Monday, January 4, 2021

कराडच्या जनतेच्या मनावर राज्य करणारा लोकनेता, माणसं उभी करणारा नेता विलासकाका पाटील उंडाळकर - जेष्ठ पत्रकार विजय चोरमारे; लोकनेते विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या राजकीय, सामाजिक कारकीर्दीवर प्रकाश टाकणारा विशेष लेख...

 

माणसं उभी करणारा नेता...                                                         

                                                                             विलासकाका पाटील यांना मी पहिल्यांदा पाहिलं, ते १९७९ साली. कराड लोकसभा मतदार संघातून ते अर्स काँग्रेसच्यावतीनं निवडणूक लढवत होते. त्यांच्याविरोधात यशवंतराव मोहिते काँग्रेस आयचे उमेदवार होते. विलासकाकांची पोस्टर्स आमच्या चरण, आरळा भागात मोठ्या प्रमाणावर लागली होती. या निवडणुकीच्या काळात एकदा विलासकाकांच्या प्रचारासाठी यशवंतराव चव्हाण यांची आरळा येथे सभा होती. आम्ही हायस्कूलमध्ये होतो. आरळ्याकडे जाताना आमच्या गावात गाडी आल्यावर गावाच्या वेशीवर यशवंतराव चव्हाण गाडीतून उतरले. स्वातंत्र्यलढ्यातले त्यांचे मित्र बाबूरावदादा चरणकर त्यांच्या स्वागताला थांबले होते. यशवंतरावांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा आम्ही शाळकरी मुलं-मुली थांबलो होतो. गावाच्या वेशीपासून मुख्य रस्त्यानं यशवंतराव आणि बाबूरावदादा आपुलकीनं गप्पा मारत जाताना आम्ही पाहिलं. सोबत विलासकाकाही होते. विलासकाकांना मी पहिल्यांदा पाहिलं त्यावेळी. अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व होतं त्यांचं. पोस्टरवर फोटो होता तसेच रुबाबदार दिसत होते.





यशवंतराव चव्हाण आणि बाकीची मंडळी गाडीत बसून पुढं निघून गेली. बाबूरावदादा परत आपल्या घरी आले. आरळ्याच्या त्या सभेसाठी गावातून एक ट्रक निघाला होता. आम्ही बरीचशी शाळकरी मुलं त्या ट्रकमध्ये चढलो आणि सभेला गेलो. सभा ऐकण्यापेक्षा ट्रकमध्ये बसण्याचं त्यावेळी अप्रूप होतं.


त्या सभेत विलासकाकांचं भाषण ऐकलं. फारसं प्रभावी वक्तृत्व नव्हतं. नवखा उमेदवार बोलतो तसं थोडंसं बोलले. निवडून देण्याचं आवाहन करून जागेवर बसले.


यशवंतरावांचं भाषण ऐकण्याचा योग त्यावेळी आला. तो पहिला आणि एकमेव योग. राजकीय भाषणातलं फारसं काही कळण्याचं वय नव्हतं. त्यावेळी शिवाजीराव देशमुख आमच्या मतदारसंघाचे म्हणजे शिराळ्याचे आमदार होते. ते अपक्ष असले तरी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारात होते. यशवंतरांवांनी त्यांचा उल्लेख केला आणि म्हणाले, 'शिवाजीराव देशमुख म्हणतात, शिराळा मतदारसंघ माझ्या खिशात आहे. परंतु आम्ही असं म्हणत नाही. मी म्हणतो, की माझा सातारा मतदारसंघ माझ्या हृदयात आहे.'




यशवंतरावांच्या भाषणातलं लक्षात राहिलेलं हे एवढंच वाक्य.


विलासकाका त्या निवडणुकीत पराभूत झाले. यशवंतराव मोहिते निवडून आले.


दहावीनंतर एक वर्षं कराडला कॉलेजला असताना वर्षभर उंडाळे गावावरून येत-जात होतो. त्यावेळी एक-दोनदा विलासकाका रस्त्याकडेला कुणाशीतरी बोलताना किंवा कार्यकर्त्यांच्या घोळक्यात दिसले होते. कराडला असताना स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकरांच्या आठवणी निमित्ता निमित्ताने कुणाकुणाकडून ऐकायला मिळायच्या. विलासकाकांचं नाव त्यात निघायचं. तेवढंच. हे १९८३ सालचं. नंतर विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांचं नाव कानावर पडायचं.





पत्रकारितेत आल्यानंतर राजकीय विषयावर लिहू लागलो. 2004मध्ये एकदा विलासकाका आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात काही कारणावरून मोठा वाद रंगला होता. बरंच उलट-सुलट छापून येत होतं. त्या वादाच्या निमित्तानं मी लोकमतमध्ये वार्तापत्र लिहिलं होतं. त्या वार्तापत्रानंतर तो वाद थांबल्याचं मला नंतर कराड-साता-याच्या च्या काही पत्रकार मित्रांनी सांगितलं.





किसनराव बाणखेले खेडमधून खासदार झाले तेव्हा त्यांच्या लोकसंपर्काची चर्चा सुरू होती. बारशापासून बाराव्यापर्यंत कार्यक्रमांना उपस्थित राहून लोकसंपर्क ठेवणारा नेता अशी त्यांची ख्याती होती. त्याच अनुषंगानं वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्या लोकसंपर्काचा विषय निघाला. राज्याचे नेते असूनही गावागावातल्या सामान्य कार्यकर्त्यांना नावानं हाक मारणारे हे दुर्मीळ नेते होत. राजकीय नेत्यांचा असा लोकसंपर्क कमी झाल्याचा विषय निघाला असताना कुणीतरी माहितीत भर घातली, की विलासकाका पाटील हे अशापैकीच एक आहेत. त्यांचाही लोकसंपर्क दांडगा आहे. नंतर आणखी काही लोकांकडून माहिती घेतल्यावर ही माहिती खरी असल्याचं लक्षात आलं. लोकसंपर्क आणि लोकांचं प्रेम हेच विलासकाकांचं भांडवल आहे. विलासकाकांना निवडणुकीसाठी कधी पैसे वाटावे लागले नाहीत किंवा जेवणावळी घालाव्या लागल्या नाहीत. परंतु मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांच्या आनंदाच्या किंवा दुःखाच्या प्रसंगी विलासकाका सोबत असतात. त्यामुळं कार्यकर्त्यांना ते घरातली वडिलधारी व्यक्ती असल्यासारखे वाटतात. असे अनेक कार्यकर्ते मला भेटले आहेत, जे विलासकाकांवर वडिलांसारखं प्रेम करतात. विलासकाकांनी हा सगळा गोतावळा मायेने जोडलेला आहे. त्याच बळावर आणि भांडवलावर त्यांनी कराड दक्षिण मतदारसंघातून सलग सातवेळा निवडणूक जिंकली.




मोबाईल हा राजकीय नेत्यांचा जीव की प्राण मानला जातो, परंतु मोबाइल न वापरणारा त्यांच्यासारखा नेताही आजच्या काळात दुर्मीळ म्हणावा लागेल. मोबाइलवरच्या कृत्रिम संपर्काशिवाय कार्यकर्त्यांशी 'हार्ट टू हार्ट' संपर्क ठेवणारा नेता, म्हणून मला विलासकाकांचं नेहमीच कौतुक वाटत आलंय.




राजकीय नेत्यांच्या शिक्षणसंस्था आणि तेथील शिक्षक भरती हा सगळीकडं भलताच गुंतागुंतीचा प्रकार असतो. शिक्षकांच्या नेमणुकीमध्ये जे काही होत असतं ते सामान्य माणसाच्या आकलनापलीकडचं असतं. विलासकाकांच्या शिक्षणसंस्थेमध्ये शिक्षक भरतीची पद्धत ऐकून मी चकित झालो. शिक्षक भरतीमध्ये शिक्षणसंस्थेचा प्रमुख अजिबात लक्ष घालत नाही, हे कुणाला पटणार नाही. पण ती वस्तुस्थिती आहे. शिक्षक नेमणुकीसाठी शिक्षकांचीच एक कमिटी नेमली जाते आणि ही कमिटी चांगल्या शिक्षकाची निवड करीत असते. त्यांच्याकडून होईल ती निवड अंतिम. उंडाळ्यासारख्या विकासाच्या मार्गावरच्या खेड्यात शिक्षक गुणवंत असले तर चांगले विद्यार्थी घडतील, ही त्यामागची त्यांची धारणा. शिक्षक भरतीचे बाहेरचे दर डोळे फिरवणारे आहेत. शिक्षक भरतीतून संस्थेला म्हणजेच त्यांना लाखो रुपये कमावता येऊ शकले असते. परंतु भ्रष्टाचाराचा पैसा घ्यायचा नाही, असाही त्यामागचा दुसरा दृष्टीकोन दिसून येतो. भ्रष्ट मार्गानं पैसे देऊन नोकरी मिळवलेल्या किंवा राजकीय हितसंबंधातून भरती झालेल्या वशिल्याच्या तट्टांमुळं भावी पिढ्यांचं नुकसान होईल, म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक तो मार्ग टाळला. शिक्षकांची भरती गुणवत्तेवर आणि कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय केली. शिक्षणाबद्दलचा असा निर्मळ दृष्टीकोन आणि आपल्या गावातल्या सामान्य कुटुंबातल्या पोरांच्या भविष्याविषयीची अशी तळमळ अपवादात्मक म्हणावी लागेल.




राजकीय नेते विकासकामं करीत असतात. परंतु विकासकामातल्या कमिशनच्या टक्केवारीवर हा व्यवहार चाललेला असतो. विलासकाकांनी असला व्यवहार कधी केला नाही, असं त्यांचे जवळचे लोक सांगतात. अर्थात ते पटतंही. त्यांनी आपल्या मतदारसंघात जी तलावांची साखळी निर्माण केली आहे, ती त्यांच्या विकासाच्या दृष्टीचं दर्शन घडवते. तलावांच्या या साखळीमुळं ख-या अर्थानं देशातला पहिला नदीजोड प्रकल्प साकार झाला आहे. कृष्णा आणि वारणेचा संगम सांगलीजवळ हरिपूरला होतो. परंतु वाकुर्डे बुद्रुक योजद्वारे विलासकाकांच्या मतदारसंघातल्या तलावांच्या साखळीमुळं हा वारणा-कृष्णेचा संगम त्याआधीच घडवण्यात यश आलंय. विकासाची दृष्टी आणि आपल्या लोकांच्या नेमक्या गरजा ओळखून त्यांनी कामं केली.




विलासकाका पाटील हे मूळचे यशवंतराव चव्हाण यांचे निष्ठावंत. त्यांनी १९७९ साली ‘अर्स काँग्रेस’कडून कराड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती, याचा उल्लेख वर आलाच आहे. या निवडणुनकीनंतर विलासकाकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. स्थानिक राजकीय संदर्भ विचारात घेऊन प्रेमलाकाकी चव्हाण यांनी विधानसभेसाठी त्यांची शिफारस केली. त्यांना उमेदवारी मिळाली आणि ते निवडूनही आले. वसंतदादा पाटील आपल्याला मंत्रिपद देतील अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र प्रेमलाकाकींनी त्यांच्या नावाला विरोध करून विधानपरिषदेचे सदस्य असलेल्या भास्करराव शिंदे यांची मंत्रिपदासाठी शिफारस केली, परंतु वसंतदादांनी ते मान्य केलं नाही. पृथ्वीराज चव्हाण यांचे घराणे आणि विलासकाका पाटील यांच्यातील संबंध बिघडण्यास सुरुवात झाली ती तिथूनच. त्यात पुढे कुठल्याही टप्प्यावर सौहार्द निर्माण होऊ शकलं नाही. प्रेमलाकाकींच्या नंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्याशीही त्यांचं जमलं नाही किंबहुना एकाच पक्षात राहून दोघं सतत परस्परविरोधी काम करीत राहिले. नंतरच्या प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत हा विरोध ठळक होत गेला.




राजकीय पटावर पाहिलं तर दोघं दोन टोकांवर. पृथ्वीराज चव्हाण यांचं दिल्लीत वजन आहे, परंतु स्थानिक राजकारणात त्यांची ताकद नाही. याउलट विलासकाकांचा स्थानिक पातळीवरचा जनसंपर्क दांडगा, पाया भक्कम. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधामुळे त्यांच्या पुढच्या सगळ्या वाटा अडवल्या गेल्या. सातवेळा आमदार झालेल्या नेत्याचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत यायला हवं होतं. परंतु त्यांना नंतरच्या काळात साधं मंत्रिपद मिळालं नाही, यावरून त्याची कल्पना येऊ शकते. काँग्रेस पक्षाच्या करंटेपणाचंही दर्शन त्यातून घडतं. कराड तालुका, सातारा जिल्हा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्यादृष्टीनंही हा संघर्ष दुर्दैवी म्हणावा लागेल. माझ्यासारख्याला सतत वाटत आलं की, हा संघर्ष मिटायला पाहिजे. त्यातच या दोन्ही नेत्यांचं भलं आहे. दोघांना परस्परांची ताकद मिळाली तर त्यातून काँग्रेसला ताकद मिळेल. आणि महत्त्वाचं म्हणजे दोन्ही नेते सत्तेत राहून कराड-साता-यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी भरीव काम करतील. परंतु ते घडू शकलं नाही. विलासकाकांनी कोणत्याही टप्प्यावर तडजोड केली नाही. सत्तेच्या प्रलोभनाला बळी पडले नाहीत किंवा सत्तेच्या ताकदीपुढं झुकलेही नाहीत. त्यासाठी त्यांना कौटुंबिक पातळीवर जबर किंमत चुकवावी लागली. खूप सोसावं लागलं. एखादा ऐरागैरा असता तर या संघर्षात मोडून पडला असता. परंतु विलासकाका डगमगले नाहीत.




दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचं साहित्य संमेलन यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त आम्ही कराडला घ्यायचं ठरवलं. त्यासंदर्भात काकांशी एकदा चर्चा करीत असताना त्यांनी सल्ला दिला की, संमेलन बाहेर कुठं मैदानावर मंडप घालून वगैरे घेऊ नका. वेणुताई चव्हाण सभागृहातच घ्या. कारण लोकांची मानसिकता फार बदललीय. चांगलं काही ऐकायची मानसिकता राहिलेली नाही. लोक नाचगाणं बघायला जातील, पण चांगले विचार ऐकायला येत नाहीत, असं मी अलीकडं अनुभवतोय.


त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही संमेलन सभागृहात घेतलं. संमेलनादिवशीच त्यांची गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासोबत महत्त्वाची बैठक होती. त्यांच्या कौटुंबिक प्रश्नासंदर्भानं ही महत्त्वाची बैठक होती, तरीही विलासकाका संमेलनाला उपस्थित राहिले. येणं शक्य नसताना ते आले आणि थोडावेळ थांबले. त्यातून त्यांची कमिटमेंट दिसून आली. अशी कमिटमेंट फार कमी लोकांकडे दिसते, राजकारणात तर फारच कमी.




राजकारणाला समाजकारणाची जोड असली पाहिजे, असं नुसतं बोललं जातं. यशवंतराव चव्हाणांचे शिष्य असलेल्या विलासकाकांनी मात्र आपल्या राजकीय वाटचालीला समाजकारणाची भक्कम जोड दिली. उंडाळे येथे दरवर्षी स्वातंत्र्यसैनिक मेळावा आणि समाजप्रबोधन साहित्य संमेलन घेतात. स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्यसैनिक यांच्याप्रती एवढा जिव्हाळा मी अन्य कुणाकडं पाहिला नाही. त्यानिमित्तानं देशपातळीवरचे मोठमोठे विचारवंत आणि नामवंत साहित्यिक उंडाळे येथे येऊन गेले आहेत. मेळाव्यासाठी आलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची ते किती आस्थेनं काळजी घेतात हे मी प्रत्यक्ष पाहिलं आहे.




आजचं माणसाचं एकूण जगणंच बदललंय. राजकारणही बदललंय. रोज नवे चेहरे होर्डिंगवर उगवत असतात. वेगवेगळ्या माध्यमातून नवश्रीमंत वर्ग तयार होतोय. यातल्या अनेकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना धुमारे फुटतात. त्यातले काहीजण राजकारणात टिकतात. काहीजण चव चाखून बाहेर पडतात. नव्या राजकारणात कार्यकर्त्यांना उभं करण्याऐवजी त्यांना मिंधे करण्यावर भर दिला जातो. विलासकाका अशा राजकारणापासून दूर राहिले. त्यांनी माणसं जपली. कार्यकर्ते जपले. माणसं उभी केली. पण मिंधं करून दावणीला बांधण्याच्या वाटेला गेले नाहीत. लोकांच्या मनात घर केल्यामुळंच ते सलग सातवेळा निवडून आले. आठव्या वेळी पराभूत झाले त्याची कारणं वेगळी आहेत. मतदारसंघ बदललेला होता. विरोधात साक्षात मुख्यमंत्री होते. त्यांच्याकडं पक्षाचं चिन्ह नव्हतं. विरोधी उमेदवारांकडं असलेली पैशाची ताकद नव्हती. या सा-याचा परिपाक त्यांच्या पराभवात झाला. खरंतर त्यांच्यासारख्या राजकारण्याचं मूल्यमापन निवडणुकीतल्या जय-पराजयांवरून करणं योग्य ठरत नाही. त्यांच्यासारखे लोकांच्या मनात घर करणारे राजकीय नेते दुर्मीळ असतात. त्याअर्थानं कराड दक्षिण मतदारसंघातली जनता खूप भाग्यवान म्हणायला हवी. विलासकाकांच्या  राजकीय कारकीर्दीचा सुवर्णमहोत्सव अलीकडेच झाला होता. शिवाय पृथ्वीराज  चव्हाण यांच्याशी असलेले मतभेदही कृष्णार्पण झाले होते. अशा वेळी त्यांच्या जाण्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणाचं मोठं नुकसान झालं आहे!


लेखक - महाराष्ट्राचे जेष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक  विजय चोरमारे. 


(लेख सौजन्य - जेष्ठ पत्रकार विजय चोरमारे; फेसबुकवरून साभार)



No comments:

Post a Comment