Sunday, January 31, 2021

आण्णा हजारे एक दिशाहीन समाजसेवक - विकास लवांडे; सामाजिक कार्यकर्ते विकास लवांडे यांचा रविवार विशेष लेख..

 

आण्णा टीमची राजकीय पक्षांशी तुलना करूच नका कारण आण्णा कायम राजकीय पक्षांना शिव्या देत आलेत. द्वेष करत आलेत , स्वतःला अराजकीय म्हणत इतरांना कायम तुच्छ लेखत आहेत. जो राळेगणला येऊन पायावर डोकं ठेवील तोच आपला ही अण्णांची मुख्य अट असते. देशात फक्त आण्णा प्रामाणिक बाकी सर्वजण चोर आहेत , बाकी पुरोगामी प्रतिगामी वगैरे व्याख्या अण्णांनी स्वतः जाहीरपणे सांगाव्यात पण कुणाचा सल्ला न घेता सांगाव्यात , अण्णांची विचारधारा नेमकी कोणती खुद्द अण्णांना तरी माहीत आहे काय ? 




उपोषणाचे हत्यार बोथट करून आण्णा स्वतःला दुसरा गांधी समजू लागले आहेत. गांधीजी तत्वनिष्ठ होते त्यांना स्वतःचे स्पष्ट असे विचार होते. आण्णा स्वतःला फकीर म्हणवतात कारण संसार झेपला नसता. संसारी माणसांची दुःख अडचणी त्यांना कशा कळणार ? 




भाजप वगळून सर्व राजकीय पक्षांना शिव्या देत मध्यम वर्गीय लोकांची दिशाभूल करत अराजक आणण्यासाठी आण्णा आजपर्यंत अपयशी ठरले आहेत. संघटना म्हणजे सासू असते असे अण्णांचे मत आहे म्हणून इतक्या वर्षात संघटना उभी करू शकले नाहीत कारण मग मनमानी करता आली नसती. 




मनमानी करता यावी म्हनून दरवेळी नवीन आण्णा टीम उभारली जाते. एक लोकपाल आंदोलनातील आण्णा टीम सध्या भाजपच्या सत्तेचे लाभार्थी बनले आहेत. हा डुप्लिकेटपणा आता उघड झाला आहे.




आण्णा म्हणजे ढोंगीपणा हे आता उघड सत्य कुणीच नाकारू शकत नाही. भारतरत्न मिळण्याच्या आशेवर भाजपला बिनधास्त समर्थन करत राहावे कारण तूमची राज्यघटनेच्या व गांधीजींच्या तत्वांशी बांधिलकी कधीच नाही.




बाकी आम्ही राजकीय पक्षाचे लोक बदनाम आहोतच कारण आम्ही संत नाहीत. आण्णा तुमचा चेहरा काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने दरवेळी मोठा केला तुम्हाला दरवेळी महत्व दिले तुमच्या पत्रांना मुख्यमंत्री ,पंतप्रधान उत्तर द्यायचे तुमच्या बरोबर चर्चा करायचे हीच त्यांची घोडचूक होती काय ? 


लेखक : -  सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते, विकास लवांडे.


     

Tuesday, January 26, 2021

महाराष्ट्रातील 57 पोलीस शिलेदारांना केंद्र सरकारकडून विशेष पोलीस पदक जाहीर; ४ राष्ट्रपती विशेष सेवा पदक, १३ शौर्य पदक, ४० विशेष पोलीस पदक जाहीर...




नवी दिल्ली, दि. 25 :  महाराष्ट्र पोलीस सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. पोलीस दलामध्ये केलेल्या शौर्य, विशेष उल्लेखनीय, गुणवत्तापूर्ण कामगिरीसाठी आज राष्ट्रपती पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील एकूण 57 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’, 13 ‘पोलीस शौर्य पदक’ तर प्रशंसनीय सेवेकरिता 40 ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.







प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी एकूण 946 पोलीस पदक जाहीर झाली असून 89 पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक' (पीपीएम), 205 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि 650 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) आणि दोन ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण 57 पदक मिळाली आहेत.







देशातील 89 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील चार अधिकारी–कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे -





चौघांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ (पीपीएम)

 

1)श्री.प्रभात कुमार, अतिरिक्त पोलीस महासंचालक, पोलीस महासंचालक कार्यालय (भ्रष्टाचार विरोधी पथक), वरळी, मुंबई

2)डॉ.सुखविंदर सिंग, अतिरिक्त पोलीस महासंचालक फोर्स – 1, 
एस. आर.पी.एफ.ग्रुप-8 च्या पुढे गोरेगाव पूर्व,मुंबई

3)श्री.निवृत्ती तुकाराम कदम, सहाय्यक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, ठाणे शहर.

4)श्री.विलास बाळकु गंगावणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शाहू नगर पोलिस ठाणे माहिम (पूर्व), मुंबई.                      
 



राज्यातील एकूण 13 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’

 

1)श्री. राजा आर., अतिरिक्त पोलीस अधीक्षक.

2)श्री.नागनाथ गुरुसिद्ध पाटील, पोलीस उपनिरीक्षक.

3)श्री.महादेव मारोती मडावी, नाईक पोलीस हवालदार.

4)श्री.कमलेश अशोक अर्का, नाईक पोलीस हवालदार.

5)श्री.हेमंत कोरके मडावी, पोलीस हवालदार.

6)श्री.अमुल श्रीराम जगताप, पोलीस हवालदार.

7)श्री. वेल्ला कोरके आत्राम, पोलीस हवालदार.

8)श्री..सुधाकर मलय्या मोगलीवार, पोलीस हवालदार.

9)श्री. बियेश्वर विष्णू गेडाम, पोलीस हवालदार..

10)श्री. गजानन दत्तात्रय पवार, पोलीस  निरीक्षक.

11)श्री.हरि बालाजी एन, सहाय्यक पोलीस अधीक्षक.

12)श्री.गिरीश मारोती ढेकळे, नाईक पोलीस हवालदार.

13)श्री. निलेश मारोती धुमणे, नाईक पोलीस हवालदार.
 

