Sunday, December 13, 2020

लै बोलायचंय तुमच्याशी साहेब.. ईडीवर चाल करून जाणारा वाघ बघून, तुमच्या जिगरबाज वृत्तिकडे बघून आम्हाला शंभर हत्तीचं बळ मिळत.. - प्रसिद्ध अभिनेते, लेखक किरण माने यांचा खास लेख...

 


लै बोलायचंय तुमच्याशी साहेब.. लै बोलायचंय.. कुठून सुरूवात करू? 'राजकारणा'च्या पलीकडं जाऊन तुमच्यासारख्या 'स्माॅल टाऊन' शेतकरीपुत्राच्या संघर्षाबद्दल - प्रेरणादायक प्रवासाबद्दल लै कमी लोक बोलतात... 


...माझ्यासारख्या छोट्या माणसाच्या आयुष्यातही असं घडतं साहेब... आपण मोठी केलेली, जवळची माणसं विश्वासघात करतात..सोडून जातात.. ओळखही देत नाहीत.. एकटं पडल्यासारखं वाटतं.. उदासीनं मन घेरलं जातं.. अशावेळी मी डोळे बंद करतो आणि तुम्ही अशा गोष्टींवर अनेकदा केलेली मात आठवतो..! 




...आयुष्यात कित्येकदा खचवणारे अनेक क्षण येतात, तेव्हा मी अशा प्रसंगांमधला तुमचा शांत हसरा चेहरा आठवतो... 





तुमच्याकडं - तुमच्या जिगरबाज वृत्तीकडं पाहून शंभर हत्तींचं बळ मिळतं... 




अभिनेता बनण्याचं स्वप्न घेऊन मायणीतून सातार्‍यात आणि सातार्‍यातून मुंबईसारख्या महानगरीत आलेल्या किरण माने नांवाच्या साध्या घरातल्या पोराला आयुष्यात जेव्हा रक्ताचं पाणी करावं लागलं.. अभिनयसाधना करण्यात प्रामाणिकपणे प्रचंड कष्ट घेऊनही विनाकारण अपमान - अवहेलना - रिजेक्शन - खोटे आरोप - बदनामीचे प्रयत्न - जातवर्चस्ववादी लोकांनी ठरवून 'टारगेट' करणं... अशा सगळ्यांमधून जावं लागलं, तेव्हा 'तू टिकून रहा. झगडत रहा. काम करत रहा. स्वत:ला घडवत रहा.. काळ तुला तुझा आत्मसन्मान परत मिळवून देणारच.' हा विश्वास मिळाला तो तुमच्याकडे पाहूनच !!! 




आज सगळीकडेच सुमारांची सद्दी आहे. आमच्या अभिनयक्षेत्रातही आपल्या आसपासची उथळ - थिल्लर - थर्ड क्लास माणसं अचानक रातोरात 'स्टार' वगैरे होताना पहातो.. पायचाटूगिरी करुन चांगल्या भुमिका मिळवून त्यांची माती करताना पहातो. तेव्हा अशा प्रसंगी राजकारणातही असे 'सुमार - थिल्लर - बोलबच्चन' लोक मोठे होत असताना तुम्ही बाळगलेला संयम - बोलण्याचा वागण्याचा टिकवून ठेवलेला दर्जा - आणि वेळ येताच शांतपणे उरकलेले 'कार्यक्रम'... हे सगळं मी आठवतो. हे निव्वळ अफलातून आहे ! सगळ्या क्षेत्रातल्या 'प्रतिभावानांनी' यातून खूप काही शिकण्यासारखं आहे.




राजकारण वगैरे बाजूला ठेवून फक्त 'माणूस' म्हणून मी तुमचा संघर्ष पहातो साहेब.. काटेवाडीतल्या एका शेतकर्‍याचा पोरगा जर सगळ्या विपरीत परीस्थितीवर एकहाती मात करून जग जिंकू शकतो.. ज्याला पहिली आमदारकी मिळवताना स्वपक्षातल्या प्रस्थापितांनी वाळीत टाकला, तो आज कोट्यावधी रयतेच्या मनावर राज्य करणारा स्वयंभू 'राजा' होऊ शकतो, ही गोष्टच लै लै लै प्रेरणा देणारी आहे !!!




तुमच्यावर 'आरोप' खूप झाले. आमचाही कधीकधी त्या आरोपांवर विश्वास बसायचा. पण ते आरोप पुराव्यांनिशी 'सिद्ध' करणारा एकही 'माईचा लाल' पैदा झाला नाही ! तुमच्या विरोधातल्या शक्ती आज बलाढ्य आहेत - महाभयंकर आहेत. पण तुम्हाला 'नख'ही लावण्याची छाती नाही कुणाची !! ईडीवर चाल करून जाणारा वाघ बघून आम्हाला जी ताकद मिळालीय ती अवर्णनीय आहे !!!




तुमच्यावर विनाकारण टीका करणारे लोक तुम्हाला पंतप्रधानपद मिळू शकलं नाही म्हणून टवाळी करतात... त्यांना कदाचित माहिती नसावं की 'खर्‍याखुर्‍या' महान व्यक्ती अशा पदाच्या आणि सन्मानाच्या मोहताज नसतात. जगातला सर्वात श्रेष्ठ अभिनेता - ज्याच्या नखाचीही सर कुणाला येऊ शकणार नाही अशा चॅर्ली चॅप्लीनला संपूर्ण कारकिर्दीत अभिनयासाठी एकही 'ऑस्कर' ॲवाॅर्ड मिळालं नाही... क्रिकेटचा 'देव' सचिन तेंडूलकर भारताचा 'कॅप्टन' म्हणून अपयशी ठरला... म्हणून त्यांचं 'माहात्त्म्य' कमी होत नाही...उलट ते त्या पदापेक्षा-पुरस्कारापेक्षा उंच झालेले असतात.. तसंच आज तुमच्यापुढं देशातली सगळी पदं कमरेत झुकलेली आहेत.. खुजी झालेली आहेत ! ..आणि सर्वसामान्य जनतेच्या काळजात तुम्ही मिळवलेलं पद तर आज हयात असलेल्या कुठल्याच नेत्याला, कधीच मिळवता येऊ शकणार नाही !!!






सलाम साहेब... तुम्ही सदैव आमच्यासोबत आहात याबद्दल खूप खूप आभार आणि वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा ! :


लेखक - महाराष्ट्राचे प्रसिद्ध अभिनेते,  सृजनशील लेखक किरण माने.





2 comments:

  1. Very nice kiran mane sir🙏🙏🙏

    ReplyDelete
  2. आदरणीय साहेबांचा प्रेरणादायी प्रवास आणि त्यांचं राजकारणातील स्थान अतिशय चांगल्या पद्धतीने मांडले आहे. राजकारणातली सर्व पदे साहेबांनी आपल्या कर्तृत्वाने खुजी केलेली आहेत. यासंदर्भात आपण अतिशय मार्मिक उल्लेख केला आहे. त्याबद्दल आपले अभिनंदन !!!!

    ReplyDelete