Thursday, February 18, 2021

महाराष्ट्र राज्य सरकारने शिवप्रेमींच्या भावनांचा विचार करून "शिवजयंतीवर" अनाठाई पद्धतीने लावलेले निर्बंध मागे घ्यावेत - प्रवीण गायकवाड



पुणे, दि.१८ : महाराष्ट्राचे प्रेरणास्थान युगपुरूष छत्रपती शिवाजीराजे यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात, पारंपारिक पद्धतीने व धूमधडाक्यात, जल्लोषात संपूर्ण राज्यभर साजरी केली जाते.




 या वर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना  जारी करून शिवजयंती उत्सवावर निर्बंध घातल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट निर्माण झालेली आहे. " महाराष्ट्र राज्य सरकारने शिवप्रेमींच्या भावनांचा विचार करून शिवजयंतीवर अनाठाई पद्धतीने लावलेले निर्बंध मागे घ्यावेत." अशी विनंती  महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतील  सामाजिक कार्यकर्ते, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी राज्य सरकारला केली.





"राज्य सरकारने शिवजयंती साजरी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करून जे निर्बंध लादले आहेत ते दुर्दैवी आहेत. शिवजयंती हा केवळ एक सण नाही तर त्यातून होणारे प्रबोधन, सामाजिक सलोखा, तरुण मंडळाकडून केले जाणारे सामाजिक कार्य या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत." अशी प्रतिक्रिया प्रवीण गायकवाड यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.





शिवजयंती उत्सवाबद्दल बोलताना प्रवीण गायकवाड म्हणाले की "अलीकडच्या काळात तर शिवजयंतीला एक वैचारिक स्वरूप प्राप्त झाले आहे त्यामुळे राज्य सरकारने शिवप्रेमींच्या भावनांचा विचार करून शिवजयंती उत्सवावरील निर्बंध मागे घेतले पाहिजेत."




शिवजयंती उत्सवावरील निर्बंधामुळे राज्यातील शिवप्रेमींमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. हजारो शिवप्रेमींनी शिवजयंती उत्सवावरील  घातलेल्या निर्बंधांना  विरोध केला आहे. " जे शिवप्रेमी हे निर्बंध झुगारून शिवजयंती साजरी करतील त्यांना कुठल्याही कायदेशीर अडचणींमध्ये टाकू नये अशी विनंती प्रवीण गायकवाड यांनी राज्य सरकारला केली.





राजकीय पक्षांच्या व नेत्यांच्या सभा, मेळावे, संवाद दौरे, रॅलीला हजारो लोकांची गर्दी होते त्यावेळी निर्बंध नाहीत पण शिवजयंतीलाच  हे कठोर निर्बंध का? असा सवाल शिवप्रेमींनी उपस्थित केला आहे.







पुरंदरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते हरपले, लालासाहेब धुमाळ यांचे दुःखद निधन; वीर पंचक्रोशीत शोककळा पसरली...



पुरंदर, वीर, दि.१८ : पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, वीर गावचे सामाजिक कार्यकर्ते, प्रगतशील शेतकरी लालासाहेब धुमाळ(वय ६५) यांचे बुधवारी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, पुतणे, भावंडे असा परिवार आहे.




पुरंदर तालुक्यातील वीर गावातील प्रगतशील शेतकरी, जनसामान्यांना अडीअडचणीत नेहमी मदत  करणारे ज्येष्ठ नेते अशी लालासाहेब धुमाळ यांची ख्याती संपूर्ण तालुकाभर  पसरलेली होती. वीर गावचे कार्यक्षम ग्रामपंचायत सदस्य  व तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून लालासाहेब धुमाळ यांनी खूप चांगले कार्य केले.




" पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार ग्रामीण भागात प्रामाणिकपणे पोहोचवणारे विश्वासू नेते पक्षाने गमावले याचे खूप दुःख आहे. धुमाळ कुटुंबावरील हा मोठा आघात असून, संपूर्ण राष्ट्रवादी कांग्रेस परिवार त्यांच्या दुःखात सहभागी आहे." अशी प्रतिक्रिया पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




वीर पंचक्रोशीतील अठरापगड जातीतील लोकांशी प्रेमाने, माणुसकीने, सहकार्याने वागणारे लालासाहेब धुमाळ यांच्या दुःखद निधनामुळे पुरंदर तालुक्यात व संपूर्ण वीर पंचक्रोशीत शोककळा पसरली.


