Monday, May 31, 2021
'पुणे शहरातील कोरोनाचे निर्बंध शिथिल'; "कोरोना पूर्णपणे संपलेला नाही, आपल्याला तिसरी लाट सामूहिकपणे रोखायचीय, तुम्हा सर्वांच्या साथी शिवाय शक्य नाही" - महापौर मुरलीधर मोहोळ
Tuesday, May 25, 2021
"कोरोनामुळे निधन पावलेल्या मित्राच्या कुटुंबीयांच्या मदतीला धावून आले 'दहावीचे वर्गमित्र'; एक लाख 21 हजार रुपयांची मदत करून, जपली माणुसकी....
पुरंदर, वीर, दि. 25 : - महाराष्ट्रात कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे अनेक कुटुंबातील, कुटुंबप्रमुख मृत्युमुखी पडल्यामुळे शेकडो, हजारो कुटुंबांवरती मोठे संकट कोसळलेले आहे. पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील वीर येथील "अस्तित्व प्रतिष्ठानचे" संस्थापक व संचालक, वंचित व अनाथ मुलांसाठी "गुरुकुल" चालवणारे सामाजिक कार्यकर्ते संतोष वाघ यांचे कोरोना मुळे गेल्या महिन्यात निधन झाले. संतोष वाघ यांच्या दहावीच्या सन 1994 - 95 च्या बॅच मधील सर्व वर्गमित्रांनी मदत निधी गोळा करून वाघ कुटुंबीयांना एक लाख 21 हजार रुपयांची मदत करून माणुसकी समृद्ध करणारा आदर्श निर्माण केला.
अनाथांचा नाथ, समाजात गोरगरीब लोकांना, मित्रांना, विविध माध्यमातून मदत करणारे आणि आपले स्वतःचे घर न बांधता, गोरगरीब, अनाथ मुलांसाठी स्वतःच्या शेतात शाळा, गुरुकुल उभे करणारा असा हाडाचा सामाजिक कार्यकर्ता संतोष वाघ यांचे अचानक निधन झाल्याने वाघ कुटुंबावर मोठे संकट कोसळले. संतोष वाघ यांच्या दहावीतील 1994 - 95 च्या बॅच मधील सर्व मुले व मुली, वर्गमित्रांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून मदत निधी गोळा करून संतोष वाघ यांच्या दोन्ही मुलींच्या नावावर प्रत्येकी पन्नास हजार रुपये फिक्स डिपॉझिट केले. व 21 हजार रुपये रोख आर्थिक मदत त्यांच्या कुटुंबीयांना दिली.
यावेळी वीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ, निजाम मुलाणी, सचिन कापरे, अमोल राऊत, राहुल साबळे व राहुल समगीर हे मित्र परिवार उपस्थित होते. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या संतोष वाघ यांच्या कुटुंबीयांना संतोष वाघ यांच्या दहावीतील सर्व मित्रपरिवाराने केलेली लाख मोलाची मदत माणुसकीची शिकवण देणारी आहे.
"आमच्या मित्राच्या कुटुंबावरती एवढे मोठे संकट कोसळल्यावर माणुसकीच्या नात्याने, मैत्रीच्या नात्याने मदत करणे आमच्या सर्व मित्र परिवाराचे कर्तव्य आहे. अस्तित्व प्रतिष्ठान च्या माध्यमातून, गुरुकुलच्या माध्यमातून संतोष वाघ यांनी गोरगरीब अनाथ मुलांसाठी खूप मोठे सामाजिक कार्य केले आहे." असे वीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी सांगितले.
"आम्हा वर्गमित्रांना एकत्र आणणारा, सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा, गोर गरीबांना मदत मिळवून देणारा, अनाथ,सिंगल पेरन्ट्स मुलांसाठी शाळा उभी करणारा, असा सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा ,आमच्या साठी प्रेरणास्त्रोत असणाऱ्या मित्राला विनम्र अभिवादन. आमच्या मित्राचे प्रेरणादायी सामाजिक कार्य सर्वांच्या स्मरणात कायम राहील." अशी प्रतिक्रिया शिक्षक मित्र निजाम मुलाणी यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
"आम्हा सर्व मित्रांना एकत्र आणणारा, सर्वांशी प्रेमाने आपुलकीने, माणुसकीने वागणाऱ्या आमच्या मित्राचे अचानक निधन होणे हे खूप मोठे दुःख आहे आमच्या सर्व मित्रपरिवारासाठी. सामाजिक बांधिलकीतून आमच्या सर्व वर्गमित्रांनी संतोषच्या कुटुंबाला केलेली मदत आमच्या सर्वांचे कर्तव्य आहे." अशी प्रतिक्रिया राजेंद्र वाघ यांनी दिली.
