पुरंदर, वीर, दि. 25 : - महाराष्ट्रात कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे अनेक कुटुंबातील, कुटुंबप्रमुख मृत्युमुखी पडल्यामुळे शेकडो, हजारो कुटुंबांवरती मोठे संकट कोसळलेले आहे. पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील वीर येथील "अस्तित्व प्रतिष्ठानचे" संस्थापक व संचालक, वंचित व अनाथ मुलांसाठी "गुरुकुल" चालवणारे सामाजिक कार्यकर्ते संतोष वाघ यांचे कोरोना मुळे गेल्या महिन्यात निधन झाले. संतोष वाघ यांच्या दहावीच्या सन 1994 - 95 च्या बॅच मधील सर्व वर्गमित्रांनी मदत निधी गोळा करून वाघ कुटुंबीयांना एक लाख 21 हजार रुपयांची मदत करून माणुसकी समृद्ध करणारा आदर्श निर्माण केला.
अनाथांचा नाथ, समाजात गोरगरीब लोकांना, मित्रांना, विविध माध्यमातून मदत करणारे आणि आपले स्वतःचे घर न बांधता, गोरगरीब, अनाथ मुलांसाठी स्वतःच्या शेतात शाळा, गुरुकुल उभे करणारा असा हाडाचा सामाजिक कार्यकर्ता संतोष वाघ यांचे अचानक निधन झाल्याने वाघ कुटुंबावर मोठे संकट कोसळले. संतोष वाघ यांच्या दहावीतील 1994 - 95 च्या बॅच मधील सर्व मुले व मुली, वर्गमित्रांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून मदत निधी गोळा करून संतोष वाघ यांच्या दोन्ही मुलींच्या नावावर प्रत्येकी पन्नास हजार रुपये फिक्स डिपॉझिट केले. व 21 हजार रुपये रोख आर्थिक मदत त्यांच्या कुटुंबीयांना दिली.
यावेळी वीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ, निजाम मुलाणी, सचिन कापरे, अमोल राऊत, राहुल साबळे व राहुल समगीर हे मित्र परिवार उपस्थित होते. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या संतोष वाघ यांच्या कुटुंबीयांना संतोष वाघ यांच्या दहावीतील सर्व मित्रपरिवाराने केलेली लाख मोलाची मदत माणुसकीची शिकवण देणारी आहे.
"आमच्या मित्राच्या कुटुंबावरती एवढे मोठे संकट कोसळल्यावर माणुसकीच्या नात्याने, मैत्रीच्या नात्याने मदत करणे आमच्या सर्व मित्र परिवाराचे कर्तव्य आहे. अस्तित्व प्रतिष्ठान च्या माध्यमातून, गुरुकुलच्या माध्यमातून संतोष वाघ यांनी गोरगरीब अनाथ मुलांसाठी खूप मोठे सामाजिक कार्य केले आहे." असे वीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी सांगितले.
"आम्हा वर्गमित्रांना एकत्र आणणारा, सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा, गोर गरीबांना मदत मिळवून देणारा, अनाथ,सिंगल पेरन्ट्स मुलांसाठी शाळा उभी करणारा, असा सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा ,आमच्या साठी प्रेरणास्त्रोत असणाऱ्या मित्राला विनम्र अभिवादन. आमच्या मित्राचे प्रेरणादायी सामाजिक कार्य सर्वांच्या स्मरणात कायम राहील." अशी प्रतिक्रिया शिक्षक मित्र निजाम मुलाणी यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
"आम्हा सर्व मित्रांना एकत्र आणणारा, सर्वांशी प्रेमाने आपुलकीने, माणुसकीने वागणाऱ्या आमच्या मित्राचे अचानक निधन होणे हे खूप मोठे दुःख आहे आमच्या सर्व मित्रपरिवारासाठी. सामाजिक बांधिलकीतून आमच्या सर्व वर्गमित्रांनी संतोषच्या कुटुंबाला केलेली मदत आमच्या सर्वांचे कर्तव्य आहे." अशी प्रतिक्रिया राजेंद्र वाघ यांनी दिली.
"वीर येथील अस्तित्व प्रतिष्ठानचे संचालक संतोष वाघ यांचे गेल्याच महिन्यात कोरोनाने निधन झाले. आणि सर्व पंचक्रोशीतील मित्रमंडळींना धक्का बसला. एक सच्चा माणूस, एक चांगला सामाजिक कार्यकर्ता, अनाथांचा नाथ गेल्याची भावना सर्वांच्या मध्ये दिसून आली. आपल्या घरातील कर्ता पुरुष नसल्यावर काय यातना भोगाव्या लागतात? त्या फक्त घरातल्या स्त्रीलाच माहिती असते. घर, प्रपंच चालवताना किती संकटांना तोंड द्यावे लागते? त्या माऊलीला माहित असते. अशा माऊलीचे सगळे दुःख आपण हलके करू शकत नाही, परंतु फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण मदत करणे हे सामाजिक दायित्व आहे. आणि याच भावनेतून इयत्ता दहावीचे 94 - 95 चे बॅच सर्व मुले व मुली यांनी मिळून संतोष वाघ यांच्या कुटुंबियांना एक लाख 21 हजार ची जी मदत केलेली आहे व या कुटुंबाला जो आर्थिक आधार दिलेला आहे तो खरंच प्रेरणादायी आहे. या उपक्रमाबद्दल सर्व मुला-मुलींचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे. समाजातील प्रत्येक घटकाने सोशल मीडियाचा असा विधायक उपयोग करून माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून द्यावे." असे दैनिक पुढारीचे अभ्यासू पत्रकार शिवदास शितोळे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना सांगितले.
"समाजातील दुर्लक्षित, पीडित घटकांसाठी निस्वार्थपणे, प्रामाणिकपणे कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्रात खूप कमी आहेत. संतोष वाघ यांनी गोरगरीब, अनाथ मुलांसाठी केलेले निस्वार्थी, प्रामाणिक, सामाजिक कार्य कायम सर्वांच्या लक्षात राहील. सामाजिक कार्यकर्ते संतोष वाघ यांचे कोरोनामुळे, अचानक झालेले निधन सर्वांसाठी धक्कादायक आणि वेदनादायी आहे. वाघ कुटुंबावर एवढे मोठे संकट कोसळल्यानंतर, संतोष वाघ यांच्या दहावीच्या सन 1994 - 95 च्या बॅचमधील सर्व वर्गमित्रांनी मदत निधी गोळा करून एक लाख 21 हजार रुपयांची वाघ कुटुंबाला केलेली मदत माणुसकी समृद्ध करणारी आहे." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.
कोरोना महामारीच्या काळात समाजातील सर्वच घटकांना फटका बसलेला आहे. अशावेळी समाजातील सर्वच लोकांनी माणुसकी जपणं खूप महत्त्वाचे आहे.
Factful , a very nice social message to all of us.
ReplyDelete