"महाराष्ट्रातील "या" सामाजिक आक्रमक चेहऱ्यामागील 'एक हळवे अन कनवाळू, माणुसकीबाज व्यक्तिमत्त्व; 'लोकहिताच्या कार्यात' वाहून घेणाऱ्या "महाराष्ट्राच्या प्रेरणादायी योद्धा"...
काही लोक हे केवळ इतिहास घडवायला येतात. कोणत्याही गोष्टींची तमा न बाळगत प्रवाहाविरुद्ध पोहणे हा त्यांचा अंगभूत स्वभाव असतो. अशाच एक महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीतील अग्रगण्य नेत्या, कोणत्याही पक्षीय राजकारणाला बळी न पडता महिलांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी मजबूत ढाल, राज्यघटनेतील स्त्री - पुरुष समानतेच्या तत्वाचे रक्षण आपल्या जीवाची पर्वा न करता करणारी तळपती तलवार म्हणजे तृप्ती देसाई.
देशात तृप्ती देसाई हे नाव म्हणजे जणू काही आक्रमकतेचेच प्रतीक आहे असे बऱ्याच जणांना वाटते. परंतु त्या आक्रमक चेहऱ्यामागील एक हळवे आणि कनवाळू व्यक्तिमत्व शोधण्याचा प्रयत्न कधीही झाला नाही. कारण त्यांच्या पडद्यावरील आक्रमक चेहऱ्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. परंतु भूमाता फाऊंडेशनच्या माध्यमातून पडद्यामागे चालत असलेल्या सामाजिक लोकहिताचे कार्य कधीच बाहेर आले नाही.
2020 ला अचानक लॉकडाऊन जाहीर झाले. सर्व काही बंद झालं. काही दिवसांनी शहरात अशी परिस्थिती निर्माण झाली की लोकांच्या घरी खायला अन्न नव्हतं. रेशन देण्याचं शासनाने जाहीर केलं पण बऱ्याच लोकांकडे रेशन कार्ड देखील नव्हते.
अशा लोकांनी आपल्या हातातले काम गेल्यावर आपली पोटाची भूख कशी भागवायची हा प्रश्न उभा राहिला. आपल्याला माहीत असलेली कुणीही व्यक्ती उपाशी राहू नये अशी भावना तृप्तीताईंच्या मनात होती. अशावेळी पुण्यामध्ये जिथपर्यंत सहजगत्या कुणी पोहचत नाही अशा ठिकाणी जाऊन त्यांना धान्याचे किट वाटप केले. लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याने कोरोनाची भीती देखील मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त होती.
त्यामुळे सेवा देणारी लोक सुद्धा यावर्षी काही प्रमाणात लोकांच्या घरी जायला घाबरत. काही ठिकाणी तर उपासमारीने सुद्धा लोकं दगावल्याची दाट शक्यता होती. एका छोट्या कुटुंबाला महिनाभर पुरेल इतके साहित्य त्या किटमध्ये होते. रस्त्यावर, सिग्नलवर फुगे विकणारी मुले, झोपडपट्टी भागात राहणारे अत्यंत गरीब आणि गरजू लोक व तृतीयपंथी लोकांपर्यंत सुद्धा ही मदत पोहचत होती. गरजूंना मास्क, सेनीटायझर, हॅण्ड ग्लोवज व आवश्यक तेथे पी.पी. ई. किट देखील वाटप केले. हे सगळं कार्य भूमाता फाऊंडेशन तर्फे चालू होतं.
लॉकडाऊन दरम्यान महिलांसंबंधी अनेक नवीन सामाजिक प्रश्न निर्माण झालेत. बऱ्याच मुलींचे लॉकडाऊन मध्ये लग्न जुळलेले होते. पण कंपन्या व कारखाने बंद झाल्याने बऱ्याच लोकांचे रोजगार गेलेत. मुलींचे लग्न लावायला बऱ्याच लोकांकडे पैसा राहिला नाही.
त्यातल्या काही मुलींचे आई किंवा वडील अपंग होते. काहींना आई वडील नव्हते. अशावेळी महिलांसाठी काम करणारी अशी ओळख त्यांच्या संघटनेची असल्याने जबाबदारीने पुढे येऊन त्यांना काम करावे लागले. अगदी साध्या पद्धतीने लग्न करायला कमीत कमी येऊ शकणाऱ्या खर्चाचा अंदाज बांधून 15 हजार एवढी रक्कम लग्नासाठी निश्चित करण्यात आली. अगदी घरापुढे हिरवा मांडव टाकून देखील लग्नाला तयार झालेल्यांना ही रक्कम पुरेशी होती.
नवरीसाठी आवश्यक वस्तू घेण्यापासून इतरही बाबींवर ती रक्कम खर्च करता येणार होती. त्यानुसार लग्न जुळलेल्या मुलींच्या थेट बँक खात्यामध्ये ही रक्कम पाठवण्यात आली. नांदेड, परभणी, लातूर, अमरावती, सातारा, कोल्हापूर व गडचिरोली अशा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात ही मदत पोहोचवली गेली.
एका मुलीच्या डोळ्याला अपंगत्व आल्याने गेल्या 6 वर्षांपासून तिचे लग्न जुळत नव्हते. तिला वडील नव्हते आणि आईवर जवळपास दहा हजारांचे कर्ज होते. मजुरी अगदी 70-80 रुपये. अशावेळी तिला भूमाता फाऊंडेशन कडून 25 हजारांची मदत तिच्या खात्यात पाठवली गेली. 15 हजार रुपयांत ते लग्न पार पाडून उर्वरित रकमेत आईचे कर्ज देखील फेडले गेले. त्यावेळी आपण गरजू मुलींच्या लग्नासाठी पाठवत असलेली रक्कम पुरेशी असल्याचा आनंद तृप्तीताईंना झाला.
पुढील काही दिवसांत 15 ते 20 लग्न फाऊंडेशन तर्फे पार पाडणार असल्याचा संकल्प करणार आहेत. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये मृत्यूची भीती मोठ्या प्रमाणात वाढल्याने मदत गोळा करण्यासाठी असो की गरजूंचा शोध घेण्यासाठी बऱ्याच ठिकाणी त्यांना स्वतः जावे लागले.
मागच्या वर्षी 700-750 कुटुंबांना व यावर्षी जवळपास चारशे कुटुंबांना धान्याचे किट वाटप करण्यात आले. त्यामध्ये 5 किलो गव्हाचे पीठ, 5 किलो तांदूळ, सूर्यफुल तेल, तूरडाळ, साखर, मीठ अशा सर्व गरजेच्या अत्यंत दर्जेदार गुणवत्ता असलेल्या वस्तू त्यात देण्यात आल्या. आपण जे घरी खातो त्याच दर्जेच्या वस्तू त्या किटमध्ये समाविष्ट केल्या.
कोल्हापूरला भूमाता फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला राज्यातील आरोग्य राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 250-300 कोरोना योद्ध्यांना वाफ घेण्याची मशीन भेट देण्यात आली. त्यांचा सत्कार करण्यात आला. पोलिसांना देखील विविध आवश्यक वस्तू पुरवल्या.
कोरोनाचे संकट देशावर येण्यापूर्वी देखील त्यांचे सामाजिक जनकल्याणाचे कार्य असेच सुरू होते. मागच्या वर्षी कोल्हापूरला पूर आल्यानंतर महिलांना अत्यंत आवश्यक असतील अशा सगळ्या वस्तूंचा पुरवठा देखील भूमाता फाऊंडेशन तर्फे करण्यात आला.
सगळ्यांनी दुर्लक्ष केलेल्या सांगलीच्या तुरुंगातील कैद्यांना देखील त्याकाळात त्यांनी मदत केली. वाटेतील गरजूंना आवश्यक त्या वस्तू ऐन वेळेला देता याव्यात म्हणून स्वतःच्या गाडीमध्ये त्या नेहमीच महिलांसाठी साडी चोळी पासून शाल पर्यंत अनेक वस्तू बाळगतात. वाटेत भेटणाऱ्या वृद्ध गरजू महिलांना व पुरुषांना त्या देऊन टाकतात ही त्यांची नेहमीचीच सवय.
या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांनी आपल्या संघटनेतील सहकाऱ्यांना व कुटुंबियांना देखील गमावले परंतु ते वैयक्तिक दुःख मनात न ठेवता आपले कार्य सुरूच ठेवले. गरज असेल तेथे इतरांच्या मदतीला त्या धाऊन गेल्या.
निपाणी हे त्यांचं जन्मगाव. जन्मापासून बेळगाव - निपाणी सीमा वादाचा संघर्ष अनुभवल्याने कदाचित त्या स्वतः आक्रमक आणि संघर्षशील बनलेल्या असाव्यात. त्यामुळेच लढणे आणि संघर्ष करणे हे त्यांच्या रक्तात आहे. अन्यायाविरूद्ध उभे राहणे हा त्यांचा जन्मजात पिंड आहे.
पुण्याला बालपणीच येऊन त्यांचं कुटुंब स्थायिक झालं. कॉलेजला असतानापासूनच त्यांनी अनेक लढ्यांचे नेतृत्व स्वीकारले होते. तसेच त्या घडत गेल्या. त्यांनी लढलेले 25 हजार ठेवीदारांचे पहिले आंदोलन असो की महिलांच्या न्याय हक्कांसाठी मंदिर प्रवेश आंदोलन असो त्या खंबीरपणे लढल्या.
यादरम्यान अनेक जीवघेणी संकटे त्यांच्यावर आलीत. पण त्या कधीच डगमगल्या नाहीत. त्यांनी माघार घेतली नाही. समाज माध्यमांमध्ये त्यांना प्रचंड ट्रोल केले गेले. पण त्यालाही त्यांनी कधीच जुमानले नाही. आपल्या निश्चयापासून त्या कधीच विचलित झाल्या नाहीत.
समाज परिवर्तनाचे लढे लढतांना लोकांचा रोष सहन करावाच लागतो. शिवीगाळ ऐकावी लागते. पण अशा परिस्थितीत आपल्या घरच्या लोकांचा पाठिंबा फार महत्त्वाचा असतो. तो त्यांना माहेरी व सासरी दोन्ही ठिकाणी मिळाला. त्यांची आई, वडील, सासूबाई व पती नेहमीच खंबीरपणे पाठीशी उभे राहिलेत.
त्या बाहेरून जितक्या आक्रमक आहेत तितक्याच त्या प्रेमळ आहेत. एखाद्या सहृदयी व कनवाळू व्यक्तीलाच चुकीच्या गोष्टींची चीड येते. सामान्य लोकांवर होणारा अन्याय त्याला सहन होत नाही. मग तो व्यवस्थेविरूद्ध व सामाजिक रूढी परंपरांविरूद्ध बंड करून उठतो. परिवर्तनाचे वाटसरू म्हणून समाजाच्या रोषाचा सामना तर सावित्रीबाई फुलेंना देखील करावा लागला होता. त्यातून आपण तरी कसे सुटणार अशीच भावना त्यांच्या मनात येत असावी.
त्यांचे व्यक्तिमत्त्व असेच उत्तरोत्तर बहरत जावो. त्यांनी हाती घेतलेल्या प्रत्येक लढ्याला यश मिळो. देशाच्या उत्तुंग शिखरावर जाण्यासाठी त्यांना प्रचंड आत्मबळ लाभो त्यासाठी निसर्ग त्यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य देवो.
लेखक : - डॉ. मिलिंद भोई (भोई फाऊंडेशन), प्रा. कमलनारायण उईके
No comments:
Post a Comment