"वीर येथील अस्तित्व प्रतिष्ठानचे संचालक संतोष वाघ यांचे गेल्याच महिन्यात कोरोनाने निधन झाले. आणि सर्व पंचक्रोशीतील मित्रमंडळींना धक्का बसला. एक सच्चा माणूस, एक चांगला सामाजिक कार्यकर्ता, अनाथांचा नाथ गेल्याची भावना सर्वांच्या मध्ये दिसून आली. आपल्या घरातील कर्ता पुरुष नसल्यावर काय यातना भोगाव्या लागतात? त्या फक्त घरातल्या स्त्रीलाच माहिती असते. घर, प्रपंच चालवताना किती संकटांना तोंड द्यावे लागते? त्या माऊलीला माहित असते. अशा माऊलीचे सगळे दुःख आपण हलके करू शकत नाही, परंतु फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण मदत करणे हे सामाजिक दायित्व आहे. आणि याच भावनेतून इयत्ता दहावीचे 94 - 95 चे बॅच सर्व मुले व मुली यांनी मिळून संतोष वाघ यांच्या कुटुंबियांना एक लाख 21 हजार ची जी मदत केलेली आहे व या कुटुंबाला जो आर्थिक आधार दिलेला आहे तो खरंच प्रेरणादायी आहे. या उपक्रमाबद्दल सर्व मुला-मुलींचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे. समाजातील प्रत्येक घटकाने सोशल मीडियाचा असा विधायक उपयोग करून माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून द्यावे." असे दैनिक पुढारीचे अभ्यासू पत्रकार शिवदास शितोळे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना सांगितले.
"समाजातील दुर्लक्षित, पीडित घटकांसाठी निस्वार्थपणे, प्रामाणिकपणे कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्रात खूप कमी आहेत. संतोष वाघ यांनी गोरगरीब, अनाथ मुलांसाठी केलेले निस्वार्थी, प्रामाणिक, सामाजिक कार्य कायम सर्वांच्या लक्षात राहील. सामाजिक कार्यकर्ते संतोष वाघ यांचे कोरोनामुळे, अचानक झालेले निधन सर्वांसाठी धक्कादायक आणि वेदनादायी आहे. वाघ कुटुंबावर एवढे मोठे संकट कोसळल्यानंतर, संतोष वाघ यांच्या दहावीच्या सन 1994 - 95 च्या बॅचमधील सर्व वर्गमित्रांनी मदत निधी गोळा करून एक लाख 21 हजार रुपयांची वाघ कुटुंबाला केलेली मदत माणुसकी समृद्ध करणारी आहे." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.
कोरोना महामारीच्या काळात समाजातील सर्वच घटकांना फटका बसलेला आहे. अशावेळी समाजातील सर्वच लोकांनी माणुसकी जपणं खूप महत्त्वाचे आहे.
Sunday, May 23, 2021
"इतिहास अभ्यासक तुमचा खोटारडेपणा समोर आणतील आणि जागृत शिवप्रेमी तुमचे थोबाड काळे करतील"....युवा लेखक अनिल माने यांचा विशेष लेख..."रीनैसंस स्टेट" या गिरीश कुबेरांच्या पुस्तकातील छत्रपती संभाजीराजे, छत्रपती घराण्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह, चुकीच्या, बदनामीकारक लेखनाला, इतिहास अभ्यासक व युवा लेखक अनिल माने यांनी दिले सणसणीत, अभ्यासपूर्ण उत्तर...
लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी त्यांच्या “Renaissance State” पुस्तकात छत्रपती घराण्याविषयी बदनामीकारक मजकूर लिहल्याने शिवप्रेमींमध्ये संताप आहे. कुबेर यांच्या पुस्तकात असणारे काही वादग्रस्त मुद्दे पुढीलप्रमाणे : -
१) छत्रपती संभाजी महाराजांनी आपला वारसाहक्क मिळवण्यासाठी महाराणी सोयराबाई यांच्यासह शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील अनमोल प्रतिभावान मंत्र्यांना ठार केले.
२) छत्रपती संभाजी महाराज अत्यंत धाडसी असले तरी त्यांच्यात वडिलांकडे असणाऱ्या संयम आणि मुत्सद्दीपणाची कमतरता होती.
३) इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांशी जुळणारे कोणी व्यक्तिमत्त्व असेल तर ते बाजीराव पेशवे आहेत.
गिरीश कुबेर हे अर्थशास्त्राचे चांगले अभ्यासक आहेत, पण छत्रपती घराण्याच्या इतिहासाविषयी त्यांचा जास्त अभ्यास नसल्याचे दिसते. त्यांच्या मुद्द्याची छाननी केली असता आपणास ते कळून येईल.
१) छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाप्रसंगी युवराज म्हणून संभाजीराजांना मान मिळाला होता. शिवरायांच्या पश्चात संभाजीराजेच स्वराज्याचे छत्रपती बनणार होते हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची आवश्यकता नव्हती. वारसाहक्कासाठी संभाजीराजांनी सोयराबाईंना ठार केले हा मल्हार रामराव चिटणीसाच्या डोक्यातून बाहेर आलेला केवळ एक आरोप आहे. त्याचीच री गिरीश कुबेरांनी ओढली आहे. वास्तविक चिटणीस सांगतो ती घटना घडल्यापासून महाराणी सोयराबाई एक वर्ष जीवंत होत्या. ऑगस्ट १६८० मधील एका पत्रात छत्रपती संभाजीराजांनी सोयराबाईंबद्दल “स्फटिकाप्रमाणे निर्मळ मनाची माता” असे उद्गार काढले होते. संभाजीराजे आणि महाराणी सोयराबाई यांच्यात कसलाही कलह नव्हता. राहिला विषय छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांचा तर आपल्याविरुद्ध कट केल्यानंतरही त्यांना एकदा मोठ्या मनाने माफ करुन मंत्रिमंडळात घेणारे छत्रपती संभाजीराजेच होते. या मंत्र्यापैकी काहींनी स्वराज्यद्रोह करण्याचा प्रयत्न केला, त्याचीच शिक्षा म्हणून त्यांना हत्तीच्या पायाखाली देण्यात आले. संभाजीराजांनी छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांना वारसाहक्कासाठी ठार केले नसून, त्यांना स्वराज्यद्रोहाबद्दल शिक्षा केली.
२) छत्रपती संभाजी महाराज हे खुद्द शिवरायांच्या आणि जिजाऊ माँसाहेबांच्या जडणघडणीत तयार झाले होते. एकाच वेळी हातात तलवार आणि लेखणी घेऊन लढणारा राजा म्हणून त्यांची नोंद घेतली जाते. संभाजीराजे युद्धभूमीवर जितके कुशल तितकेच राजकीय डावपेचात निपुण होते. संभाजीराजांनी लिहलेला बुधभूषण ग्रंथ वाचला तरी त्यांच्यातील राजकीय समज लक्षात येते. वयाच्या नवव्या वर्षी औरंगजेबाच्या दरबारात पाच हजारी मनसबदार आणि वयाच्या तेविसाव्या वर्षी स्वराज्याचे छत्रपती म्हणून कारभार पाहणारे, स्वराज्याचा विस्तार करणारे, स्वराज्याच्या सीमा बळकट करणारे, फंदफितुरी समूळ नष्ट करणारे, औरंगजेब बादशहाचा मुलगा अकबर याला बापाच्याच विरोधात वापरण्याचा डावपेच हा मुत्सद्देगिरीचाच भाग आहे. गिरीश कुबेरांनी एकदा परकीय अभ्यासकांनी संभाजीराजेंबद्दल व्यक्त केलेली मते वाचली तरी त्यांना संभाजीराजांच्या संयम आणि मुत्सद्देपणाचा अंदाज येईल.
