बार्शी, सोलापूर, दि. 2 : - महाराष्ट्राचे प्रेरणास्थान युगपुरुष छत्रपती शिवाजीराजे यांचे महान गड - किल्ले महाराष्ट्राच्या जनतेला महान इतिहासाची प्रेरणा देऊन जगण्याचा नवीन मार्ग दाखवत असतात. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील बावी गावची शिवाज्ञा अंबरिष श्रीखंडे या दीड वर्षाच्या चिमुकल्या हिरकणीने अचंबित करणारा, बालवयात साहस दाखवणारा, तरुणाईला प्रेरणा देणारा पराक्रम करून दाखवला, रायगड सारखा अभेद्य, बलाढ्य, ऐतिहासिक किल्ला दीड वर्षाच्या चिमुकलीने पायी सर केला.
जिथं मोठया वयोगटातील लोकांना भीती वाटते तिथं ही दीड वर्षांची शिवाज्ञा पळत होती, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाला आसुसल्याने गड चढताना भान हरपून गेली होती, तिच्या चालण्याला लोकांचा आदर भेटत होता, तिचं कौतुक केलं जात होत, आणि या गोष्टी सर्वांचा उत्साह वाढवत होत्या.
शिवाज्ञाला तिच्या आई, वडिलांनी तिच्या एवढंच लहान होऊन चालण्यास मदत केली, कधी मागून धक्का दिला तर कधी तोंडातून गाडीचा आवाज काढायचा. कारण उंच चढ आला की तिचे तोल जायचे. मग तिला मागून धक्का द्यावा लागायचा. कधी मोठ्या पायऱ्या आल्यावर पण तिला थोडी मदत करावी लागायची. पण ती सहसा हात लावून द्यायची नाही, लोकं ती जवळ आली की तिला रस्ता करून द्यायचे.
रायगड किल्ला सर करताना समोरून येणारे लोक सुद्धा थांबून पहायचे. फोटो काढायचे. याकडे तिचं लक्ष नसायचं. तिचं आपलं गुणगुणत चालणं चालूच असायचं.
"जवळपास कूठे छत्रपती शिवाजी महाराज की म्हणलं की ही जय म्हणायला विसरायची नाही, मुलगी प्रत्येक घरात हवी पण मुलीला परक्याच धन म्हणुन हिनवल जात.
उमलायच्या अगोदर कळ्या तोडल्या जातात.मुलीला भार समजलं जातं,त्याच जनमाणसात माझ्या चिमुकलीनं बापाची आवड,आनंद शोधला आणि त्यात जणू भर टाकली.
पप्पा मला रायगडला यायचंय इथं पर्यंत ठीक आहे पण पप्पा मी तुमच्यावर भार नाही होणार. मी लहान असले म्हनून काय झालं, मी तुमच्या बरोबरीन रायगड चढणार असा आंतरिक आवाज मी समजू शकलो.
रायगडच्या पायथ्याला पोहचताच मला चालू द्या म्हणुन रडणाऱ्या माझ्या चिमुकलीत जणू मला मांसाहेब जिजाऊच दिसल्या, म्हणून माझं प्रामाणिक मत आहे त्यांना संधी द्या, कारण घरात अगोदर जिजाऊ घडणं गरजेचं आहे मग शिवाजी महाराज नक्की घडतील, त्या तुमच्यावर भार कधीच होणार नाहीत तर तुमची स्वप्न तुमच्या कार्यात सर्वात पुढं हिरारीनं झोकून देणाऱ्या बापाच्या लाडक्या मुली असतात. हे माझ्या चिमुकलीनं रायगड सर करून दाखवून दिलं आहे." अशी प्रतिक्रिया शिवाज्ञाचे वडील अंबरीश श्रीखंडे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
व्हिडीओ : -
"या लहानश्या चिमुकलीने पडत, सावरत रायगड सर केला. अत्तापर्यंत एवढ्या लहान वयात रायगड सर करणारी कदाचित ही पहिलीच असेल, खरंच रायगड आणि रायगडचा राणा हे प्रचंड मोठे ऊर्जास्रोत आहेत, हेच या चिमुकलीने दाखवून दिलं आहे.तिच्या या साहसी कामगिरीच्या व्हिडीओमुळे यापुढे कोणीही सहकुटूंब कधीही निःसंकोचपणे रायगड पायी चढतील आणि तेंव्हाच त्यांना रायगडची अथांगता दिसेल. ती अनुभवता येईल आणि महाराजांच्या दूरदृष्टीची एक अनुभूती येईल की महाराजांनी रायगडच का निवडला असेल राजधानीसाठी, कारण रायगड अनेक कलागुंणसंपन्नतेचा समुच्चय आहे. हे पण पायी जाऊन पाहिल्यावरच समजते." अशी प्रतिक्रिया अंबरीश श्रीखंडे यांनी दिली.
दीड वर्ष वयाच्या चिमुकलीने, शिवाज्ञाने अद्भूत कामगिरी करत, अभेद्य रायगड सर करून महाराष्ट्राच्या तरुणाईसाठी प्रेरणादायी कामगिरी केली आहे. तिला मिळालेले आई - वडिलांचे संस्कार, मार्गदर्शन, प्रोत्साहन खूप महत्वाचे आहे.
No comments:
Post a Comment