Thursday, February 29, 2024

"डोळ्यांच्या कॅमेऱ्यात क्लिक झालेली वीरची ऐतिहासिक जत्रा! मनाला भिडलेली, माणुसकी समृद्ध करणारी जत्रा"...सामाजिक कार्यकर्त्या प्राजक्ता धुमाळ यांचा महाराष्ट्रातील प्रसिद्ध वीर यात्रेवरील विशेष लेख... वाचा फक्त महाराष्ट्र गर्जना न्यूज पोर्टलवर...


"डोळ्यांच्या कॅमेऱ्यात क्लिक झालेली वीरची ऐतिहासिक जत्रा!  मनाला भिडलेली, माणुसकी समृद्ध करणारी जत्रा"..


जत्रा हा महाराष्ट्राचा एक धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा. अनेक जत्रा महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. त्यातलीच एक म्हणजे वीरची जत्रा! माघ पौर्णिमा जवळ येऊ लागली की महाराष्ट्राला वीरच्या यात्रेचे वेध लागतात. माघ पौर्णिमेच्या दिवशी देवाचं लग्न असतं, आदल्या दिवशी देवाला आणि देवीला हळद लावली जाते. 


स्त्रिया या संधीचा न चुकता आनंद लुटतात. हळद लावण्यासाठी महिलांना थेट मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश असतो. पूर्वी श्रीनाथांच्या गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेश नव्हता. २०१४ पासून अमावस्या सोडून हा प्रवेश स्त्रियांसाठीही खुला करण्यात आला आहे. स्त्रियांना आणि इतर सर्वांनाच नेहमीच सर्व धार्मिक स्थळांमध्ये आणि मंदिरांमध्ये प्रवेश कायम खुला असावा, त्यावर कुणाची मक्तेदारी असू नये असं वाटतं. माणसांच्या श्रध्देची स्थानं जात, धर्म, लिंग, वर्ण, उच्च-नीच, गरीब-श्रीमंत अशा भेदभावांच्या सगळ्या भिंतींपासून मुक्त असावीत.  


माघ पोर्णिमेच्या संध्याकाळपर्यंत सोनवडी, कन्हेरी, वाई, कोडीत, राजेवाडी अशा विविध ठिकाणाहून पालख्या येत असतात. पालख्यांसोबत अनेक भाविक वीरपर्यंत पायी आलेले असतात.. मग बाजारतळावर येऊन कुणी कसंही, कुठंही जागा मिळेल तिथं अंग टाकतं. 


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


आजूबाजूच्या गोंगाटाची, गर्दीची कल्पना असूनही नसल्यासारखी.. कित्येक दिवसात अशी गाढ झोप त्यांना लागलीच नसावी असं वाटतं त्यांना पाहून. अगदी निरागस दृश्यं. हळूहळू चहूबाजूंनी अफाट गर्दी होते आणि पौर्णिमेच्या रात्री श्रीनाथ म्हस्कोबा आणि जोगेश्वरी देवीचं लग्न लागतं.   


देवाचं लग्न लावलं की दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत यात्रा बरीच पांगलेली असते. पुन्हा चतुर्थी-पंचमीपर्यंत यात्रेला नवा रंग येतो, बैलगाड्या येऊ लागतात. पालं बांधली जातात. नव्याने जत्रा भरते. 


"बैलगाड्या जुंपून, मजबूत ताटी बांधून, बैलांना सजवून-धजवून.. रंगरंगोटी करुन, घुंगरमाळा घालून, पायात चाळ चढवून चहुबाजूंनी बैलजोड्या खुळूखुळू तालावर वीरची वाट धरतात. तट्ट्या तर इतका सुरेख, व्यवस्थित बांधलेला असतो की पाहत राहावं! बैलगाड्या हे वीरच्या यात्रेतलं एक खास आकर्षण".. 



