Tuesday, December 22, 2020

पुरंदरचा कोरोना योद्धा डॉक्टर धनंजय पडळकर यांचा श्रीनाथ म्हस्कोबा वीर देवस्थान ट्रस्टकडून सन्मान....

 


पुरंदर, वीर, दि. 22  : कोरोना महामारीने संपूर्ण जगात हाहाकार माजवलेला असताना महाराष्ट्रात आरोग्य क्षेत्रातील सर्वच डॉक्टर,नर्स, आरोग्य सेवक आणि सर्वच क्षेत्रातील कोरोना योद्धयांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावून जनतेचे प्राण वाचवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. पुणे जिल्हातील पुरंदर तालुक्यातील वीर गावचे सुपुत्र, कोरोना योद्धे डॉक्टर धनंजय पडळकर यांनी कोरोनाकाळात पुणे येथील प्रसिद्ध असे नवले हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या विभागात कोविड योध्दा, डॉक्टर म्हणून प्रामाणिकपणे कामगिरी बजावून रुग्णांची चांगली सेवा केल्यामुळे पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट वीर यांच्या वतीने डॉक्टर धनंजय पडळकर यांचा सन्मान करण्यात आला.




"कोरोनाकाळातील डॉक्टर धनंजय पडळकर यांनी केलेली प्रामाणिक कामगिरी,रुग्णांची केलेली प्रामाणिक सेवा नक्कीच कौतुकास्पद आहे." अशी प्रतिक्रिया श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन बाळासाहेब धुमाळ यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




या सन्मानावेळी देवस्थान कमिटीचे चेअरमन श्री बाळासाहेब धुमाळ, सचिव तय्यदभाई मुलाणी, संभाजी धुमाळ, दत्तात्रय धुमाळ, तानाजी धुमाळ, गणेश राऊत, संग्राम धुमाळ, संदीप कांचन, शरद चवरे  व  ग्रामस्थ उपस्थित होते.





"कोरोनाकाळात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातुन आलेल्या रुग्णांची पुणे येथील नवले हॉस्पिटलमध्ये मला प्रामाणिकपणे सेवा करण्याची संधी मिळाली. माझ्या पुरंदर तालुक्यातीलही काही रुग्णांचीही सेवा करण्याची संधी मला कोरोनाकाळात मिळाली याचेही मला मनापासून समाधान आहे. माझ्या गावातील ग्रामस्थांनी, श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टने केलेला माझा सन्मान माझी ऊर्जा वाढवणारा आहे, मी सर्वांचा मनापासून आभारी आहे." अशी प्रतिक्रिया डॉक्टर धनंजय पडळकर यांनी महाराष्ट्र गर्जना न्युजशी बोलताना दिली.




"पुणे येथील नवले हॉस्पिटलमध्ये पुरंदर तालुक्यातील कुठल्याही व्यक्तीला गंभीर आजारांवर उपचार घ्यायचे असतील तर मी नक्कीच सहकार्य करेन, मला हक्काने संपर्क करा. असे आव्हान डॉक्टर पडळकर यांनी पुरंदरच्या लोकांना केले.


डॉक्टर धनंजय पडळकर यांनी एमबीबीएस ही वैद्यकीय पदवी पूर्ण केल्यानंतर मागील 3 वर्षांपासून ते पुणे येथील प्रसिद्ध नवले हॉस्पिटलमध्ये स्त्री रोग विभागात कार्यरत आहेत.


"पुरंदरमधील ग्रामीण भागातील वीर या गावातील सर्वसामान्य कुटुंबात लहानाचा मोठा झालेल्या डॉक्टर धनंजय पडळकर यांनी जिद्दीने, कष्टाने, मेहनतीने उच्चशिक्षण घेऊन एमबीबीएस ही वैदयकीय पदवी पूर्ण करून पुणे येथील प्रसिद्ध असे नवले हॉस्पिटलमध्ये मागील 3 वर्षांपासून स्त्री रोग विभागात ते कार्यरत आहेत. कोरोनाकाळातील नवले हॉस्पिटलमध्ये कोरोना योद्धे म्हणून डॉक्टर पडळकर यांनी केलेली प्रामाणिक कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.



Sunday, December 20, 2020

"दोस्तमंडळी" - आणि म्हणे.. नादखुळा पुणेकर...बिनधास्त बोल भाऊ...

 


😜🤔  दोस्तमंडळी  😍😂😀


एक आगळावेगळा,रोमहर्षक,नादखूळा प्रवास...नक्कीच वाचा....



