गांधीविचारांची आज तीव्र गरज...
काही लाख इंग्रज कोट्यवधी भारतीयांवर राज्य करू शकले त्याची अनेक कारणे आहेत त्यातील सर्वात मुख्य कारण म्हणजे जात-पात , धर्म-वर्ग यात विभागलेला समाज.
काही लोक लढायचे पण त्याला म्हणावा तितका पाठिंबा मिळत नसे. शिवाय सामान्यांना व पददलित वर्गाला तर त्याने काही फरकच पडत नसे. त्यांच्यावर इंग्रजांनी राज्य केले काय, मोगलांनी केले वा पेशव्यांनी केले, त्यांचे तर सगळीकडे हालच होत.
पण जेव्हा महात्मा गांधी आले तेव्हा त्यांनी काय केले तर जात ,धर्म, पंथ, वर्ग, लिंग आदी सर्व भेद विसरून देशासाठी लढण्यासाठी एकत्र केले. त्यांच्यात सुराज्य मिळवण्याचा आत्मविश्वास निर्माण केला जो त्यापूर्वी कोणी निर्माण केला नव्हता.
आज पुन्हा जेव्हा जाती जातीचे मोर्चे पाहतो तेव्हा गांधीविचारांची तीव्रतेने गरज जाणवते.
गांधीजी -जात आणि धर्म
गांधीजींनी कोणत्याही जातिचे वा धर्माचे अतिरेकी समर्थन केले नाही म्हणून सर्व जातीतील कट्टरवादी लोक त्यांचा द्वेष करतात .
एका जातीतील कट्टर लोकांना पुणे करारामुळे गांधीजी ब्राम्हणधार्जिणे आणि दलितद्वेष्टे (मनुवादी) वाटतात.
कट्टर उच्चवर्णीयांना गांधी ब्राम्हणद्वेष्टे दलित धार्जिणे वाटतात कारण जिथे एका जातीचे वर्चस्व होते अशी सर्व ठिकाणे राजकारण, समाजकारण व इतर अनेक गांधीजींनी अस्पृश्यता निवारण चळवळीद्वारे सर्व जातीसाठी खुली केली जिथे त्यापूर्वी फक्त उच्चवर्णीयांचे वर्चस्व होते.
पाकिस्तानमधील काही कट्टर मुस्लिमांनाही आम्हाला छोटा पाकिस्तान दिला,काश्मीर दिला नाही वगैरे कारणावरून गांधी मुस्लिमद्वेष्टे व हिंदुधार्जिणे वाटतात.
त्यामुळे गांधीजींच्या मागे त्यांचा उदो उदो वा देव करणारी कोणताही जातसमूह नाही. जेवढी टिंगल गांधीजींची उडवली जाते त्याच्या एक टक्का जरी इतर कोणत्या महापुरुषांची झाली असती तर दंगली झाल्या असत्या, पण हेच गांधीजींचे वैशिष्ट्य आहे कुठल्याही जातीचा , धर्माचा, पंथाचा आधार न घेता ते जगभर पोहचले या उलट इतर जातींच्या महापुरुषांना त्यांच्याच जातीच्या लोकांनी स्वतःपुरते संकुचित करून ठेवले.
कुठल्याही महापुरुषाचे गुणगान करताना किंवा चरित्र लिहितांना गांधीजींना कमी लेखावेच लागते त्याशिवाय यांचा महापुरुष मोठा होत नाही.याउलट गांधीजीनी स्वतःच्या चरित्रात इतर कुणाही महापुरुषाला कमी लेखण्यापेक्षा स्वतःलाच कमी लेखले आहे.
गांधीजी आणि जागतिक प्रभाव
त्यांचा भारतावरच नाही तर पूर्ण जगावर प्रभाव आहे हे आपणास माहीतच नसते.
जगभर २ ऑक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिवस ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून साजरा केला जातो. 130पेक्षा जास्त देशांनी गांधीजीवर अभ्यास करण्यासाठी विद्यापिठ सुरु केली आहेत.
शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन म्हणतो, गांधी नावाचा हाडा मांसाचा महान माणूस या पृथ्वीवर होऊन गेला यावर पुढील पिढ्या विश्वास पण ठेवणार नाहीत. ( आईनस्टाईन हा मानवी इतिहासातील सर्वात बुध्दीमान माणसांपैकी एक आहे ),
ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणात म्हटले की जर गांधीविचार नसते तर मी आज इथे नसतो? मार्टिन ल्युथर किंग, बीटल्सचा उद्गाता जाॅन लेनन, रोमेन रोलंड, रीचर्ड अॅटनबरो, अलीकडचे स्टीव्ह जाॅब्ज, दलाई लामा, आॅंग साॅन स्यु की , हेन्री फोर्ड, मलाला, सत्यार्थी, अभय बंग, सुधा-नारायनमूर्ती,प्रकाश आमटे इ. अनेक माणसे गांधींपासून प्रेरणा घेऊन मोठी झाली आणि त्यांनी जगाचा इतिहास बदलला आणि आजही बदलत आहेत.
गांधीजी व समकालीन महापुरुष
स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पाहताना एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी.
सर्व महापुरुषांना एकमेकांविषयी प्रचंड आदर होता त्यांचे मार्ग जरी वेगळे असले तरी ध्येय एकच होते.
आझाद हिंद सेना स्थापन केल्यावर नेताजींनी त्यात ज्या तुकड्या बनवल्या त्यांची नावे गांधी टुकडी व नेहरू टुकडी होते. आकाशवाणीवरून गांधीजीना राष्ट्रपिता म्हणणारे नेताजी सुभाषचंद्र बोसच होते तर सुभाषचंद्र बोस ना प्रथम नेताजी म्हणणारे गांधीच होते.
शहीदे आजम भगतसिंहनी आपल्या 'नये नेताओंके अलग अलग विचार' या पुस्तकात नेताजी बोसना emotional Bengali, a devotee of the ancient culture of India तर नेहरुंना internationalist and revolutionary असे म्हटले आहे.
गांधीजी राष्ट्रपिता
‘ गांधींचे राष्ट्रपितापण हे कुणाच्या मानण्या न मानण्यावर अवलंबून नाही आणि कुणाच्या मेहेरबानीने ते महात्माजींना मिळालेले नव्हते. शतकानुशतके अन्याय आणि शोषणामुळे अवनत झालेल्या करोडो भारतीयांच्या उत्थानाचा आशय गांधींनी स्वातंत्र्य आंदोलनाशी जोडला. अस्पृश्य, दलित, शेतकरी, कष्टकरी, महिला अशा सर्वानीच आपले उत्थान भारतीय स्वातंत्र्यलढय़ात पाहिले. सर्वाच्या दु:खांवर गांधींनी आपल्या करुणेची केवळ फुंकरच घातली नाही, तर त्यांच्यातील स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम जागृत करून समतेवर आधारलेला राष्ट्रवाद गांधींनी उभा केला. गांधीजींनी कृश आणि दुबळ्या हाताने मूठभर मीठ उचलले आणि एका बलाढय़, गौरवशाली साम्राज्याचा पाया खचून गेला. कारण कोटी कोटी भारतीय जनतेच्या तन-मन-धनाची प्रेरणा त्या कृश आणि दुबळ्या हातांत एकवटली होती. गांधींनी राष्ट्रही जागविले आणि नवा राष्ट्रवादही जागविला. म्हणूनच सर्वच बाबतीत विभिन्नता असलेल्या देशात सर्वाना राजकीय, सामाजिक आणि आíथक समतेच्या संधी देणाऱ्या एका सेक्युलर संविधानाची, एका आधुनिक नव्या राष्ट्राची निर्मिती शक्य झाली. त्यामुळे गांधी राष्ट्रपिता ठरतात.
गांधीजी खूप अध्यात्मिक वा धार्मिक होते त्यामुळे ते मनुवादी होते असा काही मंडळींचा आरोप असतो
सत्य - गांधीजी हे धार्मिक व आध्यात्मिक असले तरी धर्मांध व दुसऱ्या धर्माचा द्वेष करणारे नव्हते
गांधीजींचे अध्यात्म हे धार्मिक अथवा साक्षात्कारी नव्हते. त्याला सामाजिक परिमाणे होती. समाजाची सेवा, निसर्गाचे रक्षण, जलसंवर्धन, सार्वजनिक आरोग्याची काळजी हे त्यांना अभिप्रेत होते. व्यक्तिगत त्याग व व्यक्तिगत विकास यातून समाजाच्या हिताचा व्यापक विचार त्यांनी मांडला होता. एकाही डोळ्यातून एकही अश्रू निघू नये, गरिबी, अन्याय, विषमता यांचे उच्चाटन व्हावे, हीच त्यांची जीवनदृष्टी होती, हेच त्यांचे अध्यात्म होते आणि हाच त्यांचा परमार्थ होता. स्वातंत्र्याचा उल्लेख करणाऱ्यांनी स्वातंत्र्याकडे कसे पाहावे, याची दृष्टी गांधीजींच्या आचरणातून मिळते..
महात्मा गांधी आणि गोसेवा -
महात्मा गांधी गोसेवक होते पण गोरक्षणाच्या नावाखाली माणसाला मारायला व माणसा-माणसात भेद पडायला त्यांनी कडाडून विरोध केला होता.
25 जुलै 1947 सालच्या सर्वधर्म प्रार्थनेच्या वेळी गांधींजीनी गोहत्याबंदीसाठी करत असलेल्या उपोषणकर्त्या मित्राला आपल्या भाषणातून खडसावले होते "भारतात गोहत्या बंदीचा कायदा होऊ शकत नाही. गोसेवेचं व्रत मी अनेक वर्षांपासून स्वीकारलं आहे, पण माझा धर्म सर्व भारतीयांचा कसा असू शकेल? ही तर हिंदू नसलेल्या भारतीयांवर बळजबरी होईल.जोपर्यंत एखादा माणूस गोहत्या न करण्यास प्रवृत्त होत नाही, तोवर मी त्याला बळजबरी कशी करू? भारतात फक्त हिंदूच नाहीत तर मुस्लीम, पारसी, ख्रिश्चन आणि इतर धर्मांचे लोकही राहतात. आता भारत हा फक्त हिंदूंची भूमी आहे, हे हिंदूंचे गृहितक चुकीचे आहे. इथे जे राहतात, भारत त्या सर्वांचा आहे."
गांधीजी आणि अहिंसा-
एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करा हे गांधीजी काही इंग्रजांबाबत बोलले नव्हते तर हरीजनांबाबत बोलले होते.दंगल झाल्यावर जेव्हा सवर्णांनी हरीजनांवर अन्याय केला तेव्हा गांधींनी हे उद्गार काढले होते त्यांचे पूर्ण वाक्य असे होते 'एका गालावर मारले आणि दुसरा गाल पुढे केला आणि त्याच्यावर जरी मारले तरी आपण हरीजनांवर जो अत्याचार केला आहे त्याचे परिमार्जन होणार नाही. काश्मीरमध्ये दंगली चालू होत्या पाकिस्तान घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा नेहरूंनी गांधीजींना विचारले होते की आत्ता अहिंसेचे कसे करायचे त्यावर गांधींनी उत्तर दिले होते की मी जर तुमच्या जागी असतो तर सैन्याचा वापर केला असता आणि पाकिस्तानच्या घुसखोरीला चोख प्रत्युत्तर दिले असते.पत्रीसरकारचे मुख्य क्रातीसिंह नाना पाटील जेव्हा महात्मा गांधींना भेटले त्यांना आपल्या ‘पत्रीसरकार’बद्दल सांगितले. त्यावर गांधीजी म्हणाले होते, की ‘नाना पाटील, तुमची चळवळ माझ्या तत्त्वात बसते न बसते यापेक्षा तुम्ही १९४२ ची स्वातंत्र्य चळवळ जिवंत ठेवली, साताऱ्याने या चळवळीचे नाव राखले हे महत्त्वाचे होय ! नाना, तुम्ही बहादूर आहात. भ्याडाच्या अहिंसेपेक्षा शुराची हिंसा परवडेल असे मानणारा मी आहे.
संघ आणि गांधी
संघातील मंडळी अश्या बाता मारतात कि गांधीजीनी संघाचे कौतुक केले होते म्हणून पण गोळवलकर गुरुजींच्या भेटीनंतर महात्मा गांधीजींनी गोळवलकर गुरुजी व रा. स्व. संघ याबद्दलचे त्यांचे मत नेहरूंकडे व्यक्त केले होते. नेहरूंनी सरदार पटेलांना लिहिलेल्या एका पत्रात ते उदधृत केले आहे. नेहरू लिहितात : "बापूंनी श्री. गोळवलकरांच्या पहिल्या भेटीनंतर सांगितल्याचे स्मरते की त्यांनी (गोळवलकरांनी) काहीशी छाप टाकली हे खरे; पण मी त्यांच्यावर विश्वास टाकायला तयार नाही. त्यांच्याशी झालेल्या दुसर्या व तिसर्या भेटीनंतर मात्र प्रतिकूल मत व्यक्त करून बापू म्हणाले, यांचा काही भरवसा देता येत नाही. ही मंडळी बोलताना समजूतदार, वाजवी भासतात. पण नंतर बोलल्याच्या नेमके उलट वागण्यात त्यांना कसलाही खंत, खेद वाटत नाही. माझंही मत तसंच झालं आहे."
