Tuesday, September 29, 2020

"मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार म्हणून केलेला माझा गौरव माझ्या मातृत्वाला सार्थ करतो" - सुनंदा पवार, रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व्यक्त केल्या हृदयस्पर्शी शुभेच्छांच्या भावना...



पुणे, दि.२९ : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या संचालिका, सामाजिक कार्यकर्त्या, रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी आपल्या प्रामाणिक भावना व्यक्त करून, आगळ्या,वेगळ्या, हृदयस्पर्शी शुभेच्छा दिल्या. रोहित पवार यांनी आमदारकीच्या शपथ विधीच्या वेळी "मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार म्हणून केलेला माझा गौरव माझ्या मातृत्वाला सार्थ करतो" अश्या शब्दात सुनंदा पवार यांनी खास शुभेच्छांच्या भावना व्यक्त केल्या. सुनंदा पवार यांनी फेसबुकच्या अधिकृत पेजवर रोहित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन रोहित पवार यांच्याविषयी खास, हृदयस्पर्शी भावना व्यक्त केल्या.




"प्रिय रोहित, 

 थँकू, आज मला माझी स्वतःच्या किंवा दुसऱ्या कोणत्याही ओळखीची गरज पडत नाही, आज मला लोकं रोहित दादांची आई म्हणून ओळखतात. प्रत्येक, आई-वडिलांना त्याची मुलं मोठी व्हावी, मुलांच्या नावाने आई-वडिलांची ओळख व्हावी असे वाटते, तू ते आम्ही न सांगता पूर्ण करून दाखवलं.! शपथ विधीच्या वेळी 'मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार' म्हणून केलेला माझा गौरव माझ्या मातृत्वाला सार्थ करतो. लहानपणी गड्या माणसात खेळता खेळता आज तू कधी एवढा मोठा माणूस झाला हे मला कळलंच नाही.मात्र, पदानेचं नाही तर इतकाचं तू मनाने ही मोठा आहे हे मी नाही संपूर्ण महाराष्ट्र सांगतो. रोहित, खरं सांगू तू माझा मुलगा असल्याचा सार्थ अभिमान आहे. आज तुझ्या वाढदिवसानिमित्त खूप खूप आशीर्वाद व शुभेच्छा. तू उत्तरोत्तर प्रगती करत राहा हीच देवाकडे प्रार्थना.!"




या हृदयस्पर्शी भावनांमधून सुनंदा पवार यांनी रोहित पवार यांना प्रगतशील वाटचालीसाठी खास शुभेच्छा दिल्या. सुनंदा पवार यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श घेऊन रोहित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सामाजिक भान राखून वाढदिवस साधेपणाने, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करून, सामाजिक बांधिलकी जोपासून साजरा करावा असे आव्हान केलेले आहे.


Saturday, September 26, 2020

महाराष्ट्रात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १० लाख पार...रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.९४%, राज्यातील जिल्हानिहाय कोरोनाग्रस्त ॲक्टिव्ह रुग्णांची चिंताजनक आकडेवारी... वाचा या खास बातमीत...


मुंबई, दि.२६ : महाराष्ट्रात आज सलग दुसऱ्या दिवशी बरे झालेल्यांच्या तुलनेत नवीन निदान झालेल्या रुग्णांची संख्या कमी आली आहे. आज दिवसभरात २३ हजार ६४४ रुग्ण बरे होऊन घरी  सोडण्यात आले असून २० हजार ४१९ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १० लाख १६ हजार ४५० वर पोहोचली असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.९४ टक्के एवढे झाले आहे. राज्यभरात सध्या २ लाख ६९ हजार ११९ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.




 आज निदान झालेले २०,४१९ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ४३० मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) :


मुंबई मनपा-२२८२ (४४), ठाणे- २५६ (३), ठाणे मनपा-४०१ (८), नवी  मुंबई मनपा-४०३ (९), कल्याण डोंबिवली मनपा-४०८ (२६), उल्हासनगर मनपा-४८, भिवंडी निजामपूर मनपा-३३, मीरा भाईंदर मनपा-१९७ (१०), पालघर-१६३ (२), वसई-विरार मनपा-२१० (१), रायगड-३१८ (६), पनवेल मनपा-२०० (१), नाशिक-४३५ (८), नाशिक मनपा-११६० (९), मालेगाव मनपा-३२ (१), अहमदनगर-५२५ (६),अहमदनगर मनपा-१७२ (२), धुळे-२६, धुळे मनपा-२४, जळगाव-२३८ (९), जळगाव मनपा-११९ (१), नंदूरबार-७९, पुणे- १३९० (२३), पुणे मनपा-१७९६ (६३), पिंपरी चिंचवड मनपा-११३८ (४), सोलापूर-६०१ (१५), सोलापूर मनपा-१०२ (३), सातारा-८४९ (२१), कोल्हापूर-४९५ (२२), कोल्हापूर मनपा-१८३ (५), सांगली-५२४ (२१), सांगली  मिरज कुपवाड मनपा-२५५ (७), सिंधुदूर्ग-९६ (२), रत्नागिरी-१४४ (५), औरंगाबाद-१४५ (२),औरंगाबाद मनपा-२४४ (६), जालना-८८ (१), हिंगोली-६७, परभणी-५८ (५), परभणी मनपा-३० (७), लातूर-११७ (२), लातूर मनपा-९७ (२), उस्मानाबाद-२२४ (११), बीड-२०२ (२), नांदेड-१४१ (२), नांदेड मनपा-२१६ (३), अकोला-१८, अकोला मनपा-७५, अमरावती-७० (१), अमरावती मनपा-१२८ (३), यवतमाळ-२८६ (७), बुलढाणा-२०२ (४), वाशिम-५७ (१), नागपूर-५१८ (४), नागपूर मनपा-१११७ (११), वर्धा-२६४ (५), भंडारा-१९२, गोंदिया-२५७, चंद्रपूर-१५५ (३), चंद्रपूर मनपा-१२९ (६), गडचिरोली-९०, इतर राज्य- ३० (५).




आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६३ लाख ६९ हजार ६७६ नमुन्यांपैकी १३ लाख २१ हजार १७६ नमुने पॉझिटिव्ह ( २०.७४ टक्के) आले आहेत. राज्यात  १९ लाख  ४५ हजार ७५८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३० हजार ५७१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४३० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६६ टक्के एवढा आहे.




राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील : - 


मुंबई: बाधित रुग्ण- (१,९६,५८५) बरे झालेले रुग्ण- (१,५८,७४९), मृत्यू- (८७५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३९५), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८,६९१)


ठाणे: बाधित रुग्ण- (१,८०,८३८), बरे झालेले रुग्ण- (१,४६,५२०), मृत्यू (४७२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९,५९६)


 


पालघर: बाधित रुग्ण- (३५,८१९), बरे झालेले रुग्ण- (२८,४१७), मृत्यू- (८१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६५८९)


रायगड: बाधित रुग्ण- (४९,४९६), बरे झालेले रुग्ण-(४०,६९३), मृत्यू- (११०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (७७००)


रत्नागिरी: बाधित रुग्ण- (८११९), बरे झालेले रुग्ण- (५२०३), मृत्यू- (२४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६७०)


सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (३५९८), बरे झालेले रुग्ण- (२२५२), मृत्यू- (७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२७४)


पुणे: बाधित रुग्ण- (२,८२,२६६), बरे झालेले रुग्ण- (२,१९,१०६), मृत्यू- (५६२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७,५३५)


सातारा: बाधित रुग्ण- (३४,३४९), बरे झालेले रुग्ण- (२५,०४३), मृत्यू- (८६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (८४४२)


सांगली: बाधित रुग्ण- (३५,९७०), बरे झालेले रुग्ण- (२४,७७७), मृत्यू- (१०८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,१०४)


कोल्हापूर: बाधित रुग्ण- (४१,८९४), बरे झालेले रुग्ण- (३२,३७६), मृत्यू- (१२७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८२४१)


सोलापूर: बाधित रुग्ण- (३४,६९३), बरे झालेले रुग्ण- (२५,७३७), मृत्यू- (११२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८३५)