३) छत्रपती शिवाजी महाराज हे असे व्यक्तिमत्त्व होते ज्यांची तुलना केवळ स्वतःशीच होऊ शकते. त्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले. त्यांच्या पश्चात संभाजीराजांनी त्याचा विस्तार केला. छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराराणी यांनी स्वराज्याचे रक्षण केले. थोरले छत्रपती शाहू महाराज यांनी स्वराज्याचे रुपांतर बलाढ्य साम्राज्यात केले. गिरीश कुबेरांनी छत्रपती संभाजी महाराजांनंतर त्यांचे पुत्र थोरले छत्रपती शाहू महाराज यांनाही बगल देऊन बाजीरावांना पुढे रेटण्याचा प्रकार केला आहे. बाजीराव पेशवे पराक्रमी होतेच, पण छत्रपती शिवाजी महाराजांशी त्यांची तुलना होऊच शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज तर खूप दूर राहिले, थोरल्या छत्रपती शाहूंचा झाकोळला गेलेला इतिहास जरी नुसता उजेडात आला तर त्याच्यापुढे बाजीराव पेशव्यांचा इतिहास दिपून जाईल.
गिरीश कुबेर हे व्यक्तिमत्त्व “मला जे वाटते तेच लोकांना वाटले पाहिजे” असा विचार करणाऱ्यापैकी आहे. लोकसत्ताचे संपादक असणे म्हणजे सर्वज्ञानी असणे असा त्यांचा कदाचित भ्रम झाला असावा. “बळीराजाची बोगस बोंब” या अग्रलेखातून त्यांच्या बौद्धिक दिवळखोरीचे आणि “असंतांचे संत” या अग्रलेखातून पळपुट्या संपादकाचे दर्शन आपल्याला घडले आहे. कोविडोस्कोप सदरातील वाड्ःमयचौर्याबद्दल सर्वत्र त्यांची लायकी निघत आहे.
“Renaissance State” या पुस्तकात कुबेरांनी इतका धादांत खोटारडा इतिहास लिहला असेल, तर त्यांच्या आगामी “Shivaji in South Block : The Unwritten History of a Proud People” नावाचे पुस्तकात काय केले असेल ? कुबेरांनी छत्रपती घराण्यावर लिहण्याआधी किमान इतिहासाचा नीट अभ्यास करायला हवा. जेम्स लेन प्रकरण घडल्यानंतर महाराष्ट्रात कुणीही उठावं आणि छत्रपतींच्या इतिहासाची मोडतोड करावी असे दिवस राहिले नाहीत. इथले सजग इतिहास अभ्यासक तुमचा खोटारडेपणा समोर आणतील आणि जागृत शिवप्रेमी तुमचे थोबाड काळे करतील...
लेखक : - इतिहास अभ्यासक, युवा लेखक अनिल माने
Wednesday, May 19, 2021
"महाराष्ट्राच्या 'या' पोलीस शिलेदाराने जिंकली तरुणाईची मने; सोशल मीडियावरील "श्रीनाथ म्हस्कोबा वीर" या व्हाट्सएप ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी; पुरंदर तालुक्यातील "वीर येथील श्रीनाथ कोविड सेंटरला 55 हजार 555 रुपये व वैद्यकीय साहित्य देऊन दिला मदतीचा हात"...
पुरंदर, वीर, दि. 19 : - महाराष्ट्रात कोरोना संसर्गाच्या महामारीने समाजातील सर्वच घटकांना फटका बसलेला आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर खूप ताण आलेला आहे. सोशल मीडियावर अनेक नकारात्मक, गंभीर विषयांवरील पोस्ट, बातम्या वाचून मन निराश होते, सुन्न होते. पण समाजात दिलासादायक, प्रेरणादायी कार्य करणाऱ्या लोकांकडे, ग्रुपकडे, संस्थांकडे पाहून वाटते की माणुसकी जिवंत आहे.
पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील, वीर गावचे सुपुत्र, इतिहास अभ्यासक, पोलीस शिलेदार बापूसाहेब धुमाळ यांच्या संकल्पनेतून आकार घेतलेल्या सामाजिक उपक्रमाला सोशल मीडियावरील "श्रीनाथ म्हस्कोबा वीर" या व्हाट्सअप ग्रुपच्या सदस्यांनी भरभरून प्रतिसाद देऊन मदत केल्याने,श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट वीर व वीर ग्रामस्थ यांच्या सहकार्याने व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील श्रीनाथ म्हस्कोबा भक्तांनी सढळ हाताने मदत केल्यामुळे सोशल मीडियावरील "श्रीनाथ म्हस्कोबा वीर" या व्हाट्सएप ग्रूपच्या माध्यमातून 'श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट वीर व शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पुरंदर तालुक्यात वीर येथे सुरू केलेल्या श्रीनाथ कोविड सेंटरला 55 हजार 555 रुपयाचा मदतनिधी देऊन व 50 पीपीए किट, 50 बेडशीट, 12 डॉक्टर्स व परिचारिका यांना लागणारे वैद्यकीय साहित्य देऊन, सामाजिक बांधिलकी जपत, मदतीचा हात पुढे करून सोशल मीडियावरील व्हाट्सएप ग्रूप "श्रीनाथ म्हस्कोबा वीर" यांनी समाजात एक चांगला आदर्श सामाजिक उपक्रम राबविला.
यावेळी श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष धुमाळ, विश्वस्त अभिजीत धुमाळ, सल्लागार विशाल धुमाळ, माजी विश्वस्त दिलीप धुमाळ, राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र धुमाळ, "श्रीनाथ म्हस्कोबा वीर" ग्रुपचे ऍडमिन, इतिहास अभ्यासक, पोलीस शिलेदार बापूसाहेब धुमाळ, श्रीनाथ ग्रुपचे सदस्य अमोल चंद्रकांत धुमाळ, सागर नढे, अशोक बुरुंगले, अरुण धुमाळ, डॉक्टर सुनील धुमाळ, भरत धुमाळ, गिरीश क्षीरसागर, अमोल धोंडीबा धुमाळ, देविदास चवरे, पांडुरंग धुमाळ, अरुण धुमाळ, माऊली कुंभार, संतोष थिटे व श्रीनाथ ग्रुपचे सदस्य व देवस्थानचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
मागील काही वर्षांपासून सोशल मीडियावर, प्रामाणिक भक्तिभावाच्या उद्देशाने लोकांना घरी बसून महाराष्ट्रातील कुलदैवतांचे, आराध्य दैवतांचे दर्शन व्हावे यासाठी 'श्रीनाथ म्हस्कोबा वीर' या व्हाट्सएप ग्रुपचे ऍडमिन बापूसाहेब धुमाळ त्यांच्या मित्रांच्या सहकार्याने भक्तीचे चांगले उपक्रम राबवत आहेत.
"सोशल मीडियावर फक्त पोस्ट वाचणे व फॉरवर्ड करणे यापेक्षाही सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपण कोरोनाकाळात चांगले काम करणाऱ्या पुरंदर तालुक्यातील, वीर येथील श्रीनाथ कोविड सेंटरला मदत करण्याच्या भावनेतून 'श्रीनाथ म्हस्कोबा वीर' या आमच्या व्हाट्सएप ग्रुपवर ऍडमिन या नात्याने कोविड सेंटरला मदतनिधी या सामाजिक उपक्रमासाठी मदतीचे आवाहन केले. प्रत्येकाने 100 रुपये मदतनिधी दिला तरी 16000 रुपये मदतनिधी जमा होईन तो मदतनिधी श्रीनाथ कोविड सेंटरला देऊयात. ही पोस्ट ग्रुपवर शेअर केल्यावर श्रीनाथ म्हस्कोबा वीर या ग्रुपमधील सदस्यांनी या सामाजिक उपक्रमासाठी खूप चांगला प्रतिसाद दिला.
वीर देवस्थान ट्रस्ट, वीर ग्रामस्थ यांनी या उपक्रमाला खूप चांगले सहकार्य केले. महाराष्ट्रातील सर्व श्रीनाथ म्हस्कोबा भक्त परिवार, ताईसाहेब ग्रुप, महिला वर्ग, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव, मित्रपरिवार यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अल्पावधीतच 55 हजार 555 रुपये मदतनिधी जमा झाला. कामटे ऑटोमोटिव्हचे उद्योजक अमित कामठे व विशाल कामठे यांनी 50 पीपीए किट, 50 बेडशीट, 12 डॉक्टर व परिचारिकांना लागणारे वैद्यकीय साहित्यांचे किट मदत दिली. आमच्या 'श्रीनाथ म्हस्कोबा वीर' ग्रुपच्या माध्यमातून 55 हजार 555 रुपये मदतनिधी व वैद्यकीय साहित्य, कोविड सेंटर उत्तम चालवणाऱ्या वीर देवस्थान ट्रस्टला सुपूर्त करून कोविड सेंटरला मदत करण्याचा आमच्या ग्रुपचा संकल्प पूर्ण झाला." अशी प्रतिक्रिया 'श्रीनाथ म्हस्कोबा वीर' या ग्रुपचे ऍडमिन,इतिहास अभ्यासक, पोलीस शिलेदार बापूसाहेब धुमाळ यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
पुरंदर तालुक्यातील वीर येथील श्रीनाथ कोविड सेंटरच्या माध्यमातून तालुक्यातील रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळत आहेत. श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष धुमाळ यांनी 'श्रीनाथ म्हस्कोबा वीर' ग्रुपच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. "सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या 'श्रीनाथ म्हस्कोबा वीर' या ग्रुपने राबविलेला सामाजिक उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे व इतर ग्रुपलाही प्रेरणा देणारा आहे." अशी प्रतिक्रिया श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष धुमाळ यांनी दिली.
"बापुसाहेब धुमाळ यांनी सोशल मीडियावरील ग्रुपच्या माध्यामातून सामाजिक कार्य कसे करु शकतो? याचे अतिशय उत्तम उदहारण समाजासमोर ठेवले आहे . सर्व ग्रुप व ग्रुपबाहेरच्या मंडळींनीही यामध्ये चांगले सहकार्य केले. त्याबद्दल बापूसाहेब व सर्वांचे हार्दिक अभिनंदन. अशा सहकार्यामुळे काम करणार्या लोकांचाही उत्साह शतपटीने वाढतो. असेच कार्य आपण कायम सुरु ठेवावे. श्रीनाथ साहेबांच्या छत्रछायेखाली अजुन मोठी कामे होतील. अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर सुनील धुमाळ यांनी दिली.
"बापूसाहेब करत असलेले कार्य खरंच प्रेरणादायी आहे. आपण कायमच गावातील प्रत्येक सामाजिक ,धार्मिक, सांस्कृतिक तसेच गावाच्या विकासासाठी सदैव तन, मन, धनाने तत्पर असता. त्याच बरोबर सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची तुमची सचोटी वाखनण्याजोगी आहे. येणाऱ्या काळात अशीच सामाजिक सेवा आपल्या हातून घडो अशी प्रतिक्रिया पुरंदरचे शिवसेनेचे युवा नेते समीर जाधव यांनी दिली.
"'श्रीनाथ म्हस्कोबा वीर' या व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून राबवलेला हा सामाजिक उपक्रम हा समाजातील सर्वांसाठीच खूप प्रेरणादायी आणि चांगला उपक्रम आहे. बापूसाहेब यांचे कार्यही नक्कीच खूप कौतुकास्पद आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून लोकहिताच्या उपक्रमांसाठी पुढाकार घेऊन सर्वांनीच मदत केली पाहिजे अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते भरत धुमाळ यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
"समाजामध्ये चांगले सामाजिक उपक्रम राबवणारे सोशल मीडियावरील फार कमी ग्रुप बघायला मिळतात. 'श्रीनाथ म्हस्कोबा वीर' या ग्रुपने राबवलेला सामाजिक उपक्रम समाजातील सर्वच घटकांसाठी प्रेरणादायी व चांगली शिकवण देणारा आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रसह्याद्रीच्या पत्रकार सविता शितोळे यांनी दिली.
"बापुसाहेब धुमाळ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच प्रामाणिक भक्तीच्या चळवळीच्या माध्यमातून समाजात एक आदर्श सामाजिक उपक्रम राबवून, श्रीनाथ म्हस्कोबा ग्रुपच्या माध्यमातून कोविड सेंटरला केलेली मदत ही सामाजिक जबाबदारीचे भान जपणारी व तरुणाईसाठी हा प्रेरणादायी उपक्रम आहे. जनसामान्यांना भक्तीच्या माध्यमातून जोडून सामाजिक बांधिलकी जपत चांगले सामाजिक उपक्रम राबवणे हा माणुसकी समृद्ध करणारा प्रवास आहे." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.
कोरोना महामारीच्या काळात सोशल मीडियाचा विधायक कार्यासाठी, सामाजिक उपक्रमांसाठी कसा उपयोग करता येऊ शकतो? हे आदर्श उदाहरण "श्रीनाथ म्हस्कोबा वीर, या व्हाट्सएप ग्रुपने समाजासमोर कृतीतून दाखवून दिलेले आहे.
Tuesday, May 18, 2021
"कोकणातील 'आंबा बागायतदार शेतकऱ्यांना 'तौक्ते चक्रीवादळाचा' मोठा फटका'; बाजारपेठेतील 'हापूस आंब्यांची आवक' घटणार; "अस्सल हापूस आंबा कसा ओळखायचा? वाचा तज्ञांच्या प्रतिक्रिया"...
मुंबई, दि.18 : - महाराष्ट्रात कोरोना महामारीने समाजातील सर्वच घटकांचे कंबरडे मोडलेले असताना तौक्ते चक्रीवादळाच्या संकटामुळे कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांना, सामान्य नागरिकांना व शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे जिल्ह्यात हापूस आंब्याचे उत्पादन मोठया प्रमाणावर होत असते. जगभरातील अनेक देशांत अमेरिका, इंग्लंड, सौदी अरेबिया, नेपाळ, नेदरलँड या देशांत हापूस आंबा निर्यात केला जातो. तौक्ते चक्रीवादळामुळे हापूस आंब्याच्या बागांचे खूप मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरीवर्गाचे कंबरडे मोडले असून बाजारपेठेत हापूस आंब्यांची आवक कमी होण्याचे चित्र निर्माण झाले आहे.
"निसर्ग वादळाने व अवकाळी पावसामुळे कोकणातील आंब्याच्या बागांचे अगोदरच नुकसान झाले होते. त्यात कोरोना महामारी व लॉकडाऊनचाही आर्थिक फटका बसलेला आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे तर कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांचे खूप नुकसान झालेले आहे. सध्या वाशी कृषी उत्पन्न समितीच्या बाजारपेठेत कोकणातील हापूस आंब्याची आवक 50000 पेटी तर कर्नाटकी हापूस आंब्याची आवक 1 ते 1.5 लाख पेटी आहे.
चक्रीवादळामुळे खूप नुकसान झाल्यामुळे ही आंब्याची आवक खूप कमी होइल. शासनाने आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज जाहीर करावे. पीक कर्ज माफ करावे. अशी शेतकरी वर्गाची मागणी आहे. बाजारपेठेतील आंबा विक्रीची वेळ शासनाने 7 ते 11 ऐवजी 10 ते 2 करावी." अशी प्रतिक्रिया वाशी मार्केटयार्ड मधील प्रसिद्ध आंबा व्यापारी माणिक हांडे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
"चक्रीवादळामुळे कोकणातील शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानभरपाई लवकर देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. कोकणातील हापूस आंब्याचे उत्पादन दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी खूप कमी झाले. 70 ते 80% उत्पादन कमी झाले.
चक्रीवादळामुळे अजून जास्त नुकसान झाले. कोकणात आमदार नितेश राणे साहेब नेहमीच शेतकऱ्यांच्या, नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सर्वोतोपरी मदत करत असतात. आज महाराष्ट्रातील अनेक शहरात कोकणातील हापूस आंबा ग्राहकांपर्यंत पोहचत असतो. कोकणातील अस्सल हापूस आंबा ओळखणे सोपे आहे.कोकणातील हापूस आंब्याची साल पातळ असते.आतून तो केशरी रंगाचा असतो व हापूस आंब्याचा रंग बॉटल ग्रीन असतो, संपूर्ण पिवळसर नसतो पण पिकत, पिकत पिवळसर होतो. आकार गोलाकार असतो व आंब्याला विशिष्ट सुगंध असतो." अशी प्रतिक्रिया देवगड पंचायत समितीचे सभापती रवी पाळेकर यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
"कोकणातील हापूस आंबा विशिष्ट, खास चवीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात,भारतात व जगभरात प्रसिद्ध आहे. ग्राहकांनी अस्सल हापूस आंबा विकत घेताना कोकणातील पाच जिल्ह्यातील जीआय मानांकन (भौगोलिक निर्देशांक) असलेला हापूस आंबा विकत घ्यावा. व्यापाऱ्याकडून घेण्यात येणाऱ्या हापूस आंब्याच्या पेटीवर जीआयचा लोगो आहे का? हे तपासून घ्यावे. जीआयचा लोगो असलेली पेटी अस्सल हापूस आंब्याची असते. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने जीआयचा लोगो नसताना हापूस आंबा विक्री करणाऱ्या काही व्यापाऱ्यांवर कारवाई केलेली आहे." अशी प्रतिक्रिया कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण,कृषी आयुक्तालय, पुणे) विकास पाटील यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
"कोकणातील लाल माती, व जांभा कातळ दगडांमध्ये असलेली आंबा लागवड तसेच त्याला पोषक असलेले उष्ण व दमट हवामान यामुळे कोकणातील हापूस आंब्याला विशिष्ट प्रकारची गोड चव आहे. तसेच आंबा पिकल्यानंतर विशिष्ट प्रकारचा सुगंध येतो, जो की इतर कोणत्याही ठिकाणच्या आंब्या पेक्षा वेगळा असल्याने नेहमी कोकणचा हापूस आंब्याला बाजारात ग्राहकांची मागणी जास्त असते. सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या व नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या हापूस आंब्याला शहरी ग्राहकांची जास्त मागणी असते त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीवर भर द्यावा." अशी प्रतिक्रिया कृषी पर्यवेक्षक संदीप कदम यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
कोकणातील हापूस आंबा विकत घेताना ग्राहकांनी जागरूक राहून, व्यवस्थित खात्री करून अस्सल हापूस आंबा विकत घ्यावा.
Monday, May 17, 2021
"पुणेकरांना दिलासा, पुणे शहरात 'कोरोनाबाधितांच्या आकड्यात लक्षणीय घट'; आज "कोरोनाबाधीतांपेक्षा कोरोनामुक्त चौपट"...
पुणे, दि. 17 : - महाराष्ट्रात तसेच पुणे शहरातील कोरोना संसर्गाचा विळखा गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसत आहे. पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट झालेली दिसून आल्यामुळे दिलासादायक परिस्थिती निर्माण होत आहे. आज सोमवारी पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली दिसून आली. आज 'पुणे शहरात कोरोना बाधित 684 नवे रुग्ण आढळल्याने, कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे प्रशासनाला व नागरिकांनाही दिलासा मिळताना दिसत आहे'.
पुणे शहरात 18,440 रुग्णांवर उपचार चालू आहेत. आज 2,790 रुग्ण कोरोना मुक्त होऊन, बरे होऊन घरी गेले. आज कोरोना संसर्गामुळे पुणे शहरात 43 लोकांचा मृत्यू झाला.
मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा कमी होत असल्यामुळे दिलासादायक परिस्थिती निर्माण होत आहे.
पुणे महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग कोरोना संसर्ग कमी होण्यासाठी अनेक उपाय योजना राबवत आहेत.
कोरोना बाधित रुग्णांचा आकडा कमी होण्यासाठी पुणे शहरात लॉकडाऊनचे सर्व कडक निर्बंध लागू केलेले आहेत.
पुणे शहरातील नागरिकांनी लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून, मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग या त्रिसूत्रीचा अवलंब करणे खूप गरजेचे आहे.
'पुणे शहरातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होण्यासाठी शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लस मिळणे खूप गरजेचे आहे.'
-
"११ रुपयांसाठी संघर्ष करणारा मुलगा ते मुलांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी संघर्ष करणारी कर्तृत्ववान आई ते हॉटेल व्यवसायाच्या प्रगतीसाठी को...
-
"हॉस्पिटलमध्ये चारशे रुपये पगार ते कपड्याच्या दुकानातील सामान्य कर्मचारी ते कुटुंबाला आधार देण्यासाठी संघर्ष करणारी रणरागिणी ते सॉफ्टवे...
-
सवाई सर्जाचं चांगभलं... वीरच्या म्हस्कोबाचं चांगभलं... श्री क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा...