लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी त्यांच्या “Renaissance State” पुस्तकात छत्रपती घराण्याविषयी बदनामीकारक मजकूर लिहल्याने शिवप्रेमींमध्ये संताप आहे. कुबेर यांच्या पुस्तकात असणारे काही वादग्रस्त मुद्दे पुढीलप्रमाणे : -
१) छत्रपती संभाजी महाराजांनी आपला वारसाहक्क मिळवण्यासाठी महाराणी सोयराबाई यांच्यासह शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील अनमोल प्रतिभावान मंत्र्यांना ठार केले.
२) छत्रपती संभाजी महाराज अत्यंत धाडसी असले तरी त्यांच्यात वडिलांकडे असणाऱ्या संयम आणि मुत्सद्दीपणाची कमतरता होती.
३) इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांशी जुळणारे कोणी व्यक्तिमत्त्व असेल तर ते बाजीराव पेशवे आहेत.
गिरीश कुबेर हे अर्थशास्त्राचे चांगले अभ्यासक आहेत, पण छत्रपती घराण्याच्या इतिहासाविषयी त्यांचा जास्त अभ्यास नसल्याचे दिसते. त्यांच्या मुद्द्याची छाननी केली असता आपणास ते कळून येईल.
१) छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाप्रसंगी युवराज म्हणून संभाजीराजांना मान मिळाला होता. शिवरायांच्या पश्चात संभाजीराजेच स्वराज्याचे छत्रपती बनणार होते हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची आवश्यकता नव्हती. वारसाहक्कासाठी संभाजीराजांनी सोयराबाईंना ठार केले हा मल्हार रामराव चिटणीसाच्या डोक्यातून बाहेर आलेला केवळ एक आरोप आहे. त्याचीच री गिरीश कुबेरांनी ओढली आहे. वास्तविक चिटणीस सांगतो ती घटना घडल्यापासून महाराणी सोयराबाई एक वर्ष जीवंत होत्या. ऑगस्ट १६८० मधील एका पत्रात छत्रपती संभाजीराजांनी सोयराबाईंबद्दल “स्फटिकाप्रमाणे निर्मळ मनाची माता” असे उद्गार काढले होते. संभाजीराजे आणि महाराणी सोयराबाई यांच्यात कसलाही कलह नव्हता. राहिला विषय छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांचा तर आपल्याविरुद्ध कट केल्यानंतरही त्यांना एकदा मोठ्या मनाने माफ करुन मंत्रिमंडळात घेणारे छत्रपती संभाजीराजेच होते. या मंत्र्यापैकी काहींनी स्वराज्यद्रोह करण्याचा प्रयत्न केला, त्याचीच शिक्षा म्हणून त्यांना हत्तीच्या पायाखाली देण्यात आले. संभाजीराजांनी छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांना वारसाहक्कासाठी ठार केले नसून, त्यांना स्वराज्यद्रोहाबद्दल शिक्षा केली.
२) छत्रपती संभाजी महाराज हे खुद्द शिवरायांच्या आणि जिजाऊ माँसाहेबांच्या जडणघडणीत तयार झाले होते. एकाच वेळी हातात तलवार आणि लेखणी घेऊन लढणारा राजा म्हणून त्यांची नोंद घेतली जाते. संभाजीराजे युद्धभूमीवर जितके कुशल तितकेच राजकीय डावपेचात निपुण होते. संभाजीराजांनी लिहलेला बुधभूषण ग्रंथ वाचला तरी त्यांच्यातील राजकीय समज लक्षात येते. वयाच्या नवव्या वर्षी औरंगजेबाच्या दरबारात पाच हजारी मनसबदार आणि वयाच्या तेविसाव्या वर्षी स्वराज्याचे छत्रपती म्हणून कारभार पाहणारे, स्वराज्याचा विस्तार करणारे, स्वराज्याच्या सीमा बळकट करणारे, फंदफितुरी समूळ नष्ट करणारे, औरंगजेब बादशहाचा मुलगा अकबर याला बापाच्याच विरोधात वापरण्याचा डावपेच हा मुत्सद्देगिरीचाच भाग आहे. गिरीश कुबेरांनी एकदा परकीय अभ्यासकांनी संभाजीराजेंबद्दल व्यक्त केलेली मते वाचली तरी त्यांना संभाजीराजांच्या संयम आणि मुत्सद्देपणाचा अंदाज येईल.
३) छत्रपती शिवाजी महाराज हे असे व्यक्तिमत्त्व होते ज्यांची तुलना केवळ स्वतःशीच होऊ शकते. त्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले. त्यांच्या पश्चात संभाजीराजांनी त्याचा विस्तार केला. छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराराणी यांनी स्वराज्याचे रक्षण केले. थोरले छत्रपती शाहू महाराज यांनी स्वराज्याचे रुपांतर बलाढ्य साम्राज्यात केले. गिरीश कुबेरांनी छत्रपती संभाजी महाराजांनंतर त्यांचे पुत्र थोरले छत्रपती शाहू महाराज यांनाही बगल देऊन बाजीरावांना पुढे रेटण्याचा प्रकार केला आहे. बाजीराव पेशवे पराक्रमी होतेच, पण छत्रपती शिवाजी महाराजांशी त्यांची तुलना होऊच शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज तर खूप दूर राहिले, थोरल्या छत्रपती शाहूंचा झाकोळला गेलेला इतिहास जरी नुसता उजेडात आला तर त्याच्यापुढे बाजीराव पेशव्यांचा इतिहास दिपून जाईल.
गिरीश कुबेर हे व्यक्तिमत्त्व “मला जे वाटते तेच लोकांना वाटले पाहिजे” असा विचार करणाऱ्यापैकी आहे. लोकसत्ताचे संपादक असणे म्हणजे सर्वज्ञानी असणे असा त्यांचा कदाचित भ्रम झाला असावा. “बळीराजाची बोगस बोंब” या अग्रलेखातून त्यांच्या बौद्धिक दिवळखोरीचे आणि “असंतांचे संत” या अग्रलेखातून पळपुट्या संपादकाचे दर्शन आपल्याला घडले आहे. कोविडोस्कोप सदरातील वाड्ःमयचौर्याबद्दल सर्वत्र त्यांची लायकी निघत आहे.
“Renaissance State” या पुस्तकात कुबेरांनी इतका धादांत खोटारडा इतिहास लिहला असेल, तर त्यांच्या आगामी “Shivaji in South Block : The Unwritten History of a Proud People” नावाचे पुस्तकात काय केले असेल ? कुबेरांनी छत्रपती घराण्यावर लिहण्याआधी किमान इतिहासाचा नीट अभ्यास करायला हवा. जेम्स लेन प्रकरण घडल्यानंतर महाराष्ट्रात कुणीही उठावं आणि छत्रपतींच्या इतिहासाची मोडतोड करावी असे दिवस राहिले नाहीत. इथले सजग इतिहास अभ्यासक तुमचा खोटारडेपणा समोर आणतील आणि जागृत शिवप्रेमी तुमचे थोबाड काळे करतील...
लेखक : - इतिहास अभ्यासक, युवा लेखक अनिल माने
कुबेर सारख्या विकृतांना कायमचा धडा शिकवला पाहीजे...
ReplyDelete