राज्यातील एकूण 40 पोलिसांना ‘पोलीस पदक’ 

श्री. रविंद्र अनंत शिसवे, पोलीस सहआयुक्त, साधु वासवानी रोड, पुणे.

श्री . प्रविणकुमार चुडामण पाटील, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई.

श्री. वसंत उत्तमराव जाधव,पोलिस अधीक्षक, भंडारा.

श्रीमती कल्पना यशवंत गाडेकर, सहायक पोलीस आयुक्त, दहशतवाद विरोधी पथक (सायबर) मुंबई.

श्रीमती संगीता लिओनेल शिंदे-अल्फोन्सो, पोलीस उपअधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे.

श्री.दिनकर नामदेव मोहिते, पोलीस निरीक्षक, सी. बी. डी, बेलापूर, पोलीस ठाणे, नवी मुंबई.

श्री. मेघश्याम दादा डांगे, पोलीस निरीक्षक, अक्क्लकुवा पोलीस ठाणे, नंदुरबार.

श्री. मिंलिद मनोहर देसाई, पोलीस निरीक्षक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, औरंगाबाद.

श्री.विजय चिंतामण डोळस, पोलीस निरीक्षक, निजामपुरा पोलीस ठाणे, ठाणे शहर.

श्री. रविंद्र रघुनाथ दौंडकर, पोलीस निरीक्षक, वाशी पोलिस ठाणे, नवी मुंबई.

श्री. तानाजी दिगंबर सावंत पोलीस  निरीक्षक, स्थानिय गुन्हे शाखा, कोल्हापूर.

श्री. मनिष मधुकर ठाकरे, पोलीस निरीक्षक, गाडगेनगर, पोलीस ठाणे, अमरावती शहर.

श्री. राजु भागोजी बिडकर,  पोलीस  निरीक्षक, डॉ. डी.बी मार्ग, पोलीस ठाणे, मुंबई.

श्री. अजय रामदास जोशी, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, अंधेरी,मुंबई शहर.

श्री. प्रमोद भाऊ सावंत , पोलीस निरीक्षक, तंत्रज्ञान कक्ष,मुंबई शहर.

श्री. भगवान मारीबा धाबडगे, पोलीस निरीक्षक, देगलुर पोलीस ठाणे, नांदेड.

श्री. रमेश मुगतराव कदम, पोलीस उपनिरीक्षक, खंडणी विरोधी पथक, ठाणे शहर.

श्री. राजेश बाबुलाल नगरुरकर, राखीव पोलीस उपनिरीक्षक, पोलीस मुख्यालय, बुलढाणा.

श्री. सुर्यकांत क्रिष्णा बोलाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, रेल्वे पोलीस मुख्यालय, घाटकोपर,मुंबई.

श्री. लिलेश्वर गजानन व-हाडमारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, डी.एस.बी, चंद्रपूर.

श्री. भारत ज्ञानदेव नाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, वाहतुक शाखा, सातारा.

श्री. हेमंत नागेश राणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, शीव पोलीस ठाणे, माटुंगा, मुंबई.

श्री. रामदास बाजीराव गाडेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. वळुज, औरंगाबाद.

श्री. हेमंत काशीनाथ पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक, रिडर ब्रँच, रायगड.

श्री. अशोक कमलावर मंगलेकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक, रिडर ब्रँच, अमरावती शहर.

श्री. जीवन हिंदुराव जाधव, सहायक पोलीस उपनिरीक्षक,सी.आय.यु. ब्रँच, पोलीस आयुक्तालय, मुंबई.

श्री. राजेंद्र रमाकांत मांडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, डी.एस.बी. बेस कर्जत, रायगङ

श्री. ‍ विजय नामदेवराव बोरीकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस मुख्यालय, चंद्रपूर.

श्री. पुरुषोत्तम शेषरावजी बरड, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस आयुक्तालय, अमरावती.

श्री. उदयकुमार रघुनाथ पलांडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट -4, उल्हासनगर, ठाणे शहर.

श्री. थॉमस कार्लोस डिसोझा, सहायक पोलीस उपनिरीक्षक, मुख्यालय,ठाणे.

श्री. प्रकाश बाबुराव चौघुले, सहायक पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, रेल्वे मुंबई.

श्री. सुरेश शिवराम मोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, ठाणे शहर.

श्री. संजय पुंडलिक साटम, सहायक पोलीस उपनिरीक्षक, बी.डी.डी. एस, सिंधुदुर्ग.

श्री. शाकिर गौसमोहीदिन जिनेदी, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस मुख्यालय, पिंपरी-चिंचवड.

श्री. संजय रामचंद्र पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, नवी मुंबई.

श्री. शरदप्रसाद रमाकांत मिश्रा, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलिस स्टेशन, अंबाझरी, नागपूर शहर.

श्री. प्रकाश ज्ञानेश्वर अंडील, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एस.आर.पी.एफ. ग्रुप-3, जालना.

श्री. जयराम बाजीराव धनवाई, गुप्तचर अधिकारी,राज्य गुप्तचर विभाग, औरंगाबाद.

श्री. राजु इरपा उसेंडी, गुप्तचर अधिकारी,राज्य गुप्तचर विभाग, सिरोंचा, गडचिरोली.




Tuesday, January 19, 2021

महाराष्ट्रातील "या आदर्श गावच्या आदर्श सरपंचांने" आदर्श ग्रामविकास पॅनेलच्या सर्व सातही जागा जिंकून; ग्रामपंचायतीवर राखले निर्विवाद वर्चस्व...




अहमदनगर, दि. 18 : महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील आदर्श गाव हिवरे बाजार ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्राचे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्या आदर्श ग्रामविकास पॅनेलने सर्व सातही जागा जिंकून हिवरे बाजार ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व राखले.




पोपटराव पवार यांच्या विकासकामांना, ग्रामविकासाच्या क्रांतिकारी कार्याला जनतेने पुन्हा एकदा कौल दिला. सलग 30 वर्ष बिनविरोध  होणारी हिवरे बाजार गावची निवडणूक परंपरा यंदा मात्र खंडित होऊन झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पोपटराव पवार यांच्या पॅनेलने मोठा विजय मिळवून जनतेच्या मनातील स्थान मजबूत केले.




पोपटराव पवार यांना या निवडणुकीत २८२ मते मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवाराला अवघी ४४ मते मिळाली. पोपटराव  पवार यांचे हिवरे बाजार हे आदर्श गाव, ग्रामविकास आराखडा पहायला महाराष्ट्रातून, देशभरातून शेकडो लोकं येत असतात. 




"गाव उभे करणारे,घडवणारे हात किती मजबूत आहेत, जनतेचा विकासकामांवर किती विश्वास आहे हे सांगणारी ही निवडणूक आदर्श पद्धतीने पार पाडून आमची लोकशाही समृद्ध करणारी ही प्रक्रिया आहे." अशी प्रतिक्रिया पोपटराव पवार यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




पोपटराव पवार यांच्या हिवरेबाजार ग्रामपंचायत निवडणुकीच्या आदर्श ग्रामविकास पॅनेलचे विजयी उमेदवार खालीलप्रमाणे : -

हिवरेबाजार प्रभाग क्रमांक १ : मीना गुंजाळ, विठ्ठल ठाणगे, सुरेखा पादिर.

प्रभाग क्रमांक २ : आदिनाथ पवार, रोहिदास पादिर, रंजना पवार.


Sunday, January 17, 2021

शेतीच्या धंद्याचं मूळ दुखणं...शेतकरी वर्गाच्या मुख्य समस्यांच्या मुळावर घाव घालणारा; लेखक आनंद शितोळे यांचा वास्तववादी, परखड, रविवार विशेष लेख...



भारताने मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारण्याआधी एकूण सरकारच धोरण हे बऱ्याच अंशी कष्टकरी, कामगार वर्ग आणि शेतकरी ह्यांना केंद्रस्थानी ठेवून होतं. मुक्त अर्थव्यवस्थेच्या आगमनानंतर ते धोरण पूर्णतः मध्यमवर्ग आणि नोकरदार वर्गाला केंद्रस्थानी ठेवून काम करत आहेत. हा मुळात धोरणात झालेला बदल सगळ्या समस्येच्या मुळाशी आहे.





नरसिंहराव सरकारने आणलेल्या धोरणाने भारतीय आणि परदेशी अश्या दोन्ही कंपन्या , उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर विस्तारीकरण आणि नवीन व्यवसायात आलेत.मोठी गुंतवणूक ह्या क्षेत्रात झालेली आहे. ह्या सगळ्या कंपन्यांचा प्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे असणारा ग्राहक किंवा बाजारपेठ हि मध्यमवर्गाची आहे ज्यात उच्च मध्यमवर्गीय आलेत. ह्या वर्गात खाजगी नोकरदार, सरकारी नोकर , निमसरकारी नोकरदार आणि छोटे स्थानिक पातळीवर काम करणारे व्यापारी, व्यावसायिक आहेत.





ह्या बाजारपेठेला आपल्या ताब्यात घेण्यासाठी मोठ्या उद्योगांनी सरकारची धोरण आपल्याला हवी तशी वाकवायला सुरुवात केली. त्याच्याच जोडीने ज्ञानाच्या जोरावर मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळवून खाजगी क्षेत्रात पुढे येणाऱ्या नवश्रीमंत लोकांचा एक नवीनच वर्ग उदयाला आला आहे.





ह्या खाजगी आणि सरकारी मध्यमवर्गाच्या बाजारपेठेला लागणाऱ्या सगळ्या वस्तू पुरवणारे मोठे उद्योग ते गाव पातळीवर असणारे छोटे व्यावसायिक ह्यांची मोठी साखळी ह्या उलाढालीत लाभार्थी ठरली. आलेला पैसा आपल्या गरजा पुरवून उरायला लागला तेव्हा नवीन व्यवसाय , स्थावर मालमत्ता , गुंतवणूक आणि मग चैनीसाठी वापरला जाऊ लागला.





एका मध्यमवर्गीय माणसाच्या हातात आलेला एक रुपया जेव्हा दहा हातात फिरायला लागला तेव्हा त्याची उलाढाल दहा रुपयाची झालेली दिसते आहे.ह्या सगळ्या सुबत्तेच्या आणि प्रगतीच्या वाटेवर अगदी खालच्या पातळीवर काम करणारा असंघटीत कामगार वर्ग थोडाफार लाभार्थी ठरला पण शेतकऱ्याच्या वाट्याला मात्र त्या तुलनेत काहीच लाभ झाला नाही. कारण मध्यमवर्गीय असो , जिल्हाधिकारी असो किंवा टाटा बिर्ला सारखा उद्योगपती असो, त्याला लागणारी रोजची अन्नधान्याची गरज नेहेमी मर्यादित असते. आणि एकूण अन्नधान्याची गरज वाढली तरी ती वाढलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाढते.






शेतीसाठी लागणारी भांडवली गुंतवणूक आणि प्रत्येक पिकासाठी लागणारा खर्च ज्याला खेळत भांडवल म्हणतो त्याची किंमत सतत वाढतच राहिलेली आहे.शेतीसाठी लागणाऱ्या औजार, यंत्र, बियाणे, खते, कीटकनाशक आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे इंधन , या सगळ्यांची किंमत ज्या प्रमाणात वाढलीय त्या प्रमाणात शेतमालाला मिळणारा खुल्या बाजारातला भाव वाढलेला नाही न सरकारचा दर वाढलेला आहे.






