प्रति,
आमदार श्री.रोहित राजेंद्र पवार दादा,
जय जिजाऊ !
आपले फेसबुक अकाउंट हाताळणाऱ्या लोकांना वेळेवर पगार दाणापाणी भेटत असल्याने ते सजगपणे माझं म्हणणं आपल्यापर्यंत पोहोचवतील अशी अपेक्षा बाळगून मी फेसबुकद्वारेच आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या सोशल टीमने जरी हे म्हणणं आपल्यापर्यंत पोहोचवलं नाही, तरी निदान फेसबुकवर तुमच्यासाठी बिनपगारी काम करणारे आमचे काही मित्र तरी हे म्हणणं आपल्यापर्यंत पोहोचवतील अशी खात्री आहे.
विषय प्रासंगिक आहे. योगेश चौरे या आमच्या मित्राने खूप कष्टाने पोल्ट्रीव्यवसाय सुरु केला आहे. त्याचे प्रामाणिक कष्ट आम्ही पाहिले आहेत, अनुभवले आहेत.त्याने त्याच्या पोल्ट्रीतील पक्षांना लागणाऱ्या खाद्याबाबत माझ्याकडे विचारणा केली, त्यावेळी मी त्याला आपल्या बारामती ऍग्रो कंपनीचे पोल्ट्रीखाद्य घेण्याबाबत सुचवले होते. त्याने इतरही ठिकाणी विचारणा केली. शेवटी बारामती ऍग्रोचे खाद्य वापरण्याचा त्याने निर्णय घेतला.
तेव्हापासून तो नियमितपणे आपल्याच कंपनीचे खाद्य वापरतो आहे. काही काळापूर्वी आपल्या कंपनीने जो खाद्याचा लॉट पुरवला होता, त्यामुळे आपल्या पोल्ट्रीतील पक्षांचे नुकसान झाले आहे अशी त्याची आणि त्याच्या भागातील अजून काही पोल्ट्री व्यावसायिकांची तक्रार आहे.
सुरुवातीला कंपनी व्यवस्थापनाकडे पाठपुरावा करुन त्यांनी आपली समस्या मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु व्यवस्थापनाने त्यांना योग्य प्रतिसाद दिला नाही. सोशल मिडियाद्वारे आपल्याविषयी त्यांच्या मनात “आपला माणूस” अशी प्रतिमा आहे, त्या समजुतीतून त्यांनी आपल्याशी फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु आपलाही संपर्क होऊ शकला नाही. गेले दीड महिने हा प्रकार सुरु असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
आपल्यासारख्या युवा नेत्याकडून अपेक्षाभंग झाल्याने सदरहू नुकसानग्रस्तांनी फेसबुक माध्यमावर पोस्ट टाकून आपला रोष व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रसंगी मित्र म्हणून अनेकजण त्यांच्या पाठीशी उभे राहिले.
त्यांच्या सुरात सूर मिसळून अनेकांनी त्यांना त्यांच्या नुकसानाची भरपाई मिळण्याची मागणी केली. आम्हीदेखील आमच्या मित्राने कुणाचीही भीडभाड न बाळगता गुळमुळीत न बोलता निर्भीडपणे स्वतःच्या हक्कासाठी लढण्याची अपेक्षा व्यक्त केली.
त्यापुढे टीका, टिप्पणी, ट्रोलिंग अशी सोशल मीडियाची आयुधेही वापरली. निदान अशा प्रकारातून तरी आपल्यापर्यंत या विषयाचे गांभीर्य जावे हीच आमची अपेक्षा होती.
या प्रकारानंतर आपल्याकडून काहीही प्रतिक्रिया आली नाही. आमच्या मित्रांनी आपल्या स्वीय सहायकांना संपर्क केला असता तिकडून मुजोरपणाची भाषा ऐकावी लागली. आपल्या पगारी आणि बिनपगारी समर्थकांनीही विषयाचे गांभीर्य समजून न घेता नुकसानग्रस्त पोल्ट्री व्यावसायिक आणि त्यांच्या पाठीशी उभे असणाऱ्या मित्रांवरच फेसबुकच्या माध्यमातून प्रतिहल्ला करायला सुरुवात केली.
या सगळ्या प्रकारची हाईट म्हणजे “आमच्या युवा नेत्याला फोन करायचा असेल तर तेवढी लायकी कमवा” असे आव्हान आपले समर्थक करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर तुमची प्रतिमा “आपला माणूस” अशी आहे, त्या आपलेपणातूनच राज्यातील अनेक गरजू लोक आपल्याकडे कामानिमित्त, नोकरीच्या आशेने येतात. त्यांचीही हेटाळणी आपले समर्थक करताना दिसत आहेत.
कृपया दादा आपणच आम्हाला सांगाल का, आपल्याला फोन करण्यासाठी लायकीचे प्रमाण किती असावे आणि त्याचे प्रमाणपत्र कुठे मिळेल ? आपल्याकडे कुणी यावे आणि कुणी नाही हे जर आपले समर्थक ठरवणार असतील तर इथून पुढच्या काळात महादेवाच्या देवळाबाहेर असणाऱ्या नंदीबैलाप्रमाणे आपल्या समर्थकांनी परवानगी दिल्यानंतरच लोकांनी आपल्याला भेटायला यावे का याची स्पष्टता व्हावी.
दादा, आपला आणि मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडमधील पदाधिकाऱ्यांचा स्नेह चांगला आहे याची मला कल्पना आहे. आपण पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक असो किंवा कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक असो, या संघटनेतील लोकांनी आपल्या विजयासाठी घेतलेले परिश्रम आपणास माहीत आहेत.
आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मा.प्रवीणदादा गायकवाड आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी स्वखर्चाने आपले कार्यक्रम आयोजित केले. संघटनेच्या माध्यमातून जोडले गेलेल्या युवकांशी आपला परिचय घडवून आणला.
संघटनेतील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांनाही बारामती दौरा घडवून आपल्या बारामती ऍग्रो, बारामती ऍग्रीकल्चरल ट्रस्टच्या उदाहरणांसहित व्यावसायिक विषयावर मार्गदर्शन सत्र आयोजित केले. अशा अनेक घटना आहेत, जिथे ही संघटना आणि आपला स्नेहभाव आहे. परंतु पोल्ट्रीखाद्य प्रकरणावरुन आपले समर्थक संघटनेची मापं काढण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहेत. या प्रकाराला आपले समर्थन नसेलच अशी अपेक्षा आहे. याबाबत आपण मौन सोडले तर सर्वांना त्याची स्पष्टता होईल.
जाता जाता एक विषय, पवार कुटुंबाला सामाजिक कार्याचा वारसा आहे. अनेक चांगल्या गोष्टींसाठी आपल्या कुटुंबाने अनेकदा आर्थिक सहकार्य केले आहे, पण त्या आर्थिक सहकार्याची कधी जाहिरात केली नाही.
परंतु पोल्ट्रीखाद्य प्रकरणावरुन आपले समर्थक महापुरुषांच्या नावाने सुरु असणाऱ्या सोहळ्यांना आपण केलेले आर्थिक सहकार्य हे उपकार म्हणून दाखवण्यात मग्न झाली आहेत. हा तर आपल्या कौटुंबिक वारशाचा आणि महापुरुषांच्या सोहळ्याचाही अपमान आहे.
महापुरुषांचा सोहळा हा खरोखर अशा उपकाराखाली दबलेला आहे असे जर आपलेही मत असेल, तर मग पुढच्या सोहळ्याच्या आधी आपले हे उपकार व्याजासहित फेडून महापुरुषांचा सोहळा कुठल्याही उपकाराच्या ओझ्याखालून मुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरु करावेत का याचीही सूचना आम्हाला मिळावी अशी अपेक्षा आहे.
विनंती : सदर पोस्ट दादांचे फेसबुक अकाउंट हाताळणारे लोक आणि समर्थक वाचत आहेत असा मला विश्वास आहे. मोठ्या मनाने आपल्या लहान भावाचे म्हणणे आदरणीय रोहित दादांपर्यंत पोहोचवून सहकार्य करा. कमीजास्त असेल तर चुकभुल देणेघेणे.
आपला नम्र,
अनिल माने.
पत्र लेखक : - प्रगतशील शेतकरी, युवा लेखक अनिल माने