Tuesday, August 31, 2021

महाराष्ट्राचे राजकारण तिसऱ्या लाटेवर स्वार... ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांचा विशेष लेख...

 


महाराष्ट्राचे राजकारण तिस-या लाटेवर स्वार...


कोविडच्या तिस-या लाटेवर स्वार होऊन महाराष्ट्राचे राजकारण रंगात आले आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. हंड्या फुटू लागल्या आहेत. रंगपंचमीवर बंदी असल्यामुळे चिखलफेक सुरू आहे. आमच्यावर बंधने आणि तुम्ही मात्र मोकाट असे आरोप केले जात आहेत. या गोंधळात सामान्य माणूस मात्र संभ्रमात सापडल्यासारखा झाला आहे. तिसरी लाट येणार म्हणतात ते खरे की, लाट वगैरे थोतांड आहे म्हणतात ते खरे असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. 


काय आहे तिस-या लाटेची वस्तुस्थिती ?


जागतिक आरोग्य संघटनेसह आरोग्य क्षेत्रातील इतरही आंतरराष्ट्रीय संघटनांकडून वारंवार महामारीच्या लाटांचा उल्लेख केला जातो. पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट वगैरे. एका लाटेचा उल्लेख केला जातो तेव्हा त्यामध्ये संबंधित आजाराचे रुग्ण, त्यांची वाढत वाढत एका विशिष्ट उंचीपर्यंत जाणारी आणि पुन्हा कमी कमी होत येणारी संख्या या सगळ्या बदलांचा समावेश असतो. विशिष्ट काळातील रुग्णसंख्येतील चढउतार, रुग्णसंख्येचा उद्रेक आणि त्यांचे किमान पातळीवर येणे म्हणजे लाट.


सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी पहिल्यांदा १८००च्या दशकाच्या अखेरच्या काळात आणि नंतर १९१८ ते १९२९च्या स्पॅनिश फ्लूमध्ये इन्फ्लूएंझाच्या उद्रेकाच्या काळात लाट या संकल्पनेचा पहिल्यांदा वापर केला होता.  या ऐतिहासिक महामारीच्या काळातील निरीक्षणे आणि नोंदींचा वापर आजसुद्धा मोठ्या साथीच्या काळात एखाद्या मॉडेलसारखा केला जातो. कोविड-१९च्या काळातही तज्ज्ञांनी याच मॉडेलच्या आधारे साथीचा चढउतार कसा असू शकेल यासंदर्भातील निष्कर्ष मांडले. आणि आतापर्यंत तरी ते निष्कर्ष बरोबर ठरत आले आहेत.


१९१८मधील इन्फ्लूएंझा महामारी तीन लाटांमध्ये आली आणि इतिहासातील सर्वात गंभीर महामारी होती. त्यामुळे स्वाभाविकच आजच्या काळातही अनुमान काढण्यासाठी त्याचाच आधार घेतला जातो. या महामारीच्या काळात जगभरात सुमारे पाच कोटीहून अधिक लोकांचे मृत्यू झाले होते.त्यावेळी भारतातील मृत्यूंची संख्या सव्वा ते दीड कोटींच्या जवळपास होती. एकूण लोकसंख्येचा पाच टक्के.

त्यावेळी अमेरिकेत फ्लूसारख्या आजाराचा पहिला उद्रेक  मार्चमध्ये आढळला होता. कॅन्ससमध्ये शंभरहून अधिक रुग्ण आढळून आले होते. १९१८मध्ये अमेरिका पहिल्या महायद्धात गुंतली होती. युद्धासाठी तैनात हजारो अमेरिकन सैनिकांनी अटलांटिक ओलांडून प्रवास केल्यामुळे फ्लूचा जगभर प्रसार झाला होता. नोंद घेण्याजोगी बाब म्हणजे पहिल्या महायुद्धामध्ये जी एकूण लष्करी आणि अन्य मनुष्यहानी झाली, त्याहून कितीतरी अधिक लोकांचे बळी या साथीमध्ये गेले होते. या साथीची दुसरी लाट उन्हाळा आणि हिवाळ्याच्या दरम्यान म्हणजेच सप्टेंबर ते डिसेंबरच्या दरम्यान आली होती.


मार्च १९१८मध्ये सुरू झालेल्या आणि १९१९च्य उन्हाळ्यापर्यंत चाललेल्या या साथीच्या काळात तीन वेगवेगळ्या लाटा होत्या. उन्हाळा आणि हिवाळ्यादरम्यानच्या दुस-या लटेत साथ शिगेला पोहोचली होती. या काळात प्रचंड संख्येने मृत्यू झाले. हिवाळा आणि वसंत ऋतुच्या दरम्यान तिसरी लाट आली आणि  या लाटेने मृत्यूंच्या संख्येत आणखी भर घातली. १९१९च्या उन्हाळ्यात तिसरी लाट शमली.




त्यानंतरही साथीचे काही आजार आले. प्रत्येक साथीची तीव्रता कमीजास्त होती, प्रदेशनिहाय वेगवेगळी स्थिती होती. अशा महामारीच्या काळातील परिस्थितीचा अभ्यासही वैद्यकीय तज्ज्ञांनी वेळोवेळी केला आहे. आणि भूतकाळातील या अभ्यासांच्या आधारेच करोनांच्या लाटांसंदर्भात अनुमान मांडले जात आहेत. सप्टेंबरच्या दुस-या आठवड्यात कोविडची तिसरी लाट येणार हे सांगितले जाते, त्यामागे तोच शास्त्रीय आधार आहे. कुणातरी राज्यकर्त्याला वाटले, कुणाला तरी काहीतरी अवैध कामे रेटून न्यायची आहेत म्हणून कोविडच्या लाटेची भीती घातली जात नाही. परंतु शास्त्रीय आधारावर मांडलेल्या निष्कर्षांना खोटे ठरवून स्वतःचा राजकीय अजेंडा चालवणारी मंडळी अत्यंत स्वार्थी आणि लोकविरोधी आहेत, हे ठामपणे सांगायला हवे. राजकीय स्वार्थासाठी ही मंडळी लोकांच्या जिवाशी खेळत आहेत आणि हे अत्यंत क्रूर आहे. 


साथीच्या तीव्रतेच्या काळात मंदिरे नको, हॉस्पिटल बांधा यासारखे मेसेज फॉरवर्ड करणारी मंडळी साथीचा जोर कमी झाल्यावर पुन्हा घंटा वाजवू लागली आहेत. कुणी काय वाजवावे हा ज्यांचा त्यांचा प्रश्न. परंतु शास्त्रशुद्ध  अभ्यासाच्या आधारे मांडलेल्या निष्कर्षांना खोटे ठरवून शहाणपणा पाजळणा-यांना एवढेच सांगावे वाटते, की बाबाहो तुमची दुकाने कायमची बंद झालेली नाहीत. फक्त दोन महिने धीर धरा. सप्टेंबर आणि ऑक्टोबर. फारफारतर नोव्हेंबर अखेरपर्यंत. तिस-या संभाव्य लाटेकडे दुर्लक्ष करणे कदाचित तुम्हालाच महागात पडेल.


दुसरी लाट येणार असं तज्ज्ञ सांगत होते, परंतु पहिली लाट ओसरल्यानंतर करोना गेला म्हणून उन्मादाने बाहेर पडल्यानंतर काय झाले, हे आपण अनुभवले आहे. आपल्या अवतीभवती वावरणारी चांगली चांगली पैसेवाली म्हटली जाणारी माणसंही ऑक्सिजनअभावी तडफडून मरताना पाहिली. आतापर्यतं कोविडनं देशात चार लाखाहून अधिक बळी घेतले आहेत. पहिल्या लाटेत सुमारे दीड लाख आणि दुस-या लाटेत अडीच लाख लोकांना प्राण गमावावे लागले आहेत. राज ठाकरेंना घरात बसून दहीहंडी जोरात करा म्हणायला काही बिघडत नाही. तुम्ही मोठा उत्सव करा, तिथं मी स्वतः किंवा माझा मुलगा येईल, असं ते म्हणाले असते तर त्यांच्या बोलण्याला काही अर्थ होता. थर लावणा-या गरिबांच्या पोरांना चिथावणी देणं शौर्याचं लक्षण नाही. अशामुळं त्या पोरांचं करिअर बाद होतं. राज ठाकरेंच्या आंदोलनांमुळं अशा शेकडो पोरांचं आयुष्य बरबाद झालं आहे.