खरतर देशातल्या गरिबांना अन्नसुरक्षा पुरवायची म्हणून सरकार कायदे करणार असेल आणि त्यासाठी भांडवली गुंतवणूक करणार असेल तर या अन्नसुरक्षा कायद्याचा कणा आहे अन्नधान्याचे उत्पादन आणि ते करणारा शेतकरी, अन्नसुरक्षा कायद्यासाठी लागणारे अन्नधान्य आणि इतर लोकांना लागणारे अन्नधान्य या बाबी अनिवार्य आहेत, माणसाच्या सगळ्या गरजा पुढे ढकलल्या जाऊ शकतात मात्र अन्नपाणी, श्वसनाला लागणारी हवा या बाबी पुढे ढकलून चालत नाही. आपल्याकड जरी लोकसंख्या ह्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढली असली तरी त्या तुलनेत शेती मालाच उत्पादन पण वाढल आहे. मात्र शेतमालावर प्रक्रिया करण्यासाठी लागणारे उद्योग, शेतमालाचे उत्पादन ते प्रक्रिया ते ग्राहक या सगळ्यांची जी सप्लाय चेन निर्माण होताना शेतकऱ्याच स्थान असायला हवय तेच नेमक दुय्यम आहे, त्याचा कच्चा माल नाशवंत आहे, त्याला तातडीने विकण्याची गरज आहे म्हणून पडेल त्या भावात त्याने माल विकला कि त्याच नियंत्रण संपल.





या सप्लाय चेनची , प्रक्रिया उद्योगाची मालकी कंपनीच्या माध्यमातून किंवा सहकारी तत्वावर शेतकऱ्यांची असेल तरच काही प्रमाणात भावावर शेतकऱ्याच नियंत्रण राहू शकत. इथे शेतकऱ्यांना कंपनी स्थापन करायला लागणार मार्गदर्शन आणि मुळात शेतकी कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया सुटसुटीत करण्याची गरज आहे , मग त्याच माध्यम बचतगट असेल, सामुहिक मालकीची कंपनी असेल किंवा सहकारी संस्था असेल. शेती मालाच उत्पादन वाढूनही , मध्यमवर्गीय लोकांची क्रयशक्ती वाढूनही शेवटचा कामगार आणि शेतकरी ह्यांची क्रयशक्ती तितक्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली नाही.याला पर्याय म्हणून कंत्राटी शेतीचा पर्याय म्हणजे आजारापेक्षा औषध भयंकर.




जोडीला आलेली महागाई अजून शेतकऱ्याला जाचक ठरायला लागली.एकीकडे नवरा बायको मिळून लाखभर रुपये घरात दरमहा घेऊन येणारा मध्यमवर्ग आणि दुसरीकडे काही हजार रुपयात सगळ वर्ष कस काढायचं ह्या चिंचेत पडलेला शेतकरी.हि दोन्ही वर्गामध्ये पूर्वीही असणारी दरी आता मात्र खूप भयानक वेगाने वाढते आहे. त्यात ज्या मोजक्या शेतकऱ्यांची मुल ह्या नवश्रीमंत वर्गात आलीत त्यांची , त्यांच्या घराची झालेली प्रगती बाकीच्या गावकर्यांना दिसत्येय. मात्र हि प्रगती फक्त सुखसोयी, चैनीच्या वस्तू आणि घरांची बांधकाम इथवरच बहुतेककरून मर्यादित आहेत, जर शेतीला तात्पुरता का होईना ह्या घरातल्या नवश्रीमंत सदस्याकडून अर्थपुरवठा होत असेल तर त्या शेतकऱ्याची किमान जगण्याची भ्रांत सुटलेली आहे. मात्र शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक करायला घरातलेच नोकरदार नाखूष असतील तर शेतीमध्ये नवे प्रयोग किंवा गुंतवणूक अवघड आहे.हि शेतकरी आणि बाकीच्या सगळ्या समाजात वाढणारी दरी मानसिकरीत्या शेतकऱ्याला खच्ची करतेय. त्याची शेती करण्याची , जगण्याची उमेद संपवते आहे.




गरिबी पूर्वीही होती , हातातोंडाशी गाठ सगळ्यांची होती. पण पूर्वी गावात नोकरीला असलेल्या शेतकऱ्याच्या घरातल्या माणसाला जर गावाकडून एक दोन पोते धान्य गेल तर त्याच बजेट बरच आटोक्यात यायचं. आता ती गरजच राहिलेली नाही. जे पाहिजे ते विकत घ्यायची क्षमता ह्या मध्यमवर्गात आलेली आहे, त्यात सरकार आणि प्रशासन ह्या मध्यमवर्गाला भाजीपाला , अन्नधान्य , फळ ह्या गोष्टी कशा स्वस्त मिळतील ह्या तऱ्हेने धोरण आखण्यात मग्न आहे.




हि शेतकरी विरोधी धोरण , शेतीमालाला चांगला भाव न मिळू देण्याच आडते दलालांच साटलोट , हमीभावाची मारामार, शेतीमाल साठवण्याच्या चांगल्या सुविधा नाहीत , शेतीमालावर प्रक्रिया करून जास्त काळ टिकवण किंवा त्यापासून काही पदार्थ तयार करण ह्या पातळीवर असलेल्या सरकारच्या सगळ्या योजना फक्त कागदावर आहेत.




सगळ्या नोकरदार मध्यमवर्गाला आणि शहरी वर्गाला खुश ठेवल कि आपली सत्ता सुखाने राबवता येते आणि उद्योग व्यवसायिकांच्या सोयीने धोरण ठरवली कि त्यातून मलीदाही मिळतो अश्या दुहेरी फायद्यापुढे शेतकऱ्याच्या दुरावस्थेकडे सगळी सरकार दुर्लक्ष करताहेत. ह्याला ना कॉंग्रेस अपवाद ना भाजपची सरकार अपवाद. सगळे एका माळेचे मणी.




मध्यमवर्गाचा रोष पत्करून , शेतमालाला चांगला भाव देऊन , त्याची योग्य वितरण व्यवस्था आणि विक्री व्यवस्था सरकार करेल हि आशा शेतकऱ्याला राहिलेली नाही.त्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि त्याच निवारण करताना सरकारची उदासीनता ह्या सगळ्या दुरावस्थेत अजून भर घालते आहे.




ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून शेतकऱ्याची उमेद संपलेली आहे, या आजारावर मलमपट्टी करून भागणार नाही तर शस्त्रक्रिया करून दीर्घकालीन उपाययोजना आखणे आणि राबवणे हाच पर्याय आहे.


