Saturday, October 24, 2020

पुरंदरचा युवा दिग्दर्शक,वीरचा सुपुत्र रोहित धुमाळ यांची "गावचा ७/12" ही विनोदी वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला....

 

पुरंदर, दि. 24 : पुरंदर तालुक्यातील वीर गावचे सुपुत्र, युवा दिग्दर्शक रोहित धुमाळ यांनी दिग्दर्शित केलेली "गावचा ७/12" ही विनोदी वेबसिरीज नुकतीच माळरान प्रोडक्शन या युवट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विषय,वास्तव हे आगळ्या,वेगळ्या पद्धतीने मांडून विनोदातून प्रबोधन करण्याचा यशस्वी प्रयत्न दिग्दर्शक रोहित धुमाळ यांनी केला आहे.




पुरंदरचे तरुण दिग्दर्शक रोहित धुमाळ यांनी अवघ्या वयाच्या 21 व्या वर्षी "गावचा ७/12" ही विनोदी वेबसिरीज दिग्दर्शित करण्याचे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलले आहे. या विनोदी वेबसिरीजचे खास असे पीक पाणी, शेतकऱ्यांची व्यथा, पाहुणे आले गावात हे तीन भाग ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर, माळरान प्रोडक्शन या युवट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध झाले आहेत. ग्रामीण, अस्सल, रांगड्या भाषेतील संवादाने सजवलेली, विनोदातून प्रबोधन करणारी ग्रामीण शेतकऱ्यांचा विषय मांडणाऱ्या या वेबसिरीजला अल्पावधीतच चांगला प्रतिसाद मिळाला आहे.



महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान श्रीनाथ म्हस्कोबा श्री क्षेत्र वीर येथील निसर्गरम्य, अस्सल ग्रामीण  वातावरणात या वेबसिरीजचे चित्रीकरण करण्यात आलेले आहे. रोहित धुमाळ यांनी ग्रामीण भागातील नवीन  तरुण कलाकारांना या वेबसिरीजच्या माध्यमातून अभिनयाची संधी दिली.




"मनोरंजनासाठी वेगवेगळ्या विषयांवर वेबसिरीजची निर्मिती केली जाते पण आपल्या ग्रामीण शेतकऱ्यांचा विषय,आपल्या मातीतली ग्रामीण संस्कृती आगळ्या, वेगळ्या पद्धतीने, विनोदातून प्रबोधन करण्यासाठी 'गावचा सातबारा' ही वेबसिरीज मी दिग्दर्शित केली. असे युवा दिग्दर्शक रोहित धुमाळ यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूज शी बोलताना सांगितले.




ग्रामीण भागातील मित्रांची फौज घेऊन,उपलब्ध कमी साधनसामग्रीचा,तंत्रज्ञानाचा वापर करून  ग्रामीण शेतकऱ्यांच्या विषयावर वेबसिरीज बनवण्याचे धाडस नक्कीच कौतुकास्पद आहे. अजित धुमाळ यांनी कॅमेरामन म्हणून या वेबसिरीजचे उत्तम चित्रीकरण केलेले आहे. 




या वेबसिरीजमधील तरुण कलाकार वैभव चव्हाण, रोहित धुमाळ,सिद्धेश गवारे,प्रजवल बुणगे,संकेत गवारे,शिव शिर्के व गोविंदा ढमढेरे यांनी उत्तम अभिनय करून कथानकाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. रोहित धुमाळ व श्रेयस गवारे यांनी कथानकाचे अप्रतिम लेखन केल्यामुळे ही वेबसिरीज ग्रामीण लोकांना आपलीशी वाटते.




"ग्रामीण भागातील तरुण दिग्दर्शक ग्रामीण शेतकऱ्यांचा विषय आगळ्या, वेगळ्या, खास पद्धतीने वेबसिरीजच्या माध्यमातून मांडतोय हे खूप कौतुकास्पद पाऊल आहे. ग्रामीण भागातील तरुणांच्या या विनोदातून प्रबोधन करणाऱ्या 'गावचा सातबारा' या वेबसिरीजच्या सर्व टीमला सर्वांनी प्रोत्साहित केले पाहिजे." असे आव्हान महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी केले. महाराष्ट्र गर्जना न्यूजच्या टीमने माळरान प्रोडक्शन प्रस्तुत "गावचा ७/१२" या टीमला शुभेच्छा देऊन कौतुक केले.



1 comment:

  1. एक काळ होता,
    कि या क्षेत्रात एखाद्या विशिष्ठ वर्गाची मक्तेदारी होती,
    अशा क्षेत्रात ग्रामिण भागातील तरुण जर पुढे येऊन निर्मिती करीत असतील तर हि अतिशय अभिमानाची बाब आहे.
    सचिन शिंदेपाटील
    लघुपट लेखक/दिग्दर्शक/निर्माता
    विघ्नहर्ता मुव्हिज,पुणे

    ReplyDelete