पुणे, दि.१९ : महाराष्ट्रात युगपुरुष छत्रपती शिवाजीराजे यांची जयंती मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम,सामाजिक उपक्रम राबवून मोठया उत्साहात साजरी केली जाते.पुणे शहरात अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून शिवजयंती उत्सव वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून, वैचारिक व्याख्याने, शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन, कर्तृत्ववान व प्रेरणादायी समाजरत्नांचा सन्मान अश्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवजयंती महोत्सव साजरा केला जातो.
अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बॉडी बिल्डर्सची शिवरायांना मानवंदना व शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला पुण्यातील वकिलांचे अभिवादन आयोजित करण्यात आले होते.
शिवाजीनगर येथील एस.एस.पी.एम.एस. च्या प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवरायांच्या जगातील पहिल्या स्मारकास पुणे शहरातील वकिलांच्या माध्यमातून अभिवादन, बॉडी बिल्डर्सची मानवंदना व शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी शेकडो वकील बांधव उपस्थित होते.
अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या माध्यमातून दर वर्षी ही मानवंदना दिली जाते. या प्रसंगी समितीचे संस्थापक अध्यक्ष मा.विकास पासलकर म्हणाले, "घरोघरी शिवजयंती साजरी व्हावी यासाठी समितीच्या माध्यमातून शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात हा उपक्रम दर वर्षी राबवला जातो. घरगुती शिवजयंतीचे फोटो आम्हाला पाठवा आम्ही पहिल्या पाच स्पर्धकांना रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येईल असे आवाहन त्यांनी केले."
दि.१३ फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या शिवमहोत्सवाचे आजचे सहाव्या दिवसाच्या सत्राच्या प्रसंगी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड सतीश मुळीक, पुणे जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड मिलिंद पवार, महाराष्ट्र केसरी पै.संदीप नलावडे, महाराष्ट्र केसरी पै. औटी, पै.ऋषिकेश पासलकर, पै. राजू कदम, पै. संग्राम मोहिते, राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनचे कैलास वडघुले, प्रशांत धुमाळ, विराज तावरे, जितेंद्र साळुंखे, राजाभाऊ पासलकर, दत्ताभाऊ पासलकर, मंदार बहिरट, युवराज ढवळे व मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली. पुणे शहरातील तरुणवर्ग या आगळ्या वेगळ्या खास शिवजयंती महोत्सवात मोठया उत्साहाने सहभागी होत असतो.
No comments:
Post a Comment