लेखक : - राजकीय, सामाजिक घडामोडींचे अभ्यासू, जेष्ठ विश्लेषक, आर्थिक आणि कृषी विषयांचे तज्ञ आनंद शितोळे.








Sunday, January 10, 2021

महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट वीर अध्यक्ष पदी संतोष धुमाळ यांची निवड; नवीन विश्वस्त मंडळाची निवड जाहीर...

 

पुरंदर, वीर, दि. 10 : महाराष्ट्रातील लाखो लोकांच्या भक्तीचे श्रद्धास्थान, पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील  प्रसिद्ध देवस्थान श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्र वीर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी वीर गावचे तरुण सामाजिक कार्यकर्ते संतोष धुमाळ  यांची निवड झाली.




श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टच्या आज रविवारी झालेल्या बैठकीत नवीन विश्वस्त  मंडळाची निवड सर्वानुमते जाहीर झाली. या विश्वस्त मंडळामध्ये श्री संतोष धुमाळ यांची श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष पदी निवड झाली. श्री रवींद्र धुमाळ यांची देवस्थान ट्रस्ट उपाध्यक्ष पदी निवड झाली. 




श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट वीर च्या विश्वस्त मंडळामध्ये श्री हनुमंत धुमाळ, श्री अमोल धुमाळ, श्री अभिजित धुमाळ, श्री राजेंद्र कुरपड, श्री संजय कापरे, श्री शिवाजी कदम, श्री नामदेव जाधव यांची विश्वस्त म्हणून सर्वानुमते निवड झाल्याची माहिती श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे सचिव श्री तय्यद भाई मुलाणी यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी  बोलताना दिली.





"महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन येणाऱ्या लाखो भाविकांसाठी चांगल्या सुख सुविधा देण्याचा प्रयत्न आमचे श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थानचे विश्वस्त मंडळ एकजुटीने करेन अशी प्रतिक्रिया श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे नवनियुक्त अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




"महाराष्ट्रातील अठरा पगड जातीतील लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक यात्रा सोहळा, भक्तीचा महासागर विविध जाती धर्मातील लोकांना एकत्र आणून माणुसकी समृद्ध करण्याचा सोहळा साजरा करत असते." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली. श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट वीर च्या माध्यमातून भक्तांना सुखसुविधा देण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रम देखील वीर पंचक्रोशीमध्ये नेहमी राबविले जातात.





Thursday, January 7, 2021

उदगीरचे "टाटा" - जेष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख; माणुसकी जागवणारा विशेष लेख....

 



वरील छायाचित्रात दिसणारे आहेत, अशोक तोंडारे.. राहतात उदगीरला.. प्रेस फोटोग्राफर म्हणून आयुष्यभर वृत्तपत्रांना फोटो पाठविण्याचा उद्योग केला.. झपाटल्यासारखे काम करताना तोंडारे यांनी उद्याची कधी चिंता केली नाही.. परिणामतः व्हायचं तेच झालं.. उत्तर आयुष्यात जगायची मारामार.. सरकारची सन्मान योजना तोंडारे पर्यंत पोहोचण्याचा प्रश्नच नाही.. 




आयुष्यभर जगाच्या उठाठेवी करणारे, समाजातील व्यंगावर कॅमेरयाच्या माध्यमातून प्रहार करणारया तोडांरे यांची अवस्था पाहवत नाही.. मायबाप सरकार काही करीत नाही,. काल पर्यत वेगवेगळ्या पोझेस देत "काढ रे फोटो" म्हणून सांगणारया पुढारयांनी त्यांच्याकडे कानाडोळा केला.. आणि समाज? पत्रकारांकडून लाख अपेक्षा ठेवणारा समाजही त्यांची साधी चौकशी करायला आला नाही.. 




अशा एकाकी स्थितीत असलेल्या तोंडारे यांच्या मदतीसाठी उदगीरमधील पत्रकार धावून आले.. त्यांनी एक ग्राइंडर विकत घेतला.. त्यांच्या घरी नेऊन त्यांना दिला.. अपेक्षा अशी.. लोकांच्या हळद, मिरच्या कांडून त्यांना उपजिविका करता यावी.. सगळे पत्रकार यासाठी त्यांच्या घरी यासाठी गेले की तोंडारे कोणत्या स्थितीत जगताहेत याचा प्रत्यय सर्व पत्रकारांना आला पाहिजे.. पत्रकारांनी दिलेल्या भेटीनं तोंडारे कुटुंबिय "आत्मनिर्भर" होईल की नाही माहिती नाही.. पण आपण एकाकी नाही, आपले पत्रकार मित्र आपल्या पाठिशी आहेत याची तोंडारे कुटुंबियांना नक्कीच जाणीव झाली असेल.. मला वाटतं ही जाणीव त्यांना जगण्याचं बळ आणि नवी उमेद देणारी आहे..





विडंबना अशी की, अशोक तोंडारे यांना आख्ख उदगीर टाटा म्हणून ओळखते.. त्यांना टाटा हे नाव कोणी आणि का ठेवलं असेल माहिती नाही पण या टाटांची झालेली अवस्था तमाम पत्रकार आणि छायाचित्रकारांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे..





उदगीरच्या पत्रकारांनी आपल्या एका पत्रकार बांधवाची व्यथा ओळखून त्यांना जो मदतीचा हात आणि मायेची ऊब दिली त्याबद्दल उदगीरकर पत्रकार मित्रांना मनापासून धन्यवाद..


लेखक - महाराष्ट्राचे जेष्ठ पत्रकार, मराठी पत्रकार परिषद मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख.








Monday, January 4, 2021

कराडच्या जनतेच्या मनावर राज्य करणारा लोकनेता, माणसं उभी करणारा नेता विलासकाका पाटील उंडाळकर - जेष्ठ पत्रकार विजय चोरमारे; लोकनेते विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या राजकीय, सामाजिक कारकीर्दीवर प्रकाश टाकणारा विशेष लेख...

 

माणसं उभी करणारा नेता...                                                         

                                                                             विलासकाका पाटील यांना मी पहिल्यांदा पाहिलं, ते १९७९ साली. कराड लोकसभा मतदार संघातून ते अर्स काँग्रेसच्यावतीनं निवडणूक लढवत होते. त्यांच्याविरोधात यशवंतराव मोहिते काँग्रेस आयचे उमेदवार होते. विलासकाकांची पोस्टर्स आमच्या चरण, आरळा भागात मोठ्या प्रमाणावर लागली होती. या निवडणुकीच्या काळात एकदा विलासकाकांच्या प्रचारासाठी यशवंतराव चव्हाण यांची आरळा येथे सभा होती. आम्ही हायस्कूलमध्ये होतो. आरळ्याकडे जाताना आमच्या गावात गाडी आल्यावर गावाच्या वेशीवर यशवंतराव चव्हाण गाडीतून उतरले. स्वातंत्र्यलढ्यातले त्यांचे मित्र बाबूरावदादा चरणकर त्यांच्या स्वागताला थांबले होते. यशवंतरावांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा आम्ही शाळकरी मुलं-मुली थांबलो होतो. गावाच्या वेशीपासून मुख्य रस्त्यानं यशवंतराव आणि बाबूरावदादा आपुलकीनं गप्पा मारत जाताना आम्ही पाहिलं. सोबत विलासकाकाही होते. विलासकाकांना मी पहिल्यांदा पाहिलं त्यावेळी. अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व होतं त्यांचं. पोस्टरवर फोटो होता तसेच रुबाबदार दिसत होते.





यशवंतराव चव्हाण आणि बाकीची मंडळी गाडीत बसून पुढं निघून गेली. बाबूरावदादा परत आपल्या घरी आले. आरळ्याच्या त्या सभेसाठी गावातून एक ट्रक निघाला होता. आम्ही बरीचशी शाळकरी मुलं त्या ट्रकमध्ये चढलो आणि सभेला गेलो. सभा ऐकण्यापेक्षा ट्रकमध्ये बसण्याचं त्यावेळी अप्रूप होतं.


त्या सभेत विलासकाकांचं भाषण ऐकलं. फारसं प्रभावी वक्तृत्व नव्हतं. नवखा उमेदवार बोलतो तसं थोडंसं बोलले. निवडून देण्याचं आवाहन करून जागेवर बसले.


यशवंतरावांचं भाषण ऐकण्याचा योग त्यावेळी आला. तो पहिला आणि एकमेव योग. राजकीय भाषणातलं फारसं काही कळण्याचं वय नव्हतं. त्यावेळी शिवाजीराव देशमुख आमच्या मतदारसंघाचे म्हणजे शिराळ्याचे आमदार होते. ते अपक्ष असले तरी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारात होते. यशवंतरांवांनी त्यांचा उल्लेख केला आणि म्हणाले, 'शिवाजीराव देशमुख म्हणतात, शिराळा मतदारसंघ माझ्या खिशात आहे. परंतु आम्ही असं म्हणत नाही. मी म्हणतो, की माझा सातारा मतदारसंघ माझ्या हृदयात आहे.'




यशवंतरावांच्या भाषणातलं लक्षात राहिलेलं हे एवढंच वाक्य.


विलासकाका त्या निवडणुकीत पराभूत झाले. यशवंतराव मोहिते निवडून आले.


दहावीनंतर एक वर्षं कराडला कॉलेजला असताना वर्षभर उंडाळे गावावरून येत-जात होतो. त्यावेळी एक-दोनदा विलासकाका रस्त्याकडेला कुणाशीतरी बोलताना किंवा कार्यकर्त्यांच्या घोळक्यात दिसले होते. कराडला असताना स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकरांच्या आठवणी निमित्ता निमित्ताने कुणाकुणाकडून ऐकायला मिळायच्या. विलासकाकांचं नाव त्यात निघायचं. तेवढंच. हे १९८३ सालचं. नंतर विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांचं नाव कानावर पडायचं.





पत्रकारितेत आल्यानंतर राजकीय विषयावर लिहू लागलो. 2004मध्ये एकदा विलासकाका आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात काही कारणावरून मोठा वाद रंगला होता. बरंच उलट-सुलट छापून येत होतं. त्या वादाच्या निमित्तानं मी लोकमतमध्ये वार्तापत्र लिहिलं होतं. त्या वार्तापत्रानंतर तो वाद थांबल्याचं मला नंतर कराड-साता-याच्या च्या काही पत्रकार मित्रांनी सांगितलं.





किसनराव बाणखेले खेडमधून खासदार झाले तेव्हा त्यांच्या लोकसंपर्काची चर्चा सुरू होती. बारशापासून बाराव्यापर्यंत कार्यक्रमांना उपस्थित राहून लोकसंपर्क ठेवणारा नेता अशी त्यांची ख्याती होती. त्याच अनुषंगानं वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्या लोकसंपर्काचा विषय निघाला. राज्याचे नेते असूनही गावागावातल्या सामान्य कार्यकर्त्यांना नावानं हाक मारणारे हे दुर्मीळ नेते होत. राजकीय नेत्यांचा असा लोकसंपर्क कमी झाल्याचा विषय निघाला असताना कुणीतरी माहितीत भर घातली, की विलासकाका पाटील हे अशापैकीच एक आहेत. त्यांचाही लोकसंपर्क दांडगा आहे. नंतर आणखी काही लोकांकडून माहिती घेतल्यावर ही माहिती खरी असल्याचं लक्षात आलं. लोकसंपर्क आणि लोकांचं प्रेम हेच विलासकाकांचं भांडवल आहे. विलासकाकांना निवडणुकीसाठी कधी पैसे वाटावे लागले नाहीत किंवा जेवणावळी घालाव्या लागल्या नाहीत. परंतु मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांच्या आनंदाच्या किंवा दुःखाच्या प्रसंगी विलासकाका सोबत असतात. त्यामुळं कार्यकर्त्यांना ते घरातली वडिलधारी व्यक्ती असल्यासारखे वाटतात. असे अनेक कार्यकर्ते मला भेटले आहेत, जे विलासकाकांवर वडिलांसारखं प्रेम करतात. विलासकाकांनी हा सगळा गोतावळा मायेने जोडलेला आहे. त्याच बळावर आणि भांडवलावर त्यांनी कराड दक्षिण मतदारसंघातून सलग सातवेळा निवडणूक जिंकली.




मोबाईल हा राजकीय नेत्यांचा जीव की प्राण मानला जातो, परंतु मोबाइल न वापरणारा त्यांच्यासारखा नेताही आजच्या काळात दुर्मीळ म्हणावा लागेल. मोबाइलवरच्या कृत्रिम संपर्काशिवाय कार्यकर्त्यांशी 'हार्ट टू हार्ट' संपर्क ठेवणारा नेता, म्हणून मला विलासकाकांचं नेहमीच कौतुक वाटत आलंय.




राजकीय नेत्यांच्या शिक्षणसंस्था आणि तेथील शिक्षक भरती हा सगळीकडं भलताच गुंतागुंतीचा प्रकार असतो. शिक्षकांच्या नेमणुकीमध्ये जे काही होत असतं ते सामान्य माणसाच्या आकलनापलीकडचं असतं. विलासकाकांच्या शिक्षणसंस्थेमध्ये शिक्षक भरतीची पद्धत ऐकून मी चकित झालो. शिक्षक भरतीमध्ये शिक्षणसंस्थेचा प्रमुख अजिबात लक्ष घालत नाही, हे कुणाला पटणार नाही. पण ती वस्तुस्थिती आहे. शिक्षक नेमणुकीसाठी शिक्षकांचीच एक कमिटी नेमली जाते आणि ही कमिटी चांगल्या शिक्षकाची निवड करीत असते. त्यांच्याकडून होईल ती निवड अंतिम. उंडाळ्यासारख्या विकासाच्या मार्गावरच्या खेड्यात शिक्षक गुणवंत असले तर चांगले विद्यार्थी घडतील, ही त्यामागची त्यांची धारणा. शिक्षक भरतीचे बाहेरचे दर डोळे फिरवणारे आहेत. शिक्षक भरतीतून संस्थेला म्हणजेच त्यांना लाखो रुपये कमावता येऊ शकले असते. परंतु भ्रष्टाचाराचा पैसा घ्यायचा नाही, असाही त्यामागचा दुसरा दृष्टीकोन दिसून येतो. भ्रष्ट मार्गानं पैसे देऊन नोकरी मिळवलेल्या किंवा राजकीय हितसंबंधातून भरती झालेल्या वशिल्याच्या तट्टांमुळं भावी पिढ्यांचं नुकसान होईल, म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक तो मार्ग टाळला. शिक्षकांची भरती गुणवत्तेवर आणि कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय केली. शिक्षणाबद्दलचा असा निर्मळ दृष्टीकोन आणि आपल्या गावातल्या सामान्य कुटुंबातल्या पोरांच्या भविष्याविषयीची अशी तळमळ अपवादात्मक म्हणावी लागेल.




राजकीय नेते विकासकामं करीत असतात. परंतु विकासकामातल्या कमिशनच्या टक्केवारीवर हा व्यवहार चाललेला असतो. विलासकाकांनी असला व्यवहार कधी केला नाही, असं त्यांचे जवळचे लोक सांगतात. अर्थात ते पटतंही. त्यांनी आपल्या मतदारसंघात जी तलावांची साखळी निर्माण केली आहे, ती त्यांच्या विकासाच्या दृष्टीचं दर्शन घडवते. तलावांच्या या साखळीमुळं ख-या अर्थानं देशातला पहिला नदीजोड प्रकल्प साकार झाला आहे. कृष्णा आणि वारणेचा संगम सांगलीजवळ हरिपूरला होतो. परंतु वाकुर्डे बुद्रुक योजद्वारे विलासकाकांच्या मतदारसंघातल्या तलावांच्या साखळीमुळं हा वारणा-कृष्णेचा संगम त्याआधीच घडवण्यात यश आलंय. विकासाची दृष्टी आणि आपल्या लोकांच्या नेमक्या गरजा ओळखून त्यांनी कामं केली.




विलासकाका पाटील हे मूळचे यशवंतराव चव्हाण यांचे निष्ठावंत. त्यांनी १९७९ साली ‘अर्स काँग्रेस’कडून कराड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती, याचा उल्लेख वर आलाच आहे. या निवडणुनकीनंतर विलासकाकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. स्थानिक राजकीय संदर्भ विचारात घेऊन प्रेमलाकाकी चव्हाण यांनी विधानसभेसाठी त्यांची शिफारस केली. त्यांना उमेदवारी मिळाली आणि ते निवडूनही आले. वसंतदादा पाटील आपल्याला मंत्रिपद देतील अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र प्रेमलाकाकींनी त्यांच्या नावाला विरोध करून विधानपरिषदेचे सदस्य असलेल्या भास्करराव शिंदे यांची मंत्रिपदासाठी शिफारस केली, परंतु वसंतदादांनी ते मान्य केलं नाही. पृथ्वीराज चव्हाण यांचे घराणे आणि विलासकाका पाटील यांच्यातील संबंध बिघडण्यास सुरुवात झाली ती तिथूनच. त्यात पुढे कुठल्याही टप्प्यावर सौहार्द निर्माण होऊ शकलं नाही. प्रेमलाकाकींच्या नंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्याशीही त्यांचं जमलं नाही किंबहुना एकाच पक्षात राहून दोघं सतत परस्परविरोधी काम करीत राहिले. नंतरच्या प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत हा विरोध ठळक होत गेला.




राजकीय पटावर पाहिलं तर दोघं दोन टोकांवर. पृथ्वीराज चव्हाण यांचं दिल्लीत वजन आहे, परंतु स्थानिक राजकारणात त्यांची ताकद नाही. याउलट विलासकाकांचा स्थानिक पातळीवरचा जनसंपर्क दांडगा, पाया भक्कम. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधामुळे त्यांच्या पुढच्या सगळ्या वाटा अडवल्या गेल्या. सातवेळा आमदार झालेल्या नेत्याचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत यायला हवं होतं. परंतु त्यांना नंतरच्या काळात साधं मंत्रिपद मिळालं नाही, यावरून त्याची कल्पना येऊ शकते. काँग्रेस पक्षाच्या करंटेपणाचंही दर्शन त्यातून घडतं. कराड तालुका, सातारा जिल्हा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्यादृष्टीनंही हा संघर्ष दुर्दैवी म्हणावा लागेल. माझ्यासारख्याला सतत वाटत आलं की, हा संघर्ष मिटायला पाहिजे. त्यातच या दोन्ही नेत्यांचं भलं आहे. दोघांना परस्परांची ताकद मिळाली तर त्यातून काँग्रेसला ताकद मिळेल. आणि महत्त्वाचं म्हणजे दोन्ही नेते सत्तेत राहून कराड-साता-यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी भरीव काम करतील. परंतु ते घडू शकलं नाही. विलासकाकांनी कोणत्याही टप्प्यावर तडजोड केली नाही. सत्तेच्या प्रलोभनाला बळी पडले नाहीत किंवा सत्तेच्या ताकदीपुढं झुकलेही नाहीत. त्यासाठी त्यांना कौटुंबिक पातळीवर जबर किंमत चुकवावी लागली. खूप सोसावं लागलं. एखादा ऐरागैरा असता तर या संघर्षात मोडून पडला असता. परंतु विलासकाका डगमगले नाहीत.




दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचं साहित्य संमेलन यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त आम्ही कराडला घ्यायचं ठरवलं. त्यासंदर्भात काकांशी एकदा चर्चा करीत असताना त्यांनी सल्ला दिला की, संमेलन बाहेर कुठं मैदानावर मंडप घालून वगैरे घेऊ नका. वेणुताई चव्हाण सभागृहातच घ्या. कारण लोकांची मानसिकता फार बदललीय. चांगलं काही ऐकायची मानसिकता राहिलेली नाही. लोक नाचगाणं बघायला जातील, पण चांगले विचार ऐकायला येत नाहीत, असं मी अलीकडं अनुभवतोय.


त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही संमेलन सभागृहात घेतलं. संमेलनादिवशीच त्यांची गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासोबत महत्त्वाची बैठक होती. त्यांच्या कौटुंबिक प्रश्नासंदर्भानं ही महत्त्वाची बैठक होती, तरीही विलासकाका संमेलनाला उपस्थित राहिले. येणं शक्य नसताना ते आले आणि थोडावेळ थांबले. त्यातून त्यांची कमिटमेंट दिसून आली. अशी कमिटमेंट फार कमी लोकांकडे दिसते, राजकारणात तर फारच कमी.




राजकारणाला समाजकारणाची जोड असली पाहिजे, असं नुसतं बोललं जातं. यशवंतराव चव्हाणांचे शिष्य असलेल्या विलासकाकांनी मात्र आपल्या राजकीय वाटचालीला समाजकारणाची भक्कम जोड दिली. उंडाळे येथे दरवर्षी स्वातंत्र्यसैनिक मेळावा आणि समाजप्रबोधन साहित्य संमेलन घेतात. स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्यसैनिक यांच्याप्रती एवढा जिव्हाळा मी अन्य कुणाकडं पाहिला नाही. त्यानिमित्तानं देशपातळीवरचे मोठमोठे विचारवंत आणि नामवंत साहित्यिक उंडाळे येथे येऊन गेले आहेत. मेळाव्यासाठी आलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची ते किती आस्थेनं काळजी घेतात हे मी प्रत्यक्ष पाहिलं आहे.




आजचं माणसाचं एकूण जगणंच बदललंय. राजकारणही बदललंय. रोज नवे चेहरे होर्डिंगवर उगवत असतात. वेगवेगळ्या माध्यमातून नवश्रीमंत वर्ग तयार होतोय. यातल्या अनेकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना धुमारे फुटतात. त्यातले काहीजण राजकारणात टिकतात. काहीजण चव चाखून बाहेर पडतात. नव्या राजकारणात कार्यकर्त्यांना उभं करण्याऐवजी त्यांना मिंधे करण्यावर भर दिला जातो. विलासकाका अशा राजकारणापासून दूर राहिले. त्यांनी माणसं जपली. कार्यकर्ते जपले. माणसं उभी केली. पण मिंधं करून दावणीला बांधण्याच्या वाटेला गेले नाहीत. लोकांच्या मनात घर केल्यामुळंच ते सलग सातवेळा निवडून आले. आठव्या वेळी पराभूत झाले त्याची कारणं वेगळी आहेत. मतदारसंघ बदललेला होता. विरोधात साक्षात मुख्यमंत्री होते. त्यांच्याकडं पक्षाचं चिन्ह नव्हतं. विरोधी उमेदवारांकडं असलेली पैशाची ताकद नव्हती. या सा-याचा परिपाक त्यांच्या पराभवात झाला. खरंतर त्यांच्यासारख्या राजकारण्याचं मूल्यमापन निवडणुकीतल्या जय-पराजयांवरून करणं योग्य ठरत नाही. त्यांच्यासारखे लोकांच्या मनात घर करणारे राजकीय नेते दुर्मीळ असतात. त्याअर्थानं कराड दक्षिण मतदारसंघातली जनता खूप भाग्यवान म्हणायला हवी. विलासकाकांच्या  राजकीय कारकीर्दीचा सुवर्णमहोत्सव अलीकडेच झाला होता. शिवाय पृथ्वीराज  चव्हाण यांच्याशी असलेले मतभेदही कृष्णार्पण झाले होते. अशा वेळी त्यांच्या जाण्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणाचं मोठं नुकसान झालं आहे!


लेखक - महाराष्ट्राचे जेष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक  विजय चोरमारे. 


(लेख सौजन्य - जेष्ठ पत्रकार विजय चोरमारे; फेसबुकवरून साभार)