" वीर गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे झटणारे ज्येष्ठ नेते आणि आमच्या वीर गावचे मार्गदर्शक  आम्ही गमावले याचे खूप दुःख आहे. लालासाहेब धुमाळ यांच्या निधनाने खूप मोठा धक्का बसला." अशी प्रतिक्रिया वीर गावचे सरपंच ज्ञानेश्वर वचकल यांनी दिली.




" तरुण पिढीला सामाजिक उपक्रमांसाठी नेहमी पाठिंबा देणारे आणि व्यवसायासाठी मार्गदर्शन करणारे आमच्या गावचे ज्येष्ठ नेते लालासाहेब धुमाळ ऊर्फ  तात्यासाहेब यांच्या निधनामुळे खूप मोठी पोकळी निर्माण झालीये, वीर गावावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे." अशी प्रतिक्रिया वीर गावचे तरुण सामाजिक कार्यकर्ते मिलिंद धुमाळ यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.


" राष्ट्रवादी काँग्रेसचा पुरोगामी विचार पुरंदरच्या ग्रामीण भागात प्रामाणिकपणे पोहचवणारे जुने निष्ठावंत कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते लालासाहेब धुमाळ यांच्या निधनाने  खूप दुःख झाले. समाजासाठी व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या तात्यासाहेबांच्या कार्याची आठवण सर्वांच्याच स्मरणात राहील." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूज चे संपादक अजित जगताप यांनी दिली.




वीर पंचक्रोशी मध्ये प्रगतशील शेतकरी म्हणून लोकप्रिय असलेल्या लालासाहेब धुमाळ यांच्या दुःखद निधनामुळे शेतकरी वर्गाकडून तीव्र शोक व्यक्त करण्यात आला.


Friday, February 12, 2021

मराठा आरक्षण गंभीर प्रश्नासंदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत घेतली शरद पवार यांची भेट; "मराठा समाजातल्या ४० हुन अधिक मराठा बांधवांनी आत्महत्या केली, सरकारने मराठा आरक्षणाच्या केसमध्ये कोणत्याही प्रकारचा वेळकाढूपणा आणि हलगर्जीपणा करु नये" - खासदार उदयनराजे भोसले



नवी दिल्ली, दि.11 : राज्यसभेचे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आज नवी दिल्ली येथे शरद पवार यांची भेट घेऊन मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाची चर्चा केली आणि मराठा आरक्षणासंदर्भातील  विविध महत्त्वाच्या  मुद्दांवर निवेदनाद्वारे मागणी करून  मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचे मागणी केली. मराठा आरक्षणासंदर्भातील प्रश्नांवर श्वेतपत्रिका काढण्याचा राज्य सरकारला आदेश द्यावा तसेच मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये कोणत्याही प्रकारचा वेळकाढूपणा आणि हलगर्जीपणा करू नये अशा सूचना राज्य सरकारला देऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना केली.



राज्यसभा भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांना मराठा आरक्षण या गंभीर प्रश्नासंदर्भात  दिलेले महत्वाचे निवेदन खालील प्रमाणे...





आदरणीय साहेब...

तुम्हाला माहीतच आहे कि मराठा समाज हा आरक्षणासाठी वर्षानुवर्षे खूप मोठा संघर्ष करत आहे. तरीही त्याच्या पदरात आजपर्यंत काहीच पडले नाही. यापेक्षा मला खूप दुःख होतं की मराठा समाजातल्या ४० हून अधिक मराठा बांधवानी आत्महत्या केली. मराठा समाजाची आरक्षणाची वैध मागणी लक्षात घेवून राज्य शासनाने न्या. गायकवाड आयोगाची स्थापना केली. या आयोगाने खेडोपाडी, शहरांमधून मराठा समाजाच्या संबंधित जास्तीत जास्त आणि पुरावे जमा केले. तसेच अतिशय शास्त्रशुद्ध माहिती जमा केली. 




ही माहिती संकलित करून त्याची अहवाल राज्य शासनाला दिला. यामध्ये गायकवाड आयोगाने कुणबी आणि मराठा समाज एकच असल्याचे या अहवालात नमूद केले. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे हे त्यामध्ये स्पष्टपणे नमूद करून मराठा समाजाला एसईबीसी हा वेगळा प्रवर्ग तयार करून आरक्षण देण्याची शिफारस राज्य सरकारला केली. हा रिपोर्ट दोन्ही सभागृहामध्ये सादर झाल्यानंतर त्याला बहुमताने मंजुरी देण्यात आली आणि त्यानंतर त्याचे एस ई बी सी आरक्षण कायद्यात रूपांतर झाले. पुढे या कायद्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. पुढे त्या याचिकेवर अनेक सुनावण्या झाल्यानंतर अखेर मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब झाले.






मात्र पुन्हा उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आले. २०१९  पासून ही केस सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यामध्ये अनेक तारखा व सुनावणी झाल्यानंतर ही केस तात्पुरती स्थगित होत गेली. परंतू ९ सप्टेंबर २०२० चा आदेश वाचल्यानंतर मला असं लक्षात आलं की राज्य सरकार हा कायदा टिकवून ठेवण्यात असमर्थ ठरलेलं आहे. आणि ज्या काही वेगवेगळ्या नियुक्‍त्या झाल्या होत्या. हा कायदा प्रलंबित असताना जवळपास २१५० उमेदवारांच्या नियुक्तीची ९० टक्के प्रक्रिया पूर्ण झालेली असतानासुद्धा त्यांना राज्य सरकारने नियुक्तीपत्र दिले नाही. जणू काही राज्य सरकार स्टे ॲार्डरची वाटच पाहात होते. अशी मला शंका येत आहे. 




सर्वोच्च न्यायालयाने या कायद्याला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने जी ठोस पाऊले उचलायला हवी होती तशी कोणतीही कार्यवाही सरकारने केली नाही. या कायद्याला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने जी कार्यवाही केली तीसुद्धा सदोष होती. कारण या कायद्याला मिळालेली स्थगिती उठवायची असेल तर त्या आदेशाच्या विरोधात रिव्ह्यू पिटिशन दाखल करायला हवी होती. परंतु राज्य सरकारने सुधारीत अर्ज दाखल केला.




 सगळयात आश्चर्याची बाब म्हणजे जेव्हा हा अर्ज सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणीस आला. तेव्हा असं अपेक्षित होतं कि सरकार या अर्जावरची सुनावणी संपवून टाकेल आणि स्थगिती उठवण्याची विनंती न्यायालयाला करेल. परंतू यातली धक्कादायक बाब अशी कि या सुनावणीत कोणतीही बाजू न मांडता राज्य सरकारने न्यायालयाला सांगितले कि आम्हाला हि सुनावणी घटनापीठा समोर करायची आहे. त्यानंतर जेव्हा घटनापीठासमोर सुनावणी सुरू झाली. तेव्हा सरकारने २१५० उमेदवारांच्या भरती बाबत कोणतीही बाजू मांडली नाही. या केसच्या रेकॅार्डवरून असं लक्षात येतं कि, ही केस घटनापीठासमोर आल्यानंतर ३ सुनावण्या झाल्या. त्यामध्ये राज्य सरकारने आपली तयारी नसल्याचे कारण सांगून तयारीसाठी वेळ मागितला. 




साहेब, एकीकडे राज्यशासने एसईबीसी पात्र उमेदवारानां ईडब्ल्यूएस लागू करण्याचा निर्णय घेतला. आणि दुसरीकडे एसईबीसी च्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात वेळकाढूपणा करत आहे. यावरून मराठा समाजामध्ये सरकारबद्दल प्रचंड नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे इडब्ल्यूएस वर्गातील आरक्षण स्विकारण्याशिवाय मराठा समाजापुढे दुसरा कोणताही पर्याय उरत नाही. एकदा जर का मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाने या प्रवर्गातून आरक्षण स्वीकारले तर याचा एसईबीसी आरक्षण्याच्या केसवर भयंकर परिणाम होण्याची भीती मला वाटते.





 मला अशीही माहीती कि, एमपीएससीने सर्वोच्च न्यायालयात एक अर्ज दाखल करून त्यामध्ये एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांचे नाव यादीतून बाद करण्याची मागणी केली आहे. ही बाब खूपच भयंकर आहे. याबाबत सरकार कसे काय अंधारात राहिले ? कि ही बाब जाणूनबुजून केली गेली आहे का? असा मला प्रश्न पडला आहे. 



माझ्या असही लक्षात आलं आहे कि, राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आणखी दोन अर्ज दाखल केले आहेत. त्यातल्या एका अर्जात सर्व राज्य सरकरानां प्रतिवादी करण्याची विनंती केली आहे. आणि दुसऱ्या अर्जात ११ न्यायाधिशांचे खंडपीठ नेमण्याची मागणी करण्याच्या तयारीत आहे. जर अशा पद्धतीने या खटल्याचे कामकाज सुरू राहिले तर इतर खटल्यांप्रमाणे ही केस प्रलंबित राहील. परिणामी मराठा समाजात मोठा असंतोष निर्माण होईल. आजही समाजात या दिरंगाईची खदखद वेगवेगळ्या रूपाने बाहेर येताना दिसत आहे.





 या सर्व बाबी लक्षात घेता माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे कि, या प्रकरणात तुम्ही स्वत: जातीनीशी लक्ष घालावे. तसेच मराठा आरक्षणाच्या केसमध्ये कोणत्याही प्रकराचा वेळकाढूपणा आणि हलगर्जीपणा करू नये. तशा सक्त सुचना राज्य सरकारला देवून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा. याचबरोबर खालील मुद्दयांवर श्वेतपत्रिका काढण्याचा राज्य सरकारला आदेश द्यावा. जेणेकरून समाजात निर्माण झालेला असंतोष कमी होईल. 

१) जर एसईबीसी उमेदवाराने ईडब्यूएस कोट्यातून आरक्षण स्वीकारले तर त्याचा सर्वोच्च न्यायालयातल्या केसवर काही परिणाम होणार आहे का?

२) जर मोठ्या प्रमाणावर ईडब्यूएस आरक्षण स्वीकारले तर त्याचा या केसवर काही परिणाम होईल का?

३) जर ईडब्लूएस आरक्षण रद्दबातल ठरवलं तर त्याचा मराठा उमेदवारांवर काही परिणाम होईल का?

४) महाराष्ट्र शासनाच्या मंत्रीमंडळ कमिटीने सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्या संबंधी जे जे निर्णय घेतले ते समाजासमोर आले पाहिजे. जेणेकरून या खटल्यात सरकारकडून वकिलानां नेमके काय निर्देश दिले गेले आहेत. याचा खुलासा होईल. 

५) एमपीएससीच्या माध्यमातून निवड झालेल्या २१५० उमेदवारांसाठी सुपर न्यूमररी पोस्ट निर्माण करून त्यानां नोकरीत का सामावून घेत नाही?




साहेब....आपण वडिलधारे आहात, जाणकार आणि अनुभवी आहात म्हणून मी आज तुम्हाला ही विचारणा करीत आहे. कारण आज मराठा तरूण-तरुणी वडिलकिच्या नात्याने मला विचारणा करीत आहेत. मला या प्रश्नांची उत्तरे दिलीत, तर मी सुद्धा आताच्या मराठा तरूण-तरूणीनां देवू शकेन.  वरील सर्व बाबींचा आपण नक्कीच विचार कराल आणि मराठा समाजाला न्याय मिळवून द्याल.
धन्यवाद साहेब...!!!

आपला...

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले.


मराठा आरक्षणासंदर्भातील या महत्वपूर्ण निवेदनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा गंभीर प्रश्न शरद पवार यांनी विशेष लक्ष घालून सोडवण्याचा प्रयत्न करावा व मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी  राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.



Wednesday, February 10, 2021

पुरंदर तालुक्यातील "माहुरच्या" सरपंचपदी रामदास जगताप तर उपसरपंचपदी पूनम माहुरकर यांची बहुमताने निवड...


पुरंदर, माहूर, दि.10 : - पुरंदर तालुक्यातील माहूर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस - शिवसेना पुरस्कृत श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनलने नऊपैकी पाच जागा जिंकून माहूर ग्रामपंचायतीची सत्ता काबीज करणारा विजय संपादित केला.



माहूर गावच्या सरपंचपदी रामदास नारायण जगताप व उपसरपंचपदी पुनम तुषार माहुरकर यांची बहुमताने निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नानासाहेब कांबळे यांनी दिली.



"पुरंदरचे लोकप्रिय,कार्यक्षम आमदार संजयजी जगताप सर व माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली माहूर गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमचे श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल कटिबद्ध असेन याची आम्ही ग्वाही देतो अशी प्रतिक्रिया माहूर गावचे काँग्रेसचे युवा नेते तुषार माहुरकर यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




माहूर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये रामदास नारायण जगताप, पुनम तुषार माहुरकर, संतोष महादेव पांडे, मेघा संजय जगताप, जयश्री राहुल भोसले, शरद नारायणराव जगताप, राजेंद्र पोपटराव जगताप, दिपाली बापूराव खोमणे, उज्वला परशुराम जगताप यांची सदस्य म्हणून निवड झालेली आहे. 




"माहूर गावच्या नागरिकांनी दिलेला विजयाचा कौल सार्थकी लावून सर्व लोकांच्या समस्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा व गावात चांगले विकासकार्य करून माहूर गावाला विकासाचा चांगल्या उंचीवरती घेऊन जाण्याचा मनापासून प्रयत्न करेन." अशी प्रतिक्रिया माहूर गावचे नवनिर्वाचित सरपंच रामदास जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




" माहूर गावातील महिला सक्षमीकरणासाठी आम्ही महिलांसाठी असणाऱ्या सर्व सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणार आहोत." अशी प्रतिक्रिया माहूर गावच्या नवनिर्वाचित उपसरपंच पुनम माहुरकर यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी  बोलताना दिली.




" माहूर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेले सर्व विजयी उमेदवार माहूर गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतील याची आम्हाला खात्री आहे."  अशी प्रतिक्रिया माहूर गावचे ग्रामस्थ नवनाथ हनुमंतराव जगताप (मुकादम) यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.



पुरंदरच्या "परिंचे" गावात शिवसेनेची विजयी घोडदौड; परिंचेच्या सरपंचपदी शिवसेनेच्या ऋतुजा जाधव, उपसरपंचपदी दत्तात्रय राऊत...



पुरंदर, परिंचे,  दि.9 : पुरंदर तालुक्यातील परिंचे गावातील मतदारांनी सलग तिसऱ्यांदा शिवसेना पुरस्कृत पॅनेलला संधी दिल्यामुळे शिवसेनेची सलग तिसऱ्यांदा विजयी घोडदौड कायम राहिली. परिंचे गावच्या सरपंचपदी ऋतुजा जाधव व उपसरपंचपदी दत्तात्रय राऊत यांची निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शरद काटवटे यांनी दिली.




पुरंदरच्या माजी सभापती अर्चना जाधव यांच्या नेतृत्वाखाली सिद्धिविनायक ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून परिंचे गावचे कार्यक्षम माजी सरपंच समीर जाधव व सोपान राऊत यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्यात आली असून निवडणुकीत शिवसेनेने 11 पैकी सात जागा जिंकून परिंचे ग्रामपंचायतीवर सलग तिसऱ्यांदा शिवसेनेचा भगवा फडकवला.




परिंचे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ऋतुजा धैर्यशील जाधव व वंदना महादेव राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीमध्ये ऋतुजा जाधव यांना सात मते मिळाली तर वंदना राऊत यांना चार मते मिळाली.







उपसरपंच पदासाठी दत्तात्रय रामचंद्र राऊत व सुजाता सुरेश दुधाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दत्तात्रय राऊत यांना सात मते तर सुजाता दुधाळ यांना चार मते मिळाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शरद काटवटे यांनी दिली.



या निवडणुकीवेळी ग्रामसेवक शशांक सावंत, गाव कामगार तलाठी सुजित मंडलेजा निवडणूक प्रक्रियेसाठी  उपस्थित होते. परिंचे ग्रामपंचायतीमध्ये अजित रमेश नवले, दत्तात्रय रामचंद्र राऊत, अर्चना संतोष राऊत, शैला संजय जाधव, सुजाता सुरेश दुधाळ, सुनील शिवाजी जाधव, ऋतुजा धैर्यशील जाधव, गणेश संजय पारखी, प्रवीण प्रमोद जाधव, पुष्पलता दामोदर नाईकनवरे, वंदना महादेव राऊत यांची सदस्य म्हणून निवड झालेले आहे.




"परिंचे गावात मागील दहा वर्षांत शिवसेनेच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांना नागरिकांनी भरघोस मतदानाच्या रुपात मोठा कौल दिला. माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली परिंचे गावची सर्वांगीण विकासाची वाटचाल अखंडपणे चालू राहील अशी प्रतिक्रिया परिंचे गावचे माजी सरपंच समीर जाधव यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूज शी बोलताना दिली.




पुणे जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव व माजी सभापती आणि विद्यमान पंचायत समिती सदस्य अर्चना जाधव यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार करण्यात आला.




" पुरंदरचे विकास पुरुष माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली शाश्वत व चिरंतर ग्रामविकासाची संकल्पना परिंचे गावासाठी राबवणार आहे." अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित सरपंच ऋतुजा जाधव यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूज शी बोलताना दिली.




Friday, February 5, 2021

पुणे - आंबेगाव पठार; नवीन जलवाहिनीचे काम चालू असताना नागरिकांच्या जुन्या पाण्याच्या जोडणी तुटल्यास, अडचणी आल्यास संपूर्ण सहकार्य करणार - स्विकृत नगरसेवक युवराज रेणूसे




पुणे, दि.4 : पुणे शहरातील विकासापासून वंचित राहिलेल्या आंबेगाव पठार या भागात नवीन जलवाहिनीचे काम सुरू झाले असून, पुणे महानगरपालिका स्वीकृत नगरसेवक युवराज रेणूसे यांनी आंबेगाव पठार येथील सर्व्हे नंबर १६, १५ या ठिकाणी चालू असलेल्या नवीन  जलवाहिनीच्या कामाची पाहणी केल्यानंतर येथील नागरिकांना नवीन जलवाहिनीचे काम चालू असताना जुन्या पाण्याची जोडणी तुटल्यास पुणे  महानगरपालिकेतर्फे जोडून देण्यात येईल, संपूर्ण सहकार्य केले जाईल व काही अडचणी आल्यास संपर्क करण्याचे आव्हान स्वीकृत नगरसेवक युवराज रेणूसे यांनी केले.




 महानगरपालिके तर्फे समाविष्ट ११ गावांच्या विकासासाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून पाणी पुरवठा मुख्य विभागा तर्फे सर्वे नं १५/१६ येथील नागरिकांसाठी १८” पिण्याच्या पाण्याच्या लाईनच्या सुरू असलेल्या कामास महापालिकेच्या अधिकार्यांसमवेत युवराज रेणूसे यांनी भेट दिली व सदर पाण्याच्या लाईनच्या नियोजनाविषयी सविस्तर चर्चा केली.




   तळजाई पासून सुरू झालेले लाईनचे काम हे चिंतामणी ज्ञानपीठ पर्यंत होणार आहे व त्यानंतर सर्वे नं १५/१६ मधील सर्व लेन मध्ये पाण्याच्या लाईन टाकण्यास सुरुवात होणार आहे.




     सर्वे नं १५/१६ मधील नागरिकांबरोबरच आंबेगाव पठार वरील नागरिकांना देखील या पाण्याच्या लाईन मुळे मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.




     "सदर ठिकाणी खोदकाम करत असताना जुनी पाण्याची कनेक्शन तुटत आहेत ती कनेक्शन महापालिकेतर्फे जोडून देण्यात येत आहेत,या कामासाठी नागरिकांकडे कोणी पैसे मागितले तर ८३९०७८६६७६ या नंबर वर संपर्क करावा." अशी प्रतिक्रिया स्वीकृत नगरसेवक युवराज रेणूसे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




आंबेगाव पठार येथील नागरिक मागील अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करत आहेत. या जलवाहिनीचे काम लवकर पूर्ण झाल्यानंतर आंबेगाव पठार येथील नागरिकांची पाणी समस्या सुटायला नक्कीच मदत होईन.



Tuesday, February 2, 2021

छावा स्वराज्य सेनेच्या शिवकालीन ऐतिहासिक घडामोडींना उजाळा देणाऱ्या "दिनदर्शिका २०२१" चे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते प्रकाशन...

 


पुणे, दि.१ : वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली सामाजिक संघटना छावा स्वराज्य सेना यांच्यावतीने युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या महान इतिहासातील प्रमुख घडामोडींना नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेच्या माध्यमातून खास उजाळा देऊन इतिहासाचा प्रसार करण्याचा आगळा वेगळा प्रयत्न करणाऱ्या "दिनदर्शिका २०२१" चे प्रकाशन खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते झाले.





छावा स्वराज्य सेना,महाराष्ट्र राज्य संस्थापक/अध्यक्ष राम घायतिडक(पाटील)यांच्या व प्रदेश अध्यक्ष श्री राजेंद्र पडवळ, प्रदेश कार्याध्यक्ष श्री आरिफ शेख, प्रदेश अध्यक्षा महिला आघाडी सौ शितलताई हुलावळे,प्रदेश संघटक श्री.विवेक अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली,पुणे जिल्हा,पुणे शहर कार्यकारिणीने आज छावा स्वराज्य सेना,महाराष्ट्र राज्य वतीने करण्यात आलेल्या, ऐतिहासिक घडामोडींना उजाळा देणारी "दिनदर्शिका २०२१" प्रकाशनानंतर तरुण पिढीच्या, शिवभक्तांच्या, अनेक लोकांच्या पसंतीस उतरली.





       छावा स्वराज्य सेनेने केलेल्या दिनदर्शिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या ऐतिहासिक कालखंडातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच त्या काळातील ज्या ज्या सरदारांनी अथवा मावळ्यांनी जो काही इतिहास घडविला त्या सगळ्या घडामोडी तारखांनुसार मांडण्याचा प्रयत्न करून इतिहास कसा लोकांपर्यंत पोहचविता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्या संघटनेने केला आहे. अशी प्रतिक्रिया छावा स्वराज्य सेना संस्थापक, अध्यक्ष राम घायतिडक पाटील यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




        खासदार छत्रपती संभाजीराजे  यांनी ही दिनदर्शिका पाहिल्यावर त्यांना ही आगळी वेगळी संकल्पना आवडली. युगपुरुष शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. छावा स्वराज्य सेनेने  ऐतिहासिक घडामोडींना उजाळा देण्याचा चांगला प्रयत्न या दिनदर्शिकेच्या माध्यमातून केला अशी प्रतिक्रिया कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी दिली.




         सदर दिनदर्शिकेचे प्रकाशन होत असताना छावा स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष राम घायतिडक(पाटील),प्रदेश अध्यक्ष राजेंद्र पडवळ,कार्याध्यक्ष अरीफभाई शेख,प्रदेश संघटक विवेक अत्रे,प्रदेश महिला अध्यक्षा सौ.शितलताई हुलावळे , जिल्हा कार्यकारिणी, शहर कार्यकारिणी तसेच छावा स्वराज्य सेनेचे बरेच सदस्य उपस्थित होते.