भारत महासत्ता होईल तवा होईल पण आमचं पुणे जगात नेहमीच महासत्ता असतंय..आमच्या पुण्याच्या रुबाबाचा नादच नाय करायचा.. पुणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान इतिहासाने पावन झालेली महान भूमि ,विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी,आयटी हब, ऑटोमोबाईल हब अश्या एकसे बढ़कर एक गोष्टी आमच्या पुण्यात रुबाबात झळकत्यात. मी अभिजीत पाटील पुण्याच्या नादखुळ्या मातीतला अस्सल पुणेकर....पुण्याचा अभिमान, स्वाभिमान रक्तारक्तात भिनलेला मराठा....आता तुमी जातीच्या चष्म्यातून बघा, धर्माच्या चष्म्यातून बघा की प्रांताच्या चष्म्यातून बघा...मला काय बी फरक नाय पडत...




आमच्या पुण्याबद्दल बरेच गैरसमज काही मतलबी लोकं पसरवत असत्यात. म्हणे पुणेकर लोक टीका करतात, अपमान करतात, अहो हे ठराविक जणच हायेत म्हणून काय सगळे पुणेकर तसेच हायेत का ? कौतुक करणारे, प्रोत्साहन देणारे आणी मनापासून भरभरून प्रेम देणारे लाखो पुणेकर हायेत की आमच्या पुण्यात...अनेकांचा अजून एक मोठ्ठा गैरसमज हाय की नारायण पेठ, सदाशिव पेठ म्हणजेच.. पुणेरी संस्कृती...




हा कुठल्या मूर्ख विद्वानाने शोध लावला कुणास ठावूक...हडपसर,कात्रज,स्वारगेट,कोथरूड,रास्ता पेठ,नाना पेठ,शिवाजी नगर हेज्यासारखं अनेक महत्वाचे भाग काय पुण्याच्या बाहेर हायेत काय? यांची संस्कृती काय पुण्याच्या बाहेरची संस्कृती हाय काय? हडपसर,कात्रज,स्वारगेट,कोथरूड,पुणे स्टेशन,रास्ता पेठ,नाना पेठ, सोमवार पेठ, शिवाजीनगर यांच्यासारख्या पुणे शहरातील सर्वच उपनगरातल्या,सर्वच भागातल्या लाखो पुणेकर लोकांनी वाढावलीया,सम्रुदध केलीया, विकसित केलीया.. ही पुणेरी संस्कृती....




पुणेरी पगडी जेवढी महत्वाची हाय तेवढाच पुणेरी नादखुळा फेटा ही खूप महत्वाचा हाय, पुणेरी व्याख्यानमाला जेवढ्या महत्वाच्या हायेत तेवढेच गणेशउत्सव,दुर्गाउत्सव यातील सांस्कृतिक कार्यक्रम पण महत्वाचे हाय....अशे खूप विषय हायेत पण समजने वाले को इशारा काफी है....




पुण्याचा विषय निघाला की हा अभिजीत पाटील असाच बोलतो भरभरून...आमच्या पुण्याच्या सर्वांगीण पैलूंवर जोरदार प्रकाश टाकतच असतोया...ते कुणाला पटू अगर नाय.. आमा पुणेकरांना काय फरक पडत नाय...




आमचं मित्र सातारकर, कोल्हापूरकर,सांगलीकर,सोलापूरकर,अमरावतीकर सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले हायेत पण पुण्यात आले की ते सगळे अस्सल, नादखुळे पुणेकरच होत्यात....हे तर आमच्या पुण्याचे खास वैशिष्ट हाय...




दोस्तांनो.. आमचा किश्या भाऊ म्हणतो दिल्लीच्या शीमेवर.. एवढं मोठं शेतकरी आंदोलन चालूया...पेट्रोलचं भाव गगनाला भिडल्यात...जनता महागाईने होरपाळतीया..कोरोना महामारीनं सगळ्याच सामान्य माणसाचं कंबरडं मोडलयां..पुण्यातल्या खासगी हॉस्पिटल वाल्यांनी निबार लूटलाय गोरगरीबाला.. सामान्याला... तरीबी तुमचा पुणेकर शांतच व्हय...जीवघेण्या ट्रॅफिममधून, खड्डे पडलेले रस्ते तुडवत पुण्यात प्रवास करून, प्रदूषणाचा काळा धूर आमच्या फुफुसात घालून आमी तुमच्याकडे आलं की तुम्ही म्हणणार.. पाणी कमी वापरा.. 2 दिवस झालं पाणी आल नाय...आरं तुमच्या पेक्षा आमचा गावं भारी...  आणि म्हणे नादखुळे पुणेकर...





किश्या भाऊचा धारदार बाणानं आमचं टकूरं गरम झालं खरं...मग त्याला बी आमचा पुणेरी हिसका, बाणा दाखवून म्या उत्तर दिलं जोरदार.... 


पुढच्या लेखात... नक्की वाचा....




आता पुढचा नादखूळा प्रवास.... पुढच्या भागात सांगतो ,तोपर्यंत ह्या अभिजीत पाटीलचा रामराम 🙏🙏🙏🙏🤔😍😜 दोस्तमंडळी 😜😍😂



लेखक : - पत्रकार अजित श्रीरंग जगताप, पुणे.  संपादक - महाराष्ट्र गर्जना न्यूज.




