Tuesday, May 4, 2021

महाराष्ट्राच्या "या सामाजिक योद्ध्याने" 'आई व पत्नीचे दागिने गहाण ठेवून पुणे शहरात सुरू केले "छत्रपती शिवाजी महाराज कोविड - १९ हॉस्पिटल'; महाराष्ट्राच्या या "सामाजिक योद्ध्याला" तरूणाईचा सलाम...



पुणे, दि. 4 : –  कोरोना महामारीने  महाराष्ट्रात  भयानक परिस्थिती निर्माण केलेली आहे. पुणे शहरातील  कोरोना संसर्ग  खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.  रुग्णांना  ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर बेड, मिळत नाहीत.  पुणे शहरातील आरोग्य व्यवस्था  कोलमडलेली आहे. अशा परिस्थितीत रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी पुण्यातील धानोरी येथे अवघ्या काही दिवसातच ५३ बेडचे सुसज्ज "छत्रपती शिवाजी महाराज  covid-19 हॉस्पिटल" सुरू केले. 




"कोरोना  महामारीमुळे  नागरिकांमध्ये खूप भीती आहे. कोरोना संसर्ग खूप वेगाने वाढलेला आहे. रुग्णांना वेळेवर बेड मिळत नाहीत. औषधे मिळत  नाहीत  अश्या परिस्थितीत लोक आजाराला घाबरण्यापेक्षा उपचार मिळत नाहीत, याप्रकाराला घाबरून जात आहेत. यामध्ये तरुण रुग्णांच्या मृत्यूनंतर सगळीकडे भीतीची लाट पसरली आहे. ज्यावेळी प्रयत्न करूनही बेड उपलब्ध होतच नाहीत हे लक्षात आल्यानंतर आम्ही स्वतःचे हॉस्पिटल निर्माण करण्याचे ठरविले. यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अनेक अडचणींचा सामना करून रुग्णांच्या सेवेत हे "छत्रपती शिवाजी महाराज कोविड - 19 हॉस्पिटल" सज्ज झालेले आहे अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते, रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.



उमेश चव्हाण यांचे जवळचे मित्र विकास साठे, शांताराम खलसे, श्रीराम पाटील, दशरथ माटवणकर, अर्चना प्रधान यांनी मदतीचा हात पुढे केला, तर 'अडचणीच्या प्रसंगी उमेश चव्हाण यांनी स्वतःचे घरातील पत्नी आणि आईचे पस्तीस तोळे दागिने गहान ठेऊन तीस लाखांची जुळवाजुळव करून हे हॉस्पिटल अल्पावधीत म्हणजे अगदी सात दिवसात उभे केले.'




डॉ. सलीम आळतेकर, डॉ. किशोर चिपोळे, गिरीश घाग, कुणाल टिंगरे, अपर्णा साठे यांनी हे हॉस्पिटल उभारण्यात मोलाची कामगिरी बजावली. यामध्ये पुणे मनपाचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती आणि पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे तसेच डॉ. अमोल देवळेकर यांनी या हॉस्पिटल उभारण्यासाठी केलेली मदत खूप महत्त्वाची आहे.




रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे रुग्णांच्या न्याय हक्कांसाठी निस्वार्थपणे  व प्रामाणिकपणे काम करून, वेगवेगळ्या रुग्णालयात रुग्णांना सेवा देऊन उमेश चव्हाण यांनी रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून "छत्रपती शिवाजी महाराज कोविड – १९ हॉस्पिटल" निर्माण करून महाराष्ट्रात एक मोठा आदर्श निर्माण केलेला आहे. महाराष्ट्राला अश्या आदर्श रूग्णसेवकांची, सामाजिक योद्ध्यांची खूप गरज आहे.




"आमच्या कोविड हॉस्पिटलमध्ये गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज पडली तर तशी व्यवस्था केलेली आहे. कोरोना महामारीने समाजातील सर्वच घटकांचे कंबरडे मोडले आहे पण येणाऱ्या काही महिन्यात कोरोनाचा संसर्ग कमी होईल अशी प्रतिक्रिया आदर्श रुग्णसेवक उमेश चव्हाण यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




रुग्ण हक्क परिषदेचे उमेश चव्हाण यांचे रुग्णसेवेचे हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद व समाजातील सर्व घटकांना प्रेरणादायी आहे.


3 comments:

  1. अतिशय अभिमानास्पद...
    कोरोनाचा सामना करण्यात अपयशी ठरलेल्या राजकिय पुढाय्रांच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारं कार्य केलं आहे उमेश चव्हाणांनी...
    त्यांचे विशेष अभिनंदन...
    सचिन शिंदेपाटील

    ReplyDelete