"पुरंदरसह आसपासच्या भोर, वेल्हासारख्या तालुक्यांतून वीरच्या यात्रेला भाविक कुटुंबंच्या कुटुंबं ८-१५ दिवस राहायला येतात. पालं करुन राहणं हे वीरच्या यात्रेचं एक खास वैशिष्ट्य. यात विशेषतः चहुबाजूंचा शेतकरी वर्ग अधिक दिसतो. आतापर्यंत आम्ही कुटुंब घेऊन कधीच कोणत्या यात्रेला राहायला गेलेलो नाही, त्यामुळे या माणसांबद्दल नेहमीच अप्रूप वाटत आलंय."


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


कुणी भक्त निवास इमारतीत राहतात, तर कुणी शाळांच्या प्रांगणात, कुणी बाजार तळावर, कुणी काळूबाईच्या माळावर, कुणी विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या आवारात, कुणी विरेश्वराच्या प्रांगणात आणि कुणी जागा मिळेल तिथं पालं उभारलेली असतात. वीरच्या यात्रेतली ही एक निराळीच मौज असते. 


एकदा मी माझ्या ४ वर्षाच्या भाच्याला घेऊन जत्रेत बैलांचे, बैलगाड्यांचे फोटो काढत होते. तो सुद्धा हे एन्जॉय करत होता. काही बैलांच्या हावभावावरुन जर त्यांचा फोटो काढण्याला नकार आहे, हे ते दर्शवत असतात, तर तेव्हा मी फोटो नाही काढायचे. हे सारं मी माझ्या भाच्याशीही बोलत होते आणि त्याला ते समजत होतं. 



आपण बैलांचा फोटो घेताना जर त्यांना कम्फर्ट असेल तरच फोटो घ्यायचा असं आम्ही ठरवलं. प्रवासाहून आल्यावर निवांत बसून आराम करणारी बैलं पाहताना जणू त्यांच्यातली शांतता जशीच्या तशी आपल्यापर्यंत पोहचते असं वाटतं. वीरच्या यात्रेत बैलजोड्यांचे फोटो क्लिक करणं हा छंदच जडलाय मला! एकदा काय झालं, मी बैलांचा फोटो काढत होते, तेवढ्यात त्या पालातले एक काका मला म्हणाले, की “तायडे बैलांच्या मालकाचा बी फोटो काढायचा असतो, बैलांसंगं...” 

मीही आनंदाने पुन्हा क्लिक केलं! साहजिकच आहे, त्यांनीच त्यांची नीट काळजी घेतलेली असते आणि त्यांना सुदृढ केलेलं असतं. जनावरांच्या दाग-दागिन्यांची (घुंगुरवाळा, चाळ आणि बरंच काही) स्पेशल दुकानं असतात जत्रेत. तिथं अशा हौशी शेतकऱ्यांची झुंबड उडालेली असते. 


"आपल्याला भावणारी आणखी एक गोष्ट म्हणजे ठिकठिकाणी रचलेल्या, पेटवलेल्या चुली.. घातलेला शेणाचा सडा. काही चुली तर इतक्या सुबकतेनं रचलेल्या आणि पांढऱ्या मातीनं सारवलेल्या असतात की त्या माऊलींच्या हातांच्या कलेची आणि मायेची चुणूक त्यात डोकावतेच. डोळ्यांच्या कॅमेऱ्यात आपोआपच क्लिक होतात असे क्षण! या पेटलेल्या चुली बिकट परिस्थितीत सकारात्मकता मनात तेवत ठेवणाऱ्या मशालीच वाटतात. स्थलांतरित कामगारांना पोटाला भाजी- भाकरी आणि उघड्यावर संसार थाटत पाठीवर बिऱ्हाड बांधत पुढं चालत राहायला बळ देतात."



यात्रा म्हटलं, की हौशी, नवसी आणि गवसी, ओघानं आलेच! यातले हौशी मला जवळचे वाटतात. हे हौशी जत्रेकरु मोजक्या साधन-सामग्रीवर पिढ्यानपिढ्या जत्रेला येत आले आहेत. म्हणतात नं.. ‘हौसेला मोल नाही..’ ते बैलांच्या चारा-पाण्याची चोख व्यवस्था करतात. चारा त्यांनी येतानाच आणलेला असतो. 

माझ्या आईच्या भाषेत सांगायचं तर “प्रवासाचा शीण आलेला असला तरी त्यांची किती लगबग असते. बैलांना चारा-पाणी घालणं, चूल मांडणं, पिण्याचं पाणी आणणं, स्वच्छता, सडा-सारवण, पाठोपाठ कालवणं खदखदू लागतात. कोकणातल्या भाताचा दरवळ तर कुठल्या कुठे पसरलेला असतो.” कोणतं चैतन्य असतं या मंडळींमध्ये! 


माझ्या वडिलांच्या ओळखीतले एक शेतकरी गृहस्थ त्यांच्या कुटुंबासह अनेक वर्षांपासून जत्रेला येतात. ३-४ दिवस पालात राहतात. त्यांचा पुरणपोळ्यांचा नैवेद्य असतो, दरवर्षी आमच्या घरुन दगडी पाटा-वरुटा घेऊन जातात, आमटीचं वाटण वाटायला. जेवणाचं एक ताट ते नेहमी आमच्यासाठी घेऊन येतात. त्या आमटीची चव काही निराळीच! यात्रेत गेलं की खूप ठिकाणी पंगती दिसतात, गोपाळ जेवताना दिसतात. यालाच ‘गजी’ किंवा ‘शिद’ घालणं असं म्हणतात. खरं तर यात्रेला आलेलं एक माणूसही उपाशी राहू नये, या विचारातून पुढे आलेली ही पद्धत आहे. या निमित्ताने जाती-धर्माचा भेदभावही मोडीत निघतो.  

वीरच्या यात्रेवरचं प्रेम म्हणजे इथल्या घडशी-गोसाव्यांनी त्यांच्या बोलीभाषेत श्रीनाथ आणि जोगेश्वरीवर रचलेली गाणी.. त्यांना लावलेल्या सुंदर..लोकप्रिय चाली! यात्रेत ठिकठिकाणी वाजणारी ही गाणी ‘माहौल’ बनवतात.. छबिना आणि भाकणूक हे वीरच्या यात्रेतील महत्वपूर्ण धार्मिक भाग आहेत. छबिन्यातला नृत्यप्रकार मला विशेष आवडतो. वाद्यांच्या तालावर अनेक लोकं नृत्य करण्यात तल्लीन झालेली असतात. 


भाकणूकीत सदर वर्षाचा पीक-पाण्याचा अंदाज मांडला जातो, कुठे दुष्काळ असेल, कुठे पाऊस होईल याचे अंदाज मांडले जातात. वीरच्या यात्रेत धनगर समाजातील मंडळींचंही विशेष महत्व. श्रीनाथांचे भक्त कमळाजी हे धनगर समाजातील होते असं मानलं जातं. त्यामुळे धनगरांचा देव अशी देखील श्रीनाथांची ओळख आहे. धनगर समाज मोठ्या प्रमाणात जत्रेत सामील होतो. 

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


जत्रेत ओळखीचे भेटतात तसे अनोळखीही भेटतात.. किंवा नव्या ओळखी होतात. एकदा दाराच्या उंबरठ्यावर उभी राहून रस्त्यावरची वाहतूक पाहत होते. समोर एका जीपमधून जाणाऱ्या एका शाळकरी मुलाने माझ्याकडे पाहून हात केला. तो माझ्या ओळखीचा नव्हता, पण तरीही मीही त्याला प्रतिसाद म्हणून हात केला. पुढे कधीतरी त्या मुलाशी भेट होईल असं उगाच वाटत होतं. जवळपास एक वर्षानंतर वेल्ह्यातल्या गुंजवणेच्या शाळेत जाण्याचा प्रसंग आला. 