Sunday, December 13, 2020

लै बोलायचंय तुमच्याशी साहेब.. ईडीवर चाल करून जाणारा वाघ बघून, तुमच्या जिगरबाज वृत्तिकडे बघून आम्हाला शंभर हत्तीचं बळ मिळत.. - प्रसिद्ध अभिनेते, लेखक किरण माने यांचा खास लेख...

 


लै बोलायचंय तुमच्याशी साहेब.. लै बोलायचंय.. कुठून सुरूवात करू? 'राजकारणा'च्या पलीकडं जाऊन तुमच्यासारख्या 'स्माॅल टाऊन' शेतकरीपुत्राच्या संघर्षाबद्दल - प्रेरणादायक प्रवासाबद्दल लै कमी लोक बोलतात... 


...माझ्यासारख्या छोट्या माणसाच्या आयुष्यातही असं घडतं साहेब... आपण मोठी केलेली, जवळची माणसं विश्वासघात करतात..सोडून जातात.. ओळखही देत नाहीत.. एकटं पडल्यासारखं वाटतं.. उदासीनं मन घेरलं जातं.. अशावेळी मी डोळे बंद करतो आणि तुम्ही अशा गोष्टींवर अनेकदा केलेली मात आठवतो..! 




...आयुष्यात कित्येकदा खचवणारे अनेक क्षण येतात, तेव्हा मी अशा प्रसंगांमधला तुमचा शांत हसरा चेहरा आठवतो... 





तुमच्याकडं - तुमच्या जिगरबाज वृत्तीकडं पाहून शंभर हत्तींचं बळ मिळतं... 




अभिनेता बनण्याचं स्वप्न घेऊन मायणीतून सातार्‍यात आणि सातार्‍यातून मुंबईसारख्या महानगरीत आलेल्या किरण माने नांवाच्या साध्या घरातल्या पोराला आयुष्यात जेव्हा रक्ताचं पाणी करावं लागलं.. अभिनयसाधना करण्यात प्रामाणिकपणे प्रचंड कष्ट घेऊनही विनाकारण अपमान - अवहेलना - रिजेक्शन - खोटे आरोप - बदनामीचे प्रयत्न - जातवर्चस्ववादी लोकांनी ठरवून 'टारगेट' करणं... अशा सगळ्यांमधून जावं लागलं, तेव्हा 'तू टिकून रहा. झगडत रहा. काम करत रहा. स्वत:ला घडवत रहा.. काळ तुला तुझा आत्मसन्मान परत मिळवून देणारच.' हा विश्वास मिळाला तो तुमच्याकडे पाहूनच !!! 




आज सगळीकडेच सुमारांची सद्दी आहे. आमच्या अभिनयक्षेत्रातही आपल्या आसपासची उथळ - थिल्लर - थर्ड क्लास माणसं अचानक रातोरात 'स्टार' वगैरे होताना पहातो.. पायचाटूगिरी करुन चांगल्या भुमिका मिळवून त्यांची माती करताना पहातो. तेव्हा अशा प्रसंगी राजकारणातही असे 'सुमार - थिल्लर - बोलबच्चन' लोक मोठे होत असताना तुम्ही बाळगलेला संयम - बोलण्याचा वागण्याचा टिकवून ठेवलेला दर्जा - आणि वेळ येताच शांतपणे उरकलेले 'कार्यक्रम'... हे सगळं मी आठवतो. हे निव्वळ अफलातून आहे ! सगळ्या क्षेत्रातल्या 'प्रतिभावानांनी' यातून खूप काही शिकण्यासारखं आहे.




राजकारण वगैरे बाजूला ठेवून फक्त 'माणूस' म्हणून मी तुमचा संघर्ष पहातो साहेब.. काटेवाडीतल्या एका शेतकर्‍याचा पोरगा जर सगळ्या विपरीत परीस्थितीवर एकहाती मात करून जग जिंकू शकतो.. ज्याला पहिली आमदारकी मिळवताना स्वपक्षातल्या प्रस्थापितांनी वाळीत टाकला, तो आज कोट्यावधी रयतेच्या मनावर राज्य करणारा स्वयंभू 'राजा' होऊ शकतो, ही गोष्टच लै लै लै प्रेरणा देणारी आहे !!!




तुमच्यावर 'आरोप' खूप झाले. आमचाही कधीकधी त्या आरोपांवर विश्वास बसायचा. पण ते आरोप पुराव्यांनिशी 'सिद्ध' करणारा एकही 'माईचा लाल' पैदा झाला नाही ! तुमच्या विरोधातल्या शक्ती आज बलाढ्य आहेत - महाभयंकर आहेत. पण तुम्हाला 'नख'ही लावण्याची छाती नाही कुणाची !! ईडीवर चाल करून जाणारा वाघ बघून आम्हाला जी ताकद मिळालीय ती अवर्णनीय आहे !!!




