Thursday, August 20, 2020

जगभरात महाराष्ट्राचे, भारताचे नाव अभिमानाने उंचावणारे भारताचे एल.आय.सी.ऑफ इंडियाचे प्रसिद्ध अधिकारी मिलिंद माने यांचा प्रेरणादायी,संघर्षमय प्रवास... महाराष्ट्राचे प्रेरणादायी योद्धे - मिलिंद माने...

 

जगाला प्रेरणा देणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजीराजे यांच्या महान पराक्रमाने, महान कार्याने पावन झालेली ही महाराष्ट्राची महान भूमी. महाराष्ट्राला जशी महान संतांची,महापुरुषांची, क्रांतिकारकांची,समाजसुधारकांची परंपरा लाभली तशीच आजच्या प्रगतशील महाराष्ट्राच्या वाटचालीत सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा,साहित्य, विज्ञान,शिक्षण, तंत्रज्ञान यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महान कर्तृत्ववान मराठी व्यक्तिमत्वांनी  महाराष्ट्राला प्रगतीच्या एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. सचिन तेंडुलकर, शरद पवार, लता मंगेशकर यांच्यासारखी कर्तृत्ववान, लोकप्रिय व्यक्तिमत्त्व बहूसंख्य लोकांना माहिती असतात.


पण महाराष्ट्राचे, भारताचे नाव आपल्या कर्तृत्वाने जगभर गाजवणारी काही प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व अश्या लोकप्रियतेपासून लांब राहून देखील आपल्या कर्तृत्वाने,प्रभावशाली कार्याने, संघर्षमय प्रवासाने तरुण पिढीला प्रेरणा देत असतात.आंतरराष्ट्रीय पातळीवरील विमा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार TOT - TOP OF TABLE, COT - COURT OF TABLE, MDRT - MILLION DOLLAR ROUND TABLE शेकडो व्यक्तिमत्वांना मिळवून देण्याची अनमोल कामगिरी करणारे एल.आय. सी. ऑफ इंडियाचे, महाराष्ट्राचे,भारताचे प्रसिद्ध,कर्तृत्ववान विकास अधिकारी मिलींद माने यांचा संघर्षमय, प्रेरणादायी प्रवास तरुण पिढीसाठी खूप मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे. 


जगभरातील अमेरिका, कॅनडा यासारख्या विकसित देशांमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये जीवन विमा, आर्थिक नियोजन यासारख्या महत्वाच्या विषयावर जगभरातून आलेल्या विमा, आर्थिक क्षेत्रातील प्रोफेशनल लोकांना मार्गदर्शन करणाऱ्या मिलिंद माने यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील धामनेर या गावी एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. 


सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात शालेय जीवन जगत असतानाच महाविद्यालयीन शिक्षणासाठी विद्येचे माहेरघर पुणे येथे  उच्च शिक्षणासाठी जायचे असे ठरविले असल्याने मिलिंद माने यांनी घरच्यांचा विरोध असतानाही दहावीनंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी थेट पुणे गाठले.ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाने घरच्यांचा विरोध डावलून, प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून पुण्यासारख्या मोठया शहरात 1970 - 80 च्या दशकात उच्च शिक्षणासाठी जाणे हा धाडसीच निर्णय होता.फर्ग्युसन महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेतल्यानंतर कमवा आणि शिका या योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन शिक्षणाला प्रारंभ झाला. अनेक अडचणींना तोंड देत, प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत मिलिंद माने यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातुन विज्ञान शाखेतून पदवी घेतल्यानंतर पुणे विद्यापीठातुन MSC - Statistics ही पदवी पूर्ण केली. यानंतर MBA - Marketing and Finance ही व्यवस्थापन शास्त्राची पदवी घेऊन मुंबई येथील हिंदुस्तान लिवर लिमिटेड या नामांकित कंपनीत व्यस्थापकीय मोठया पदावर रुजू झाले. यानंतर 1987 - 88 मध्ये Volta's LTD Mumbai या नामांकित कंपनीत काम करत असताना मिलिंद माने यांच्या आयुष्यात एक घटना घडली ज्यामुळे त्यांच्या पुढील आयुष्याला एक वेगळे वळण मिळाले. 


लोणावळा येथिल एका आलिशान हॉटेलमध्ये मिलिंद माने यांच्या कंपनीचा खास कार्यक्रम होता आणि त्याच हॉटेलमध्ये एल. आय.सी.ऑफ इंडियाचे देशभरातील वेगवेगळ्या अधिकारी लोकांची टीम आली होती. यामधील पुणे येथील एका अधिकाऱ्याचा त्या हॉटेलमध्येच दुर्दैवाने हृदयविकाराने निधन झाले होते. देशभरातील हे सर्व अधिकारी खूप घाबरले होते कारण मृत्यू झालेल्या या पुण्याच्या अधिकाऱ्याला त्याच्या घरी कोण,कसे घेऊन जाणार,काय सांगणार,कुणाला व्यवस्थित पत्ताही माहिती नव्हता अश्या संकट काळी मिलिंद माने या सर्व अधिकारी वर्गाच्या मदतीला धावून आले.मिलिंद माने यांनी मृत्यू झालेल्या त्या पुण्यातील अधिकाऱ्याची सर्व माहिती मिळवून त्यांना पुण्यातील घरी पोहचवण्यासाठी स्वता ते सर्व अधिकाऱ्यांबरोबर पुण्याला गेले, त्यांच्या कुटुंबियांना धीर देऊन पुढील सर्व व्यवस्था लावून मार्गक्रमण झाले. 


या घटनेमुळेच मिलिंद माने यांची एल.आय.सी. ऑफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख झाली आणि यातीलच एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मिलिंद माने यांना एल.आय. सी.ऑफ इंडिया या सरकारी कंपनीच्या विकास अधिकारी या महत्त्वाच्या पदाविषयी माहिती व महत्व सांगून त्यासाठी तयारी आणि अर्ज करण्यास सांगितले पण मिलिंद माने यांनी प्रथम साफ नकार दिला कारण त्यावेळी ते एका मोठया खासगी कंपनीत चांगल्या पदावर,मोठया पगाराची नोकरी करत होते. त्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे पुन्हा ज्यावेळेस पुणे शहरात काम असे त्यावेळेस ते मिलिंद माने यांना भेटत आणि त्यांच्यातील सकारात्मक संवादामुळेच मिलिंद माने यांनी 1989 ला मोठया पगाराची Voltas LTD या नामांकित खासगी कंपनीतील नोकरी सोडून एल.आय.सी.ऑफ इंडिया या सरकारी कंपनीच्या पुणे डिव्हिजनला विकास अधिकारी म्हणून रुजू झाले. खासगी कंपनीतील मोठया पगारापेक्षा  मिलिंद माने यांना  विकास अधिकारी या पदावर कमी पगार मिळणार होता हे माहिती असून देखील त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला.


