पुरंदर/वीर, दि. 3 : भारतात जम्मू काश्मीर, आसाम, दिल्ली, गडचिरोली, वाराणसी अश्या वेगवेगळ्या ठिकाणी भारत देशाची प्रामाणिकपणे सेवा करणारे, पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील वीर गावचे सुपुत्र, कर्तव्यदक्ष सैनिक श्री. सचिन मधुकर कापरे, ९५ बटालियन, केंदीय राखीव पोलीस दलातून सेवानिवृत्त झाल्याबद्दल वीर गावच्या ग्रामस्थांनी वाद्यवृंदासह मिरवणूक काढून त्यांचा सपत्नीक सत्कार केला. देशसेवा करताना निवृत्त झालेल्या सैनिकाची छाती ग्रामस्थांच्या सन्मानाने फुलून आली. या वेळी भावना मोकळ्या करताना ग्रामस्थांना आनंदाश्रूही आले.
"केंदीय राखीव पोलीस बलाचे जवान म्हणून देशभरात सेवा बजावत असताना स्पेशल ड्युटी ग्रुपमध्ये निवड झाल्यामुळे सचिन कापरे यांना माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, पंतप्रधान कार्यालय, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेतही प्रामाणिकपणे सेवा करण्याची संधी मिळाली." अशी माहिती तरुण कार्यकर्ते निलेश कापरे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
भारतीय सैन्य दलात विविध संकटांना सामोरे जात देशाचे रक्षण करणारे जवान भारतमातेचे भूषण असतात. अशा सैनिकांचा ज्या, त्या गावांना अभिमान असतो. वीर (ता. पुरंदर) येथील सैनिक श्री सचिन मधुकर कापरे (CRPF) ३०/११/२०२० रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा सन्मान करण्यासाठी बुधवारी (ता.०२) जवानाची ग्रामस्थांनी वाजत-गाजत मिरवणूक काढली.
गावचे सुपुत्र देशाचे रक्षण करतात याचा अभिमान असल्याने त्यांचा आदर्श गावातील नव्या उमेदीच्या तरुण पिढीने घ्यावा, या हेतूने श्री. सचिन कापरेंसह सर्व निवृत्त सैनिकांची मिरवणूक काढून त्यांचा सन्मान करण्याचे सरपंचासह वीर गावच्या सर्व ग्रामस्थांनी ठरविले.
निवृत्त सैनिकांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यासाठी सकाळपासूनच ग्रामस्थांची लगबग सुरू झाली. बघता-बघता गावच्या मंदिरासमोर सर्व ग्रामस्थ व महिला जमा झाल्या.
निवृत्त जवानाने गणवेशात गावात प्रवेश केला. ग्रामस्थांचा उत्साह पाहून तेही भावुक झाले. "भारत माता की जय' असा जयघोष करीत व वाद्यवृंदांच्या साथीने गावात ही मिरवणूक निघाली. गावच्या सभागृहात मिरवणूक पोचल्यानंतर देशभक्तीच्या वातावरणात महिलांनी या सैनिकांचे औक्षणही केले.
पुरंदरच्या शिलेदाराचा असा झाला सन्मान....
गावच्या सभागृहात निवृत्त सैनिक श्री. सचिन मधुकर कापरे यांचा सपत्नीक सत्कार झाला. याप्रसंगी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना गावातील सर्व माजी सैनिकांचादेखील भव्य नागरी सत्कार ग्रामस्थांमार्फत करण्यात आला.यावेळी सामाजिक, शैक्षणिक,राजकीय क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची व ग्रामस्थांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीर गावचे सरपंच ज्ञानेश्वर वचकल होते. गावातील सर्व माजी सैनिक व त्यांच्या नातेवाईकांची समारंभास उपस्थिती होती.
याप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते सर्व जवानांचा पत्नीसह सन्मान झाला. या सैनिकांनी भावना व्यक्त केल्या. सरपंच ज्ञानेश्वर वचकल यांनी गावातील युवकांनी हा आदर्श समोर ठेवून देश रक्षणासाठी सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले. श्री.योगेश राऊत (गुरुजी) यांनी कार्यक्रमाची संकल्पना मांडली.वीर गावचे ग्रामस्थ श्री.सतिश वचकल,श्री.चंद्रकांत जमदाडे,श्री.कृष्णा राऊत (गुरुजी) ,श्री.महादेव जमदाडे,श्री.निलेश कापरे,चेतन गारडे यांनी आपल्या मनोगतातुन सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. श्री. संतोष वाघ यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
"माझ्या मातीत आपुलकीने माझा सन्मान झाला, याचा गर्व नक्कीच आहे.सेनेतील अनुभवाचा फायदा हा समाजासाठी करण्याचा यानंतरचा प्रामाणिक प्रयत्न करेन. भारतीय सैन्य दलातील केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये चांगली सेवा देता आली, याचा अभिमान आहे. असे मनोगत सेवानिवृत्त सैनिक सचिन कापरे यांनी व्यक्त केले."
देशसेवा करणाऱ्या सैनिकांचा जीवनप्रवास सर्व तरुण पिढीसाठी निश्चितच खूप प्रेरणादायी असतो.
No comments:
Post a Comment