पुणे, दि.१८ : महाराष्ट्राचे प्रेरणास्थान युगपुरूष छत्रपती शिवाजीराजे यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात, पारंपारिक पद्धतीने व धूमधडाक्यात, जल्लोषात संपूर्ण राज्यभर साजरी केली जाते.
या वर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी करून शिवजयंती उत्सवावर निर्बंध घातल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट निर्माण झालेली आहे. " महाराष्ट्र राज्य सरकारने शिवप्रेमींच्या भावनांचा विचार करून शिवजयंतीवर अनाठाई पद्धतीने लावलेले निर्बंध मागे घ्यावेत." अशी विनंती महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी राज्य सरकारला केली.
"राज्य सरकारने शिवजयंती साजरी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करून जे निर्बंध लादले आहेत ते दुर्दैवी आहेत. शिवजयंती हा केवळ एक सण नाही तर त्यातून होणारे प्रबोधन, सामाजिक सलोखा, तरुण मंडळाकडून केले जाणारे सामाजिक कार्य या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत." अशी प्रतिक्रिया प्रवीण गायकवाड यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
शिवजयंती उत्सवाबद्दल बोलताना प्रवीण गायकवाड म्हणाले की "अलीकडच्या काळात तर शिवजयंतीला एक वैचारिक स्वरूप प्राप्त झाले आहे त्यामुळे राज्य सरकारने शिवप्रेमींच्या भावनांचा विचार करून शिवजयंती उत्सवावरील निर्बंध मागे घेतले पाहिजेत."
शिवजयंती उत्सवावरील निर्बंधामुळे राज्यातील शिवप्रेमींमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. हजारो शिवप्रेमींनी शिवजयंती उत्सवावरील घातलेल्या निर्बंधांना विरोध केला आहे. " जे शिवप्रेमी हे निर्बंध झुगारून शिवजयंती साजरी करतील त्यांना कुठल्याही कायदेशीर अडचणींमध्ये टाकू नये अशी विनंती प्रवीण गायकवाड यांनी राज्य सरकारला केली.
राजकीय पक्षांच्या व नेत्यांच्या सभा, मेळावे, संवाद दौरे, रॅलीला हजारो लोकांची गर्दी होते त्यावेळी निर्बंध नाहीत पण शिवजयंतीलाच हे कठोर निर्बंध का? असा सवाल शिवप्रेमींनी उपस्थित केला आहे.
No comments:
Post a Comment