महाराष्ट्राच्या समाजकारणात, राजकारणात मोठा सामाजिक व राजकीय वारसा मिळालेली अनेक तरुण नेतेमंडळी मिळालेल्या अनमोल वारस्याचा, पद, पैसा, प्रसिद्धी, घराणेशाहीने मिळालेल्या मोठया राजकीय ताकदीचा योग्य उपयोग करून समाजकारणात व राजकारणात मोठी ताकद निर्माण करून चांगले स्थान निर्माण करतात. पण सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या सामान्य माणसाला समाजकारणात, राजकारणात चांगले स्थान निर्माण करण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो. प्रस्थापित श्रीमंत सरंजामदारांविरोधात खूप मोठी लढाई लढावी लागते. जनतेच्या न्याय हक्कांसाठी, गंभीर प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे आणि निर्भीडपणे अन्यायकारी व्यवस्थेविरोधात आवाज उठवणारी फार कमी लोक समाजात असतात. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील ग्रामीण भागातील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या विकास लवांडे यांचा प्रस्थापित अन्यायकारी व्यवस्थेविरुद्ध सामान्य लोकांच्या न्याय हक्कांसाठी लढण्याचा प्रवास, सामाजिक चळवळीतील व समाजहितवादी राजकीय जीवनातील संघर्षमय प्रवास तरुण पिढीसाठी खूप प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे.
कोरोना महामारीने समाजातील सर्वच घटकांना खूप मोठा फटका बसलेला आहे. कोरोना महामारीने भारताच्या व महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेचे कंबरडे मोडायचा प्रयत्न केला. लाखोंच्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्यांनी महाराष्ट्र हादरला. कोरोनाग्रस्त गंभीर रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटल मिळत नव्हते,व्हेंटिलेटर बेड मिळत नव्हते,ऑक्सिजन बेड व ॲम्बुलन्स मिळत नव्हती म्हणून शेकडो लोकांचा मृत्यू झाला. श्रीमंतांनी मोठया हॉस्पिटलचे आयसीयू बेड 3 महिने बुक केले होते. खाजगी हॉस्पिटलवाले सरकारी आरोग्य योजनेच्या माध्यमातून सामान्य लोकांना उपचार देण्यास नकार देत आहेत. खाजगी हॉस्पिटलवाले अवाजवी, जास्त बिल आकारून सामान्य लोकांची लूटमार करत आहेत अश्या गंभीर आणि भयानक परिस्थितीत महाराष्ट्रात सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावून आलेला हा देवमाणूस, गरिबांचा कैवारी, सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावून जाणारा खरा लोकनेता विकास लवांडे.
कोरोना महामारीच्या काळात एखादया गंभीर रुग्णाला जेव्हा हॉस्पिटल मिळत नाही, हॉस्पिटल मिळाले तरी व्हेंटिलेटर बेड मिळत नाही, या सर्व सुविधा मिळुनही गंभीर अवस्थेतील रुग्ण वाचेल की नाही याची भीती असते, अश्या परिस्थितीत ज्यावेळेस हॉस्पिटलचे अवाजवी बिल भरायला त्या रुग्णाच्या कुटुंबीयांकडे पैसे नसतात त्यावेळेचा संघर्ष फार भयंकर आणि वेदनादायी असतो. अश्या शेकडो कुटुंबियांना विकास लवांडे यांनी मदत करून सरकारी योजनेतून मोफत उपचार मिळवून दिले. खाजगी हॉस्पिटलच्या लुटारू व्यवस्थापनाशी संघर्ष करून विकास लवांडे यांनी अनेक लोकांचे अवाजवी, जास्तीचे बिल कमी करून घेतले तसेच सर्वसामान्य , गरीब लोकांना महात्मा फुले योजनेतून कोरोना व इतर गंभीर आजारांसाठी मोफत उपचार मिळवून देण्याचे महत्वाचे कार्य केले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कुठल्याही जिल्ह्यातुन, कुठल्याही तालुक्यातुन आरोग्यसेवेसाठी फोन आला तरी विकास लवांडे यांनी सर्वांना खूप मदत केलेली आहे.
महाराष्ट्राचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली युवक क्रांती दलाच्या सामाजिक चळवळीत विकास लवांडे यांनी सलग 14 वर्ष पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ता म्हणून राज्यभर जनतेच्या गंभीर प्रश्नांसाठी अनेक यशस्वी आंदोलने व उपोषणे केली. दारूबंदीची चळवळ असो की व्यसनमुक्तीची चळवळ असो विकास लवांडे यांनी महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये जाऊन प्रबोधन करून, आंदोलने करून, उपोषणे करून, प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष करून अनेक गावांमध्ये दारूबंदी केली आणि हजारो माता - भगिनींचे संसार उद्धवस्त होण्यापासून वाचवले.