तुमच्यावर विनाकारण टीका करणारे लोक तुम्हाला पंतप्रधानपद मिळू शकलं नाही म्हणून टवाळी करतात... त्यांना कदाचित माहिती नसावं की 'खर्‍याखुर्‍या' महान व्यक्ती अशा पदाच्या आणि सन्मानाच्या मोहताज नसतात. जगातला सर्वात श्रेष्ठ अभिनेता - ज्याच्या नखाचीही सर कुणाला येऊ शकणार नाही अशा चॅर्ली चॅप्लीनला संपूर्ण कारकिर्दीत अभिनयासाठी एकही 'ऑस्कर' ॲवाॅर्ड मिळालं नाही... क्रिकेटचा 'देव' सचिन तेंडूलकर भारताचा 'कॅप्टन' म्हणून अपयशी ठरला... म्हणून त्यांचं 'माहात्त्म्य' कमी होत नाही...उलट ते त्या पदापेक्षा-पुरस्कारापेक्षा उंच झालेले असतात.. तसंच आज तुमच्यापुढं देशातली सगळी पदं कमरेत झुकलेली आहेत.. खुजी झालेली आहेत ! ..आणि सर्वसामान्य जनतेच्या काळजात तुम्ही मिळवलेलं पद तर आज हयात असलेल्या कुठल्याच नेत्याला, कधीच मिळवता येऊ शकणार नाही !!!






सलाम साहेब... तुम्ही सदैव आमच्यासोबत आहात याबद्दल खूप खूप आभार आणि वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा ! :


लेखक - महाराष्ट्राचे प्रसिद्ध अभिनेते,  सृजनशील लेखक किरण माने.





Wednesday, December 9, 2020

आज मराठा आरक्षणाचा निर्णायक दिवस, सरकारला शेवटची संधी - डॉक्टर बाळासाहेब सराटे; मराठा आरक्षणाचा आजपर्यंतचा इतिहास, मराठा आरक्षणाचा बळी कुणी घेतला? आणि आजचे धगधगीत वास्तव यावर प्रकाश टाकणारा खास लेख...

 


आज मराठा आरक्षणाचा निर्णायक दिवस, सरकारला शेवटची संधी.....

आज स्थगिती उठली नाही, तर ओबीसी कोट्यात समावेश हाच पर्याय.....

---------------------------------------


1. दिनांक 27 एप्रिल 1979 रोजी राज्यात शुद्ध आर्थिक निकषांवर एकंदरित 80% आरक्षण लागू झाले होते. ते 1984 पर्यंत चालू होते. त्यात ओबीसी प्रवर्गास केवळ 10% होते, तर मराठा समाजाला 23% आरक्षण होते.


2. सन 1982 मध्ये हे आरक्षण चालूच होते. 1984 मध्ये ओबीसी मधील वंजारी जातीच्या श्री. शिवाजी गर्जे यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन मराठ्यांचे ते आरक्षण रद्द करविले आणि मराठा मुलांच्या तोंडाचा घास काढून घेतला.



3. तेंव्हा "मराठा महासंघ" ही एकमेव प्रमुख संघटना होती. त्यांनी किंवा कोणत्याही मराठा व्यक्तीने 1984 मध्ये ते आरक्षण टिकावे म्हणून अजिबात लक्ष दिले नव्हते. 


4. नोव्हेंबर 1992 मध्ये इंद्रा साहनी खटल्याचा निकाल आला. मंडल आयोगामुळे केंद्रात 27% आरक्षण लागू झाले, असा गैर समाज मुद्दाम पसरविण्यात आला. परंतु. ते सर्वस्वी खोटे आहे. तीन न्यायमूर्तींनी मंडल आयोगाला बोगस ठरवून ते आरक्षण घटनाबाह्य असल्याचा आदेश दिला. (परिच्छेद 325, 326).




5. इंद्रा साहनी निकालात चार न्यायमूर्तींनी (मेजोरिटी) परिच्छेद 853, 854, 856, 857 अन्वये मंडल आयोग पूर्णपणे विसंगत ठरविला आहे. चाळीस वर्षांपासून आरक्षण देण्यास टाळाटाळ केली आहे, म्हणून केवळ दयाभावनेतून ते 27% आरक्षण चालू ठेवण्यास परवानगी दिली आणि  वैधानिक आयोगांनी पुढील काळात लवकरात लवकर ओबीसी जातींची तपासणी करावी असा आदेश दिला. 


6.सर्वोच्च न्यायालयाने मंडल आयोग मान्य केलेला नाही आणि त्याचे परिक्षणही केलेले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे चार महिन्यात वैधानिक मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्याचा आदेश दिला होता. पण राज्य सरकारने तब्बल 16 वर्षांनी तो आदेश अंमलात आणला. 




