Thursday, February 18, 2021

पुरंदरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते हरपले, लालासाहेब धुमाळ यांचे दुःखद निधन; वीर पंचक्रोशीत शोककळा पसरली...



पुरंदर, वीर, दि.१८ : पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, वीर गावचे सामाजिक कार्यकर्ते, प्रगतशील शेतकरी लालासाहेब धुमाळ(वय ६५) यांचे बुधवारी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, पुतणे, भावंडे असा परिवार आहे.




पुरंदर तालुक्यातील वीर गावातील प्रगतशील शेतकरी, जनसामान्यांना अडीअडचणीत नेहमी मदत  करणारे ज्येष्ठ नेते अशी लालासाहेब धुमाळ यांची ख्याती संपूर्ण तालुकाभर  पसरलेली होती. वीर गावचे कार्यक्षम ग्रामपंचायत सदस्य  व तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून लालासाहेब धुमाळ यांनी खूप चांगले कार्य केले.




" पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार ग्रामीण भागात प्रामाणिकपणे पोहोचवणारे विश्वासू नेते पक्षाने गमावले याचे खूप दुःख आहे. धुमाळ कुटुंबावरील हा मोठा आघात असून, संपूर्ण राष्ट्रवादी कांग्रेस परिवार त्यांच्या दुःखात सहभागी आहे." अशी प्रतिक्रिया पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




वीर पंचक्रोशीतील अठरापगड जातीतील लोकांशी प्रेमाने, माणुसकीने, सहकार्याने वागणारे लालासाहेब धुमाळ यांच्या दुःखद निधनामुळे पुरंदर तालुक्यात व संपूर्ण वीर पंचक्रोशीत शोककळा पसरली.


" वीर गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे झटणारे ज्येष्ठ नेते आणि आमच्या वीर गावचे मार्गदर्शक  आम्ही गमावले याचे खूप दुःख आहे. लालासाहेब धुमाळ यांच्या निधनाने खूप मोठा धक्का बसला." अशी प्रतिक्रिया वीर गावचे सरपंच ज्ञानेश्वर वचकल यांनी दिली.




" तरुण पिढीला सामाजिक उपक्रमांसाठी नेहमी पाठिंबा देणारे आणि व्यवसायासाठी मार्गदर्शन करणारे आमच्या गावचे ज्येष्ठ नेते लालासाहेब धुमाळ ऊर्फ  तात्यासाहेब यांच्या निधनामुळे खूप मोठी पोकळी निर्माण झालीये, वीर गावावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे." अशी प्रतिक्रिया वीर गावचे तरुण सामाजिक कार्यकर्ते मिलिंद धुमाळ यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.


" राष्ट्रवादी काँग्रेसचा पुरोगामी विचार पुरंदरच्या ग्रामीण भागात प्रामाणिकपणे पोहचवणारे जुने निष्ठावंत कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते लालासाहेब धुमाळ यांच्या निधनाने  खूप दुःख झाले. समाजासाठी व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या तात्यासाहेबांच्या कार्याची आठवण सर्वांच्याच स्मरणात राहील." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूज चे संपादक अजित जगताप यांनी दिली.




वीर पंचक्रोशी मध्ये प्रगतशील शेतकरी म्हणून लोकप्रिय असलेल्या लालासाहेब धुमाळ यांच्या दुःखद निधनामुळे शेतकरी वर्गाकडून तीव्र शोक व्यक्त करण्यात आला.


No comments:

Post a Comment