तिथल्या प्राथमिक शाळेत सहावीच्या वर्गातल्या मुलांशी मी बोलत होते.. (तेव्हा एका सामाजिक संस्थेसोबत मी वेल्हा तालुक्यातील शाळांसोबत जीवन कौशल्य शिक्षणाचा प्रकल्प राबवत होते.) तेव्हा एक मुलगा पुढे आला आणि म्हणाला, ‘ताई वीरच्या जत्रेत मी तुम्हाला हात केला होता...’ ओळखलेलं नसताना मीही त्याला हात केला याबद्दल आश्वस्त वाटलं मला आणि मस्तही!


यात्रा म्हणताच अनेक आकर्षणं आपल्याला खुणावू लागतात. नकली दागिन्यांची, खेळण्यांची, बांगड्यांची दुकानं, पाळणेवाले, गारीगारवाले, गुड्डी के बालवाले, फुगेवाले आणि बरंच काही.. व्यक्तीपरत्वे ही आकर्षणं वेगवेगळी असतात. लहान मुलांचं एका खेळण्याने आणि एका पाळण्यात बसल्याने मन भरत नसतंच. उडवायला फुगे आणि वाजवायला पिपाण्या असतातच. अधून-मधून चमचमीत खाऊचा ब्रेकही असतो.

वीरच्या जत्रेत काचेच्या बांगड्यांच्या दुकानांनी (कासारांनी) आख्खी एक रांग व्यापलेली असते. तिथून जाताना जत्रेतल्या भुयारात गेल्यासारखं वाटतं. लाकडी वस्तू हे जत्रेतलं एक खास आकर्षण. लाकडी पोळपाट लाटणं, काटवट, डाव, शोभेच्या वस्तू आणि बरंच काही. लोखंडी भांड्यांच्या दुकानांचीही हल्ली गर्दी दिसते. यांचा जणू एक स्वतंत्र सेक्शनच असतो. विशेषतः महिलांची तिथं झुंबड उडालेली असते. 


लाकडापासून बनवलेल्या या वस्तूंची रचना आणि सुबकता पाहणं, त्या हाताळणं यातही खूप आनंद वाटतो. विक्रेते विक्रीला बसलेले असताना दुसऱ्या बाजूला पोळपाटांना सुबक आणि मजबूत बनवण्याचं त्यांचं कामही चालूच असतं. लोकरीच्या जेन, घोंगड्यांचा बाजार हे या यात्रेतलं एक विशेष आकर्षण. मागच्या अनेक वर्षांपासून त्यांचा बाजारही विशिष्ट ठिकाणीच भरतो! यात्रेत किती वेगवेगळ्या वस्तू, कपडे, खाद्यपदार्थ विकायला असतात, आनंद देणारी, मनोरंजनाची साधनं असतात. सामान्य माणसाच्या नजरेतून पाहायचं तर जत्रेत विविध प्रकारे मोठी आर्थिक उलाढालही होत असते.



पूर्वी तमाशा हे देखील वीरच्या यात्रेचं एक खास आकर्षण होतं. पुरुष मंडळींची तुफान गर्दी व्हायची. मला नेहमी प्रश्न पडायचा, तमाशा सादर करायला महिला असतात, त्यांचा नाच आणि बरंच काय काय असतं, पण मुलींना आणि स्त्रियांना तिथं जाण्याची, प्रेक्षक म्हणून अनुभव घेण्याची बंदी का असते? याचं समाधानकारक उत्तर आजही मिळत नाही. तमाशाच्या वेळी तंबूच्या बाहेर होणारी भांडणंही आपण कायम ऐकून असतो, कदाचित अशाच कारणामुळे मागच्या काही वर्षांपासून इथे वर्षानुवर्षापासून चालणारी तमाशाची परंपरा खंडीत झाली आहे. मागच्या काही वर्षांपासून आखाड्यात कुस्त्यांचा डावही रंगतो.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


यात्रेतली गंमत म्हणजे कुणालाही फोन करायचं म्हटलं की पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहावा लागतो, वीरला असा अनुभव वर्षातून याच वेळेला येतो. ज्याने त्याने कानाला मोबाईल लावलेला असतो. अर्थातच नेटवर्क जाम असतं. अफाट गर्दी झालेली असते. काहींना गुलालात माखलेली गर्दी पाहायला आणि त्या गर्दीत निव्वळ फिरायलाही आवडतं. दुकानांच्या रांगांमधून तरूण मुलं उगाच इकडून तिकडं, तिकडून इकडं फिरत असतात. 

