Tuesday, May 18, 2021

"कोकणातील 'आंबा बागायतदार शेतकऱ्यांना 'तौक्ते चक्रीवादळाचा' मोठा फटका'; बाजारपेठेतील 'हापूस आंब्यांची आवक' घटणार; "अस्सल हापूस आंबा कसा ओळखायचा? वाचा तज्ञांच्या प्रतिक्रिया"...

 


मुंबई, दि.18 : - महाराष्ट्रात कोरोना महामारीने समाजातील सर्वच घटकांचे कंबरडे मोडलेले असताना तौक्ते चक्रीवादळाच्या संकटामुळे कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांना, सामान्य नागरिकांना व शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे जिल्ह्यात हापूस आंब्याचे उत्पादन मोठया प्रमाणावर होत असते. जगभरातील अनेक देशांत अमेरिका, इंग्लंड, सौदी अरेबिया, नेपाळ, नेदरलँड या देशांत हापूस आंबा निर्यात केला जातो. तौक्ते चक्रीवादळामुळे  हापूस आंब्याच्या बागांचे खूप मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरीवर्गाचे कंबरडे मोडले असून बाजारपेठेत हापूस आंब्यांची आवक कमी होण्याचे चित्र निर्माण झाले आहे.




"निसर्ग वादळाने व अवकाळी पावसामुळे कोकणातील आंब्याच्या बागांचे अगोदरच नुकसान झाले होते. त्यात कोरोना महामारी व लॉकडाऊनचाही आर्थिक फटका बसलेला आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे तर कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांचे खूप नुकसान झालेले आहे. सध्या वाशी कृषी उत्पन्न समितीच्या बाजारपेठेत कोकणातील हापूस आंब्याची आवक 50000 पेटी तर कर्नाटकी हापूस आंब्याची आवक 1 ते 1.5 लाख पेटी आहे. 



चक्रीवादळामुळे खूप नुकसान झाल्यामुळे ही आंब्याची आवक खूप कमी होइल. शासनाने आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज जाहीर करावे. पीक कर्ज माफ करावे. अशी शेतकरी वर्गाची मागणी आहे. बाजारपेठेतील आंबा विक्रीची वेळ शासनाने 7 ते 11 ऐवजी 10 ते 2 करावी." अशी प्रतिक्रिया वाशी मार्केटयार्ड मधील प्रसिद्ध आंबा व्यापारी माणिक हांडे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




"चक्रीवादळामुळे कोकणातील शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानभरपाई लवकर देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. कोकणातील हापूस आंब्याचे उत्पादन दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी  खूप कमी झाले. 70 ते 80% उत्पादन कमी झाले. 





चक्रीवादळामुळे अजून जास्त नुकसान झाले. कोकणात आमदार नितेश राणे साहेब नेहमीच शेतकऱ्यांच्या, नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सर्वोतोपरी मदत करत असतात. आज महाराष्ट्रातील अनेक शहरात कोकणातील हापूस आंबा ग्राहकांपर्यंत पोहचत असतो. कोकणातील अस्सल हापूस आंबा ओळखणे सोपे आहे.कोकणातील हापूस आंब्याची साल पातळ असते.आतून तो केशरी रंगाचा असतो  व हापूस आंब्याचा रंग बॉटल ग्रीन असतो, संपूर्ण पिवळसर नसतो पण पिकत, पिकत पिवळसर होतो. आकार गोलाकार असतो व आंब्याला विशिष्ट सुगंध असतो." अशी प्रतिक्रिया देवगड पंचायत समितीचे सभापती रवी पाळेकर यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




"कोकणातील हापूस आंबा विशिष्ट, खास चवीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात,भारतात व जगभरात प्रसिद्ध आहे. ग्राहकांनी अस्सल हापूस आंबा विकत घेताना कोकणातील पाच जिल्ह्यातील जीआय मानांकन (भौगोलिक निर्देशांक) असलेला हापूस आंबा विकत घ्यावा. व्यापाऱ्याकडून घेण्यात येणाऱ्या हापूस आंब्याच्या पेटीवर जीआयचा लोगो आहे का? हे तपासून घ्यावे. जीआयचा लोगो असलेली पेटी अस्सल हापूस आंब्याची असते. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने जीआयचा लोगो नसताना हापूस आंबा विक्री करणाऱ्या काही व्यापाऱ्यांवर कारवाई केलेली आहे." अशी प्रतिक्रिया कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण,कृषी आयुक्तालय, पुणे) विकास पाटील यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.



"कोकणातील लाल माती, व जांभा कातळ दगडांमध्ये असलेली आंबा लागवड तसेच त्याला पोषक असलेले उष्ण व दमट हवामान यामुळे कोकणातील हापूस आंब्याला विशिष्ट प्रकारची गोड चव आहे. तसेच आंबा पिकल्यानंतर विशिष्ट प्रकारचा सुगंध येतो, जो की इतर कोणत्याही ठिकाणच्या आंब्या पेक्षा वेगळा असल्याने नेहमी कोकणचा हापूस आंब्याला बाजारात ग्राहकांची मागणी जास्त असते. सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या व नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या हापूस आंब्याला शहरी ग्राहकांची जास्त मागणी असते त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीवर भर द्यावा." अशी प्रतिक्रिया कृषी पर्यवेक्षक संदीप कदम यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.



कोकणातील हापूस आंबा विकत घेताना ग्राहकांनी जागरूक राहून, व्यवस्थित खात्री करून अस्सल हापूस आंबा विकत घ्यावा. 



2 comments: