"मराठा समाजातील तरुणाई बुद्धिमत्ता, कौशल्य, कठोर परिश्रमाने, एकजुटीने यशाची नवी शिखरे गाठतील"
मी मराठा आरक्षणाचा पूर्ण समर्थक आहे. आपण सर्वांनी मराठा आरक्षणाच्या कायदेशीर लढाईसाठी एकजुटीने लढले पाहिजे. त्याच वेळी, आपण मराठा समाजातील काही महत्वाच्या गोष्टींचा विचार गांभीर्याने केला पाहिजे अश्या काही गोष्टींवर मी प्रकाश टाकू इच्छितो.
१) आरक्षणाचा लाभ मिळवून सरकारी नोकरी मिळेल अशा सरकारी क्षेत्रात पाच टक्क्याहून कमी रोजगाराची संधी आहे. पण सर्वात जास्त नोकरीची संधी खासगी उद्योग क्षेत्रांमध्ये आहे. जिथे फक्त बुद्धिमत्ता आणि कौशल्येच काम करतील. म्हणूनच आम्ही आमची कौशल्य विकसित करून आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट पारंगत झाले पाहिजे. उद्योगात आवश्यक असलेले आपले कौशल्य व तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. वित्त, व्यवस्थापन, औषध उत्पादन, सोने - चांदी दागिन्याचा व्यवसाय , वाहतूक,आयात निर्यात अशा अनेक अग्रगण्य उद्योगांमध्ये कार्यरत राहण्याचे आपल्या मराठा समाजातील लोकांचे प्रमाण कमी आहे. मराठा समाजाने अशा सर्वच महत्वाच्या व्यावसायिक क्षेत्रात चमकण्यासाठी मोठे काम केले पाहिजे.
2)आपण सर्वांनी कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा, अलौकिक बुद्धिमत्तेची, अनमोल ज्ञानाची उपासना केली पाहिजे. आपला समाज राजकारणामध्ये मोठया प्रमाणावर अग्रेसर आहे पण संशोधन आणि नाविन्यपूर्ण उद्योग, शैक्षणिक क्षेत्र, वेगवेगळ्या महत्वाच्या उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रात आपला समाज फार कमी प्रमाणावर आहे.
3) एक योद्धा म्हणून आपण गरीबी, निरक्षरता, सामाजिक अन्याया विरोधात लढले पाहिजे. पण बहुतेक वेळा आपण इतर मराठा कुटुंबांशी लढतो.
4) काही लोक नेहमीच आपल्या शीघ्रकोपी स्वभावाचा फायदा घेत असतात. तथ्ये व वास्तविकता जाणून न घेता आमचे तरुण रस्त्यावर आणि सोशल मीडियावर राजकीय लढाईत, वादविवादात गुंतलेले आहेत. आपल्या आदर्श व्यक्तिमत्वांबद्दल, रोल मॉडेलबद्दल तरुणाई पूर्णपणे संभ्रमित आहे. सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी तो चांगली वृत्तपत्रे आणि चांगली पुस्तके कधीच वाचत नाही.
5)महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांमधील सर्वाधिक मृत्यू हे मराठा कुटुंबातील आहेत. कुणी या गंभीर विषयाची दखल घेतली आहे का?
6) जर आरक्षण आम्हाला देण्यात आले तर आपण ते आपल्या आर्थिकदृष्ट्या कुमकुवत असलेल्या कुटुंबांना न्याय देणारे ठरेन किंवा दुसर्या उदाहरणाप्रमाणेच ठरावीक श्रीमंत लोकांना लाभ होण्यापेक्षा बहुसंख्य गरिबांना लाभ मिळाला पाहिजे.
मला वाटते की आपण जे सहज करू शकतो ते आपण प्रथम केले पाहिजे.
१)मराठा समाजातील सर्वांनीच एकमेकांना मदत करा, जर हे शक्य नसेल तर आपल्या समाज बांधवांना विरोध करू नका. प्रत्येकाने शिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि आपत्कालीन परिस्थितीत, अडचणीच्या काळात कमीतकमी एका मराठा कुटूंबाला आधार दिला पाहिजे. मदत केली पाहिजे.
२)आपल्या तरुण पिढीला महत्वाची शिकवण द्या की "केवळ अभ्यास आणि कठोर परिश्रम हीच यशाची गुरुकिल्ली आहे." "मराठा समाजातील तरुणाई बुद्धिमत्ता, कौशल्य, कठोर परिश्रमाने,एकजुटीने यशाची नवी शिखरे नक्कीच गाठतील"
3)समाजात एकजुटीने राहणे ही समाजाला प्रगतीच्या शिखरावरती घेऊन जाणारी महत्त्वाची गोष्ट आहे. आपण एकमेकांच्या चांगल्या दिवसांमध्ये एकत्र नसलो तरी कठीण परिस्थितीत मात्र आपण एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.
4)आपल्या समाजासाठी थोडेसे तरी महत्त्वाचे योगदान द्या. वेळ, पैसा, कल्पना, मार्गदर्शन,जी करता येईन ती छोटीशी मदत यापैकी काहीही द्या. अश्या सामाजिक चळवळीची खरी उणीव आहे. समाजातील जे लोक यशस्वी झाले आहेत ते आपल्या समाजापासून लांबच राहतात. अंतर ठेवतात. इतरांकरिता ते खूप कमी वेळ देतात आणि आपले स्वतःचे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी, कोणीही त्यांच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींमध्ये त्याच्या कर्तुत्वाचा उंचीवर पोहोचणार नाही याची ते काळजी घेतात.
5)आपल्या जवळच्या आणि प्रियजनांची झालेली प्रगती मोठ्या मनाने मान्य करून, कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवरती टाका. ग्रामीण भागात खूप वेळा आपल्या माणसाची प्रगती सहन होत नाही ही मोठी चिंताजनक बाब आहे. (आमच्यातला सर्वात मोठा - रोग " बघवत नाही")
6)छत्रपतींच्या कुटुंबानंतर, आपल्या मराठा समाजाला ध्येयवादी, दूरदृष्टीचे चांगले नेतृत्व मिळाले नाही.
7)आम्हाला इतर सर्व जाती, धर्म, संस्कृती याविषयी आदर आणि सहिष्णुता असली पाहिजे. आपले कोणीही शत्रू नाहीत. आपले महान, जाणते राजे, आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही जातीचा आणि धर्माचा द्वेष केला नाही. खरं तर त्यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी इतर जाती व धर्मांची मदत घेऊन आदर्श राज्यकारभार केला. द्वेष माणुसकी संपवते तर सहानुभूती, प्रेम चांगला समाज निर्माण करते. आपल्यापैकी बहुतेक जण सर्व गोष्टींबद्दल नेहमीच वाद घालण्यात व्यस्त असतात, चुकीच्या वादविवादामुळे वैमनस्य निर्माण होते आणि प्रेमाने समजून घेतले की आपुलकी आणि करुणा निर्माण होते.
मित्रांनो आणि सर्व जेष्ठ मंडळींनो, मी फक्त प्रामाणिकपणे महत्त्वाच्या विषयावर व्यक्त झालेलो आहे. मी परिपूर्ण नाही, तरी मी वरील मुद्दे / विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत आहे. आशा आहे की मी कोणास दुखवले नाही. मला कोणाच्याच भावना दुखवायचा नाहीयेत. "माणुसकी, प्रेम, जिव्हाळा, शिक्षण, कौशल्य, ज्ञान, बुद्धिमत्ता, कठोर मेहनत,आपुलकी, सहिष्णुता, यासारख्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या पैलूंनी माणसाचं जगणं समृद्ध होतं.
लेखक : - आरोग्य क्षेत्रात सामाजिक बांधिलकीने विशेष उल्लेखनीय कार्य करून, गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ठसा उमटवणारे, प्रसिद्ध डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर सागर माने.
अतिशय महत्वाच्या बाबी मांडल्यात...
ReplyDeleteमराठा समाज मुळातच अभ्यासू आणि चिकित्सक वृत्तीचा आहे,
फक्त गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची,
आणि ते आपल्याकडून समाजाला वेळोवेळी नक्किच मिळेल हेच आपल्या लेखातुन जाणवत आहे.
आपले मन:पूर्वक अभिनंदन...
आपला,
सचिन शिंदेपाटील
संस्थापक अध्यक्ष- मराठा युवा फाऊंडेशन,महा. प्रदेश