Thursday, June 10, 2021

"राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रबांधणीची गरज" - राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांचा 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धापन दिन' विशेष लेख...



राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि राष्ट्रबांधणीची गरज...


संसदीय लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष आणि सार्वत्रिक निवडणूका महत्वाच्या असतात. प्रत्येक मतदार हा राजकीय व्यक्ती असतो.लोकशाहीत कुणीही नागरिक अराजकीय नसतात. त्यामुळे राजकारण आपल्यासाठी सर्वांसाठी खूप महत्वाचे क्षेत्र आहे दुर्लक्ष्य करून चालत नसते.आपले समविचारी आपण मिळवायचे असतात.जे संविधान पूर्वक भूमिका घेतात ते राष्ट्रबांधणीसाठी महत्वाचे व गरजेचे असतात.


महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील एक मोठं नाव म्हणजे शरद पवार. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरवात काँग्रेस पक्षातून झाली. एका विशिष्ट राजकीय परिस्थितीत शरद पवार यांना बावीस वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करावी लागली. काँग्रेसपासून वेगळे झाले तरी लगेच झालेल्या निवडणुकीनंतर काँग्रेससोबत एकत्र येऊन विभाजनवादी शक्तींना सत्तेत येण्यापासून रोखले. त्यानंतर दोन दशकांनी अशाच प्रकारे दोन्ही काँग्रेसनी शिवसेनेला सोबत घेऊन भाजपला सत्तेपासून रोखून इतिहासाची पुनरावृत्ती घडवली.


 Best Offer Amazon



मुंबईत 10 जून 1999 रोजी शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करत आहेत. त्यावेळच्या आणि अलीकडच्या अशा दोन्हीवेळच्या परिस्थितीचे विश्लेषण राजकीय विश्लेषकांनी वेळोवेळी  केले आहे. 




पक्षाची मूलभूत भूमिका व विचारधारा :-

भारतीय संविधानाचा संपूर्ण सन्मान व आदर ठेवणे, संसदीय लोकशाही व्यवस्थेची जपणूक व जोपासना करणे, धर्मनिरपेक्ष व पुरोगामी विचारांची बांधिलकी, सार्वजनिक जीवनात सर्वधर्मसमभावाची जोपासना करणे, अहिंसक मार्गाने कायद्यांच्या चौकटीत राहून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहणे, भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व मानून भूमिका व धोरण ठरवणे, समता, बंधुता व सामाजिक न्यायासाठी बांधील राहून भूमिका घेणे.  





शिव-शाहू-फुले-गांधी-आंबेडकर यांचे तत्वज्ञान व विचारधारा पक्षाने आदर्श मानलेली आहे. या समविचारी सरकार राज्यात व देशात सत्तास्थानी असावे यासाठी सतत प्रयत्नशील राहून सर्व प्रकारच्या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेणे.

 


राजकीय वाटचाल :- 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूलभूत विचारधारेत व तत्वज्ञानात विशेष असा काही फरक नाही. संघटनात्मक कार्यपद्धतीत मात्र थोडासा फरक आहे. दोन्ही काँग्रेसचा एक नंबरचा राजकीय प्रतिस्पर्धी मात्र भाजपच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल सुरुवातीपासून सत्तेत राहिली.




नव्या कार्यकर्त्यांना 2014 पर्यंत फक्त सत्ता माहिती होती. सत्तेशिवाय पक्ष असतो याचा अनुभव 2014 ते 2019 मध्ये आला. तोपर्यंत पक्षातील फक्त सत्ताप्रेमी असलेले आत्मकेंद्री आमदार  इतर पदाधिकारी पक्षांतर करून विसंगत विचारांच्या भाजपमध्ये सहज सामील झाले. त्यामुळे भाजपची तत्कालिन राजकीय गरज पूर्ण झाली. अनेकांनी पक्षांतर  केले तरी पक्ष न डगमगता सर्व निवडणुकांना यशस्वीपणे सामोरा गेला. 




याचे कारण म्हणजे पक्षाचे मुख्य आधारस्तंभ शरद पवार हेच आहे. कोणत्याही संकटाचा किंवा विपरीत परिस्थितीचा सकारात्मक दृष्टीकोन ठेवत कार्यमग्न राहून सामना कसा करायचा हे शरद पवारांनी देशाला अनेकदा दाखवून दिलेले आहे. धर्मांध व जात्यंध विचारांना व कृतीला पक्षाने सतत विरोध केलेला आहे.