गेल्यावर्षीचंच उदाहरण घेतलं तर मुंबईत गणपतीच्या काळात लोकांचं एकमेकांच्या घरी जाणं येणं फिरणं वाढलं आणि त्यामुळं साथीचा उद्रेक झाल्याचं आपण पाहिलं आहे. 


प्रश्न लोकांच्या जगण्या-मरण्याचा आहे. दीड वर्षे आपण सहन करतोय. आणखी दोन महिने संयम पाळायचा आहे फक्त. व्यवहार सुरू आहेत. बाकी काही नाही फक्त गर्दी टाळायची आहे.


टाळेबंदीच्या काळात व्यवहार बंद ठेवण्याच्या विरोधात मी सुरुवातीपासून भूमिका मांडत आलो आहे. लॉकडाऊन गरीबविरोधी आहे. मंत्रालयातल्या बाबूंच्या सल्ल्यानं चालणारे सरकार केवळ लोकविरोधी फतवे काढते आणि पोलिस काठ्या आपटत त्याची अंमलबजावणी करतात. त्यातल्या अनेक गोष्टी अव्यवहार्य असतात. सरकार अनेक बाबतीत जबाबदारी झटकत असते. कोविड काळात धंदा बसलेल्या छोट्या व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी आवश्यक संवेदनशीलता महाराष्ट्र सरकारने दाखवलेली नाही. योगायोगाने नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग खाते आले होते, त्यांना मोठी संधी होती, परंतु त्यांनी ती वाया घालवली. लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याची शहरे आणि फारतर गर्दी होतील अशा तालुक्याच्या मोठ्या शहरांमध्येच लॉकडाऊन सक्तीचा करायला पाहिजे. गावोगावचे आठवडा बाजार आणि यात्रा बंद ठेवणे समजू शकते. परंतु आवश्यकता नसताना खेडोपाडीही व्यवहार बंद ठेवण्याची सक्ती केली जाते आणि त्यामुळे हजारो लोकांवर उपासमारीची पाळी येते. खेडोपाडी कुठंही दुकानात, हॉटेलात गर्दी होत नसते.त्यामुळं विनाकारण निर्बंध घालून माणसांचं जगणं अवघड करण्याचं कारण नाही. सरकारी पातळीवरून किमान व्यावहारिक शहाणपण दाखवले तर लॉकडाऊनमुळे सामान्य माणसांच्या जगण्याची जी परवड होते, त्याची तीव्रता निम्म्याने कमी करता येऊ शकते. परंतु अगदी सुरुवातीला नरेंद्र मोदींनी चार तासांचा अवधी देऊन जाहीर केलेल्या लॉकडाऊनपासून जी सरकारी पातळीवरून गरिबांची परवड सुरू झाली आहे, ती थांबवण्यासाठी कुणीही प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत नाही.


परिस्थिती कठीण आहे, हे खरे असले तरी अजून दोन महिने संयम आवश्यक आहे. विरोध मंदिरांना नाही, तर तिथे होणा-या गर्दीला आहे. विरोध दहीहंडीला नाही, तर त्यानिमित्तानं होणा-या गर्दीला आहे. परंतु हे लक्षात न घेता राजकीय दुकानदारी चालवण्यासाठी आततायीपणा केला जातो. एकजण यात्रा काढतो म्हणून दुसरा मेळावा घेतो. तिस-याने मोर्चा काढला म्हणून चौथा रस्त्यावर उतरून राडा करतो. आणि सगळे मिळून लोकांना गर्दी  न करण्याचे आवाहन करतात. जबाबदारी प्रत्येकाची आहे. सरकारची. राजकीय पक्षांची. त्याहीपेक्षा प्रत्येक व्यक्तिची. ऑक्सिजनसाठी टाचा घासण्याची वेळ येते तेव्हा कुणीही जवळ नसतं, हे लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे.


लेखक : - जेष्ठ पत्रकार विजय चोरमारे



Tuesday, August 17, 2021

पुरंदर तालुक्यातील "सॅनिटोरीयम फॉर लेप्रेसी" या कुष्ठरोगी रुग्णांचे पुनर्वसन करणाऱ्या संस्थेला स्वातंत्र्यदिनानिमित्त मिळाला मदतीचा हात; मांडकी येथे 75 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न...



पुरंदर, मांडकी, दि.17 : - पुरंदर तालुक्यातील मांडकी येथील कुष्ठरोगी रुग्णांचे पुनर्वसन करणाऱ्या 'सॅनिटोरियम फॉर लेप्रेसी' या संस्थेला स्वातंत्र्यदिनानिमित्त दानशूर व्यक्तींचा मदतीचा हात मिळाल्यामुळे 75 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात, मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.




'सॅनिटोरीयम फॉर लेप्रेसी पेशंट' या संस्थेच्या प्रांगणातील ध्वजारोहण सोहळा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखाप्रमुख मंगेश गोणे यांच्या हस्ते करण्यात आला. भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांनी भेटवस्तू दिल्या.




"पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखाप्रमुख मंगेश ढोणे व त्यांचे सहकारी मांडकी गावचे माजी सरपंच, उपसरपंच, संस्थेचे चेअरमन व ट्रस्टी व ग्रामस्थ यांच्या सर्वांच्या मदतीतून या संस्थेला गॅस शेगडी, दोन सिलेंडर, रेगुलेटर पाईप सह संपूर्ण कनेक्शन भेट देण्यात आले.



Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers, Click on Below 'Buy Now'

                                 Buy Now


या भेटवस्तूचा लोकार्पण सोहळा पीडीसी बँकेचे अधिकारी महेंद्र भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाला. समाजातील विविध घटकांकडून या संस्थेसाठी मिळणारी मदत फार महत्त्वाची आहे." अशी प्रतिक्रिया पुरंदरचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मानसिंगतात्या जगताप यांनी दिली.




75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त उपस्थित सर्व मान्यवरांचे व देणगीदारांचे स्वागत संस्थेचे मानद सचिव मानसिंगतात्या जगताप यांनी केले. तसेच या संस्थेच्या संपूर्ण प्रवासाबद्दल माहिती दिली. यावेळी सतीश गणपत जगताप यांनी संस्थेतील रुग्णांना पाच किलो जिलेबी दिली व संस्थेच्या किचन रूमला रंगकाम करून देण्याचे जाहीर केले. 



Brand Factory... RED ZONE SALE IS LIVE.. Buy 3 @ Rs 999  Add 3 Products on Cart Use Code : RED999 For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                               Buy Now


तसेच उपाध्यक्ष सुरेश दादा जगताप यांनी ध्वजस्तंभ दुरुस्ती व नवीन पाईप देण्याचे जाहीर केले. तसेच बाळासाहेब डोईफोडे यांनी संस्थेच्या रुग्णांना कपडे व भोजनाची भांडी इत्यादी मदत केली. अशी माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.



BIG BAZAAR MAHA BACHAT... Upto 50% Off On Backery, Dairy & Frozen + Free Product : - 5 Kg Atta, 1Kg Daal & 1Kg Chawal Free on Shopping of Rs 3000 with Maha Bachat E- Voucher.For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                   Buy Now


या कार्यक्रमाप्रसंगी माजी सरपंच सतीश जगताप, उपसरपंच विजय साळुंखे, संस्थेचे चेअरमन संतोष जगताप, उपाध्यक्ष सुरेश जगताप, ट्रस्टी श्रीकांत जगताप, रवींद्र सणस, हनुमंत जगताप, राहुल जगताप, संजीवन जगताप, विष्णू जगताप, संग्राम जगताप, शौर्य जगताप, बँकेचे कर्मचारी भुजबळ उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संस्थेचे चेअरमन संतोष जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले.


Amazing Deal For You...


HP Laptop (Core i 3, 4GB RAM 512GB SSD Windows 10 15.6-inch) (Model No: fr1004tu) For just Rs 39244 (MRP Rs 45710) (Model No: fr100tu) For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                Buy Now






Sunday, August 15, 2021

महाराष्ट्राच्या "या" ४ कर्तृत्ववान पोलिस अधिकारी, शिलेदारांना 'राष्ट्रपती पोलीस पदक' जाहीर; २५ पोलीस शिलेदारांना 'शौर्य पदक', ४५ पोलीस शिलेदारांना प्रशंसनीय सेवेकरिता 'पोलीस पदक' केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जाहीर...

 


नवी दिल्ली, दि. 15 : भारताच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृहमंत्रालय दरवर्षी देशातील उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या पोलिसांच्या शौर्यासाठी, पोलिस पदक जाहीर करते. महाराष्ट्रातील एकूण ७४ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील ४  पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, २५ पोलीस शौर्य पदक  तसेच  प्रशंसनीय सेवेकरिता ४५ ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.



यावर्षी  शौर्य पदक श्रेणीमध्ये  ६३०  व  सेवा पदक श्रेणींमध्ये ७५० असे एकूण १ हजार ३८०  पोलीस पदक जाहीर झाली  आहेत. शौर्य पदक श्रेणीत २ ‘राष्ट्रपती पोलीस पदक’(पीपीएमजी),  तर ६२८ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि  सेवा पदक श्रेणीत विशेष सेवेसाठी ८८ पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम) आणि ६६२ पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण ७४ पदक मिळाली आहेत.

 


शौर्य पदक श्रेणीत २ आणि सेवा पदक श्रेणीत ८८ अशा देशातील एकूण ९० पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांना  उत्कृष्ट सेवेकरिता  ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. यात महाराष्ट्रातील चार अधिकारी –कर्मचाऱ्यांचा समावेश असून  त्यांची नावे पुढील प्रमाणे.



शौर्य पदक श्रेणीत महाराष्ट्राला एक ‘राष्ट्रपती पोलीस पदक’


श्री सुनील दत्तात्रय काळे, हेडकॉन्स्टेबल, केंद्रीय राखीव पोलीस दल. (मरणोत्तर)


सेवा पदक श्रेणीत महाराष्ट्राला एकूण तीन ‘राष्ट्रपती पोलीस पदक’


श्री आशुतोष कारभारी डंबरे, अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि आयुक्त, स्टेट इंटेलिजन्स विभाग, मुंबई.


श्री अशोक उत्तम अहिरे, पोलीस सब इन्स्पेक्टर, ओझर एअरपोर्ट सुरक्षा, नाशिक ग्रामीण.


श्री विनोदकुमार लल्ताप्रसाद तिवारी, पोलीस उप निरीक्षक, एच.एस.पी. यवतमाळ.




शौर्य पदक श्रेणीत राज्यातील एकूण २५ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’


लिंगनाथ नानैय्या पोर्टेट, पोलीस हेडकॉन्स्टेबल


मोरेश्वर पत्रू वेलाडी, नाईक पोलीस कॉन्स्टेबल


बिच्छू पोच्या सिदम, पोलीस कॉन्स्टेबल


श्यामसे ताराचंद कोडापे, पोलीस कॉन्स्टेबल


नितेश गंगाराम वेलाडी, पोलीस कॉन्स्टेबल


गोवर्धन धनाजी कोळेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त


हरी बालाजी एन, आयपीएस, अतिरिक्त पोलीस आयुक्त


प्रविण प्रकाशराव कुलसम, नाईक पोलीस कॉन्स्टेबल


सडवली शंकर आसम, नाईक पोलीस कॉन्स्टेबल


योगेश देवराम पाटील, पोलीस उपनिरिक्षक


सुदर्शन सुरेश काटकर, पोलीस उपनिरिक्षक


रोहिदास शिलुजी निकुरे, हेडकॉन्स्टेबल


आशिष देवीलाल चव्हाण, नाईक पोलीस कॉन्स्टेबल


पंकज सीताराम हलामी, पोलीस कॉन्स्टेबल


आदित्य रवींद्र मडावी, पोलीस कॉन्स्टेबल


रामभाऊ मनुजी हिचामी, पोलीस कॉन्स्टेबल


मोगलशाह जीवन मडावी, पोलीस कॉन्स्टेबल


ज्ञानेश्वर देवराम गावडे, पोलीस कॉन्स्टेबल


राजेंद्र कुमार परमानंद तिवारी, सहाय्यक पोलीस निरिक्षक


विनायक विठ्ठलराव आटकर, पोलीस कॉन्स्टेबल


ओमप्रकाश मनोहर जामनिक, नाईक पोलीस कॉन्स्टेबल


मंजुनाथ हुचप्पा सिंगे, अतिरिक्त पोलीस निरिक्षक


नवनाथ ठकाजी ढवळे, उप विभागीय पोलीस अधिकारी


अरिंदकुमार पुराणशाह मडावी, नाईक पोलीस कॉन्स्टेबल


शिव पुंडलिक गोरले, पोलीस कॉन्स्टेबल



             

                      


सेवा पदक श्रेणीत महाराष्ट्रातील एकूण ४५ पोलिसांना ‘पोलीस पदक’         


श्री मधुकर किसनराव सतपुते, कमांडन्ट, औरंगाबाद.


श्री शेखर गुलाबराव कुऱ्हाडे, उप पोलिस आयुक्त (तांत्रिक), पोलिस मोटर वाहतूक विभाग, नागपाडा, मुंबई.


श्री सुरेंद्र मधुकर देशमुख, सहाय्यक आयुक्त पोलिस, गुन्हे शाखा, पुणे शहर.




श्रीमती. ज्योत्स्ना विलास रसम, पोलिस सहाय्यक आयुक्त, डी.एन. नगर विभाग, नवीन लिंक रोड, अंधेरी (पश्चिम) मुंबई.


श्री ललित रामकृपाल मिश्रा, सहाय्यक कमांडन्ट, नागपुर


श्री मधुकर गणपत सावंत, पोलीस निरीक्षक (सहाय्यक आयुक्त), स्टेट इंटेलिजन्स विभाग, एस.बी. मार्ग, कुलाबा, मुंबई


श्री राजेंद्र अंबादासजी राऊत, सशस्त्र पोलीस निरीक्षक, अमरावती.


श्री संजय देवराम निकुंबे, पोलीस निरीक्षक, खेरवाडी पोलिस स्टेशन, मुंबई.


श्री दत्तात्रय रघुनाथ खंडागळे, पोलीस निरीक्षक, फोर्स वन, गोरेगाव पूर्व मुंबई.


श्री कल्याणजी नारायण घेटे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, ठाणे शहर.


श्री चिमाजी जगन्नाथ आढाव, पोलीस निरीक्षक, भायखळा पोलिस स्टेशन, मुंबई.


श्री नितीन प्रभाकर दळवी, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, डीएन रोड मुंबई.


श्री मोतीराम बक्काजी मडवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, इंटेलिजन्स सेल, गडचिरोळी.


श्री उल्हास सीताराम रोकडे, पोलीस उपनिरीक्षक, डीजीपी कार्यालय कुलाबा, मुंबई.


श्री सुनील जगन्नाथ तावडे, पोलीस उपनिरीक्षक, उत्तर नियंत्रण कक्ष, मुंबई.


श्री सुरेश नामदेव पाटील, पोलीस उप निरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई शहर.


श्री हरिश्चंद्र गणपत ठोबरे, पोलीस उपनिरीक्षक (वरिष्ठ इंटेलिजन्स अधिकारी), स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट, एस.बी. रस्ता, कुलाबा मुंबई.


श्री संजय वसंत सावंत, पोलीस उपनिरीक्षक, रिडर ब्रॉंच, रायगड.


श्री संतोष सीताराम जाधव, पोलीस सब-इन्स्पेक्टर रिझर्व्ह, पोलिस प्रशिक्षण केंद्र, ननवीज दौंड, पुणे.


श्री बाळू भीमराज कानडे, सहाय्यक उपनिरीक्षक, जिल्हा विशेष शाखा, औरंगाबाद ग्रामीण.


श्री विष्णू मैनाजी रकडे, सहाय्यक उप निरीक्षक, अँटी करपशन ब्यूरो, औरंगाबाद.


