वीर, दि.२५ : - महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान श्री क्षेत्र वीर येथील पारंपारिक, ऐतिहासिक यात्रा यावर्षी कोरोना सदृश्य परिस्थितीमुळे पुणे जिल्हाधिकारी यांच्या संचारबंदीच्या आदेशामुळे रद्द केली असल्यामुळे श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरी माता यांचा हळदी समारंभ कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून, मोजक्याच मानकरी व सुवासिनींच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने पार पडला.
"कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थानची यात्रा यावर्षी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे रद्द झाली असल्यामुळे फक्त ठराविक मानकऱ्यांच्या उपस्थितीत, कोरानाची नियमावली पाळून, मंदिरामध्ये सर्व धार्मिक विधी पार पडले. अशी माहिती वीर देवस्थान ट्रस्टचे सचिव तय्यद मुलानी यांनी दिली.
आज २.३० वाजता नियोजित देवाचे मानकरी व राऊत मंडळी देऊळवाड्यात आले, वाजत गाजत सन्मानाने देवाची हळद मंदिरात आणली व विधीवत पूजा होऊन पोशाख व फुलांची मंडवळी देवाला बांधण्यात आली.
आज ठराविक प्रवेश पात्र राऊत मंडळींच्या मानकरी सुवासिनींच्या वतीने दुपारी तीन वाजता श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरी माता यांना हळद लावण्यास सुरवात झाली. यावेळी प्रवेश पात्र, ठरवून दिलेले मुकादम पाटील, विश्वस्त, मानकरी, दागिनदार, सालकरी हजर होते. रात्री ९.३० वाजता धुपारती होऊन मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला.
" श्रीनाथ म्हस्कोबा देवाची सन २०२१ सालची यात्रा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे रद्द करण्यात आली आहे. गुरुवार दिनांक २५/०२/२०२१ ते ०९/०३/२०२१ या काळात क्षेत्र वीर येथे शासनाचे कलम 144 लागू करण्यात आले असून भाविकांनी या काळात क्षेत्र वीर येथे येऊ नये." असे आवाहन श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी केले.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वच नागरिकांनी व भाविकांनी शासनाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे.
नाथ सायबाचं चांगभलं
ReplyDelete