7. इंद्रा साहनी मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणावर 50% मर्यादा घातली, पण त्याची पूर्वअट म्हणून वारंवार ओबीसी प्रवर्गातील विद्यमान जातींची तपासणी करून प्रगत जातींना बाहेर काढण्याचा आणि नवीन मागास जातींचां समावेश करण्याचा आदेश दिला आहे. त्याचे पालन सरकारने एकदाही केले नाही. 


8. इंद्रा साहनी मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणा बद्दल "कोणताही निर्णय करण्यासाठी आयोगामार्फत शिफारस व अहवाल सक्तीचा" केला आहे. परंतु अशी कोणतीही शिफारस व अहवाल न घेता दिनांक 23 मार्च 1994 रोजी ओबीसींच्या आरक्षणात तब्बल 16% वाढ केली आणि मनमानी पद्धतीने आरक्षणाची वाटणी केली. हा राज्य सरकारने मराठा आरक्षण विरोधात केलेला सर्वात मूलभूत गुन्हा आहे. 




9. आयोगाचा अभ्यास, शिफारस व अहवाल न घेता दिनांक 23 मार्च 1994 रोजी ओबीसीसाठी प्रथमच 30% शैक्षणिक आरक्षण लागू केले. त्यामुळे मराठा समाजाच्या अनेक पिढ्यांचे नुकसान झाले. हा राज्य सरकारचा आणखी एक मोठा गुन्हा आहे.


10. राज्य सरकारांनी मराठा समाज पात्र ठरल्यानंतर विद्यमान ओबीसी यादीत समावेश करणे क्रमप्राप्त होते, परंतु या समाजाला कायम वेगळे पाडून आरक्षणापासून वंचित ठेवले. केवळ मराठा समाज ओबीसीप्रवर्गात येऊ नये म्हणून जातीय राजकारण करून त्याच्या अहवालात वारंवार हस्तक्षेप केले गेले. 




11. गायकवाड आयोगाने मराठा समाजाला 50% वरचे आरक्षण देण्याची शिफारस केलेली नाही. मागासवर्ग आयोग कायद्यानुसार आयोग फक्त विद्यमान यादीत घालण्याची शिफारस करू शकतो, ते गायकवाड आयोगाने केले आहे. परंतु राज्य सरकारने आणि विधीमंडळाने या कायद्याचे कलम 9(2) चा पूर्ण भंग करून मराठा समाजाला घटनाबाह्य आरक्षणात घातले आहे. हा तर घटनात्मक गुन्हा आहे.


12. एकंदरित राज्य सरकारने केवळ राजकीय सोयीसाठी सातत्याने सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य मागासवर्ग आयोग कायद्यातील तरतुदींचा भंग केलेला आहे. शेवटी मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालातील परिच्छेद 176 मध्ये दिलेल्या निर्देशांचे पालनही सरकारने केलेले नाही. म्हणजे जातीयवाद ओबीसींचा, राजकारण सरकारचे आणि बळी दिला चार कोटी मराठा नागरिकांचा, अशी ही वस्तुस्थिती आहे. 




मराठा समाजाप्रति राज्य सरकारने केलेले पाप निस्तरण्याची आज त्यांना शेवटची संधी आहे. आज ते मराठा आरक्षणावरील स्थगिती नाही उठवू शकले नाही तर, मराठा समाजाचा विद्यमान ओबीसी आरक्षणात समावेश करणे एवढा एकच पर्याय शिल्लक राहतो. 


लेखक : - आरक्षणाचे अभ्यासक, विचारवंत,  प्राध्यापक  डॉ. बाळासाहेब सराटे.



Tuesday, December 8, 2020

भारताच्या शेतकऱ्यांच्या विरोधातील तीन काळे कायदे रद्द करा - निलेश काटे; म्हसवड येथे काळ्या फिती लावून महाविकासआघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे आंदोलन....



म्हसवड, दि.8 :  केंद सरकारच्या कृषी  कायद्याविरोधात संपूर्ण भारतातील शेतकरी वर्ग आक्रमक झालेला आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी वर्गाने पुकारलेल्या भारत बंदच्या  आंदोलनाला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला. सातारा जिल्हातील म्हसवड येथे शेतकरी विरोधातील तीन काळे कायदे रद्द करावेत म्हणून  महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून कडकडीत बंद पाळण्यात आला.