श्री पोपट कृष्णा आगवणे, सहाय्यक उप निरीक्षक, विशेष शाखा -1, मुंबई.


श्री सुभाष श्रीपत बुरडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलिस हेड क्वार्टर, नागपुर ग्रामीण.


श्री विजय नारायण भोसले, सहाय्यक उप निरीक्षक, विशेष शाखा, पुणे शहर.


श्री पॉल राज अँथनी, सहाय्यक उप निरीक्षक, विशेष शाखा, पुणे शहर.


श्री विनोद आत्माराम विचारे, सहाय्यक उप निरीक्षक, वरळी पोलिस स्टेशन, मुंबई.


श्री भारत कोंडीबा शिंदे, सहाय्यक उप निरीक्षक, एमआयडीसी स्टेशन, अंधेरी पूर्व, मुंबई.


श्री अनंत साहेबराव पाटील, सहाय्यक उप निरीक्षक, गुन्हे शाखा, नाशिक शहर.


श्री ज्ञानदेव रामचंद्र जाधव, सहाय्यक उप निरीक्षक, विशेष शाखा, ठाणे शहर.


श्री सुभाष लाडोजी सावंत, सहाय्यक उप निरीक्षक, व्ही.आर.रोड पोलिस स्टेशन, मुंबई.


श्री नितीन बंडू सावंत, सहाय्यक उप निरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई.


श्री युवराज मानसिंह पवार, सहाय्यक उप निरीक्षक, पोलिस प्रमुख क्वार्टर, ठाणे शहर.


श्री दीपक नानासाहेब ढोणे, सहाय्यक उप निरीक्षक, गुन्हे शाखा, औरंगाबाद शहर.


श्री सुरुअकांत तुकाराम गुलभिले, सहाय्यक उप निरीक्षक, पी.सी.डब्यू.सी. बीड.


श्री विष्णू बहिरू पाटील, हेड कॉन्स्टेबल (इंटेलिजन्स ऑफिसर), राज्य इंटेलिजन्स विभाग, नाशिक ग्रामीण.


श्री संतु शिवनाथ खिंडे, हेड कॉन्स्टेबल/211, पोलिस नियंत्रण कक्ष, नाशिक ग्रामीण.


श्री आनंदा हरिभाऊ भिल्लारे, हेड कॉन्स्टेबल/5412, गुन्हे शाखा, ठाणे शहर.


श्री प्रतापकुमार प्रमोथा रंजन बाला, हेड कॉन्स्टेबल/1945, रीडर ब्राँच, चंद्रपूर.


श्री रशीद रहिम शेख, हेड कॉन्स्टेबल/226, दहशतवाद विरोधी पथक, जालना


डॉ. दिनेश कुमार मिश्रा, सीएमओ (एसजी), सीटीसी, मुदखेड, सीआरपीएफ, नांदेड


श्री गणेशा लिंगाय, पोलीस निरीक्षक, बीएसएफबी, सीबीआय, मुंबई.


श्री मनोज नारायण पाटणकर, कॉन्स्टेबल, बीएसएफबी, सीबीआय, मुंबई


श्री संतोष महादेव पवार, कॉन्स्टेबल, बीएसएफबी, सीबीआय, मुंबई


श्री सुधीर पांडुरंग शिंदे, निरीक्षक, एम/ओ रेल्वे, पुणे.


श्री भीमप्पा देवप्पा सागर, उप निरीक्षक, एम/ओ रेल्वे, पुणे.

 



महाराष्ट्राचा सांस्कृतिक संघर्ष - सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गायकवाड यांचा विशेष लेख....

 


महाराष्ट्रातील संघर्ष हा प्रामुख्याने सांस्कृतिक स्वरुपाचा संघर्ष राहिला आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांच्या प्रशासनात संधी, अधिकार, प्रतिष्ठा आणि वर्चस्व मिळवण्यासाठी ब्राह्मण आणि कायस्थ यांच्यात सुप्त संघर्ष होता. सामाजिकदृष्ट्या ब्राह्मण हे कायस्थांना आपल्यापेक्षा कमी लेखायचे आणि त्यांचा द्वेष करायचे. या संघर्षाचे मूळ महाराजांच्या राज्याभिषेकात होते. ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांच्या क्षत्रियत्वावर आक्षेप घेऊन त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता, तर दुसऱ्या बाजूला कायस्थांनी महाराजांचा राज्याभिषेक झाला पाहिजे अशी भूमिका ठाम घेताना राज्याभिषेकासाठी संपूर्ण सहकार्य केले होते. तात्पर्य असे की हा सांस्कृतिक संघर्ष महाराष्ट्राला नवा नाही, तो जुनाच आहे.


१८९९ साली वेदोक्त प्रकरण घडले. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच राजर्षी शाहू महाराजांच्याही क्षत्रियत्वावर आक्षेप घेण्यात आला. त्यांना वेदोक्ताचा अधिकार नाही म्हणत ब्राह्मणांनी त्यांना टोकाचा विरोध करायला सुरुवात केली. या ब्राह्मणी छावणीचे नेतृत्व टिळक, राजवाडे अशा ब्राह्मण पुढाऱ्यांनी केले. 


या प्रसंगात देखील कायस्थ शाहू महाराजांसोबत उभे राहिले. पुढे वेदोक्त प्रकरणामुळे महाराष्ट्रात ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळीचा जन्म झाला. या चळवळीतून उभा राहिलेला सांस्कृतिक संघर्ष हा महाराष्ट्रातील मूळ संघर्ष आहे. या संघर्षात प्रबोधनकार ठाकरेंनी राजर्षी शाहू महाराजांची बाजू घेतली. सुरुवातीला हा संघर्ष शाहू महाराज विरुध्द टिळक असा चालला. पुढच्या काळात त्याला प्रबोधनकार ठाकरे विरुद्ध न.चि. केळकर असे स्वरुप प्राप्त झाले. त्यातून प्रबोधनकार ठाकरे हे ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळीचे प्रमुख नेतृत्व म्हणून उदयाला आले. मुंबई, पुणे, नाशिक भागात त्यांनी या चळवळ रुजवण्याचे काम केले. 


ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळीची मांडणी करताना प्रबोधनकारांनी अत्यंत जहाल भाषेत ब्राह्मण आणि ब्राह्मण्यावर टीका केली. १९९५-९९ दरम्यान महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना त्यांनी प्रबोधनकारांचे हे साहित्य प्रकाशित केले. महाराष्ट्रभर त्याचा प्रचार प्रसार केला. प्रबोधनकारांच्या साहित्यातून त्यांचे जहाल विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेले.


 लोकांना प्रबोधनकारांचा विचार भावला. त्यातून जी तरुण पिढी घडली ती आपसूक ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळीकडे आकृष्ट झाली. त्यांना लेखणीकडे बघण्याची आणि लिखाणातील Between The Lines अर्थ समजून घेण्याची दृष्टी मिळाली. त्याचकाळात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडच्या चळवळीचे कार्यही याला पूरक असेच सुरु होते. त्यांनीही प्रबोधनकारांचा हा विचार स्वीकारला. प्रबोधनकारांनी जी दृष्टी दिली होती, त्यामुळे जेम्स लेनचे लिखाण कुठल्या विकृत मेंदूतून आले हे इथल्या तरुणांना ओळखता आले आणि त्यातूनच भांडारकर प्रकरण घडले.


ब्राह्मणांनी कायस्थांना शूद्र ठरवल्यामुळे प्रबोधनकार ठाकरे राजर्षी शाहू महाराजांच्या बाजूने आले होते. मात्र आता राज ठाकरे यांनी ब्राह्मणत्व स्वीकारुन आपला प्रबोधनकारांचा वारसा सोडून दिला की काय असा प्रश्न पडतो. आज पुरंदरेंच्या विकृत लिखाणाच्या समर्थनार्थ रक्त आटवताना राज ठाकरे इथल्या पुरोगामी चळवळींवर टीका करतात. परंतु इथल्या इतिहासाचे लेखन हे जातीय दृष्टिकोनातून झाल्याचे मान्य करत नाहीत. 


