पुरंदर, वीर, दि. 22 : कोरोना महामारीने संपूर्ण जगात हाहाकार माजवलेला असताना महाराष्ट्रात आरोग्य क्षेत्रातील सर्वच डॉक्टर,नर्स, आरोग्य सेवक आणि सर्वच क्षेत्रातील कोरोना योद्धयांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावून जनतेचे प्राण वाचवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. पुणे जिल्हातील पुरंदर तालुक्यातील वीर गावचे सुपुत्र, कोरोना योद्धे डॉक्टर धनंजय पडळकर यांनी कोरोनाकाळात पुणे येथील प्रसिद्ध असे नवले हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या विभागात कोविड योध्दा, डॉक्टर म्हणून प्रामाणिकपणे कामगिरी बजावून रुग्णांची चांगली सेवा केल्यामुळे पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट वीर यांच्या वतीने डॉक्टर धनंजय पडळकर यांचा सन्मान करण्यात आला.
"कोरोनाकाळातील डॉक्टर धनंजय पडळकर यांनी केलेली प्रामाणिक कामगिरी,रुग्णांची केलेली प्रामाणिक सेवा नक्कीच कौतुकास्पद आहे." अशी प्रतिक्रिया श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन बाळासाहेब धुमाळ यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
या सन्मानावेळी देवस्थान कमिटीचे चेअरमन श्री बाळासाहेब धुमाळ, सचिव तय्यदभाई मुलाणी, संभाजी धुमाळ, दत्तात्रय धुमाळ, तानाजी धुमाळ, गणेश राऊत, संग्राम धुमाळ, संदीप कांचन, शरद चवरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
"कोरोनाकाळात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातुन आलेल्या रुग्णांची पुणे येथील नवले हॉस्पिटलमध्ये मला प्रामाणिकपणे सेवा करण्याची संधी मिळाली. माझ्या पुरंदर तालुक्यातीलही काही रुग्णांचीही सेवा करण्याची संधी मला कोरोनाकाळात मिळाली याचेही मला मनापासून समाधान आहे. माझ्या गावातील ग्रामस्थांनी, श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टने केलेला माझा सन्मान माझी ऊर्जा वाढवणारा आहे, मी सर्वांचा मनापासून आभारी आहे." अशी प्रतिक्रिया डॉक्टर धनंजय पडळकर यांनी महाराष्ट्र गर्जना न्युजशी बोलताना दिली.
"पुणे येथील नवले हॉस्पिटलमध्ये पुरंदर तालुक्यातील कुठल्याही व्यक्तीला गंभीर आजारांवर उपचार घ्यायचे असतील तर मी नक्कीच सहकार्य करेन, मला हक्काने संपर्क करा. असे आव्हान डॉक्टर पडळकर यांनी पुरंदरच्या लोकांना केले.
डॉक्टर धनंजय पडळकर यांनी एमबीबीएस ही वैद्यकीय पदवी पूर्ण केल्यानंतर मागील 3 वर्षांपासून ते पुणे येथील प्रसिद्ध नवले हॉस्पिटलमध्ये स्त्री रोग विभागात कार्यरत आहेत.
"पुरंदरमधील ग्रामीण भागातील वीर या गावातील सर्वसामान्य कुटुंबात लहानाचा मोठा झालेल्या डॉक्टर धनंजय पडळकर यांनी जिद्दीने, कष्टाने, मेहनतीने उच्चशिक्षण घेऊन एमबीबीएस ही वैदयकीय पदवी पूर्ण करून पुणे येथील प्रसिद्ध असे नवले हॉस्पिटलमध्ये मागील 3 वर्षांपासून स्त्री रोग विभागात ते कार्यरत आहेत. कोरोनाकाळातील नवले हॉस्पिटलमध्ये कोरोना योद्धे म्हणून डॉक्टर पडळकर यांनी केलेली प्रामाणिक कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.