पुरंदर, परिंचे, दि.9 : पुरंदर तालुक्यातील परिंचे गावातील मतदारांनी सलग तिसऱ्यांदा शिवसेना पुरस्कृत पॅनेलला संधी दिल्यामुळे शिवसेनेची सलग तिसऱ्यांदा विजयी घोडदौड कायम राहिली. परिंचे गावच्या सरपंचपदी ऋतुजा जाधव व उपसरपंचपदी दत्तात्रय राऊत यांची निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शरद काटवटे यांनी दिली.
पुरंदरच्या माजी सभापती अर्चना जाधव यांच्या नेतृत्वाखाली सिद्धिविनायक ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून परिंचे गावचे कार्यक्षम माजी सरपंच समीर जाधव व सोपान राऊत यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्यात आली असून निवडणुकीत शिवसेनेने 11 पैकी सात जागा जिंकून परिंचे ग्रामपंचायतीवर सलग तिसऱ्यांदा शिवसेनेचा भगवा फडकवला.
परिंचे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ऋतुजा धैर्यशील जाधव व वंदना महादेव राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीमध्ये ऋतुजा जाधव यांना सात मते मिळाली तर वंदना राऊत यांना चार मते मिळाली.
उपसरपंच पदासाठी दत्तात्रय रामचंद्र राऊत व सुजाता सुरेश दुधाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दत्तात्रय राऊत यांना सात मते तर सुजाता दुधाळ यांना चार मते मिळाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शरद काटवटे यांनी दिली.
या निवडणुकीवेळी ग्रामसेवक शशांक सावंत, गाव कामगार तलाठी सुजित मंडलेजा निवडणूक प्रक्रियेसाठी उपस्थित होते. परिंचे ग्रामपंचायतीमध्ये अजित रमेश नवले, दत्तात्रय रामचंद्र राऊत, अर्चना संतोष राऊत, शैला संजय जाधव, सुजाता सुरेश दुधाळ, सुनील शिवाजी जाधव, ऋतुजा धैर्यशील जाधव, गणेश संजय पारखी, प्रवीण प्रमोद जाधव, पुष्पलता दामोदर नाईकनवरे, वंदना महादेव राऊत यांची सदस्य म्हणून निवड झालेले आहे.
"परिंचे गावात मागील दहा वर्षांत शिवसेनेच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांना नागरिकांनी भरघोस मतदानाच्या रुपात मोठा कौल दिला. माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली परिंचे गावची सर्वांगीण विकासाची वाटचाल अखंडपणे चालू राहील अशी प्रतिक्रिया परिंचे गावचे माजी सरपंच समीर जाधव यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूज शी बोलताना दिली.
पुणे जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव व माजी सभापती आणि विद्यमान पंचायत समिती सदस्य अर्चना जाधव यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार करण्यात आला.
" पुरंदरचे विकास पुरुष माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली शाश्वत व चिरंतर ग्रामविकासाची संकल्पना परिंचे गावासाठी राबवणार आहे." अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित सरपंच ऋतुजा जाधव यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूज शी बोलताना दिली.
No comments:
Post a Comment