नाशिक: बाधित रुग्ण- (७१,६७८), बरे झालेले रुग्ण- (५५,०८०), मृत्यू- (१२५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५,३४५)


अहमदनगर: बाधित रुग्ण- (३९,६५९), बरे झालेले रुग्ण- (३१,३२२), मृत्यू- (६४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण-(७६८९)


जळगाव: बाधित रुग्ण- (४६,२६९), बरे झालेले रुग्ण- (३७,३४२), मृत्यू- (१२२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७७०६)


नंदूरबार: बाधित रुग्ण- (५०६८), बरे झालेले रुग्ण- (३९८२), मृत्यू- (११४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९७२)


धुळे: बाधित रुग्ण- (१२,१२८), बरे झालेले रुग्ण- (१०,७७२), मृत्यू- (३२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०२७)


औरंगाबाद: बाधित रुग्ण- (३४,८७४), बरे झालेले रुग्ण- (२४,४६६), मृत्यू- (८६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९५४१)


जालना: बाधित रुग्ण-(७३१७), बरे झालेले रुग्ण- (५२११), मृत्यू- (१८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९२०)


बीड: बाधित रुग्ण- (९६९५), बरे झालेले रुग्ण- (६४७२), मृत्यू- (२५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२९६५)


लातूर: बाधित रुग्ण- (१६,४९०), बरे झालेले रुग्ण- (१२,०७६), मृत्यू- (४६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९५०)


परभणी: बाधित रुग्ण- (५१६५), बरे झालेले रुग्ण- (३६७२), मृत्यू- (१८५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३०८)


हिंगोली: बाधित रुग्ण- (२८४२), बरे झालेले रुग्ण- (२२०८), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८२)


नांदेड: बाधित रुग्ण- (१४,९५९), बरे झालेले रुग्ण (८०२९), मृत्यू- (३७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६५५६)


उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (११,५६५), बरे झालेले रुग्ण- (८४९०), मृत्यू- (३३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७४४)


अमरावती: बाधित रुग्ण- (१२,६३६), बरे झालेले रुग्ण- (९९२७), मृत्यू- (२५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४५५)


अकोला: बाधित रुग्ण- (६९०२), बरे झालेले रुग्ण- (४३५५), मृत्यू- (२१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३२९)


वाशिम: बाधित रुग्ण- (३९५४), बरे झालेले रुग्ण- (३१०६), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७६५)


बुलढाणा: बाधित रुग्ण- (७१८८), बरे झालेले रुग्ण- (५०८१), मृत्यू- (१११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९९६)


यवतमाळ: बाधित रुग्ण- (८१५५), बरे झालेले रुग्ण- (५५५०), मृत्यू- (१७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४३०)


नागपूर: बाधित रुग्ण- (७३,५५८), बरे झालेले रुग्ण- (५५,०९६), मृत्यू- (१९४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६,५११)


वर्धा: बाधित रुग्ण- (३८२५), बरे झालेले रुग्ण- (२२६०), मृत्यू- (५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५०५)


भंडारा: बाधित रुग्ण- (४९०१), बरे झालेले रुग्ण- (३११९), मृत्यू- (९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६८९)


गोंदिया: बाधित रुग्ण- (६२४९), बरे झालेले रुग्ण- (३८१८), मृत्यू- (६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३६४)


चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (९०३५), बरे झालेले रुग्ण- (४२७२), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६७१)


गडचिरोली: बाधित रुग्ण- (१९४१), बरे झालेले रुग्ण- (१४४३), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८५)


इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१४९६), बरे झालेले रुग्ण- (४२८), मृत्यू- (१३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९३७)


एकूण: बाधित रुग्ण-(१३,२१,१७६) बरे झालेले रुग्ण-(१०,१६,४५०),मृत्यू- (३५,१९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४१६),ॲक्टिव्ह रुग्ण-(२,६९,११९)


(टीप: आज नोंद झालेल्या एकूण ४३० मृत्यूंपैकी २२७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ९३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ९३ मृत्यू  ठाणे -२२, पुणे -१८, कोल्हापूर -१२, सातारा -८, नाशिक -७, औरंगाबाद -४, जळगाव -३, परभणी -३, नांदेड -२, सोलापूर -२, वर्धा -२, सांगली -२, रायगड -२, अहमदनगर -१, उस्मानाबाद -१, रत्नागिरी -१, वाशिम -१, बुलढाणा -१ आणि कर्नाटक -१ असे आहेत.  पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)



'माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेच्या माध्यमातून आरोग्य साक्षर महाराष्ट्र घडविण्याचा मानस : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे



नाशिक, दि. २६ : - माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही केवळ मोहीम नसून या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आरोग्य साक्षर करण्याचा शासनाचा मानस असून आपल्या कुटुंब,गाव, शहर, जिल्हा आणि महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.




 दूरदृश्य प्रणालीद्वारे नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री व अधिकाऱ्यांच्या बैठकीत संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून पालकमंत्री छगन भुजबळ, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,  जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय,  पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, लीना बनसोड,  जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, महसूल उपायुक्त दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना  रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपील आहेर, नाशिक महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, मनपाचे कोरोना नोडल अधिकारी डॉ. आवेश पलोड आदी उपस्थित होते.





यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले,  या मोहिमेतून आपल्याला राज्याचा, जिल्ह्यांचा हेल्थ मॅप तयार करता येणार आहे. विविध माध्यमातून आपण या मोहिमेंतर्गत जनतेपर्यंत पोहोचणार आहोत.  त्यामुळे सर्वेक्षणासोबतच व्यापक स्वरूपाची जनजागृती आपल्याला करावी लागणार आहे. त्यासाठी आपल्या जिल्ह्यातील स्थानिक कला व कलावंतांचाही सहभाग वाढवावा. प्रत्येकाला आपल्या कुटुंबासाठी, गाव, जिल्हा व राज्यासाठी आरोग्यासाठी जे जे काही आवश्यक आणि गरजेचे आहे, ते ते करावे लागणार आहे, मला खात्री आहे प्रत्येक महाराष्ट्रप्रेमी यात निश्चितच सहभाग घेतल्याशिवाय राहणार नाही.




 या कालखंडात आपण कोरोनासाठीच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना साधन-सुविधा उपलब्ध करून देत आहोत. परंतु या सर्व सुविधा आपण कुठपर्यंत नेऊ शकतो यालाच काही मर्यादा आहेत, त्यामुळेच आपण प्रतिबंधात्मक उपायांसाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेवर लक्ष केंद्रित केले आहे.  काही लोक गृहविलगीकरणातही बाहेर फिरताना दिसून येत आहेत, त्यांनी आपल्या स्वत:सोबत, कुटुंब, समाज यांचीही काळजी घ्यायला हवी.  आज या क्षणाला आपले राज्य हे एकमेव राज्य आहे की जे या कोरोनामुक्तीच्या कामाला जनचळवळ बनवते आहे; त्याशिवाय आपण कोरोनामुक्त होऊ शकत नाही. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना ही केवळ प्रासंगिक आपत्ती नसून ती येणाऱ्या काळातल्या मोठ्या आपत्तीची नांदी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे येणारी आपत्ती व लॉकडाउन टाळायचे असेल तर आपल्याला कोरोना प्रतिबंधात्मक जीवनशैली अंगवळणी पाडून त्या जीवनशैलीच्या अंगिकार करावा लागेल असेही यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सांगितले.




राज्यात नाशिकचा मृत्युदर सर्वात कमी : पालकमंत्री छगन भुजबळ


नाशिक जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या ही ३ हजार ने कमी झाली असून मृत्यूदर राज्यात सर्वात कमी म्हणजे १.६ इतका आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे मापदंड एकास १० असताना तो नाशिक जिल्ह्याचा एकास ३० इतका आहे. स्वॅब तपासणीतही नाशिकची कामगिरी अत्यंत वेगवान असून औषधे, इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारी व महापालिकेच्या रूग्णालयांमध्येच त्यांचा जास्तीतजास्त साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे, त्यांच्यामार्फत औषधसाठ्याची, किमतीची नियमित तपासणी करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात २४ ते २८ मे.टन इतका ऑक्सिजन गरजेचा असून नाशिक जिल्ह्यातील मात्र स्थानिक उद्योगांच्या सहकार्यातून त्याची दररोज ५५ मे. टन इतकी निर्मिती केली जात आहे, त्यामुळे आजच्या स्थितीत ऑक्सिजनचा तुटवडा नाही, तो पुरेसा उपलब्ध आहे, असे सांगून यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, नाशिक शहरात ठक्कर डोमच्या माध्यमातून आदर्श कोविड सेंटरची संकल्पना तर राबवली जाते आहे. याशिवाय शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या संकल्पनेतून पोलीस व त्यांच्या कुटुबियांसाठी १०० बेडचे ऑक्सिजनच्या सुविधांनीयुक्त असे स्वतंत्र कोविड सेंटर निर्माण करण्यात आले आहे. या दोन्ही कोविड सेंटरमध्ये आज रूग्ण उपचार घेत आहेत. नाशिक महानगर पालिकेच्या हद्दीत पुरेसे बेड रुग्णांसाठी आज उपलब्ध असून भविष्यात बेड कमी पडणार नाही त्यासाठीही नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजन सेंटरची निर्मिती करण्यात येत असून २५ ते ३० ऑक्सिजन बेड प्रत्येक तालुकास्तरावर उपलब्ध करून दिले आहेत. आज संपूर्ण नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यातून येणारे पेशंट नाशिक शहरात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील सर्व अधिकारी आपापली कर्तव्ये  अत्यंत जबाबदारीने पार पाडत असून समाजाप्रती ते आपले कुटुंब म्हणूनच जबाबदारीने वागत आहेत असेही यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.


यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी माहिती सादर करताना सांगितले की, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम सुरू होण्यापूर्वीपासून मार्च महिन्यातच नाशिक जिल्ह्यातील मोहीम सुरू असून त्याच्या परिणामस्वरूप आम्ही जिल्ह्यातील रूग्णसंख्या मर्यादित ठेवण्यात यशस्वी झालो आहोत. आज क्षणाला जिल्ह्याचा मृत्यूदर १.६ तर रिकव्हरी होण्याचा दर जिल्ह्याचा ८७ इतका आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत आम्हाला ७३ लाख इतक्या लोकसंख्येपर्यंत पोहोचायचे आहे, आतापर्यंत आम्ही २० लाख लोकांपर्यंत पोहोचलो आहोत. जिल्ह्यात त्यासाठी ३ हजार २८९ टीम्स् कार्यरत आहेत. या माध्यमातून आपण ६९  कोमॉर्बिड रूग्णांना शोधण्यात यशस्वी झालो आहोत, त्यातील १ हजार २१४ रूग्णांन शोधून त्यांच्यापासून होणारा फैलाव रोखू शकलो हे या सर्वेक्षणाचे यश आहे. येणाऱ्या काळात उर्वरित लोकांपर्यंत आम्ही पोहचणार आहोत. दिवसेंदिवस बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून रूग्णसंख्याही कमी कमी होत चालली आहे.


या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी संजय यादव, नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड के.सी.पाडवी , जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड आदी उपस्थित होते.


Tuesday, September 22, 2020

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजातील तरुणांना दिलासा देण्यासाठी घेतले महत्त्वाचे ८ निर्णय.. वाचा ही खास बातमी सविस्तर...



मुंबई, दि.22 : मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.



मराठा आरक्षण प्रश्नाच्या अनुषंगाने दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, विविध विभागांचे मंत्री, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि सर्व विधीज्ञ यांच्यासोबत केलेल्या चर्चेनुसार राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठाकडे शासनाच्या वतीने दि.२१.०९.२०२० रोजी विनंती अर्ज दाखल केला आहे. या कामी दिलेले स्थगिती आदेश रद्द होईपर्यंत मराठा समाजातील (एसईबीसी) विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी शासनाने खालील प्रमाणे निर्णय घेतले आहेत.

 


मराठा समाजासाठी घेतलेले महत्त्वाचे ८ निर्णय : 

1. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेला लाभ एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना देण्यात येईल.

2. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना पूर्वी एसईबीसी विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आली होती ती तशीच आता ईडब्लूएस मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांकरिता लागू करण्यात येईल. राज्य शासनाने या वित्तीय वर्षासाठी ६०० कोटी इतका निधी मंजूर केलेला आहे.  जादा निधीची आवश्यकता भासल्यास त्याची तरतूद करण्यात येईल.

3. डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना पूर्वी एसईबीसी प्रवर्गासाठी लागू होती. ती तशीच आता ईडब्लूएसमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांकरिता लागू करण्यात येईल. त्यासाठी ८० कोटी इतकी तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे. यासाठी पूर्ण निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जादा निधीची आवश्यकता भासल्यास त्याची तरतूद करण्यात येईल.

4. उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह योजनेंतर्गत शासकीय व इतर इमारती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह चालविण्यासाठी नोंदणीकृत संस्थांना देण्याची योजना राबविण्यात येते. ही योजना अधिक गतिमान करण्यात येईल.

5. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांना भरीव निधी व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल. सारथी संस्थेने या वर्षासाठी रु.१३० कोटीची मागणी केलेली आहे. जादा निधीची आवश्यकता भासल्यास त्याची तरतूद करण्यात येईल.

6. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे बेरोजगार तरुणांना व्यवसायिकांसाठी आर्थिक मदत देण्यात येत आहे. यासाठी भागभांडवल ४०० कोटीने वाढविण्यात आले आहे. जादा निधीची आवश्यकता भासल्यास त्याची तरतूद करण्यात येईल.

7. मराठा क्रांती मोर्चामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरीत घेण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. प्रस्ताव जसे प्राप्त होतील, त्यापासून एका महिन्यात कार्यवाही करण्यात येईल.

8. मराठा क्रांती मोर्चामधील आंदोलकांवरील दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. आजमितीस शासनाकडे फक्त २६ प्रकरणे प्रलंबित आहेत त्यावरही एका महिन्यात कार्यवाही पूर्ण करण्यात येईल.







महाराष्ट्रात कोविडसंदर्भात २ लाख ६३ हजार गुन्हे दाखल; २५ कोटी ८५ लाख रुपयांची दंड आकारणी – गृहमंत्री अनिल देशमुख



 मुंबई दि. २१ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार  २ लाख ६३ हजार गुन्हे, तसेच १३४७ वाहनांवर अवैध वाहतुकीचे गुन्हे दाखल तर २५ कोटी ८५ लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आली, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

 


राज्यात दि. २२ मार्च ते २० सप्टेंबरपर्यंत कलम १८८ नुसार २,६३,४८१ गुन्हे नोंद झाले असून ३५,८८० व्यक्तींना अटक करण्यात आली. ९६,१७४ वाहने जप्त केली. यातील विविध गुन्हांसाठी २५ कोटी ८५ लाख ९४ हजार ०६४ रु. दंड आकारण्यात आला.

 

कडक कारवाई

 

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दृष्टप्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या ३५९ घटना घडल्या. त्यात ८९४ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

 


१०० नंबर- १ लाख १३ हजार फोन

पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर  १,१३,११६ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३४७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर ९६,१७४ वाहने जप्त करण्यात आली.

 


पोलीस कोरोना कक्ष

 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने राज्यातील १९९ पोलीस व २३ अधिकारी अशा एकूण २२२ पोलिस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

 

नागरिकाचा सहभाग

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.


Sunday, September 20, 2020

पुरंदरचे शिलेदार, वीरचे सुपुत्र; कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी वसंत जाधव भंडारा जिल्ह्यचे नवीन पोलीस अधीक्षक...

भंडारा, दि. 20 : महाराष्ट्राच्या गृह विभागाने अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले, त्यामध्ये मुंबई येथे शीघ्र कृती दलामध्ये पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत असणारे, मूळचे पुरंदर तालुक्यातील वीर गावचे सुपुत्र, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी वसंत जाधव यांची भंडारा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. 




भंडारा जिल्हयाचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असणारे अरविंद साळवे यांची चंद्रपूर येथे बदली झाली असून, चंद्रपूरचे  पोलीस अधीक्षक पदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.



मुंबई येथे शीघ्र कृती दलामध्ये पोलीस उपायुक्त म्हणून वसंत जाधव यांनी दमदार कामगिरी करून अल्पावधीतच निर्भीड, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून चांगली प्रतिमा निर्माण केलेली आहे. ग्रामीण भागात सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्म घेणाऱ्या वसंत जाधव यांनी उच्च शिक्षण,जिद्द, चिकाटी,कठोर मेहनत, प्रामाणिक कामगिरी याच्या जोरावर जिल्ह्यच्या पोलीस अधीक्षक पदापर्यंत झेप घेतली हा   थक्क करणारा प्रवास महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील तरुणांसाठी निश्चितच खुप प्रेरणादायी आहे. 


पुणे जिल्हा आणि पुरंदर तालुक्यातील नागरिकांकडून धडाकेबाज पोलीस अधिकारी वसंत जाधव यांच्या प्रगतशील कारकिर्दीसाठी आनंद व्यक्त करून भरभरून कौतुक करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र गर्जना न्यूजच्या टीमकडूनही भंडारा जिल्ह्यचे नवीन पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांना प्रगतशील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. भंडारा जिल्ह्यातही कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी वसंत जाधव विशेष कामगिरी करून लोकांची मने जिंकतील अशी अपेक्षा सर्वांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे.




Sunday, September 13, 2020

पांडुरंगचा बळी घेणारी 'ती' पाच कारणं ! - जेष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे यांचा खास लेख...

 


पांडुरंग रायकर हा सिस्टमचा बळी. व्यवस्थेचा बळी. आज अनेकांकडून ऐकलं. पण मला वाटतं पांडुरंगचा बळी नेमका का गेला याची पाच कारणं आहेत. त्यासाठी काही प्रमाणात तरी आपणही सारे जबाबदार आहोत.


 मी एक सामान्य पत्रकार. सध्या कोणत्याही प्रस्थापित माध्यमांसोबत नाही. त्यामुळेच आज खूप आतून दाटून आलं त्यामुळे समाजमाध्यमांच्या मुक्तपीठावर व्यक्त होतोय. 


 पांडुरंग रायकर. वय वर्षे ४२. माझा दोन चॅनलमधील तरुण सहकारी. सकाळी त्यानं अखेरचा श्वास घेतला. हे वय नव्हतंच जायचं. खूप करायचं होतं त्याला. खूप काही. कधीही न चिडणारा. शांतपणे काम करत राहणारा. कुणी त्रास दिला तरी तक्रारही न करणारा. वेगळाच होता तो. आज सकाळी तो गेल्यावर पुण्यातील पत्रकारांना अश्रू आवरत नव्हते त्याचं कारणचं पांडुरंगचा स्वभाव. आपुलकीचं वागणं बोलणं. त्याच्याविषयी मी जास्त बोलणार नाही. कारण अनेक जवळच्या मित्रांनी, मोठ्या माणसांनी त्याच्याविषयी भरभरून बोलून झालंय. त्यातील काही तर असेही असावेत की आज त्याच्या मृत्यूनंतरच ते बोलते झाले असावे, काल जेव्हा पुण्यातील पत्रकार पांडुरंगला वाचवण्यासाठी झगडत होते तेव्हा मात्र ते कुठेच नसतील. तेव्हा कदाचित पांडुरंग नावाचा एक पत्रकार त्यांच्या दृष्टीनं तेवढा महत्वाचाही नसावा. त्यामुळेच त्याच्या पुढे जात असं पुन्हा होऊ नये, यासाठी प्रयत्न आवश्यक!


 आपला एक पांडुरंग गेला, आणखी कुणाचा पांडुरंग होऊ नये. त्यासाठीच पांडुरंगचा बळी घेणारी कारणं तपासली पाहिजेत. 



कारण -१


 पुण्यासारख्या महानगरात कोरोना अत्यवस्थ रुग्णाला एका कोरोना उपचार केंद्रातून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध नसणे. त्याचबरोबर कोरोना जंबो फॅसिलिटीच्या नावाखाली उभारली गेलेली मोठी केंद्रं. उद्घाटन झोकात. मिरवतात नेते. असतं काय? जर पुढील उपचाराची योग्य सोय नसेल, कोणत्या वॉर्डमध्ये, कोणत्या बेडवर कोणता रुग्ण आहे, याची धड नोंद नसेल, जर आपत्कालीन स्थिती उद्भवली तर तर इतरत्र हलवण्यासाठी सुसज्ज रुग्णवाहिकाही नसतील  तर या तथाकथित जंबो फॅसलिटी म्हणजे पोकळ सांगाडेच! 

 बालेवाडीच्याआधी त्याला हिंजवडी कोव्हिड सेंटरला नेण्यात आलं. तिथं हाय प्रेशर ऑक्सिजनच नव्हते. छातीत सूज असल्यानं फिजिशियननं इंजेक्शन दिलं. 

 या पहिल्याच कारणावर आज सर्व प्रस्थापित माध्यमांचा भर राहिला. पण मुळात पांडुरंग पॉझिटिव्ह असतानाही अहमदनगरहून पुण्यात का यावं लागलं तेही महत्वाचं.



कारण -२


 पांडुरंग त्याच्या गावाकडे कोपरगावला गेला होता. तिथंही त्रास होतच असल्यानं तो कोपरगावच्या रुग्णालयात गेला. तिथं तपासणीसाठी अँटीजन किटच नव्हतं. कसंबसं ते काही तासांनी मिळालं. टेस्ट पॉझिटिव्ह आली. मात्र, रुग्णालयानं दाखल करून घेण्यासाठी ४० हजार आगाऊ रक्कम मागितली. त्याच्या पत्नीकडे दहा हजारच होते. अखेर त्याची पत्नी पांडुरंगला घेऊन पुण्याकडे निघाली. 

 कोपरगावातील रुग्णालयासारखी ती रुग्णालयं जी कंपनीनं दिलेलं कॅशलेस मेडिक्लेमचं कार्ड असतानाही तब्बल ४० हजाराची आगाऊ रक्कम मागतात. हा अनुभव सध्या हजारो घेतात. एकीकडे जीव धोक्यात टाकून रुग्णसेवा करणारे आरोग्यरक्षक डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय आणि दुसरीकडे हे धंदेवाईक ! पांडुरंगचा बळी जाण्यासाठी हेही जबाबदार !!



कारण -३


 तिसरं कारण खूपच महत्वाचं वाटतं. प्राथमिक लक्षणं दिसल्यानंतर संबंधित व्यक्तीला योग्य सल्ला न मिळणं. योग्य उपचार न मिळणं. आजवर हजारो रुग्णांवर उपचार करणाऱ्या सरकारी सेवेतील एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितलं की अनेकदा सुरुवातीच्या टप्प्यात रुग्ण काहीवेळा ज्या डॉक्टरांकडे जातात त्यांनी खूप दक्षता घेतली पाहिजे. जर वेळेत कोरोना चाचणीच्या जोडीनं संशय येत असेल तर छातीचे सिटी स्कॅन केले पाहिजे. अनेकदा सुरुवातीला कळतही नाही. पांडुरंगला ताप आल्यानंतर सात दिवसांनी एक चाचणी झाली. ती निगेटिव्ह आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो श्रीरामपूरला गेला. तिथं अँटिजन टेस्ट पॉझिटिव्ह आली. हे सारंच विचित्र वाटतंय. चौकशी गरजेची. 

 नेमके हे महत्वाचे दहा दिवस त्याचा संसर्ग जास्त वाढवणारे ठरल्याची शक्यता, वन रुपी क्लिनिकच्या डॉ. राहुल घुले यांनीही व्यक्त केली. ज्याअर्थी ऑक्सिजन पातळी ७८च्याही खाली गेली त्याचा अर्थ संसर्गानं फुप्फुसाची हानी ५० टक्क्यांपेक्षाही जास्त झाली असण्याची शक्यता होती, असंही ते म्हणाले. त्यामुळेच येणाऱ्या प्रत्येक रुग्णाकडे जनरल प्रॅक्टिसनरनी संशयानंच पाहावं. तात्पुरती औषधं देऊ नये. त्यामुळे तापासारखं लक्षण जाईल, पण कोरोना संसर्ग मात्र वाढेल, असे ते म्हणाले. 

 सरकारने जनरल प्रॅक्टिसनरसाठी असे रुग्ण आल्याची माहिती त्वरित स्थानिक आरोग्य यंत्रणेला कळवणं बंधनकारक असावं. जर नसेल तर त्वरित तसं केलं जावं, अशी मागणीही डॉ. घुले यांनी केली. 

 कोरोना उपचाराच्या दृष्टीनं सुरुवातीचे हे दिवस गोल्डन अवर, पांडुरंगच्या बाबतीत तिथं अक्षम्य दिरंगाई झाली, असं दिसतंय. 



कारण -४


 पांडुरंग रायकरला कोरोना झाला तो धोकादायक परिस्थितीत फिरल्यामुळे हे नाकारताच येणार नाही. टीव्ही 9 असो किंवा अन्य कोणतंही चॅनल आपल्या कर्मचाऱ्यांची सर्वोतोपरी काळजी घेण्याचे प्रयत्न कंपनीचं धोरण म्हणून असतातच. प्रसंगी नुकसान सहन करुनही. मात्र, तरीही पत्रकारांना व्यावसायिक जबाबदारीमुळे धोकादायक स्थितीत फिरावयास लागणं, हे अपरिहार्यच असतं. कोणी कितीही नाकारलं तरी दर गुरुवारी येणारे बार्कचे आकडे हे टीव्ही पत्रकारितेसाठी साप्ताहिक तणावाचं कारण असतंच असतं. अपरिहार्य असं. त्यामुळेच खरं तर कोरोना संकटकाळात बार्कची रेटिंग सिस्टम कोरोना संकट काळापुरती स्थगित करणं आवश्यक होतं. 

अनेकांना बाहेरून वाटतं चॅनलना काय, कोण विचारतंय? मात्र एनबीएफसारख्या संघटनांकडे नोंदवल्या जाणाऱ्या तक्रारी, अगदी कुसळाचंही मुसळ करणाऱ्याही असतात. त्यांना पुराव्यासह उत्तरं देणं सोपं नसतं. त्याच संघटनांना रेटिंगबाबतीत स्थगितीचा निर्णय घेणं आवश्यक वाटलं नाही.


 स्पर्धा नसती तर ताणही कमी असता. तशी मागणीही झाली. पण दुर्लक्ष केलं गेलं. चॅनलमधील पत्रकारांना कामाशिवाय पर्याय नव्हता. थोडक्यात चॅनलकडून कितीही काळजी घेतली गेली तरी धोकादायक स्थितीत काम करणं अपरिहार्यच होतं. 



कारण - ५


मला स्वत:ला पांडुरंग रायकर सारख्या तरुण पत्रकाराचा बळी जाण्यासाठी राजकारण हेही सर्वात महत्वाचं कारण वाटतं. खटकेल, खुपेल अनेकांना पण हे सत्यच आहे. 


टीव्हीच्या रेटिंगप्रमाणेच कोरोना संकटकाळात राजकारणही थांबणं गरजेचं होतं. पण ज्या देशात राजकारण हेच अनेकांचा फुलटाइम उद्योग असतो तिथं तसं घडणं अशक्यच होतं. 

जबाबदार राजकीय नेत्यांनी बेजबाबदारीनं गर्दी जमवत आंदोलनं करत धोकादायक परिस्थिती निर्माण करणं कधीच समर्थनीय मानलं जाऊ शकत नाही पण तसं सातत्यानं घडलं. घडतंय. अपवाद कुणाचाच नाही. कुणी आंदोलनांसाठी तर कुणी राजकीय कार्यक्रमांसाठी गर्दी जमवण्याचा बेजबाबदारपणा केलाच केला. त्यामुळे पत्रकारांनाही अशा धोकादायक गर्दीच्या ठिकाणी रिपोर्टिंग करण्याशिवाय पर्याय नव्हता. यूट्युब, फेसबुक लाइव्हचा पर्याय असतानाही पत्रकार परिषदा घेण्याची हौसही अशीच धोकादायक. पण भागवली गेली. भागवली जात आहे.



दुसरीकडे कोरोना आरोग्य सुविधा नाहीत म्हणून आरोप करायचे आणि दुसरीकडे आपल्या विभागात होऊ घातलेल्या कोरोना सुविधा केंद्रांना विरोध करण्याचेही राजकीय उद्योग बरेच झाले. 


माध्यमांनी संयम बाळगला. कोरोना जागतिक आपत्ती असल्याची जाण ठेवत गल्लीतील ठाकरे सरकार असो वा दिल्लीतील मोदी सरकार दोष देणं टाळलं. तर माध्यमांनाही लक्ष्य करून बदनामीचे प्रयत्न सुरुच आहेत. 





सकाळपासून पांडुरंग रायकरचा बळी कुणी घेतला यावर राजकीय आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवताना दिसतात तेव्हा मनाला वेदना होतात. किमान तरुण पत्रकाराच्या मृत्यूवर तरी राजकारण नसावं. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या तीन राजकीय पक्षांनी पांडुरंगच्या कुटुंबाला प्रत्येकी ५ लाखांची मदत दिली. किमान एक छोटा दिलासा मिळाला. तेवढ्यानं जीवन निघणार नाही. अजून खूप करावं लागेल. पण काही तरी झालं.



गेलेला पांडुरंग परत येणार नाही. पण किमान आता आणखी एखादा पांडुरंग नको. त्यासाठीच आपण सर्वांनी गंभीरतेनं ही पाच कारणं म्हणजे आपणही सोसलेले, दुर्लक्षानं पोसलेले आपल्याही सर्वांचे दोष असल्याचं समजून घेणं आवश्यक आहे.


सकाळपासून सांगितलं जातंय. पांडुरंगचा व्यवस्थेनं बळी घेतला. मग ही व्यवस्था...म्हणजे सिस्टम...असते काय...ती काही फक्त राजकारणी, प्रशासन मिळून तयार होत नाही, सिस्टममध्ये आपणही असतोच असतो. जेव्हा सिस्टमने पांडुरंगचा बळी घेतला म्हणतो तेव्हा तो आपणही घेतलेला आहे. पांडुरंगचा बळी आपणही घेतला असं मी म्हणतो ते त्यामुळेच. जर सिस्टम बदलायची असेल तर आपणच आधी बदलावं लागेल.


    - लेखक, जेष्ठ पत्रकार -  तुळशीदास भोईटे

या विशेष लेखाचे लेखक महाराष्ट्रातील जेष्ठ पत्रकार आहेत. टिव्ही 9 मराठी,मी मराठी या लोकप्रिय चॅनेलचे माजी संपादक म्हणून उत्कर्ष काम केलेले आहे.









Friday, September 11, 2020

मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही; सर्वांना विश्वासात घेऊन ही न्यायालयीन लढाई जिंकणारच – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  


मुंबई, दि ११: मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करू. यासंदर्भात आम्ही सर्व संबंधितांनाही विश्वासात घेऊन, त्यांच्या सूचनांचा विचार करणार आहोत. विरोधी पक्ष नेत्यांशी देखील या विषयावर सविस्तर बोलण्यात येईल. सरकार याप्रश्नी सुरुवातीपासून प्रामाणिक आहे आणि तळमळीने हा प्रश्न सोडवू इच्छिते पण राजकारणासाठी मराठा समाजाला भडकविण्याचे आणि आगी लावण्याचे काम कुणी करू नये, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

 


आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी, समाजाची बाजू मांडणारे वकील,अभ्यासक यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हीसी) संवाद साधला व त्यांच्या या न्यायालयीन लढाईच्या अनुषंगाने सूचना ऐकून घेतल्या. या बैठकीचे सूत्रसंचालन स्वतः उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री बाळासाहेब थोरात हे ऑनलाईन तर उपसमिती सदस्य एकनाथ शिंदे, अनिल परब, दिलीप वळसे पाटील प्रत्यक्ष उपस्थित होते. राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, ज्येष्ठ विधिज्ञ विजयसिंग थोरात, तीनही पक्षांचे प्रवक्ते, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे  उपस्थित होते

 

पंतप्रधानांनाही विनंती करणार

 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा समाज हा लढवय्या आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांच्या भावना मी समजुन घेऊ शकतो. मात्र तुमच्या ज्या भावना आहेत, त्याच माझ्या आणि सरकारच्या आहेत हे लक्षात घ्या. मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याचा कायदा विधानमंडळात संमत झाला तेव्हा त्यामागे सर्व पक्ष होते. एकमताने हा निर्णय झालेला होता. उच्च न्यायालयात देखील आपला विजय झाला, त्यावेळीही आपले अधिवक्ता, वकील ही सगळी पहिल्या सरकारने नेमलेली टीम कायम होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचे हे प्रकरण घटनापीठाकडे पाठविण्याचे म्हणणे एकीकडे मान्य केले आहे तर दुसरीकडे नोकऱ्या, प्रवेश याला स्थगिती दिली आहे. वास्तविक पाहता इतर राज्यांतही आरक्षणाच्या बाबतीतल्या प्रकरणांमध्ये स्थगिती नाही. पण केंद्राने देखील यात आपली भूमिका घ्यायला हवी असे मला वाटते असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या प्रश्नी लोकसभेतही आवाज उठवला जाईल तसेच पंतप्रधानांनी देखील लक्ष घालावे अशी विनंती करण्यात येईल. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर ज्या-ज्या राज्यांत आरक्षणाचे प्रश्न आहेत ते समाज या देशाचेच नागरिक आहेत त्यामुळे निश्चितपणे पंतप्रधानांनी यामध्ये लक्ष घालणे आवश्यक आहे.

संयमाने, शांतपणे आणि एकजुटीने मार्ग काढू

 

आम्ही निकाल लागल्यानंतर सातत्याने विधिज्ञ, अभ्यासक यांच्याशी बोलतो आहोत. आज आपल्याशीही चर्चा करून आपले मत जाणून घेतले आहे., लवकरच विरोधी पक्ष नेते यांच्याशी देखील बैठक आयोजित करून या प्रश्नी त्यांची सूचनाही ऐकून घेतली जाईल. मी यासंदर्भांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी बोललो आहे. सारथी संस्थेच्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांसाठी काही करता येईल का, किंवा अध्यादेश काढता येईल का अशा अनेक पर्यायांवर आम्ही बोलत आहोत. मात्र ही न्यायालयीन लढाई आपण सर्व निश्चितपणे जिंकल्याशिवाय राहणार नाही, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, याचा फायदा कुणी राजकारणासाठी करून समाजाची माथी भडकावीत असतील तर ते सहन  केले जाणार नाही. आपण विचलित न होता, संयमाने आणि शांततेने यातून मार्ग काढूत आणि महत्त्वाचे म्हणजे आपली एकजूट ठेवूत.

 


कुठेही कमतरता येऊ दिली जाणार नाही - अजित पवार

 

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, न्यायालयाने निर्णय दिला असला तरी अपील करण्यास वाव आहे. जे जे काही न्यायालयीन मार्ग आहेत ते वापरण्यात कुठेही कमतरता येऊ दिली जाणार नाही. कोरोनासंकट आले असले तरी मराठा समाजाच्या या प्रश्नावर सरकार पुरेशा गांभीर्याने आणि जबाबदारीने मार्ग काढत आहे. राजकारण करून कुणीही पोळी भाजून घेऊ नये. मराठा आंदोलकांवर यापूर्वी दाखल झालेल्या गुन्हे काढून घेण्याच्या बाबतीतही कालच आमची गृहमंत्र्यांसमवेत चर्चा झाली आहे.

 


विरोधी पक्षांना देखील विश्वासात घेणार - अशोक चव्हाण

 

यावेळी प्रारंभी उपसमितीचे अध्यक्ष म्हणून मंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थितांना सर्वोच्च न्यायालयातील या प्रकरणाविषयी थोडक्यात माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाचा स्थगिती देण्याचा निर्णय अनपेक्षित असला तरी आता विधिज्ञांशी बोलून मोठ्या घटनापिठासमोर हे प्रकरण कसे लवकरात लवकर आणता येईल, तसेच स्थगिती कशी उठवता येईल यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत असे ते म्हणाले. समाज माध्यमे तसेच इतर माध्यमांतही या निकालाच्या अनुषंगाने चुकीचा व गैरसमज पसरविणाऱ्या बातम्या देण्यात येत आहेत ते थांबले पाहिजे, तसेच कुणीही चिथावणीखोर भाषा करू नये असे ते म्हणाले.

संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला विश्वास

 

यावेळी बोलताना ज्येष्ठ विधिज्ञ विजयसिंग थोरात यांनी देखील आपले मार्गदर्शन केले. याप्रसंगी संजय लाखे पाटील, आमदार विनायक मेटे, नरेंद्र पाटील, विनोद पाटील राजेंद्र दाते पाटील, आशिष गायकवाड, श्रीराम पिंगळे, विशाल कदम, सागर धनावडे, डॉ कांचन पाटील, प्राचार्य एम एम तांबे, एड राजेंद्र टेकाळे , रमेश केरे पाटील, सुरेश पाटील, एड रवी जाधव, किशोर चव्हाण, आप्पासाहेब  कुठेकर पाटील, छाया भगत, चंद्रकांत भराट , जगन्नाथ काकडे पाटील, प्रवीण पिसाळ यांनी मुद्दे मांडले व सूचना केल्या.

 

सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी राज्य सरकार उचलत असलेल्या पावलांवर समाधान व्यक्त केले तसेच यात कुठलेही राजकारण होता कामा नये अशी अपेक्षाही व्यक्त केली आणि सहकार्य करण्याची तयारी दर्शविली.


Sunday, September 6, 2020

वाकीचा तलाव ओव्हरफ्लो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला शब्द पाळल्यामुळे शेतकरी वर्ग, बारामतीकर आनंदित...

 

वाकी, दिनांक ६ : बारामती तालुक्यातील शेतीसिंचनासाठी महत्वाचा असलेला वाकी गावचा तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला असून तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहत असल्यामुळे वाकी परिसरातील शेतकरी वर्ग आनंदित झाला आहे.




बारामती तालुक्यातील जिरायत भागात शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. बारामती तालुक्यातील वाकी गावात शेती सिंचनाची सोय नसल्यामुळे वाकीच्या तलावात पाणी सोडण्याची अनेक दिवसांपासूनची ग्रामस्थांची मागणी होती. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी अजित पवार यांनी वाकीच्या तलावात कायमस्वरूपी पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते, काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला शब्द पाळून पुरंदर उपसा सिंचन योजना अंतर्गत खडकवासला कालव्याचे पाणी वाकीच्या तलावात सोडण्यात आले होते.




आज तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाल्यामुळे वाकी पंचक्रोशीतील ग्रामस्थ आनंदित झाले आहे.वाकी गावातील पाटबंधारे तलाव  102 एम.सी.एफ. टी. क्षमतेचा असून यातील पाण्याचा फायदा शेतीसाठी आणि पिण्यासाठी होणार असून, चोपडज, वाकी, मूर्टी, मोराळवाडी, कानाडवाडी, वडगाव निंबाळकर परिसरातील शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा होणार आहे.




बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजीनाना होळकर, वाकी गावचे सर्व ग्रामस्थ, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी यांच्या पाठपुराव्यामुळे आणि अजित पवार यांनी दिलेला शब्द पाळ्ल्यामुळे वाकीचा तलाव पूर्ण क्षमतेने भरून याचा खूप मोठा फायदा शेतकरी वर्गाला होणार आहे.




 "महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुक प्रचारावेळी दिलेला शब्द पाळल्यामुळे आज वाकी गावचा तलाव पूर्ण भरून ओव्हरफ्लो झाला आहे,वाकी पंचक्रोशीतील शेतकरी वर्गाला याचा खूप फायदा होणार असून,या भागातील शेतकरी वर्ग खूप आनंदित झाला आहे अशी प्रतिक्रिया बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजीनाना होळकर यांनी दिली. वाकीचा तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे वाकी गावातील सर्व ग्रामस्थांनी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.





Friday, September 4, 2020

स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 5846 जागांसाठी पोलीस कॉन्स्टेबल पदाची भरती; पगार 21700 ते 69100..

 


नवी दिल्ली, दि. ४ : केंद्र सरकारच्या स्टाफ सिलेक्शन कमिटी - कर्मचारी निवड समिती मार्फत दिल्ली पोलीस विभागाच्या क्वांस्टेबल एक्सएकटिव्ह - Constable Executive या पदासाठी 5846 जागा भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.या पदांसाठी ऑनलाइन नोंदणी 7 सप्टेंबरपर्यंत चालू राहील. या पदांसाठी वेतनश्रेणी - Pay Level 3 - (21700 - 69100) असणार आहे.



एकूण जागा - 5846

पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स.) – पुरुष : 3433 जागा

 

पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स.) - पुरुष (माजी सैनिक (इतर) : 226

 

पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स.) - पुरुष (माजी सैनिक) : 243

 

पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स) - महिला : 1944

 

शैक्षणिक अर्हता : 12 वी पास, वैध वाहन परवाना आणि इतर

 

वयोमर्यादा : 1 जुलै 2020 रोजी वय वर्षे 18 ते 25 च्या दरम्यान असावे

 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 7 सप्टेंबर 2020 रात्री 11.30 पर्यंत.

खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करून या पदभरती विषयी संपूर्ण माहिती वाचा.

 

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2GjZHPm


खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही Constable Executive या पदासाठी अर्ज करू शकता.

 

अर्ज करण्यासाठी : https://bit.ly/3lLg6wz



Tuesday, September 1, 2020

महाराष्ट्र सरकारचे दिलासादायक मिशन बिगिन अगेन - अनलॉक ४ नियमावली जाहीर; सर्व नियमावली वाचा सविस्तर या खास बातमीत...

 





मुंबई, दि. ३१ : ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत अनेक बाबींमध्ये सूट देत  व अर्थचक्रास गती देण्यासाठी २ सप्टेंबर २०२० पासून खाजगी बसमधून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय कोणत्याही निर्बंधाशिवाय यापुढे आऊटडोर किंवा खुल्या जागेमध्ये व्यायाम आदी कार्ये करता येतील. हॉटेल (उपहारगृहे )आणि लॉज (निवासगृहे) यांना १०० टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तथापि, खाजगी बसमधून प्रवासी वाहतूक, हॉटेल, लॉजचे कार्यान्वयन याबाबत स्वतंत्र कार्यप्रणाली (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) जारी करण्यात येणार आहे.

 


संपूर्ण महाराष्ट्रासाठी शासकीय कार्यालयांमध्ये अ व ब गटातील अधिकाऱ्यांची यापुढे १०० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिका, पुणे, पिंपरी - चिंचवड महापालिका आणि वेळोवेळी सूचित करण्यात आलेल्या इतर महापालिका क्षेत्रातील शासकीय कार्यालयांमध्ये ३० टक्के कर्मचारी किंवा किमान ३० कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती असेल. उर्वरित महाराष्ट्रातील शासकीय कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचारी किंवा किमान ५० कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती असेल.

 


खाजगी कार्यालयांमध्ये आवश्यकतेनुसार ३० टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. शासकीय आणि खाजगी कार्यालये आणि आस्थापना यामध्ये निरीक्षण अधिकारी (व्हिजिलंट ऑफिसर)ची नियुक्ती करणे आवश्यक करण्यात आले असून हा अधिकारी सॅनिटायझेशन, शारीरिक अंतर आणि इतर सुरक्षाविषयक उपयायोजनांकडे लक्ष पुरवेल.

 


आता आंतरजिल्हा प्रवासी व मालवाहतुकीसाठी कोणतेही निर्बंध राहणार नाहीत. वेगवेगळ्या व्यापारी करारानुसार शेजारी राष्ट्रांमधून मालवाहतूक व प्रवासी वाहतुकीसाठी निर्बंध राहणार नाहीत. शिवाय त्यासाठी ई-परमिट / संमती / स्वतंत्र परवानगीची गरज भासणार नाही.




मिशन बिगिन अगेन - नियमावली जाहीर

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी ३० सप्टेंबर २०२० पर्यंत वाढवण्यात आला असला तरी ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी विविध सुधारणा जाहीर करण्यात आल्या आहेत.

कोविड विषाणू नियंत्रणासाठी राष्ट्रीय स्तरावरील सूचना

  • मास्कचा वापर- सार्वजनिक ठिकाणे, कार्यस्थळे या ठिकाणी तसेच प्रवासादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक आहे.
  • सामाजिक अंतर पाळणे (सोशल डिस्टंसिंग) : प्रत्येक व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी वावरताना इतरांपासून किमान 6 फुटाचे (दो गज की दूरी) अंतर राखावे.
  • ग्राहक सुरक्षित अंतर राखतील याची दुकानदारांनी काळजी घ्यावी, दुकानांमध्ये एका वेळी 5 व्यक्तींपेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देऊ नये.
  • जमावाबाबतची बंधने : मोठ्या प्रमाणावर जमाव होऊ शकणारे समारंभ/सभा आदींना यापुढेही प्रतिबंध राहील. विवाह सोहळ्याला 50 पेक्षा अधिक अधिक अभ्यागतांना आमंत्रित करता येणार नाही. अंत्यसंस्कार आणि त्यासंबंधित विधींना 20 पेक्षा अधिक व्यक्तींना सहभागाची परवानगी नसेल.
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकणे शिक्षापात्र असून त्यासाठी संबंधित प्राधिकरणाचे कायदे, नियम, नियमनानुसार असलेला दंड लागू राहील.
  • सार्वजनिक ठिकाणी मद्य, पान, तंबाखू इ. चे सेवन करण्यास प्रतिबंध राहील.

कामाच्या ठिकाणी पाळावयाच्या मार्गदर्शक सूचना :

  • घरातून काम (वर्क फ्रॉम होम) : शक्यतोवर  घरातूनच काम करण्याची पद्धत अवलंबली पाहिजे.
  • कार्यालये, कामाची जागा, दुकाने, बाजारपेठ, औद्योगिक तसेच व्यावसायिक आस्थापनांमध्ये कामाचे/ व्यवसायाच्या वेळेचे विभाजन करण्याचा नियम पाळला पाहिजे.
  • तपासणी व स्वच्छता - कार्यालयाच्या सर्व प्रवेशद्वारांवर तसेच बाहेर पडण्याच्या दरवाज्याजवळ थर्मल स्कॅनिंग (शरीराचे तापमान मोजणे), हात धुणे आणि सॅनिटायझरची व्यवस्था करावी .
  • संपूर्ण कामाची जागा, सामान्य सुविधा आणि मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व गोष्टींची/ वस्तूंची वारंवार स्वच्छता करण्यात यावी. शिफ्टमध्ये काम करताना प्रत्येक शिफ्टनंतर दरवाज्याचे हॅन्डल इत्यादी गोष्टींची स्वच्छता राखणे आवश्यक आहे.
  • सुरक्षित अंतर - कामाच्या ठिकाणी असलेले सर्व कर्मचारी / कामगारांमध्ये प्रत्येक  शिफ्टच्या वेळांमध्ये पुरेसे अंतर ठेवून काम करतील. तसेच भोजनाच्या वेळांमध्ये सुयोग्य अंतर राहील याची दक्षता संबंधित आस्थापना प्रमुखांनी घेणे आवश्यक आहे.

कंटेनमेंट झोन्स –

  • दि. १९ मे २०२० आणि २१ मे २०२० रोजीच्या आदेशान्वये वर्गीकृत केलेले कंटेनमेंट झोन्स हे पुढील आदेशापर्यंत कायम राहतील.
  • कंटेनमेंट झोन निश्चित करणे आणि त्याचे संनियंत्रण करण्याबाबत केंद्र शासन आणि राज्य शासनामार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश कायम राहतील.
  • या कालावधीत विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन एखाद्या विशिष्ट भागात जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त त्यांच्या क्षेत्रात आवश्यक निर्बंध घालू शकतील. मुख्य सचिव यांच्या मान्यतेने अत्यावश्यक नसलेल्या कामांसाठी तसेच नागरिकांच्या चलनवलनास प्रतिबंध घालू शकतील.


राज्यभरात निर्बंध कायम असलेल्या कृती -

  • शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक आणि कोचिंग संस्था बंद राहतील. ऑनलाईन शिक्षणाला संमती असेल व त्यास प्रोत्साहन दिले जाईल.
  • चित्रपटगृहे, स्विमिंग पूल, करमणुक केंद्रे, थिएटर्स (मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सेसमधील थिएटर्ससह), बार, सभागृहे, असेंब्ली हॉल्स आणि यासारखी ठिकाणे बंद राहतील.
  • केंद्रीय गृह विभागाने संमती दिलेली वगळून प्रवाशांची इतर आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक बंद राहील.
  • मेट्रो रेल्वे बंद राहतील.
  • सामाजिक, राजकीय, क्रिडाविषयक, करमणूकविषयक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आणि इतर मोठे सभा, समारंभ बंद राहतील.

 

  • या आदेशापूर्वी संमती देण्यात आलेली सर्व अत्यावश्यक दुकाने खुली राहतील.

२ सप्टेंबर २०२० पासून पुढील कृतींना संमती देण्यात येत आहे.

  • यापुर्वी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांमधील शिथिलता आणि मार्गदर्शिकेनुसार अत्यावश्यक नसलेल्या सेवांची दुकाने सुरु राहतील. मद्याची दुकाने सुरु राहतील.
  • हॉटेल (उपहारगृहे )आणि लॉज (निवासगृहे) यांना १०० टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी देण्यात येत आहे. यासाठी घ्यावयाच्या आवश्यक दक्षतांबाबत स्वतंत्र कार्यप्रणाली (स्टँडर्ड ओपरेटिंग प्रोसिजर) जारी करण्यात येईल.
  • सर्व राज्य सरकारी कार्यालये (अत्यावश्यक सेवा, आरोग्य आणि वैद्यकीय, कोषागारे, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, एनआयसी, अन्न आणि नागरी पुरवठा, एफसीआय, एनवायके, महापालिका सेवा यांना वगळून) पुढील प्रमाणे सुरु राहतील.
  • संपूर्ण महाराष्ट्रासाठी अ व ब गटातील अधिकाऱ्यांची यापुढे १०० टक्के उपस्थिती राहील.
  • इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती पुढील प्रमाणे राहील -
  • मुंबईसह महानगर क्षेत्रातील महापालिका, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि वेळोवेळी सूचित करण्यात आलेल्या इतर महापालिका क्षेत्रातील शासकीय कार्यालयांमध्ये ३० टक्के कर्मचारी किंवा किमान ३० कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितकी उपस्थिती राहील.
  • उर्वरित महाराष्ट्रातील शासकीय कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचारी किंवा किमान ५० कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितकी उपस्थिती राहील.
  • प्रत्येक कार्यालयाच्या सर्व प्रवेशद्वारांवर तसेच बाहेर पडण्याच्या दरवाज्याजवळ थर्मल स्कॅनिंग (शरीराचे तापमान मोजणे), हात धुणे आणि सॅनिटायझरची व्यवस्था करावी. कर्मचाऱ्यांना मास्क उपलब्ध करुन देण्यात यावेत.
  • खाजगी कार्यालयांमध्ये गरजेनुसार ३० टक्के कर्मचारी उपस्थित राहू शकतील.
  • शासकीय तसेच खाजगी कार्यालयात निरीक्षण अधिकारी (व्हिजिलंट ऑफिसर)ची नियुक्ती करणे आवश्यक करण्यात आले असून हा अधिकारी सॅनिटायझेशन, शारीरिक अंतर आणि इतर सुरक्षाविषयक उपयायोजनांकडे लक्ष पुरवेल.
  • आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक व मालवाहतुकीसाठी कोणतेही निर्बंध राहणार नाहीत. वेगवेगळ्या व्यापारी करारानुसार शेजारी राष्ट्रांमधून मालवाहतूक व प्रवासी वाहतुकीसाठी निर्बंध राहणार नाहीत. शिवाय वाहन किंवा प्रवास करणाऱ्या व्यक्तिंना ई – परमीट / संमती / स्वतंत्र परवानगीची गरज भासणार नाही.
  • खाजगी बस / मिनी बस आणि इतर साधनांमधून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात येत आहे. यासाठी स्वतंत्र कार्यप्रणाली (स्टँडर्ड ओपरेटिंग प्रोसिजर) परिवहन आयुक्त यांच्याकडून जारी करण्यात येईल.
  • कोणत्याही निर्बंधाशिवाय आऊटडोर किंवा खुल्या जागेमध्ये व्यायाम आदी कार्ये करता येतील.
  • सार्वजनिक आणि खाजगी वाहनांमध्ये पुढीलप्रमाणे संमती देण्यात येत आहे. टॅक्सी, कॅब, ॲग्रीगेटर यांना फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक ३ या प्रवासी क्षमतेनुसार, रिक्षा फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक २ या प्रवासी क्षमतेनुसार, चारचाकी वाहनामध्ये फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक ३ या प्रवासी क्षमतेनुसार तर दुचाकीसाठी १ अधिक १ प्रवासी क्षमतेनुसार (हेल्मेट आणि मास्कसह) चालवण्याची परवानगी राहील. वाहनांमध्ये मास्क परिधान करणे अनिवार्य राहील.
  • ६५ वर्षावरिल ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ति, गरोदर महिला आणि १० वर्षाखालील मुलांना अत्यावश्यक बाब किंवा आरोग्यविषयक बाबीसाठी बाहेर पडण्याशिवाय इतर वेळी घरीच राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
  • मास्क परिधान करणे, सामाजिक अंतर राखणे आणि स्वच्छतेविषयक काळजी घेणे आदी आवश्यक खबरदारीसह अत्यावश्यक नसलेल्या बाबींसाठीही व्यक्ती प्रवास करु शकतात.
  • परदेशी नागरिकांसाठी पारगमन (ट्रांझीट) व्यवस्था, कामगारांची वाहतूक, इंडियन सी-फेअर्सचे साईन ऑन आणि साईन ऑफ, अडकलेले मजूर, यात्री, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर व्यक्तिंची वाहतूक, देशाबाहेर अडकलेले भारतीय नागरीक, रेल्वेद्वारे प्रवासी वाहतूक, रेल्वेने राज्यात येणाऱ्या प्रवाशांची वाहतूक, कार्यालये, कामाची ठिकाणी, कारखाने आणि आस्थापना यामध्ये सामाजिक अंतर, हॉटेल आणि लॉजेसचे कार्यान्वयन, राज्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची हाताळणी, राज्यात येणाऱ्या देशांतर्गत प्रवाशांची हाताळणी, लग्न समारंभ, केशकर्तनालये, सलून्स, ब्युटी पार्लर्स, एसटी बसेसची वाहतूक आदींबाबत राज्य किंवा केंद्र शासनामार्फत लागू करण्यात आलेल्या कार्यप्रणालीस (स्टँडर्ड ओपरेटिंग प्रोसिजर) अनुसरुन या बाबी सुरु राहतील.
  • यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या इतर कृती सुरु राहतील.
  • नियमावली व कार्यप्रणालीचा (स्टँडर्ड ओपरेटिंग प्रोसिजर) अवलंब करुन प्रतिबंधित राहिलेल्या बाबी टप्प्याटप्याने सुरु केल्या जातील किंवा निर्बंध उठवले जातील.