 जिद्दीने, चिकाटीने, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या, ध्येयवादी दूरदृष्टी असलेल्या मिलिंद माने यांनी पहिल्याच वर्षी पुणे येथे एल.आय. सी.ऑफ इंडियाचे विकास अधिकारी म्हणून विमा क्षेत्रात दमदार,उल्लेखनीय,उत्कृष्ट कामगिरी करून सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.पुढील वर्षी आपल्या विमा क्षेत्रातील दमदार,विशेष कामगिरीने मिलिंद माने यांनी पुणे विभागात विकास अधिकारी म्हणून प्रथम स्थान पटकावले. यानंतर मिलिंद माने यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.जिद्दीने,चिकाटीने, निष्ठेने, प्रचंड मेहनतीने यशाची नवनवीन शिखरे गाठतच गेले. अवघ्या काही वर्षातच मिलींद माने या महाराष्ट्रातील प्रभावशाली वरिष्ठ विकास  अधिकाऱ्याने जीवन विमा क्षेत्रात दमदार, विशेष कामगिरी करत भारताच्या All India Ranking Top 5 - सर्वोत्कृष्ट 5 अधिकाऱ्यांच्या पंक्तीत स्थान मिळवले. हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. कारण एल.आय.सी.ऑफ इंडियाच्या विकास अधिकाऱ्याला एखादया शहरातील शाखेत दमदार काम करून देखील शाखेत कामगिरीच्या बाबतीत प्रथम क्रमांक मिळवणेही अवघड असते. मग जिल्हा, राज्य,देश पातळीवर विमा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून मोठे स्थान मिळवणे तर खूप कठीण गोष्ट असते. पण मिलिंद माने या प्रचंड ध्येयवादी दृष्टिकोन असलेल्या,प्रामाणिक, मेहनती,बुद्धिमान,कर्तृत्ववान मराठी माणसाने आपल्या प्रभावशाली कार्याने महाराष्ट्राचे नाव देशभरातच नाही तर जगभर उंचावले. 


2005 मध्ये विमा क्षेत्रातील जगातील सर्वोच्च पुरस्कार MDRT हा मिलिंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली  भारतातील त्यांच्या टीममधील अनेक व्यक्तींना मिळवून देण्याची अनमोल विक्रमी कामगिरी करणाऱ्या मिलिंद माने यांचा विशेष सन्मान MDRT या जागतिक संस्थेच्या अध्यक्षांनी केला. खरं तर ही प्रत्येक मराठी माणसासाठी आणि प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. विमा क्षेत्रातील MDRT या  जगातील एवढया मोठया संस्थेचा अध्यक्ष मिलिंद माने यांचा भारतातील विमा क्षेत्रातील  विशेष, विक्रमी कामगिरीमुळे विशेष सन्मान करतो ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.


जीवन विमा, आर्थिक नियोजन, या विषयावरील मिलिंद माने यांचा एवढा दांडगा अभ्यास आहे की देशभरातील दिल्ली, बंगलोर, कलकत्ता, मुंबई यासारख्या मोठया शहरातील हजारो अधिकाऱ्यांना मिलिंद माने मार्गदर्शन करत असतात. मिलिंद माने यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते जीवन विमा, आर्थीक नियोजन याविषयी नवीन दृष्टिकोन देत असतात. मिलिंद माने नेहमी सांगतात, "जीवन विमा ही लोकांना विकायची वस्तू नाही तर लोकांना आर्थिक साक्षर करायची मोहीम आहे. जीवन विम्याच्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणाचे नियोजन, रिटायरमेंट नियोजन, मुलींच्या लग्नाच्या खर्चाचे नियोजन,कुटुंबाची आर्थिक सुरक्षा, पेंशन नियोजन कसे करता येते याविषयी लोकांना साक्षर करा."


2006 ला मिलींद माने यांना अमेरिकेत MDRT या जागतिक संस्थेने आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करून विशेष सन्मानित केले. जगभरातील विमा क्षेत्रातील प्रोफेशनल व्यक्तींना मार्गदर्शन करणारे मिलिंद माने यांचा जीवनप्रवास तरुण पिढीसाठी खूपच प्रेरणादायी आहे. MDRT या विमा क्षेत्रातील जगातील सर्वात मोठया संस्थेच्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये जेव्हा मिलिंद माने भारताचे प्रतिनिधित्व करत असताना ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचा झेंडा घेऊन अभिमानाने फडकवत असतात ते मनाला आनंद देणारे दृश्य पाहून वाटते की हा महाराष्ट्राचा,भारताचा प्रेरणादायी योद्धा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन देखील शिक्षणाच्या, ज्ञानाच्या, कर्तृत्वाच्या जोरावर जगभरात देशाचे नाव उंचावतोय ही तरुणांसाठी खूप विलक्षण आणि प्रेरणादायी यशोगाथा आहे.