काही जण तर लक्ष वेधून घेण्यासाठी मोठ्यानं पिपाण्या वाजवतात. वय हो! दुसरं काय! यात्रेतली गर्दी .. वाहतुकीची कोंडी आणि जागोजागी तैनात असलेलं पोलीस दल हे एक समीकरणच! अनेक पोलीस स्त्रियाही बंदोबस्ताला असतात. त्यांचे यात्रांमधले अनुभव काय आहेत, हेही कधीतरी जाणून घ्यायला हवं! 


जत्रेत गोडाचा नैवेद्य.. म्हणजे पुरणपोळीचा आणि तिखटाचा म्हणजे मटणाचा. दोन्ही जेवणावळींचा यथेच्छ आनंद घेणारी असंख्य मंडळी समाजात आहेत. तरीही सध्याच्या परिस्थितीत अन्न म्हणून न पाहता, शाकाहार-मांसाहार यांच्या मान-अपमानावरुन होणारी चर्चा ही केवळ जातीय/धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या हेतूने केली जाताना आढळते. 


वास्तविक पाहता दोन्ही प्रकारच्या आहारांना आपल्या धर्माने आणि संस्कृतीनेही सामावून घेतलं आहे. प्रत्यक्षात आपल्या यात्रा-जत्राही सहकार्य, माणुसकी, एकोपा आणि धार्मिक सलोखा रुजवू पाहत असतात माणसा-माणसामध्ये.. छबिन्यात कसलाही भेदभाव विसरुन नाचणं असेल, मिळेल त्या पंगतीला जेवणं असेल, शेजारुन येणाऱ्या-जाणाऱ्यांचा धक्का लागून लागून आपणही गुलालात रंगून जाणं असेल! 


माझ्या नजरेनं टिपलेली.. मला उमगलेली वीरची यात्रा मांडण्याचा प्रयत्न केलाय. 


लेखिका : - सामाजिक कार्यकर्त्या, प्राजक्ता धुमाळ.



Saturday, February 24, 2024

"भक्तीचे वेड लावणाऱ्या माघ पौर्णिमेच्या चांदण्या रात्री रंगला श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरी मातेचा शाही विवाह सोहळा; श्री क्षेत्र वीर येथे सवाई सर्जाचं चांगभलंच्या जयघोषात मंत्रमुग्ध झाला लाखो भाविक - भक्तांचा जनसागर"...


पुरंदर, वीर, दि.२४ :  महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील,  पुरंदर तालुक्यातील  प्रसिद्ध देवस्थान क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरी माता यांचा ऐतिहासिक विवाह सोहळा मानकरी, सालकरी, पाटील, पुरोहित  यांच्या उपस्थितीत, फटाक्यांच्या आतिषबाजीत, माघ पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात, ढोल-ताशांच्या गजरात, उत्साहात, पारंपारिक पद्धतीने, भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.


महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध अशी क्षेत्र वीरची ऐतिहासिक यात्रा महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला महाउत्सव असतो.



क्षेत्र वीर येथे श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी माता यांच्या शाही विवाह सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातुन आलेला लाखो भाविक भक्तांचा जनसागर "सवाई सर्जाचं चांगभलं" च्या गजरात, भक्तिमय वातावरणात मंत्रमुग्ध होऊन गेला.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


शुक्रवारी पहाटे ५ वाजता मंदिरात देवाची पूजा होऊन, मुख्य गाभारा बंद करण्यात आला, सहा वाजता मुख्य गाभारा  खुला करून सकाळी देवाला अभिषेक करण्यात आला. यानंतर सकाळी १०.३० वाजता देवाला दहीभाताची पूजा बांधण्यात आली. दुपारी बारा वाजता धुपारती होऊन मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला. यानंतर दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला.


पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध क्षेत्र कोडीतची मानाची काठी - पालखी घेऊन  मानकरी, सालकरी, ग्रामस्थ मंडळी यांचे सायंकाळी आठ वाजता क्षेत्र वीर येथे आगमन झाल्यानंतर देवाची धुपारती घेऊन वीर गावचे मुकादम पाटील, सर्व विश्वस्त व ग्रामस्थ मंडळी, मानकरी, दागिनदार, सालकरी मंडळी यांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानाने भेटा भेट होऊन वाजत गाजत स्वागत करण्यात आले. 


यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवून, योग्य ती काळजी घेऊन व्यवस्थित नियोजन केले. यानंतर मानाची काठी, देवाची पालखी पालखी स्थळावर स्थानापन्न झाली.


रात्री ११.३० वाजता समस्त राऊत मंडळींच्या वतीने देवाला पोषाख करून, देवदेवतांना आवाहन करण्यात आले. 


श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या उत्सवमूर्ती पालखीत ठेवून ढोल ताशाच्या गजरात तसेच कोडीतचीही पालखी बाहेरून अंधारचिंच येथे मानाच्या काठीचा भेटाभेटीच्या पारंपरिक सोहळ्यासाठी  आल्या.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


यावेळी मानकऱ्यांना फुलांच्या माळा घालण्यात आल्या. वाई व कन्हेरी पालख्यांसह मानाच्या काठ्यांची भेटा भेट होऊन,भक्तिमय वातावरणात सर्व पालख्या देऊळवाड्यात आल्या.


एक मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर चंद्रकांत ज्ञानोबा धुमाळ (मुकादम पाटील) यांच्या हस्ते विधिवत मंत्रोपचार होऊन पहाटे ३ वाजता श्रीनाथ म्हस्कोबा  व जोगेश्वरी माता  यांच्या लग्न सोहळ्याला सुरुवात झाली. 


"रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात लग्नाच्या सात मंगलाष्टका होऊन, पारंपरिक शाही लग्न सोहळा संपन्न झाला."



यावेळी पुरोहित दिपक थिटे, संतोष थिटे यांनी पौराहित्य केले. 


यानंतर सर्व काठ्या - पालख्या पारंपारिक प्रदक्षिणेसाठी गेल्या.


वीर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून, श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी माता यांचा शाही विवाह सोहळा महाराष्ट्रातील हजारो भाविकांना ऑनलाईन यूट्यूबच्या चॅनेलच्या माध्यमातून पाहता आला.


श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टमार्फत  या शाही लग्न सोहळ्यासाठी लाईट, जनरेटर, पालखी मार्ग व्यवस्थापन, विद्युत रोषणाई, परिसर स्वच्छता, आवश्यक कर्मचारी, स्वयंसेवक, ट्राफिक पोलीस इत्यादीचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात दिलीप धुमाळ मित्र परिवारातर्फे आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


यावेळी श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष धुमाळ, व्हाईस चेअरमन रवींद्र धुमाळ व सर्व विश्वस्त व सर्व सल्लागार या सर्व मंडळींनी देवस्थान ट्रस्ट तर्फे सर्व व्यवस्था पाहून उत्तम नियोजन केले.



पुरंदर पंचायत समिती, सासवड प्राथमिक आरोग्य केंद्र, पुरंदर तहसीलदार कार्यालय, विद्युत वितरण कंपनी, पोलीस प्रशासन व वीर ग्रामपंचायत यांच्याकडूनही या ऐतिहासिक यात्रा सोहळ्यासाठी उत्तम व्यवस्था केली जाते.


"श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी देवीचा शाही विवाह सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत, पारंपारिक पद्धतीने, आनंदमय वातावरणात, उत्साहात संपन्न झाला." अशी माहिती  श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी दिली.


"महाराष्ट्रातील अठरापगड जाती-जमातींमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवाची यात्रा अठरापगड जातीतील लोकांना एकत्र आणून, भक्तीच्या धाग्यात जोडून, माणुसकी समृद्ध करणारा हा उत्सव आहे.महाराष्ट्रातील लाखो भाविकांना ऊर्जा, प्रेरणा देणाऱ्या या भक्तिमय सोहळ्याची, प्रत्येक वर्षी क्षेत्र वीर येथील या ऐतिहासिक यात्रा सोहळ्याची लाखो भक्तांना ओढ असते." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.


महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वीर येथील ऐतिहासिक यात्रा सोहळा लाखो भाविक भक्तांना भक्ती - शक्तीची ऊर्जा देणारा महान सोहळा असतो.


Friday, February 23, 2024

"पुण्यातील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ धर्मवीर संभाजीनगर गणपती ट्रस्टचा गणेश जयंती निमित्त गरजूंना, दिव्यांग बांधवांना, नवरत्न ओल्ड एज होम वृद्धाश्रमाला "या" सामाजिक उपक्रमातून; मिळाला मदतीचा हात"...


पुणे,दि.२३ : पुणे शहरातील, दक्षिण उपनगरातील, भारती विद्यापीठ परिसरातील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ धर्मवीर संभाजीनगर गणपती ट्रस्ट यांनी गणेश जयंती निमित्त  दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर वाटप करून व नवरत्न ओल्ड एज होम या वृद्धश्रमास देखील व्हीलचेअर व शिधा वाटप करून या आगळ्या वेगळ्या सामाजिक उपक्रमामुळे पुणेकरांची मने जिंकली.


भारती विद्यापीठ येशील "धर्मवीर संभाजीनगर गणपती ट्रस्टच्या वतीने आयोजीत "श्री गणेश जयंती सोहळा - २०२४" यावर्षी खूप आनंदात व  भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

या वर्षी या सोहळ्यामध्ये गणेश जयंती अगोदर तीन दिवसीय भक्तीसंगीताच्या सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 


"श्री गणेशजयंती दिनी" गणेश याग आणि   महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

यावेळी  हजारो भाविकांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा आनंद घेतला.


"धर्मवीर संभाजीनगर गणपती ट्रस्ट वर्षभर विविध सामाजीक उपक्रम राबवत असतात. ह्या गणेश जयंतीचे औचित्य साधून भारती विद्यापीठ परिसरातील आणि धाराशीव येथील गरजूंना, दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर वाटप करण्यात आले."


या गणपती ट्रस्टतर्फे "नवरत्न ओल्ड एज होम "वडगाव पुणे  येथील वृद्धाश्रमास व्हीलचेअर आणि शिधा वाटप करण्यात आला. यावेळी धर्मवीर संभाजीनगर गणपती ट्रस्टचे अध्यक्ष  मधुकर कोंढरे, आधारस्तंभ राकेश खोपडे आणि प्रमुख कार्यकर्ते  आशिष देशमुख,  निलेश मोरे, तुषार कोरडे, पराग शीळीमकर, प्रसिद्ध रुग्णसेवक उमेश महाडिक उपस्थित होते.


पुण्यातील, दक्षिण उपनगरातील प्रसिद्ध धर्मवीर संभाजीनगर गणपती ट्रस्ट नेहमीच वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांनी भारती विद्यापीठ परिसरातील तसेच पुणेकरांचे मन  जिंकत असते.


"धर्मवीर संभाजीनगर गणपती ट्रस्ट हे गणेशोत्सव मंडळ पुणे शहरात प्रत्येक वर्षीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असते. विविध चांगल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत असते. आगळ्या वेगळ्या सामाजिक उपक्रमांनी गणेश भक्तांचे मन हे गणेशोत्सव मंडळ नेहमीच जिंकते." अशी प्रतिक्रिया पुणे शहरातील प्रसिद्ध रुग्णसेवक उमेश महाडिक यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.


पुणे शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये पुण्यातील विविध गणेशोत्सव मंडळांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे.