Friday, May 14, 2021

"शिववंश - शोध छत्रपतींच्या अजून एका थेट शाखेचा;" छत्रपती वंशाचा एक अपरिचित इतिहास "शिववंश" या आगामी संशोधनात्मक ग्रंथातून इतिहास अभ्यासक करणसिंह बांदल मांडत आहेत या विषयावरील सह्याद्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी गणेश खुटवड यांचा खास लेख....

 


शिववंश....

(शोध छत्रपतींच्या अजून एका थेट शाखेचा...)


वरील शिर्षक वाचल्यावरच आपला गोंधळ उडाल्याशिवाय राहणार नाही, कि छत्रपतींची अजून एक शाखा म्हणजे नक्की काय प्रकार आहे?


खरंतर आपल्या पराक्रमी बापजाद्यांनी आपल्यासाठी इतिहासात एवढं काही पेरून ठेवलय कि आज स्वराज्यस्थापनेला ४०० वर्षे होत आली तरी आपण त्याची फळे घेत आहोत.


मराठेशाहीचा इतिहास आणि छत्रपती घराण्याची वंशावळ यावर दिवसेंदिवस जितका अभ्यास व संशोधन होईल तेवढा नवीन अपरिचित इतिहास जगासमोर येत राहील.




असाच छत्रपती वंशाचा एक अपरिचित इतिहास शिववंश या संशोधनात्मक ग्रंथातून आपणासमोर येत्या काही दिवसांत येत आहे.


१२ मावळच्या हिरडस मावळ मधील ज्या बांदल घराण्यातील ३०० वीरांनी पावनखिंडीत आपल्या प्राणाचे बलिदान दिले व छत्रपती शिवरायांना सुखरूप विशाळगडावर पोचवलं त्याच बांदल घराण्यातील सुपुत्र श्रीमंत करणसिंह नाईक बांदल यांच्या अभ्यासातून व संशोधनातून या शिववंश ग्रंथाची निर्मिती होत आहे.




आजवर आपल्याला सातारा व करवीर(कोल्हापूर) या २ छत्रपतींच्या शाखेबद्दल(वारसदार) माहिती होती, पण या संशोधनातून छत्रपती शिवरायांच्या अजून एका थेट शाखेची ओळख आता जगाला होणार आहे.


छत्रपती शिवरायांचे २ सुपुत्र, १)छत्रपती संभाजी महाराज व २)छत्रपती राजाराम महाराज.

छत्रपती राजाराम महाराज यांचे वारस म्हणजे आत्ताचे करवीर(कोल्हापूर) छत्रपती घराणे.

तसेच छत्रपती संभाजी महाराज यांचे वारस म्हणजे आत्ताचे सातारा छत्रपती घराणे.




छत्रपती संभाजी महाराज यांना महाराणी येसूबाई यांच्यापासून एकच मुलगा(थोरले शाहू महाराज) असल्याचे आजवर आपल्याला माहीत होते, परंतू छत्रपती संभाजी महाराज यांचे अजून एक अधिकृत लग्न झाल्याचे पुरावे सापडले आहेत. सिंदखेडराजा येथील जाधवराव घराण्यातील दुर्गाबाई यांच्याशी त्यांचा विवाह १६७५ साली झाला होता. एवढेच नव्हे तर दस्तरखुद्द छत्रपती शिवरायांच्या समक्ष हा विवाह झाल्याची नोंद मिळाली.


छत्रपती संभाजी महाराज व महाराणी दुर्गाबाई यांना एकूण ४ अपत्ये झाली त्यापैकी २ मुले व २ मुली. मुलींची पुढील तपशील नोंद सापडत नाही पण २ मुलांची अधिकृत नोंद सापडते, मदनसिंह व माधवसिंह हे त्यांचे २ सुपुत्र होते.



ज्यावेळी १६८९ साली छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला व राजधानी रायगड मुघलांच्या हाती लागला, त्यावेळेस गडावरील छत्रपती घराण्यातील व आप्तेष्ठ मंडळींमधील २३ जणांचा कुटुंबकबीला मुघल सैन्य ताब्यात घेतात. त्या २३ जणांमध्ये महाराणी येसूबाई व बाल शिवाजीराजे(थोरले शाहू) यांच्यासहीत महाराणी दुर्गाबाई, मदनसिंह व माधवसिंह यांनाही मुघल सैन्याने कैद करून नेल्याची नोंद मिळाली.




छत्रपती संभाजी महाराज यांच्या आजवर अपरिचित राहिलेल्या या २ मुलांचं पुढे काय झाल?

मदनसिंह व माधवसिंह यांचे आजचे म्हणजेच छत्रपतींचे थेट वंशज काय करतात व कोठे राहतात?

१७०७ साली थोरले शाहू महाराज मुघल कैदेतून सूटून आल्यावर इतर लोकांची सुटका करण्यासाठी थोरले शाहू महाराज व मदनसिंह यांनी काय योजना आखली?

छत्रपती संभाजी महाराज यांच्या क्रूर हत्येचा बदला मराठे कसा घेतात?

श्रीमंत मदनसिंह संभाजीराजे भोसले हे त्यांच्या काळात काय पराक्रम गाजवतात?

यांसारख्या अनेक अपरिचित प्रश्नांची उत्तरे आपणा सर्वांना लवकरच शिववंश या ग्रंथातून पुराव्यासहीत मिळतील.



छत्रपती संभाजी महाराजांची दुसरी पत्नी महाराणी दुर्गाबाई यांच्यावर आजवर चुकीच्या इतिहासकारांनी लावलेला उपस्त्री किंवा नाटकशाळा स्त्री हा डाग श्रीमंत करणसिंह बांदल यांच्या या ग्रंथातून निश्चितपणे पुसला जाईल व ३५० वर्षांनंतर मराठ्यांच्या अजून एका महाराणीला व छत्रपतींच्या अजून एका थेट शाखेला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल हिच अपेक्षा यानिमित्ताने करतो..


!! जय शिवराय, जय शंभूराजे !!


लेखक : - सहयाद्री प्रतिष्ठान पदाधिकारी, भोर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश खुटवड(पाटील)






No comments:

Post a Comment