(सिलेक्ट कॉरस्पॉन्डन्स ऑफ सरदार पटेल-१९४५-५० भाग २ सं. व्ही. शंकर, नवजीवन, अहमदाबाद)
कस आहे भगतसिंह-राजगुरु फ़ासावर चढत होते .
कोट्यावधी सर्वसामान्य भारतीय माणसे प्रांत , प्रदेश ,संस्थान ह्या सगळ्या सीमा पार करून गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय म्हणून एक होऊन इंग्रजांशी लढत होते.
सुभाषबाबु आझाद हिंद सेनेतुन सशस्त्र लढा देण्याचा प्रयत्न करत होते, बाबासाहेब दलित स्वातंत्र्यासाठी झगडत होते .......,खुदीराम बोस, चंद्रशेखर आझाद इथिपासुन तिथपर्यंत लोक येन केन प्रकारे देशासाठी सर्वस्व अर्पण करत होते तेव्हा हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा मुस्लिम लीग अस नाव लावणार्या आणि स्वतःला सामाजिक संघटना म्हणवणाऱ्या या संघटना , संघटना म्हणून ह्या लढाईत आपल काय योगदान देत होत्या ?
मग ज्या लढाईत आपण भाग घेतलाच नाही त्या लढाईत पुढे असणाऱ्या नेत्यांचे असणारे मतभेद ( जे वैचारिक असतील , मार्गाबद्दल असतील पण ध्येयाबद्दल कधीच नव्हते ) चव्हाट्यावर आणून चघळत बसण्याचा नैतिक हक्क ह्या संघटनांना कसा मिळतो ?
आपल्याच मनाला आपण प्रश्न विचारले तर उत्तर सापडतील पण कबूल करण्याची हिंमत असायला पाहिजे.
देशाच्या सरहद्दीवर हजारो सैनिक भगव्या किंवा हिरव्यासाठी लढत नाहीत तर तिरंग्यासाठी लढत आहेत देशाचे ऐक्य तुटेल असे काही करु नका.
शेवटी बाबा आमटेंच्या मुक्तछंदातील हे शब्द सांगून विराम घेतो
त्याने प्रथम एका मिठाच्या पुडीला हात घातला आणि मग एक साम्राज्य
मिठाच्या सात समुद्र पलीकडे फेकून दिले.त्याने सुतातून सुरुवात केली
आणि अखेर स्वराज्याचा स्वर्ग गाठून दाखवला. याच साध्या सुताने त्याने एक पिढीच्या पिढी आणि एक देशच्या देश बांधून दाखवला.
पण एक देशच्या देश आणि एक पिढीच्या पिढी पकडण्यासाठी
नुसतीच हिकमत पुरी पडत नाही
त्यासाठी ताकदही लागते
भारी वजनाचा एक क्रूस वाहण्याची ताकद!"
"ज्याला तो क्रूस वागवता येतो
त्याच्या सोबत बारा अनुयायी असले
तरी त्याचे प्रेषितत्व घाबरत नाही.
पण खांद्यावर क्रूस नसता कुणी बारा लाख बाजारबुणगे घेवून निघाला
तरी त्याचा महंत होतो.
आणि महंत फक्त गादी चालवू शकतात.
मन्वंतरे घडवून आणू शकत नाहीत
लेखक -
या गांधीजयंती विशेष लेखाचे तरुण लेखक संकेत मुनोत हे गांधीवादी विचारसरणीचे लेखक असून "एक धैर्यशील योद्धा - गांधी" या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक आणि संकलक असून गांधीवादी विचारसरणीचे महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्यानकार देखील आहेत. चांगले विचार आणि नोविंग गांधीजम ग्लोबल फ्रेंड्स समूहांमार्फत गांधीजींच्या विचारांचा प्रसार करून अनेक उत्तम सामाजिक उपक्रम राबवित असतात.
संपर्क क्रमांक - ८०८७४४६३४६
Knowing Gandhism Global Friends
changalevichar1@gmail.com
No comments:
Post a Comment