   "शेतकरी विरोधातील तीन काळे कायदे अन्यायकारी आहेत,पंजाब व हरियाणाच्या शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या या क्रांतिकारी आंदोलनाला संपूर्ण भारतातील शेतकरी वर्गाने आणि सामान्य लोकांनी पाठींबा दिला आहे. केंद सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याचा, धोरणांचा आम्ही काळ्या फिती लावून  महाविकास आघाडीच्या वतीने व शेतकरी वर्गाच्या वतीने तीव्र निषेध करतो, केंद्र सरकारने शेतकरी विरोधी  काळे कायदे लवकर रद्द करावेत नाहीतर शेतकरी वर्गाचे आंदोलन अजून आक्रमक होईन." अशी माहिती सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस निलेश काटे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




यावेळी सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस  निलेश काटे,प्रा विश्वंभर बाबर , विजय धट ,नगरसेवक विकास गोंजारी, अनिल लोखंडे, महावीर ढवळे , बाबासाहेब माने , मन्सूर मुल्ला तसेच महाविकास आघाडी चे पदाधिकारी उपस्थित होते.




      या निमित्ताने महात्मा फुले यांच्या पुतळ्याला  शेतकऱ्याच्या हस्ते पुष्पहार घालून केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.


   यावेळी निलेश काटे, विश्वंभर बाबर सर, विजय धट ,विकास गोंजारी यांनी मनोगत व्यक्त केले.

Friday, December 4, 2020

पुरंदरचे शिलेदार, देशाची सेवा करणारे; भारताच्या पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेतही प्रामाणिक सेवा करणारे वीर गावचे सुपुत्र, माजी सैनिक सचिन कापरे यांचा सेवापूर्ती सोहळा वीर येथे उत्साहात संपन्न...

 


पुरंदर/वीर, दि. 3 :  भारतात जम्मू काश्मीर, आसाम, दिल्ली, गडचिरोली, वाराणसी अश्या वेगवेगळ्या ठिकाणी भारत देशाची प्रामाणिकपणे सेवा करणारे, पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील वीर गावचे सुपुत्र, कर्तव्यदक्ष सैनिक श्री. सचिन मधुकर कापरे, ९५ बटालियन, केंदीय राखीव पोलीस दलातून सेवानिवृत्त झाल्याबद्दल वीर गावच्या ग्रामस्थांनी वाद्यवृंदासह मिरवणूक काढून त्यांचा सपत्नीक सत्कार केला. देशसेवा करताना निवृत्त झालेल्या सैनिकाची छाती ग्रामस्थांच्या सन्मानाने फुलून आली. या वेळी भावना मोकळ्या करताना ग्रामस्थांना आनंदाश्रूही आले.





"केंदीय राखीव पोलीस बलाचे जवान म्हणून देशभरात सेवा बजावत असताना स्पेशल ड्युटी ग्रुपमध्ये निवड झाल्यामुळे सचिन कापरे यांना माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, पंतप्रधान कार्यालय, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेतही प्रामाणिकपणे सेवा करण्याची संधी मिळाली." अशी माहिती तरुण कार्यकर्ते निलेश कापरे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




भारतीय सैन्य दलात विविध संकटांना सामोरे जात देशाचे रक्षण करणारे जवान भारतमातेचे भूषण असतात. अशा सैनिकांचा ज्या, त्या गावांना अभिमान असतो. वीर (ता. पुरंदर) येथील सैनिक श्री सचिन मधुकर कापरे (CRPF) ३०/११/२०२० रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा सन्मान करण्यासाठी बुधवारी (ता.०२) जवानाची ग्रामस्थांनी वाजत-गाजत मिरवणूक काढली.




गावचे सुपुत्र देशाचे रक्षण करतात याचा अभिमान असल्याने त्यांचा आदर्श गावातील नव्या उमेदीच्या तरुण पिढीने घ्यावा, या हेतूने श्री. सचिन कापरेंसह सर्व निवृत्त सैनिकांची मिरवणूक काढून त्यांचा सन्मान करण्याचे सरपंचासह वीर गावच्या सर्व ग्रामस्थांनी ठरविले.




निवृत्त सैनिकांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यासाठी सकाळपासूनच ग्रामस्थांची लगबग सुरू झाली. बघता-बघता गावच्या मंदिरासमोर सर्व ग्रामस्थ व महिला जमा झाल्या.


निवृत्त जवानाने गणवेशात गावात प्रवेश केला. ग्रामस्थांचा उत्साह पाहून तेही भावुक झाले. "भारत माता की जय' असा जयघोष करीत व वाद्यवृंदांच्या साथीने गावात ही मिरवणूक निघाली. गावच्या सभागृहात मिरवणूक पोचल्यानंतर देशभक्तीच्या वातावरणात महिलांनी या सैनिकांचे औक्षणही केले. 


पुरंदरच्या शिलेदाराचा असा झाला सन्मान....