एक दिवस जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन करायचे म्हटले तरी अनेकजण घाबरतात पण विकास लवांडे यांनी जनतेच्या गंभीर प्रश्नांसाठी, डीएड शिक्षकांच्या प्रश्नांसाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी, जनसामान्यांच्या विविध गंभीर प्रश्नांसाठी पुण्यात फुटपाथवर रात्रंदिवस मुक्काम करून 14 दिवस, 16 दिवस, 26 दिवस, 58 दिवस अन्यायग्रस्तांना घेऊन दीर्घकाळाची धरणे आंदोलने यशस्वी करून दाखवली.
विकास लवांडे यांनी शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांनवर 8 दिवसांची, 10 दिवसांची अशी वेगवेगळी उपोषणे केलेली आहेत. काँग्रेसचे जेष्ठ नेते, समाजसेवक डॉक्टर मोहन धारिया यांच्याबरोबर शेतकरी कर्जमाफीसाठी विकास लवांडे यांनीही 7 दिवसांचे उपोषण केले होते त्यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी उपोषण स्थळी येऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य करून उपोषण सोडवले होते.
महाराष्ट्रात भ्रष्टाचार विरोधी अनेक आंदोलनात विकास लवांडे यांनी सक्रिय सहभागी घेऊन महत्वाची भूमिका बजावलेली आहे. पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध असा थेऊर सहकारी साखर कारखान्याचा भ्रष्टाचारी कारभारा विरोधात आवाज उठवून शेतकरी सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठीही विकास लवांडे यांनी अनेक आंदोलने केलेली आहेत. शेतकरी असो की शेतमजूर, कामगार असो की शिक्षक, कष्टकरी महिला असो की सुशिक्षित तरुण कुणीही विकास लवांडे यांच्याकडे कुठलीही गंभीर समस्या घेऊन आले तरी विकास लवांडे माणुसकीने, आपलेपणाने आणि गांभीर्याने ती गंभीर समस्या समजून घेऊन ती समस्या सोडवण्यासाठी निस्वार्थपणे आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. जिल्हाधिकारी,जिल्हाअधीक्षक,विभागीय आयुक्त, सचिव, विविध खात्यांचे मंत्री यांच्या भेटी घेऊन, संपूर्ण पाठपुरावा करून विकास लवांडे जनतेच्या विविध गंभिर समस्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात.
पुणे जिल्ह्यातील अनेक गावांच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांना विकास लवांडे यांनी यशदा आणि जिल्हा परिषदेच्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचे काम केलेले आहे. राज्यभरातही विविध सामाजिक विषयांवर शेकडो व्याख्याने दिलेली आहेत. 2011 ते 2015 पर्यंत समाजसत्ता या लोकप्रिय साप्ताहिकाचे संपादक म्हणून विकास लवांडे यांनी उत्कृष्ट कार्य केले. केंद्रीय मंत्री डॉक्टर मोहन धारिया यांच्या हस्ते या साप्ताहिक समाजसत्ताचे उद्घाटन झाले होते. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न विकास लवांडे यांनी साप्ताहिक समाजसत्ताच्या माध्यमातून केला.
समाजकारणासाठी राजकारण हा मूळ पिंड असलेले विकास लवांडे यांनी राजकीय शिक्षण म्हणून जिल्हा परिषद आणि विधानसभेच्या निवडणुका अपक्ष म्हणून लोकवर्गणीतून लढवल्या. 2014 ला विकास लवांडे यांनी समविचारी, पुरोगामी विचारसरणीच्या वाटणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लोकप्रिय नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर विकास लवांडे यांनी पक्षाची ध्येयधोरणे जनसामान्यांपर्यंत प्रामाणिकपणे पोहचवण्याचा प्रयन्त केला त्यामुळेच अल्पावधीतच विकास लवांडे यांची नियुक्ती पुणे जिल्हा सरचिटणीस पदावर झाली. महाराष्ट्रातील सामाजिक कार्याचा 15 - 20 वर्षांचा अनुभव असलेल्या विकास लवांडे यांनी राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा सरचिटणीस झाल्यावर पुणे जिल्ह्यातील पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला.
विकास लवांडे यांचे सामाजिक चळवळीतील कार्य आणि पक्षातील प्रामाणिक कार्य पाहून खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जिल्ह्यातील निवडक 100 युवती व युवक कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी लोकसंवाद व्यासपीठ निर्माण करण्याची आणि तरुण कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी विकास लवांडे यांच्याकडे दिली.
हे काम यशस्वी केल्यामुळे राज्यभरातील निवडक कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी विकास लवांडे यांच्याकडे देण्यात आली. महाराष्ट्रातील निवडक 120 युवक,युवती,महिला कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्यांना 6 महिने लोकसंवाद व्यासपीठाच्या माध्यमातून विकास लवांडे यांनी प्रशिक्षण दिले. राज्यभरातील सर्व जिल्हा स्तरावर निवडक कार्यकर्त्यांना कार्यकर्ता शिबिरात विकास लवांडे यांनी प्रशिक्षण दिले. यातील अनेक राष्ट्रवादी चे कार्यकर्ते महाराष्ट्रात विविध महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत.
विकास लवांडे यांचे पक्षातील प्रभावशाली कार्य पाहून 2016 ला पक्षाने विकास लवांडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ते पदी निवड केली. विरोधी पक्षाचे प्रवक्ते असताना देखील विकास लवांडे यांनी महाराष्ट्रातील विविध लोकप्रिय चॅनेलवर पक्षाची भूमिका आक्रमकपणे आणि अभ्यासपूर्ण मांडली.
2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनेक दिगग्ज नेते सोडून जात होते. पक्षातील परिस्थिती गंभीर झाली होती. अश्या प्रतिकूल परिस्थितीतही विकास लवांडे यांनी पक्षाची ध्येयधोरणे, कार्य व भूमिकामहाराष्ट्रात विविध चॅनेलवर खंबीरपणे आणि प्रभावशाली पद्धतीने मांडली. शेतकऱ्यांचे प्रश्न,कामगारांचे प्रश्न, समाजातील विविध घटकांचे प्रश्न विकास लवांडे यांनी विविध चॅनलवरील चर्चेत आक्रमकपणे आणि अभ्यासपूर्ण मांडले. जनतेच्या हितासाठी सत्ताधारी पक्षाच्या चुकीच्या धोरणाविरोधात विकास लवांडे यांनी अनेक वेळा आवाज उठवला.
भारतीय संविधानावर पूर्ण निष्ठा असणारे आणि पक्षकार्य निष्ठवंतपणे करणारे विकास लवांडे यांची सामाजिक चळवळीत जडणघडण झाल्यामुळे समाजातील सर्व घटकांसाठी ते प्रामाणिकपणे काम करत असतात. 25 - 30 वर्षांचे प्रभावशाली सामाजिक कार्य करणाऱ्या विकास लवांडे यांच्यासारख्या लोकनेत्यांची खरी गरज महाराष्ट्राला आहे. कोरोना महामारीच्या काळात सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी विकास लवांडे यांनी जी आरोग्य चळवळ सुरू केली आहे ती खूप कौतुकास्पद आहे. पक्षकार्य प्रामाणिकपणे आणि निष्ठावंतपणे करणाऱ्या विकास लवांडे यांचे मागील 25 - 30 वर्षातील सामाजिक कार्य फार मोठे आणि प्रेरणादायी आहे
कुठलाही सामाजिक विषय हातात घेतला तरी कितीही अडचणी येऊद्यात, कितीही संकटे येउद्यात पण विकास लवांडे तो विषय तडीस नेल्याशिवाय राहत नाहीत. सामान्य माणसाची वेदना त्यांना स्वस्थ बसू देत नाहीत. कुठल्याही प्रसिद्धीची, पदाची अपेक्षा न ठेवता हा जनसामान्यांना न्याय मिळवून देणारा देवमाणूस सामान्य माणसाचे गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी निस्वार्थपणे, प्रामाणिकपणे, आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करून, प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून प्रयत्न करतो आणि जनसामान्यांच्या हृदयात मोठे स्थान निर्माण करतो. विकास लवांडे या महाराष्ट्राच्या प्रेरणादायी सामाजिक योद्धयाला भविष्यात महाराष्ट्राच्या विधानसभा किंवा विधानपरिषदेत काम करण्याची संधी मिळाली तर महाराष्ट्राचे दुसरे आर. आर. पाटील साहेब आपल्याला बघायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते, आदर्श सामाजिक कार्यकर्ते विकास लवांडे यांच्या राजकीय, सामाजिक कारकिर्दीचा आढावा घेण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न आहे.
लेखक - पत्रकार : अजित श्रीरंग जगताप
संपादक - महाराष्ट्र गर्जना न्यूज.
Great work..... CET2010 chya students la sirani khup help Keli.....
ReplyDeleteGreat work..... CET2010 chya students la sirani khup help Keli.....
ReplyDeleteखूप छान मी वाचलेले सर्व खरे आहे माणूस देव आहे पण आता लोकांना समजलं तर चांगलच आहे मी त्यांचा जवळून अनुभव घेतला आहे
ReplyDelete