2006 मध्येच भारतातील प्रसिद्ध लेखक,प्रेरणादायी वक्ते शिव खेरा यांच्या हस्ते मिलिंद माने यांना भारतातील विमा क्षेत्रातील विशेष कामगिरी, योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार मिळाला. 2006 नंतर सलग अनेक वर्षे जगभरातील विविध देशांमध्ये मिलिंद माने यांना आंतरराष्ट्रीय विमा परिषदेसाठी आमंत्रित केले जायचे. 2012 ला पुन्हा एकदा मिलिंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीममधील 17 व्यक्तींना विमा क्षेत्रातील MDRT हा जगातील सर्वोच्च पुरस्कार मिळाल्यामुळे MDRT या जागतिक संस्थेच्या अध्यक्षांनी मिलिंद माने यांचा  विशेष सन्मान केला.


मिलिंद माने यांचे जागतिक अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था यावरील अभ्यासपूर्ण विश्लेषण सर्वच क्षेत्रातील व्यक्तींना समजेल अश्या सोप्या भाषेतील, प्रभावशाली आणि मनाला विचार करायला भाग पाडणारे आहे. देशभरातील एल.आय. सी.ऑफ इंडियाच्या हजारो वरीष्ठ विकास अधिकाऱ्यांच्या प्रगतशील वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी जी All India Sr Business Associate Forum  या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेचे स्थापना केली त्याचे मिलिंद माने संस्थापक सदस्य आणि प्रमुख मार्गदर्शक आहेत.


मिलिंद माने यांनी विमा क्षेत्रातील यशाची एवढी मोठी शिखरे गाठल्यानंतरही शिक्षणाचा ध्यास काही सोडला नाही. 2018 ला MBA - Insurance and Financial Planning ही व्यस्थापन शास्त्राची पदवी मिळवली. मिलिंद माने यांनी विमा क्षेत्रात काम करणाऱ्या आर्थिक सल्लागार,विमा सल्लागार यांच्या प्रगतशील वाटचालीसाठी जीवन विमा या विषयावरील आंतरराष्ट्रीय दर्जाचा ट्रेनिंग प्रोग्राम बनवला आहे. नुकताच मिलिंद माने यांनी जीवन विमा विषयावरील शोधनिबंध PHD साठी विद्यापीठात सादर केला आहे. 


मिलिंद माने यांची भारतीय समाजाशी नाळ खूप घट्ट निर्माण झालेली आहे.2003 साली स्थापन केलेल्या Lend a Hand India या सामाजिक संस्थेचे मिलिंद माने संस्थापक सदस्य आणि सल्लागार आहेत. या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील, शहरी भागातील गरीब, गरजू मुलांना व्यावसायिक शिक्षण, कौशल्य विकास,रोजगाराभिमुख शिक्षण दिले जाते. आयुष्यात माणूस कोणत्याही क्षेत्रात कितीही मोठा झाला, यशस्वी झाला तरी त्याचे पाय जमिनीवर पाहिजे. सर्वांशी नम्रतेने आणि माणुसकीने वागले पाहिजे. या साऱ्या गोष्टींची प्रचिती मिलिंद माने यांना भेटल्यावर आल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील,भारतातील तरुण पिढीसाठी  प्रेरणादायी असणाऱ्या मिलींद माने यांच्या यशस्वी कारकिर्दीचा आढावा घेण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. 


लेखक, पत्रकार - अजित श्रीरंग जगताप

संपादक - महाराष्ट्र गर्जना न्यूज.



7 comments:

  1. Congratulations Milind Sir.I have witnessed your success story since beginning.We are proud of you

    ReplyDelete
  2. Proud of you my friend .....you r the best ....today and always

    ReplyDelete
  3. Sir, hats off to you and your successful career. It will definitely inspiring to the aspirants in this field. Best wishes to your future journey!

    ReplyDelete
  4. Kudos to Milind.He is our Hero.

    ReplyDelete
  5. A very inspiring journey & story...
    There is so much to learn from Milind Sir....

    ReplyDelete