गावच्या सभागृहात  निवृत्त सैनिक श्री. सचिन मधुकर कापरे यांचा सपत्नीक सत्कार झाला. याप्रसंगी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना गावातील सर्व माजी सैनिकांचादेखील भव्य नागरी सत्कार ग्रामस्थांमार्फत करण्यात आला.यावेळी सामाजिक, शैक्षणिक,राजकीय क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची व ग्रामस्थांची  प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीर गावचे सरपंच ज्ञानेश्वर  वचकल होते. गावातील सर्व माजी सैनिक व त्यांच्या नातेवाईकांची समारंभास उपस्थिती होती.




याप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते सर्व जवानांचा पत्नीसह सन्मान झाला. या सैनिकांनी भावना व्यक्त केल्या. सरपंच ज्ञानेश्वर वचकल यांनी गावातील युवकांनी हा आदर्श समोर ठेवून देश रक्षणासाठी सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले. श्री.योगेश राऊत (गुरुजी) यांनी कार्यक्रमाची संकल्पना मांडली.वीर गावचे ग्रामस्थ श्री.सतिश वचकल,श्री.चंद्रकांत जमदाडे,श्री.कृष्णा राऊत (गुरुजी) ,श्री.महादेव जमदाडे,श्री.निलेश कापरे,चेतन गारडे यांनी आपल्या मनोगतातुन सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. श्री. संतोष वाघ यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. 




"माझ्या मातीत आपुलकीने माझा सन्मान झाला, याचा गर्व नक्कीच आहे.सेनेतील अनुभवाचा फायदा हा समाजासाठी करण्याचा यानंतरचा प्रामाणिक प्रयत्न करेन. भारतीय सैन्य दलातील केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये चांगली सेवा देता आली, याचा अभिमान आहे. असे मनोगत सेवानिवृत्त सैनिक सचिन कापरे यांनी व्यक्त केले."


देशसेवा करणाऱ्या सैनिकांचा जीवनप्रवास सर्व तरुण पिढीसाठी निश्चितच खूप प्रेरणादायी असतो.


Monday, November 30, 2020

छावा स्वराज्य सेनेचा विधानपरिषद पुणे पदवीधर निवडणुकीसाठी; महाराष्ट्राचे प्रसिद्ध व्याख्यानकार, इतिहास अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे यांना जाहीर पाठींबा

 

पुणे, दि. 29 : महाराष्ट्र विधानपरिषद पुणे पदवीधर मतदार संघाची निवडणूक अपक्ष लढविणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्यानकार, इतिहास अभ्यासक, उच्चविद्याविभूषित उमेदवार डॉ.श्रीमंत शिवाजी कोकाटे यांना छावा स्वराज्य सेना या सामाजिक संघटनेने जाहीर पाठींबा दिला. 




छावा स्वराज्य सेना महाराष्ट्र राज्य                  संस्थापक/अध्यक्ष राम घायतिडक(पाटील) यांनी डॉ. श्रीमंत कोकाटे यांची सदिच्छा भेट घेऊन  पुणे पदवीधरसाठी श्रीमंत कोकाटे निवडणूक लढवीत आहेत यामुळे त्यांचे अभिनंदन केले व निवडणुकीबाबत काही महत्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करून छावा स्वराज्य सेना,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने डॉ. श्रीमंत कोकाटे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. 

      

या जाहीर पाठिंब्याचे पत्र डॉ. श्रीमंत कोकाटे यांना देताना छावा स्वराज्य सेना,महाराष्ट्र राज्य संस्थापक/अध्यक्ष राम घायतिडक(पाटील),प्रदेश कार्याध्यक्ष श्री.अरीफभाई शेख तसेच श्री.अमित हातवळणे,श्री.उमेश चांदणे, श्री.नितीन पवार व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




पुरोगामी चळवळीतील अभ्यासू व्यक्तिमत्त्व, विचारवंत, इतिहास अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे पदवीधरांचे प्रश्न नक्कीच सोडवतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे असे छावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष राम घायतिडक(पाटील)यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूज शी बोलताना सांगितले.


महाराष्ट्राच्या 'या' नेत्याने पदवीधरांसाठी वर्षभरापूर्वीच केले होते यशस्वी उपोषण; आता पदवीधरांच्या प्रश्नांवर मतदारांशी हायटेक पद्धतीने थेट संवाद साधून, विधानपरिषद पुणे पदवीधर निवडणूक लढवून प्रचारातही आघाडीवर..

 

पुणे, दि. 29 : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी प्रबळ उमेदवारांमुळे चांगलीच गाजत आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात सर्वच प्रमुख उमेदवार जरी व्यवस्थित रणनीती आखून प्रचार करत असले तरी, पदवीधर मतदार नोंदणी ऑनलाइन व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते, पुणे पदवीधर अपक्ष उमेदवार युवराज पवार यांनी मागील वर्षीच 25 ते 27 नोव्हेंबर असे 3 दिवस यशस्वी उपोषण केले आणि पदवीधर मतदार नोंदणी ऑनलाइन झाली.




युवराज पवार यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातील पदवीधर मतदारांशी आधुनिक तंत्रज्ञानाचा साहाय्याने झूम मिटिंगच्या माध्यमातून संवाद साधून पदवीधरांचे प्रश्न जाणून घेण्याचा,निवडणूक उद्दिष्टे सांगण्याचा प्रयत्न केला यावेळी तरुण पदवीधरांचा  खूप चांगला प्रतिसाद मिळाला असे युवराज पवार यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना सांगितले.




धनाढ्य राजकीय सरंजामदारांचे पुनर्वसन करण्यापेक्षा पदवीधरांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर लढणाऱ्या माझ्यासारख्या विधिमंडळ कामकाजाचा 9 वर्षांचा अनुभव असणाऱ्या अपक्ष उमेदवाराला संधी दिली तर पदवीधरांचे सर्व प्रश्न मी प्रामाणिकपणे सोडवून पदवीधरांच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन असे युवराज पवार यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना सांगितले.




युवराज पवार यांना पदवीधर मतदारांनी का निवडून द्यावे? याची 12 प्रमुख कारणे महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना युवराज पवार यांनी सांगितली.




पदवीधरांनी अपक्ष उमेदवार युवराज पवार यांना का निवडून द्यावे?  या महाराष्ट्र गर्जना न्यूजच्या प्रश्नाचे उत्तर देताना युवराज पवार म्हणाले की, 

मला निवडून देण्याची १२ कारणं खालीलप्रमाणे आहेत.


" १) पदवीधरांच्या सोयीसाठी, स्वतःच्या प्रचारासाठी, प्रचाराची दिशा बदलणार मोबाईल ॲप्लिकेशन तयार करून कार्यकर्त्यां शिवाय तंत्रज्ञानाचा वापर करून सामान्य व्यक्ती तळागाळापर्यंत पोहोचतो हे सिद्ध केले.

२) होय, निवडणूक लढवणारे अनेक पदवीधर उमेदवार युवराज पवार यांचे ॲप,  मतदार यादीत नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी वापरतात. 

३) पदवीधर मतदार नोंदणी ऑनलाइन व्हावी, म्हणून यशस्वी उपोषण केले आणि मतदार नोंदणी ऑनलाईन झाली.

४) पुणे पदवीधर मतदार यादीतील अनेक चुका दुरुस्त करून घेतल्या,  सातत्याने पाठपुरावा केला.

५) मतदार यादी मध्ये नाव शोधण्यासाठी सर्वाधिक  वापरले जाणारे एकमेव मोबाईल ॲप्लिकेशन हे युवराज उत्तम पवार यांचे आहे

६) भाजप उमेदवाराने युवराज पवार यांच्या संकल्पना स्लोगन चोरून स्वतःचे ट्विटर अकाउंट बनवले, तसेच युवराज पवार यांच्या अभ्यासपूर्ण उद्दिष्ठाची नक्कल इतर उमेदवार करत आहे.

७) युवराज पवार यांनी भाजपचे स्लोगन चोर उमेदवार आणि राष्ट्रवादीचे 73 वर्षीय आजोबा उमेदवार यांना पदवीधरांचे प्रश्न आणि विधीमंडळाचे कामकाज यावर चर्चा करण्यासाठी खुले आव्हान दिले

८) कोणत्याही राजकीय वारसा नसताना, राजकीय पाठबळ नसताना, तसेच आर्थिक पाठबळ नसताना अपक्ष उमेदवार असताना सुद्धा पाच जिल्ह्यातील बहुतांश पदवीधरांना त्यांचे नाव माहित आहे. आधार नसताना पदवीधर मतदारांपर्यंत पोचू शकतो तर आमदार झाल्यावर कार्यक्षमता किती वाढेल. 

९) कोविड काळामध्ये पदवीधर मतदारांना घरीच राहण्याचा सल्ला देऊन जनजागृती केली

१०) 417 पदवीधरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करून केले

११) जानेवारी 2020 पासून पदवीधर मतदारांच्या संपर्कात राहणारा एकमेव उमेदवार

१२) विधिमंडळ कामाचा ९ वर्षांचा अनुभव असलेला एकमेव उमेदवार. तुमच्यातला आणि तुमच्यासारखा उमेदवार आहे. स्लोगन चोर भाजप उमेदवार आणि राष्ट्रवादीचे ७३ वर्षीय आजोबा उमेदवार यांचं पुनर्वसन करण्यात आपलं बहुमूल्य मत वाया घालवू नका. पदवीधरांच्या संघर्षाचा आवाज बुलंद करा."

असे युवराज पवार यांनी सांगितले.


विधानपरिषद पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार युवराज पवार यांच्या हायटेक प्रचाराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. पदवीधरांच्या प्रश्नांविषयी झूम मिटिंगच्या साह्याने केलेला व्हिडिओ 1 लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.