1999 ते 2014 या 15 वर्षाच्या आघाडी सरकारच्या सत्ताकाळात  देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सर्वार्थाने प्रगतीपथावर गेलेला स्पष्ट दिसून येतो. विविध शेतीपूरक व्यवसाय , राज्यातील वाढलेले औद्योगीकरण, आधुनिक शेतीला प्रोत्साहन व  चालना, फलोत्पादन, कृषीमाल प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन व चालना, पाणलोट क्षेत्र विकास, ग्रामीण विकास, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे सहकारी संस्थांचे जाळे, विविध प्रकारचे तंत्रशिक्षणाची सोय, महिला सक्षमीकरणासाठीचे विशेष धोरणात्मक निर्णय, अभूतपूर्व पोलीस भरती, ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत हागणदारीमुक्त गावे, जादूटोना विरोधी कायदा, गुटखाबंदी, डान्सबारबंदी, व्यक्तिगत लाभाच्या विविध योजना, सर्व समाज घटकांना समान न्यायाची भूमिका व विविध धोरणात्मक निर्णय इत्यादी कामांची व राबविलेल्या धोरणांची मोठी यादी देता येईल.


पण  भौतिक व सामाजिक विकासाचे प्रश्न कायम अपूर्ण असतात कारण परिस्थितीनुसार गरजा बदलत असतात. सर्व प्रश्न संपले असं कधीच होत नसते. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची दखल अन्य राज्यांनी व देशाने घेतली आहे याचे श्रेय तत्कालीन आघाडी सरकारला द्यावेच लागेल.

 


दरम्यानच्या काळात भाजप ने गोबेल्स नीतीचा वापर करून समाज माध्यमांचा दुरुपयोग करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला व प्रमुख नेत्यांना भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करून बदनाम करण्याचा एककलमी कार्यक्रम कायम राबविला पण आद्यपपर्यंत त्यांचा एकही आरोप सिद्ध झालेला नाही होऊ शकणार नाही.पण खोटे आरोप करून राजकीय फायदा मात्र भाजपला काही प्रमाणात झाला हे कुणीही नाकारू शकत नाही. 


15 वर्षाच्या सत्ताकाळात नेत्यांनी पक्षसंघटनेकडे दुर्लक्ष केले. संघटना नावाला होती की काय अशीच स्थिती होती कारण पक्षात अनेक जण पदे घेऊन व्यक्तिशः मोठे झाले  त्यांना सुभेदार म्हंटले जायचे. तेच पुढे पक्षाला डोईजड झाले होते. मात्र संघटना कमकुवत बनली होती. त्यामुळे 2014 च्या निवडणुकीत त्याचा काही प्रमाणात पक्षाला फटका बसला.




सद्यस्थिती :- 

राष्ट्रवादी काँग्रेसची स्वतन्त्र राजकीय वाटचाल आता बरीच पुढे गेलेली आहे. पक्ष स्थापन होऊन 21 वर्षे पूर्ण झाली. पक्षात 1 नवीन पिढी ज्याला तिसरी पिढी म्हणता येईल ती तयार झाली आहे. महाराष्ट्राशिवाय केरळ, गोवा ,गुजरात, दिल्ली, बिहार इत्यादी राज्यात पक्ष रुजत आहे वाढत आहे. देशाच्या पातळीवर संसदीय राजकारणात नव्या पिढीचे नेतृत्व खासदार सुप्रियाताई सुळे करत आहेत. संसदेतील त्यांची कामगिरी आदर्श आणि उल्लेखनीय ठरलेली आहे. 




संसदरत्न म्हणून त्यांचा दरवर्षी गौरव होत आहे. राष्ट्रीय पातळीवर त्यांनी जनसंपर्क ठेवलेला आहे. समाजकारणासाठी राजकारण,  राजकारणात सुसंस्कृतपणा असला पाहिजे, कोणतेही धोरण ठरवताना त्यात देशहित व समाजहित असले पाहिजे ही यशवंतराव चव्हाणांची कृतिशील शिकवण पक्षासाठी कायम मार्गदर्शक व आदर्श आहे. पद्मविभूषण शरद पवार ही पक्षाची मोठी संपत्ती आहे. 




