वरील छायाचित्रात दिसणारे आहेत, अशोक तोंडारे.. राहतात उदगीरला.. प्रेस फोटोग्राफर म्हणून आयुष्यभर वृत्तपत्रांना फोटो पाठविण्याचा उद्योग केला.. झपाटल्यासारखे काम करताना तोंडारे यांनी उद्याची कधी चिंता केली नाही.. परिणामतः व्हायचं तेच झालं.. उत्तर आयुष्यात जगायची मारामार.. सरकारची सन्मान योजना तोंडारे पर्यंत पोहोचण्याचा प्रश्नच नाही..
आयुष्यभर जगाच्या उठाठेवी करणारे, समाजातील व्यंगावर कॅमेरयाच्या माध्यमातून प्रहार करणारया तोडांरे यांची अवस्था पाहवत नाही.. मायबाप सरकार काही करीत नाही,. काल पर्यत वेगवेगळ्या पोझेस देत "काढ रे फोटो" म्हणून सांगणारया पुढारयांनी त्यांच्याकडे कानाडोळा केला.. आणि समाज? पत्रकारांकडून लाख अपेक्षा ठेवणारा समाजही त्यांची साधी चौकशी करायला आला नाही..
अशा एकाकी स्थितीत असलेल्या तोंडारे यांच्या मदतीसाठी उदगीरमधील पत्रकार धावून आले.. त्यांनी एक ग्राइंडर विकत घेतला.. त्यांच्या घरी नेऊन त्यांना दिला.. अपेक्षा अशी.. लोकांच्या हळद, मिरच्या कांडून त्यांना उपजिविका करता यावी.. सगळे पत्रकार यासाठी त्यांच्या घरी यासाठी गेले की तोंडारे कोणत्या स्थितीत जगताहेत याचा प्रत्यय सर्व पत्रकारांना आला पाहिजे.. पत्रकारांनी दिलेल्या भेटीनं तोंडारे कुटुंबिय "आत्मनिर्भर" होईल की नाही माहिती नाही.. पण आपण एकाकी नाही, आपले पत्रकार मित्र आपल्या पाठिशी आहेत याची तोंडारे कुटुंबियांना नक्कीच जाणीव झाली असेल.. मला वाटतं ही जाणीव त्यांना जगण्याचं बळ आणि नवी उमेद देणारी आहे..
विडंबना अशी की, अशोक तोंडारे यांना आख्ख उदगीर टाटा म्हणून ओळखते.. त्यांना टाटा हे नाव कोणी आणि का ठेवलं असेल माहिती नाही पण या टाटांची झालेली अवस्था तमाम पत्रकार आणि छायाचित्रकारांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे..
उदगीरच्या पत्रकारांनी आपल्या एका पत्रकार बांधवाची व्यथा ओळखून त्यांना जो मदतीचा हात आणि मायेची ऊब दिली त्याबद्दल उदगीरकर पत्रकार मित्रांना मनापासून धन्यवाद..
लेखक - महाराष्ट्राचे जेष्ठ पत्रकार, मराठी पत्रकार परिषद मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख.
No comments:
Post a Comment