवेश निश्चित झाला, तेव्हाच पाराजी गाडे यांनी पाणी पिले. तहसील कार्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. पिराजी यांच्या डोळ्यातील पाणी आज खूप प्रेरणा देवून गेले...." असे ॲड. विशाल कदम यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना सांगितले.
गरीबाच्या मुलाला डॉक्टर करण्यासाठी मदत केलेल्या संदिप कदम, गोविंद साठे आणि सहकार्य करणाऱ्या सर्व लोकांचे ॲड.विशाल कदम यांनी आभार मानून, उच्च शिक्षण घेत असलेल्या अडचणीतील प्रत्येक तरुणाला समाजातील लोकांनी मदत केली पाहिजे असे आव्हान ॲड.विशाल कदम यांनी केले.
अतिशय अभिमानास्पद...
ReplyDelete