सध्या महाविकासआघाडी सरकारमध्ये पक्षाचा सहभाग मोठा आहे. अजितदादा पवार सरकारमध्ये पक्षाचे सक्षमपणे नेतृत्व करत आहेत. जयंत पाटील यांच्या सारखा अभ्यासू व संयमी नेता पक्षाच्या राज्य संघटनेची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. दर आठवड्याला पक्ष कार्यालयात पक्षाचे सर्व मंत्री जनता दरबार घेत असतात. त्याचा राज्यातील सर्वसामान्य जनतेला नक्कीच फायदा होतोय. महाविकासआघाडी ही राज्याची सध्याची राजकीय गरज होती ती पूर्ण झाली. 





हाच प्रयोग 2024 साठी राष्ट्रीय पातळीवर देशाला दिशादर्शक ठरू पहात आहे. राज्यात सरकार बनले आणि थोड्याच दिवसांत कोव्हीड महामारीचे संकट आले त्याचा सामना सर्वपातळीवर सरकार व आपण सर्वजण करत आहोत. लोकशाही मूल्यांची गळचेपी होईल अशी भूमिका कधी घेतली नाही किंवा आपल्या राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यासाठी  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने कधीही शासन व्यवस्थेचा दुरुपयोग केला नाही करत नाही. हे आज अतिशय महत्वाचे आहे.


वैचारिक बांधिलकी असलेल्या कार्यकर्त्यांचीच पक्ष संघटना बांधणी करणे आवश्यक आहे. कार्यकर्त्यांची वैचारिक जडणघडण कार्यकर्त्यांच्या सततच्या निवासी शिबिरातून होऊ शकते. मध्यंतरी तसे प्रयत्न झाले. दुसरा मार्ग नाही.यासाठी प्रमुख नेत्यांनी विशेष लक्ष्य देणे आवश्यक वाटते. पक्षाच्या मूलभूत विचारांशी बांधिलकी असलेल्या कार्यकर्त्यांची निर्मिती प्रयत्नपूर्वक करावी लागेल. सत्तेचे लाभार्थी पक्षाच्या मूलभूत विचारांशी बांधील असतीलच असे नाही. याबाबत पक्ष नेतृत्व खबरदारी घेईल हा विश्वास आहे.


देशाच्या राष्ट्रबांधणीसाठी धर्मांध व प्रतिगामी विचारांच्या शक्ती मुख्य अडसर ठरत आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्याला व देशाला गरज आहे. गांधी- नेहरू- आंबेडकरांच्या तत्व आणि विचारांनीच आपला देश सक्षम व महान होऊ शकतो सर्वांगीण प्रगती करू शकतो यावर पक्षाचा विश्वास आहे.  सर्व जाती धर्मियांना बरोबर घेऊन जाणारा एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. कोणतीही राजकीय  पार्श्वभूमी नसलेल्या सामान्य युवक युवतींना पक्ष विविध पातळीवर नेतृत्व करण्याची संधी देत असतो.अशी बरीच जुनी नवी नावे सांगता येतील.  भविष्य काळातील पक्षाची जबाबदारी घेणारी पिढी तयार होत आहे.




आज अनेकांना टीका करण्यासाठी आरोप करण्यासाठी शरद पवार हवे असतात,कुणाला राजकीय फायद्यासाठी हवे असतात कुणाला स्वतः बातमीत राहण्यासाठी हवे असतात. कुणाला निवडणुकित जिंकून येण्यासाठी हवे असतात. कुणाला आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी हवे असतात, राजकीय घडामोडीवेळी समन्वयक म्हणून शरद पवार हवे असतात. राजकीय चर्चेत आणि बातमीत मात्र शरद पवार कायम असतात. महाराष्ट्राचे पालक म्हणून दिल्लीत एकमेव शरद पवार आहेत. त्यांचा 60 वर्षांचा राजकीय कार्यकाळ विधिमंडळ आणि संसद  असा अखंड आहे देशात असे एकमेव तेच आहेत. शरद पवार व्यक्ती नसून एक विचार आहेत ज्यांचा भारतीयांच्या  सामूहिक शहाणपणावर विश्वास आहे. तीच पक्षासाठी मोठी ऊर्जा व संपत्ती आहे. 





कार्यकर्त्यांनी राजकरणात कोणतेही शॉर्टकट शोधू नयेत असे शॉर्टकट शोधणारे कार्यकर्ते लॉंगटर्मसाठी रहात  नाहीत.हाच संदेश या निमित्ताने नव युवकांना घेता येईल.


लेखक : - सामाजिक चळवळीमध्ये 25 वर्षांपेक्षा जास्त वर्ष कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे.






     

No comments:

Post a Comment