त्यांच्या माहितीसाठी एकच उदाहरण पुरेसे आहे. इतिहासाची मांडणी करताना "अटकेपार झेंडे पेशव्यांनी लावले आणि मराठ्यांचे पानिपत झाले" अशी चलाखी केली जाते. म्हणजे विजयाचे श्रेय ब्राह्मण पेशव्यांना दिले जाते आणि पराभव मराठ्यांच्या माथी मारला जातो. हा जातीय दृष्टिकोनातून लिहलेला इतिहास नाहीतर दुसरे काय आहे ?


२००३ मध्ये जेम्स लेनच्या लिखाणानंतर महाराष्ट्रात शिवप्रेमींचा विरोध सुरु झाला. जेम्स लेनला विकृत लिखाणासाठी मदत केल्याच्या रागातून पुण्यात शिवसेनेच्या निष्ठावान शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी श्रीकांत बहुलकारांना काळे फासले. तेव्हा शिवसेनेविषयी शिवप्रेमींना एक आस्था निर्माण झाली होती. परंतु त्यावेळी सेनेत असणाऱ्या राज ठाकरेंनी पुण्याला येऊन हात जोडून बहुलकरांची माफी मागितली. शिवसेनेचे तत्कालीन शहराध्यक्ष रामभाऊ पारेख यांचा तडकाफडकी राजीनामा घेतला. राज ठाकरेंच्या या वैयक्तिक भूमिकेमुळे शिवसेनेला अनेक कार्यकर्त्यांची नाराजी घ्यावी लागली होती. 


राज ठाकरेंनी कधीतरी पुरंदरेंना आपण सोलापूरच्या जनता बँक व्याख्यानमालेत जेम्स लेनच्या पुस्तकाचा प्रचार का केला होता आणि तुमच्या “पुरंदरे प्रकाशन” या संस्थेने जेम्स लेनच्या पुस्तकाचे वितरक म्हणून काम केले होते का हे प्रश्न विचारण्याचे धाडस केले पाहिजे. हे जमणार नसेल तर निदान आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी पुरंदरेंच्या इतिहासलेखनाबाबत काय मते नोंदवली आहेत याचा तरी अभ्यास करायला हवा.


१८९९ चे वेदोक्त प्रकरण ते १९९९ ची राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना या दरम्यानचा काळ शंभर वर्षांचा आहे. या शंभर वर्षांच्या काळात झालेल्या मूळ सांस्कृतिक संघर्षाकडे दुर्लक्ष करुन राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर जातीचा मुद्दा मोठा झाला असे विधान करुन भलताच संघर्ष निर्माण करु पाहत आहेत. खरेतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आडून शरद पवारांवर टीका करुन त्यांची बदनामी करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. 


राज ठाकरेंनी राजकीय स्वार्थासाठी पवारांवर टीका करुन दिशाभूल करण्याऐवजी महाराष्ट्राच्या राजकीय स्थित्यंतराचा थोडासा अभ्यास केला तर अनेक गोष्टींचा त्यांना उलगडा होईल. राष्ट्रवादीच्या स्थापनेच्या अनेक वर्ष आधीच भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणात जातीच्या मुद्द्याला जन्म घातला आहे. भाजपने माधवं या राजकीय सूत्राचा अवलंब करुन राज्यात विभागवार माळी, धनगर, वंजारी समाजातील नेतृत्वं उभी केली आणि त्यांच्या आडून "मराठा वगळून राजकारण" हा डाव खेळला.अर्थातच हा सगळा आरएसएस आणि पर्यायाने ब्राह्मणी मेंदूतून आलेला राजकीय विचार होता. राजकारणाच्या माध्यमातून जातीय संघर्षास खो घालणाऱ्या भाजपच्या त्या नितीविषयी राज ठाकरे कधी बोललेले दिसून येत नाहीत. १९८० नंतर महाराष्ट्रात मंडल कमिशनला विरोध करुन उभा केलेला मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष, नामांतर प्रकरणात उभा केलेला मराठा विरुद्ध दलित संघर्ष, हे जरी राजकीय स्वरुपाचे असले तरी त्यात जातीचा मुद्दा केंद्रस्थानी होता. राज ठाकरे या इतिहासाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात.


राज ठाकरेंना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही. राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत दिसत आहे. ठीक आहे, परंतु हा संघर्ष उभा करत असताना त्यांना १८९९ ते १९९९ या शंभर वर्षाच्या काळात महाराष्ट्रात झालेल्या सांस्कृतिक संघर्षाचा आणि आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या वारशाचा विसर पडला आहे, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. त्यांची सध्याची जी काही मांडणी आहे, ती प्रबोधनकार ठाकरेंच्या ब्राह्मणेतर विचारांपासून फारकत घेणारी आणि पुरंदरेंच्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या विचारणसरणीला जवळ करणारी आहे हे मात्र नक्की !


लेखक : -  सामाजिक कार्यकर्ते प्रविण गायकवाड. प्रदेशाध्यक्ष, मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र.






Tuesday, August 10, 2021

"महाराष्ट्रातील 'या' ऐतिहासिक भूमीत पुरंदर किल्ल्यावरील 'स्वराज्याच्या पहिली लढाईच्या' गौरवशाली इतिहासाला उजाळा देणारा ३७३ वा 'शौर्य दिन' साजरा; 'महापराक्रमी सरदार गोदाजीराजे जगताप' यांची स्वराज्याच्या पहिल्या ऐतिहासिक लढाईतील 'शौर्यगाथा' प्रेरणादायी"...



सासवड, दि.10 : - युगपुरुष छत्रपती शिवाजीराजे यांनी स्थापन केलेल्या महान स्वराज्यासाठी अनेक शिलेदारांनी, पराक्रमी सरदारांनी, मावळ्यांनी गौरवशाली कामगिरी करून प्रामाणिकपणे व निष्ठावंतपणे साथ दिली. 




पुरंदर किल्ल्यावरील १० ऑगस्ट १६४८ रोजी झालेल्या स्वराज्याच्या पहिल्या लढाईत महापराक्रमी सरदार वीर गोदाजीराजे जगताप यांनी अतुलनीय पराक्रम दाखवून आदिलशहाचा सरदार फत्तेखानाच्या फौजेचा पराभव करून  फत्तेखानाच्या फौजेतील प्रमुख सरदार मुसेखानाला ठार केले.


 


स्वराज्याच्या या पहिल्या लढाईत वीर सेनापती बाजी पासलकर, सरदार सुभानराव शिळीमकर, वीर यलजी गोते यांनी मोठा पराक्रम दाखवून स्वराज्यासाठी धारातीर्थ पडले. महापराक्रमी सरदार श्रीमंत गोदाजीराजे जगताप प्रतिष्ठानच्या शिलेदारांनी  गौरवशाली इतिहासाला उजाळा देण्यासाठी पुरंदरच्या स्वराज्याच्या पहिल्या लढाईचा शौर्यदिन हा सासवड येथील वीर बाजी पासलकर यांच्या समाधी स्थळी अभिवादन करून व महापराक्रमी सरदार गोदाजीराजे जगताप यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करून हा गौरवशाली 373 वा शौर्यदिन कोरोनाचे नियम पाळून, उत्साहात साजरा केला.




यावेळी सरदार श्रीमंत गोदाजीराजे जगताप प्रतिष्ठानचे खंबीर सभासद मा. नगराध्यक्ष  श्री प्रमोद दादा जगताप, श्री अजयकुमार जगताप, श्री दिलीप दादा जगताप, श्री अनिल तात्या जगताप, श्री दीपक आप्पा जगताप, श्री कैलास जगताप, श्री नंदकुमार जगताप, श्री निलेश जगताप, श्री संतोष दादा जगताप, श्री सुनिल जगताप, श्री शेखर जगताप, श्री संदीप नाना जगताप,श्री संतोष जगताप, श्री गणेश जगताप उपस्थित होते.


"स्वराज्याच्या या पहिल्या ऐतिहासिक लढाईतील विजयाने दूरगामी परिणाम झाले. स्वराज्यातील रयतेचा व सैन्यांचा आत्मविश्वास वाढला. शिवाजीराजेंना स्वराज्य स्थापनेसाठी पाठिंबा वाढला व स्वराज्यस्थापनेची वाट सुकर झाली. आजच्या तरुणपिढीने या गौरवशाली इतिहासातून प्रेरणा घेऊन समाजासाठी चांगले कार्य केले पाहिजे. अशी प्रतिक्रिया इतिहास अभ्यासक अजय कुमार जगताप यांनी दिली.




युगपुरुष शिवाजीराजे यांचे महान स्वराज्य कार्य, गौरवशाली महान इतिहास व स्वराज्याच्या शिलेदारांचा महान इतिहास महाराष्ट्रासाठी तसेच भारत देशासाठीही खूप प्रेरणादायी आहे.


Thursday, August 5, 2021

पुरोगामी राजकारणातला लढवय्या ! - जेष्ट पत्रकार विजय चोरमारे यांचा लोकप्रिय तरुण नेते जितेंद्र आव्हाड यांच्या राजकीय, सामाजिक कारकीर्दीवर प्रकाश टाकणारा विशेष लेख....

 


पुरोगामी राजकारणातला लढवय्या !


राजकीय पक्षाच्या पलीकडं जाऊन राज्यभरातील पुरोगामी विचारधारेच्या युवकांमध्ये लोकप्रिय असलेल्या मोजक्या नेत्यांमध्ये डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा समावेश होतो. अर्थात अशी लोकप्रियता सहजसाध्य नसते आणि मिळाल्यानंतर ती टिकवणंही अवघड असतं. परंतु आव्हाड यांनी दीर्घकाळ भूमिकेतील हे सातत्य टिकवलं आहे, त्यामुळं आजच्या सोशल मीडियाच्या प्रभावाच्या काळात त्यांना आणि पक्षालाही त्यांची भूमिका लाभदायक ठरत आलेली दिसते. विरोधी पक्षात असताना भूमिका घेऊन लढण्यासाठीची सज्जता स्वाभाविक असते, परंतु सत्तेत आल्यानंतर अनेकांचा असा जोश कमी होत असतो. आव्हाड त्याला अपवाद ठरणारे नेते आहेत. सत्तेत येऊन प्रस्थापित झाल्यानंतरही त्यांनी आपल्यातील कार्यकर्त्याचा पिंड जपला आहे. दहीहंडी उत्सव साजरा ठाण्यातील करणारा नेता ते पुरोगामी विचारधारेचा राज्यातील तरुणांचा आवडता नेता हा त्यांचा प्रवास महाराष्ट्राच्या राजकारणात  निश्चितच दखलपात्र ठरणारा आहे.


शरद पवार यांचा युवा अनुयायी म्हणून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास त्यांना आज जिथवर घेऊन आला आहे, त्यामागं त्यांचं पुरोगामी राजकारणातलं सातत्य आणि शरद पवार यांच्यावरील निष्ठा हे दोन घटक कारणीभूत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला गेला, तेव्हा राज्यभरातील शिवप्रेमींनी त्याविरोधात आवाज उठवला. त्यावेळी न्यायमूर्ती पी. बी. सावंत, न्या. बी. जी. कोळसे-पाटील यांच्यासारख्या विचारवंतांपासून ते अनेक पुरोगामी नेत्या-कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शिवसन्मान परिषदांचं आयोजन करण्यात आव्हाड यांचा पुढाकार होता. एकाचवेळी पुरंदरेसमर्थक मंडळी, प्रसारमाध्यमे आणि राज्यसरकार यांच्याविरोधात संघर्ष करण्याची ही भूमिका कुणाही राजकीय कार्यकर्त्यासाठी जोखमीची होती, परंतु राजकीय नफा-नुकसानीचा विचार न करता आव्हाडांनी त्याविरोधात रान उठवले होते.


सुमारे बारा वर्षांपूर्वी ठाण्यात एकदा धार्मिक तणावाची मोठी घटना घडली होती. रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमध्ये दोन समूहांमध्ये संघर्ष उफाळला होता. प्रचंड पोलिस फौजफाटा गोळा झाला होता आणि परिसराची नाकेबंदी केली होती. अशा परिस्थितीमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास संबंधित ठिकाणी जाऊन शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आव्हाडांनी केल्याचे आठवते. तणावग्रस्त परिसरात जाणे धोक्याचे आहे, असे पोलिस सांगत असतानाही आव्हाड तिथं गेले, लोकांशी चर्चा केली, शांततेचं आवाहन करून परत आले होते. तणाव निर्माण करणारे किंवा तणाव निर्माण झाल्यावर आगीत तेल ओतणारे अनेक नेते असतात परंतु तणावग्रस्त परिसरात स्वतः जाण्याची जोखीम आव्हाडांनी तेव्हा घेतली होती. नंतरच्या काळातही सातत्यानं ते अशा प्रकारची जोखीम घेत आले आहेत.


ठाण्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले,त्यावेळची घटना आहे. संमेलनानिमित्त जी स्मरणिका किंवा विशेषांक काढला होता, त्यामध्ये नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करणारा मजकूर होता. त्यावर्षी जन्मशताब्दी असलेल्या व्यक्तिंच्या कार्याचा आढावा घेणारा एक लेख स्मरणिकेत छापला होता आणि संबंधित लेखिकेनं त्यात `पंडित नथुराम गोडसे` यांच्या कार्याचंही गुणवर्णन केलं होतं. संमेलनाचा उदघाटन समारंभ संपता संपताच ही बाब कुणाच्यातरी लक्षात आली आणि अचानक टीव्हीवर त्यासंदर्भातील बातम्या सुरू झाल्या. त्यादिवशी दुपारी जितेंद्र आव्हाड आणि त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले नगरसेवक नारायण पवार हे दोघेजण संमेलनाच्या मंडपात आले. दोघेच होते, कुणी तिसरा कार्यकर्ताही सोबत नव्हता. संमेलनाच्या प्रवेशद्वाराजवळ आव्हाड आलेत म्हटल्यावर काही लोक भोवतीने जमले. काही लोक जमले म्हटल्यावर आणखी काही लोक आले आणि थोडी गर्दी झाली. गर्दी झाली म्हटल्यावर पोलिस हटकायला लागले. तेव्हा आव्हाडांनी त्या पोलिसाला हातातली स्मरणिका दाखवून यात काय लिहिलंय तुम्हाला माहिती आहे का? अशी दरडावून विचारणा केली आणि झापले. तसा तो पोलिस बाजूला झाला. तिथं आव्हाडांनी स्मरणिकेची होळी केली आणि छोटंसं भाषण करून ते आले तसे निघून गेले. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख आश्रयाखाली होणा-या संमेलनात एकट्यानं येऊन अशा रितीनं निषेध नोंदवणं मोठं धाडसाचं काम होतं. ही घटना मी प्रत्यक्ष पाहिली आणि त्यामुळं अस्वस्थ झालेले एकनाथ शिंदेही सायंकाळी पाहायला मिळाले.


शिवसेना-भाजप युतीचं सरकार जाऊन काँग्रेस आघाडीचं सरकार सत्तेवर आलं त्यावेळी सुरुवातीच्या काळात नारायण राणे विरोधी पक्षनेते होते. त्यांनी एकदा आमदारांसह विधानभवनाच्या दारातच धरणे देऊन सत्ताधा-यांना विधानभवनात जाण्यापासून रोखलं होतं. सत्ताधा-यांसाठी कसोटीचा काळ होता. त्यावेळीही ठाण्याहून जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते आल्यानंतर आंदोलकांना तुडवत सत्ताधारी लोक विधानभवनात शिरले होते.


शरद पवार हे सातत्याने काँग्रेससह विरोधकांच्या निशाण्यावर असत. पवारांच्यावर अनेक हल्ले झाले. आता आता पवारांवरील टीकेला प्रत्त्युत्तर देण्यासाठी जयंत पाटील, नवाब मलिक, हसन मुश्रीफ यांच्यापासून अनेक नेते पुढे सरसावतात. परंतु पाच-सात वर्षांपूर्वीची परिस्थिती पाहिली तर पवारांच्यावरील टीकेचे उत्तर देण्यासाठी स्वतः पवारांनाच पुढं यावं लागायचं. त्याव्यतिरिक्त पवारांवरील वार झेलणारी आणि संबंधितांना प्रत्त्युत्तर देणारी जी दोन माणसं होती, त्यापैकी एक होते आर. आर. पाटील आणि  दुसरे जितेंद्र आव्हाड. देवेंद्र फडणवीसांचं सरकार सत्तेवर असतानाही आव्हाडांचा सातत्यानं संघर्ष सुरू असायचा. तो एकीकडं राजकीय स्वरुपाचा असायचा, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे दुस-या बाजूला तो सामाजिक पातळीवरही असायचा. सामाजिक पातळीवर भूमिका घेऊन कोणत्याही विषयाला थेट भिडणं, हे आव्हाडांचं इतर राजकीय नेत्यांहून वेगळेपण आहे. अशा भूमिका घेणं राजकीय नेत्यांना आणि त्यांच्या पक्षांनाही गैरसोयीचं असतं. अशा भूमिका प्रत्येकवेळी पॉलिटिकली करेक्ट असतात असं नव्हे, परंतु त्याचा विचार न करता आव्हाड वेळोवेळी त्या घेत आले आहेत. विरोधात असताना आक्रमक असलेले आव्हाड सत्तेत आल्यानंतर बदलतील, असं अनेकांना वाटत होतं, परंतु मंत्रिपदानंतरही त्यांच्या वृत्तीत फरक पडलेला दिसत नाही.


सामाजिक क्षेत्रात काम करणारा नेता सत्तेच्या राजकारणात किती संवेदनशीलतेनं काम करू शकतो, हे आव्हाडांनी गृहनिर्माण मंत्री म्हणून काम करताना दाखवून दिलं आहे. टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणा-या रुग्णांच्या नातेवाईकांचे किती हाल होत असतात, याची कल्पना त्या अनुभवातून न गेलेल्यांना कळू शकणार नाही. खासदार सुप्रिया सुळे यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर ट्विट करून त्यांनी त्यासंदर्भातील मागणी जाहीरपणे केली. त्याला प्रतिसाद देताना आव्हाड यांनी तातडीनं टाटामध्ये उपचारासाठी येणा-या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी म्हाडातर्फे शंभर फ्लॅट्सची देण्याची घोषणा केली. स्थानिकांच्या तक्रारीमुळे सुरुवातीला त्यासंदर्भात काही मतभेद झाले, परंतु तो प्रश्न मार्गी लागला आहे.


मधल्या अतिवृष्टीच्या काळात महाड तालुक्यातील तळिये गावावर दरड कोसळल्यामुळं अख्खं गावच नामशेष झालं. पुणे जिल्ह्यातील माळीण गावाच्या दुर्घटनेनंतर तशाच प्रकारची ही भीषण दुर्घटना होती. या गावाचं संपूर्ण पुनर्वसन करण्याची जबाबदारी म्हाडाच्यावतीनं स्वीकारल्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. एरव्ही मुंबईकेंद्रित काम करणा-या म्हाडाच्या जाणिवेच्या कक्षा आव्हाड यांनी यानिमित्ताने नुसत्या व्यापकच केल्या नाहीत, तर त्यांना संवेदनशीलतेची जोड दिली. आपल्याकडं असलेले अधिकार तुम्ही नीट समजून घेतले तर किती चांगल्या रितीने काम करता येतं हेच त्यांनी यानिमित्तानं दाखवून दिलं.


मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा निर्णय केवळ आव्हाड यांच्याच नव्हे, तर महाविकास आघाडी सरकारच्या कारकीर्दीतला एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय ठरावा. गेली दोन-तीन दशकं बीडीची चाळींच्या पुनर्विकासाच्या चर्चा सुरु होत्या. अनेक घोषणा झाल्या होत्या, त्यामुळं इथले रहिवासी वर्षानुवर्षे फक्त पुनर्विकासाची स्वप्नं पाहात होते. त्यांची ही उलघाल समजून घेण्यासाठी तेवढीच संवेदनशीलता आवश्यक होती. ज्यांचं बालपण चाळीत गेलं आहे अशा जितेंद्र आव्हाडांनी ती समजून घेतली त्यातूनच हा ऐतिहासिक प्रकल्प मार्गी लागू शकला.


आज आव्हाडांचा वाढदिवस, त्यानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा !


लेखक : - जेष्ठ पत्रकार, विजय चोरमारे 


Tuesday, August 3, 2021

"मला भेटलेला देवदूत"; वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या 'डॉक्टर दिपक जगताप यांच्या किडनी स्टोन वरील विशेष उपचार पद्धतीचा' अनुभव मांडणाऱ्या इतिहास अभ्यासक डॉ. सुवर्णा निंबाळकर यांचा विशेष लेख .. "किडनी स्टोन ऑपरेशन ते विनाऑपरेशन किडनी स्टोन आजार मुक्ती" हा प्रवास वाचा....

 


मला भेटलेले देवदुत

              (धन्वंतरी )


आज मला माझा अनुभव शेअर करावासा वाटतोय. कारण फेसबुकवरील सर्व गृप म्हणजे एक आपले कुटुंबच आहे असे मी मानते .त्यामुळे कुटुंबातल्या व्यक्तीं जवळ आपल्या मनीचे हितगुज सांगायला काहीच हरकत नसते. गेले दोन महिने मी किडनी स्टोनच्या त्रासाने खूपच आजारी होते. मला ११ एम. एम. चा किडनी स्टोन होता. 


परवा पुण्यातील एका नामांकित हाॅस्पिटलमधे एका अलोपॅथी डॉक्टरांची (यूरोलॉजिस्ट) वेळ घेऊन त्यांना दाखवून आले. त्यांनी मला सांगितले ११ एम .एम. चा स्टोन आहे. लवकरात लवकर ऑपरेशन करावे लागेल .ऑपरेशनच्या वेळी एक स्टेंट  टाकणार होते. ती स्टेंट परत तीन आठवड्यांनी  लोकल अनेस्थेशिया देऊन परत काढणार होते. मला अत्यंत टेंन्शन आले .दोन दोन वेळा या प्रक्रियेतून जाणे मला खूप त्रासदायक वाटत होते. 


मागच्या शुक्रवारी मी ऑपरेशन चे पैसे भरायला पुण्यातील एका नामांकित   हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्यादिवशी नेमकी गुरूपौर्णिमा होती. तेथे मला गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक गुरुच भेटले म्हणायचे.त्यांनी मला एक सल्ला दिला.ते म्हणाले मॅडम टेंन्शन नका घेऊ. मी सांगतो तेवढे ऐका डॉक्टर दीपक जगताप हे किडनी स्टोन मास्टर आहेत. आपण अगोदर त्यांची ट्रीटमेंट घेऊन बघा. मी थोडी गोंधळून गेले होते. कशावर विश्वास ठेवावा तेच कळत नव्हते. उद्या तर ऑपरेशन आहे आणि आता इथून पुढे होमिओपॅथी ट्रीटमेंट कशी काय घेणार? घरचे लोक काय म्हणतील? एवढा त्रास होतोय आणि ऑपरेशन कॅन्सल करून होमिओपॅथी ट्रीटमेंट  घ्यायचा डिसीजन कसा काय मनानेच घेतला. कारण या आधी मी कधीच होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली नव्हती. परंतु आॅपरेशन च्या भीतीने मी डॉक्टर दीपक जगताप यांचे टिळक रोडवरील  क्लिनिक गाठले. भरपावसात अगदी झपाटल्यासारखे मी डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये पाय ठेवला. सोनोग्राफीचा रिपोर्ट डॉक्टरांना दाखवले. डॉक्टरांनी रिपोर्ट बघून इतक्या आत्मविश्वासाने मला सांगितले आपले ऑपरेशन करावे लागणार नाही. माझ्या औषधाने आपला स्टोन नक्की पडेल. मला तो एक चमत्कारच वाटत होता. कोणावर विश्वास ठेवावा तेच कळत नव्हते. कारण उद्या ऑपरेशन. एकदा नाही दोनदा तीच प्रकिया. साधारण खर्च एक ते दीड लाख रुपये सांगितलेला आणि हे डॉक्टर तर म्हणतात माझ्या औषधांनी चार ते पाच दिवसात स्टोन पडून जाईल. मी खूप आनंदी झाले. 


त्यादिवशी मला साक्षात डॉक्टर म्हणजे एक देवदूतच आहेत असेच वाटले. 

         ते डॉक्टर म्हणजे साधेसुधे कोणी नसून गोदाजीराव  जगताप यांचे थेट आठवे वंशज व छत्रपती  राजर्षी शाहू महाराज यांच्या सुनबाई  इंदुमती राणीसाहेब यांचे ते वंशज.ईंदुमती राणीसाहेब म्हणजे सासवडच्या शंकरराव पांडुरंगराव जगताप यांच्या कन्या. छत्रपती शाहू महाराजांनी निरखून पारखून घेतलेलं ते शंभर नंबरी सोनं होतं. त्यांचेच वंशज म्हणजे डॉक्टर दीपक जगताप सर . चेहऱ्यावरचे तेज आणि बोलतानाचा आत्मविश्वास हिच त्यांच्या खानदानाची ओळख होती.

          मला फार काही विचार करावा लागला नाही. ही व्यक्ती नक्कीच आपल्याला चांगले मार्गदर्शन करणारी आहे, याची तिथेच मला खात्री पटली होती. डॉक्टरांच्या बोलण्यावरून मला अत्यंत विश्वास  वाटत होता.फक्त औषध च नव्हे तर डॉक्टरांनी  माझ्याबरोबर इंदुमती राणीसाहेबांच्या इतिहासा बद्दल बरीच चर्चा केली. मला दोन गोष्टीचा आनंद झाला होता एक तर मला भेटलेले देवदुत आणि दुसरे म्हणजे गोदाजीराव जगताप आणि इंदुमती राणी साहेबांचे ते वंशज होते.

          डॉक्टरांच्या क्लिनिक मधून घरी परतत असताना माझ्या मनामध्ये खूप मोठा आत्मविश्वास आला होता. घरी आल्यानंतर आठ दिवस व्यवस्थितपणे औषध घ्यायला सुरुवात केली. दर दोन दिवसांनी डॉ. वृषाली मॅडम ना व्हाट्सअप वर मेसेज करायचे. मॅडम खूप त्रास होतो आहे,  पण अजून काही स्टोन पडत नाही .डाॅ.वृषाली मॅडमचे माहेर  कोल्हापूर येथील खानदानी मोरे कुटुंबातील. त्यांच्या आजीं चे बालपण जुन्या राजवाड्यात राजेशाही थाटात  गेलेले.अशा राजेशाही थाटातल्या आजीचा सहवास डॉक्टर वैशाली मॅडमना लाभला होता. त्यामुळे मॅडमच्या बोलण्यात मार्दव आणि आश्वासकता पुरेपूर भरली होती. मॅडम मला इतक्या आत्मविश्वासाने सांगायच्या  काळजी करू नका नक्की स्टोन पडेल. त्यांच्या त्या आश्वासक दोन शब्दावर मी पुढचे दिवस ढकलत जायचे.दोन दिवस खुप त्रास झाला. आज दुपारी अचानक माझा किडनी स्टोन पडून गेला. आजचा दिवस माझ्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा दिवस आहे .कारण दोन महिने मी  काय त्रास सहन केला आहे तो फक्त माझे मलाच माहिती.

         हा माझा अनुभव मला माझ्या सर्व फेसबुकवरील फ्रेंडसबरोबर शेअर करावासा वाटला. डॉक्टर दीपक जगताप म्हणजे मला भेटलेले देवदूतच आहेत. डॉक्टर दीपक जगताप आणि डॉक्टर वृषाली जगताप मला वेळोवेळी धीर देत होत्या. काळजी करू नका स्टोन पडणार तुम्हाला ऑपरेशन नाही करावे लागणार आणि ते त्यांचे बोल आज  खरे ठरले. खूप खूप धन्यवाद डॉक्टर दीपक जगताप आणि डॉक्टर वृषाली जगताप. आता किडनी स्टोन ला घाबरायचे नाही. कारण स्टोन मास्टर आपल्या जवळच हजर आहेत .परत एकदा खूप खूप धन्यवाद डाॅ.जगताप सर आणि डाॅ.वृषाली मॅडम. 

      

       कोणीतरी कधीतरी आपल्याला हात देतं. कोणीतरी कधीतरी आपल्या मार्गावर सावली होतं. कोणीतरी कधीतरी आपल्या जगण्याचा मार्ग सुखकर करतं. ती मदत तो मदतीचा हात त्यांच्या दृष्टीने छोटा असतो कदाचित .पण आपल्या दृष्टीने त्यावेळी तो खूप मौल्यवान असतो.


    

लेखिका : - इतिहास अभ्यासक डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर



महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त; पुरंदर मधील 'कुष्ठरोगी रुग्णांच्या पुनर्वसनाचे' काम करणाऱ्या "सॅनिटोरियम फॉर लेप्रसी" या संस्थेस मिळाला मदतीचा हात...

 


पुरंदर, दि. 3 : - पुरंदर तालुक्यातील कुष्ठरोगी रुग्णांचे पुनर्वसन करणारी वीर - मांडकी येथील सामाजिक संस्था 'सॅनिटोरियम फॉर लेप्रसी पेशंट वीर' या संस्थेस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुवर्णा वसंत केदारी यांनी 2 गिझर व सिद्धनाथ पवार यांनी पाण्याची टाकी भेट दिली.संतोष बोरकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे 1 ऑगस्ट रोजी उद्घाटन झाले. मान्यवरांच्या उपस्थितीत रुग्णांना आवश्यक सुविधांचे लोकार्पण झाले.




राष्ट्रपिता महात्मा  गांधीजी यांच्या प्रेरणेने व त्यांच्याच आदेशाने 1953 साली  "सॅनिटोरियम फॉर लेप्रसी पेशंट वीर" या संस्थेची स्थापना झाली. सध्या या संस्थेत 15 कुष्ठरोगी रुग्ण आहेत.



अक्षर सृष्टी या संस्थेचे अध्यक्ष सिद्धनाथ पवार यांनी या संस्थेतील रुग्णांच्या गरजांची माहिती घेतल्यानंतर सहा जून रोजी या संस्थेला भेट दिल्यानंतर सिरम कंपनीचे व्यवस्थापक अनिल बोरकर यांनी संस्थेच्या रुग्णांकरिता जीवनावश्यक वस्तूंचे किट, वाफेचे मशीन, औषधांचे किट व किराणामालाचे किट देऊन वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला.





या कार्यक्रमा दिवशीच या संस्थेला रुग्णांसाठी गरम पाण्यासाठी गिझरची  आवश्यकता असल्याचे समजल्यामुळे सुवर्णा वसंत केदारी यांनी एक ऑगस्ट रोजी दोन गिझर व सिद्धनाथ पवार यांनी पाण्याची टाकी या संस्थेस भेट दिली.



"समाजातील गरजू घटकांना मदत करणे आमचे कर्तव्य आहे यापुढेही या संस्थेस तसेच रुग्णांच्या  मदतीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू." अशी प्रतिक्रिया अक्षर सृष्टी संस्थेचे अध्यक्ष सिद्धनाथ पवार यांनी दिली.




या संस्थेचे मानद सचिव, पुरंदर चे ज्येष्ठ नेते मानसिंग तात्या जगताप यांनी कार्यक्रमात या संस्थेच्या स्थापनेपासून ते आज पर्यंतच्या  वाटचालीबाबत माहिती दिली व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.



या कार्यक्रमाप्रसंगी संतोष बोरकर, सिद्धनाथ पवार, मानसिंग तात्या जगताप, पुणे जिल्हा बँकेचे संचालक दिगंबर दुर्गाडे, पुरंदर राष्ट्रवादीचे अध्यक्ष माणिकराव झेंडे, अनिल चाचर, निकिता महामुनी, तेजपाल सणस,  महेश साळुंके, संस्थेचे अध्यक्ष संतोष जगताप, सतीश जगताप, सहदेव जगताप, शुभम जगताप, रवींद्र सणस आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश जगताप यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.