करोना, जुनी लोकं आणि वीरची पारंपरिक यात्रा...
मागच्या वर्षी वीर गावची यात्रा संपली आणि लॉकडाऊन पडलं. लोकांनी आंगचा गुलाल नुकताच पुण्या-मुंबईत जाऊन उतरवला होता तोच सगळं बिऱ्हाड घेऊन लोकं परत गावाला आली. गरम पाणी, चहा, काढा पिणं सुरू झालं नंतर परत गावच्या वेशी बंद झाल्या, नंतरचे काही दिवस तणावाखाली गेल्यानंतर एखादा रानबोका नजरेआड झाल्यावर सावधपणे चरायला बाहेर पडणाऱ्या कोंबड्यांसारखी गावातली-वाड्यावस्तीतली म्हातारी माणसं बाहेर पडू लागली. थोडं तुटक का होईना बसून गप्पागोष्टी करू लागली, त्यांच्या पिढीला गप्पा मारायला आता पूर्वीसारख्या पडव्या, सपराची घरं राहिली नव्हती हा भाग वेगळा पण त्यांना एखादी झाडाची सावट पुरेशी असते आपल्या सारखं AC, पंखा यावर त्यांचं सुख लटकलेलं नसतं.
त्यांच्याकाळात पण रोगराई भरपूर होती पण लॉकडाऊन चा प्रकार नव्हता. गावच्या गावं प्लेग सारख्या रोगांमुळं बसायची पण माणूस दिसल्यावर दार लावायची अघोरी प्रथा त्यांना मान्य नव्हती. त्यामुळं घडल्या प्रकाराला आत्ताच्या पिढीला दोष देणं आलंच. अगदी शिव्यांचा पाऊस पडत होता. आम्ही समोर आलो की "आमचा जमाना असला नव्हता" म्हणत डोळे खालीवर फिरायचे, काहींच्या शिव्या ऐकू यायच्या काहींचे फक्त ओठ हालायचे. बरेच जण फक्त नजरेतून व्यक्त व्हायचे.
तसा विषय गंभीर असला तरी त्यात चूक कुणाची? ना त्यांची ना आपली. मधमाश्या फक्त दगड मारणाऱ्यालाच चावतात असं नाही, जो वाटेत येईल तो शिकार होतो. आमच्या पिढीचं थोडं तसं झालंय. बघता बघता गणपती, दसरा, दिवाळी हे सण आले नी गेले. घरगुती गोड धोड करून नावाला हे सण सगळ्यांनी साजरे केले, इंग्रजी वर्ष संपलं. पण जेव्हा मांढरदेवी यात्रा रद्द झाली तेव्हा मात्र गावाकडच्या लोकांच्या मनाची चलबिचल झाली. बघता बघता वीरची यात्रा पण रद्द होणार अशा चर्चा सुरू झाल्या आणि एकदिवस त्यावरसुद्धा शिक्कामोर्तब झाला. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा योग्य निर्णय होता.
करोनाचा हा सर्वात मोठा फटका असं म्हणायला हरकत नाही. सर्व वयोगटातल्या लोकांना दुःख झालं. आपल्या पिढीनं सोशल मीडियावर भावनेला वाट करून दिली, पोस्ट पडल्या, व्हाट्सएपवर स्टेटस अपडेट झाले पण सध्या वयाची सत्तरी ते ऐशी गाठलेली किंवा शाळेत जाणारी ज्यांना सोशल मीडिया माहिती नाही ही लोकं कुठं व्यक्त होणार? एरव्ही जमान्यांवरून चालणाऱ्या गप्पा आपण हसण्यावारी घेतल्या पण आता थोडं वाईट वाटलं. वीर गावची यात्रा ही वीरगावची विशेष ओळख आहेच पण त्याबरोबर पंचक्रोशीतील गावं, राज्यातील विविध जातीधर्माचा समाज यांच्या श्रद्धेचा हा विषय.
इतिहासात हे पहिल्यांदाच घडतंय की वीरची यात्रा रद्द झाली. जुन्या पिढीमध्ये प्रचंड घालमेल दिसतेय, उभ्या आयुष्यात मंदिर कधी एवढे दिवस बंद नव्हतं, ना देवदर्शनाचा, रविवारच्या छबिण्याचा शिरस्ता चुकला होता. देवदर्शनाशिवाय दिवसाची सुरुवात न करणाऱ्यांना कित्येक दशकानंतर ही परिक्रमा चुकवावी लागली.
शेकडो वर्षाची परंपरा, पिढीजात चालत आलेले रितीरिवाज सगळं आयुष्यभर जसंच्या तसं पाळणारी ही पिढी पूर्णपणे गोंधळून गेली. त्याबरोबर लहान-थोर आशा सगळ्या वर्गातील लोकांची निराशा झाली.
एका जत्रेनं देव म्हातारा होत नाही पण एका जत्रेशिवाय आपण एक वर्षांनी म्हातारे होणं परवडेल का? असा प्रश्न पडणं साहजिक आहे. कारण इतर गावच्या दोन दिवसांच्या यात्रेत आणि वीरच्या यात्रेत सगळ्या बाजूने फरक जाणवतो. त्याला बरीच कारणे आहेत.
यात्रा महिनाभरावर आली की गावाची सुरू होणारी लगबग अगदी लहान थोर सगळेच कामाला लागतात. घरांची रंगरंगोटी, सारवासारव, शेताच्या कामाचे नियोजन, शहराकडून गावाकडे पळण्याची घाई आणि त्यासाठी शाळेत, कॉलेजात, ऑफिसमध्ये माराव्या लागणाऱ्या थापा, गावकऱ्यांच्या, सालकऱ्यांच्या, मानकऱ्यांच्या बैठका, कोडीतकरांचा दहा दिवसांचा सराजम, गाव धुवून पर्यायी रस्ते बनवण्याची देवस्थानची घाई, आजूबाजूच्या गावातल्या लोकांची बैलगाडी सजवण्याची गडबड, बैलांची खरेदी विक्री आणि मांढरदेव च्या जत्रेहून हॉटेल, खेळणी दुकानांची विरला येऊन बस्तान मांडायची घाई या धांदलीत पौष महिना संपून जातो.
बघता बघता गावाला लालसर रंग यायला सुरुवात झालेली असते. एरव्ही पहाटेच्या थंडीत पडणारं पांढरं शुभ्र दुखं लालसर होऊन जातं. दिवस सरतील तसा छबिना रंगाला येतो. मानाच्या काठ्या, सजवलेल्या पालख्या, गुलाल खोबऱ्याची उधळण, "चांगभलं"चा जयघोष, माणसांची गर्दी, पोलिसांची वर्दी, भुरट्या चोरांची हातघाई, लहान पोरांचे हट्ट, पापण्या, लाडू, जिलेबी, आइस्क्रीम, रेवड्या, मोठमोठाले पाळणे सर्व परिसर गजबजून जातो.
पाहुण्यांची ये जा सुरू होते वर्षभराच्या गाठीभेटी होतात. पोरांचा गलका, गुलालात माखलेली माणसं, छोटे मोठी दुकानं मांडून ज्याची त्याची चार पैसे कमवायची घाई, लहानपणीच्या शाळकरी मित्रांच्या गाठीभेटी आणि त्यांच्या चहापाण्यासोबतच्या गप्पांनी गजबजलेली हॉटेलं आणि तेवढयात श्रींनाथांची भाकणुक कानावर पडावी आणि हजारोंच्या गर्दीत एकच शांतता पसरावी असा एक प्रसंग... शेतकरी वर्गाने पावसाचा अंदाज ऐकण्यासाठी हात जोडून कानात प्राण आणावा. भाकनुक संपली की एकच मंदिराबाहेर पडणारी झुंबड आणि पुन्हा यात्रेचा गाजावाजा सुरू.
लाखोंच्या गर्दीत अगदी पद्धतशीर चाललेला हा कारभार ज्याचा माणूस म्हणून कोणी मालक नसतो. देवाच्या श्रद्धेपोटी लाखो भाविक एकत्र येतात आणि हा उत्सव पार पडतो. लाखोंची देवाणघेवाण होते, गरजा भागवल्या जातात, वस्तू नव्याजुन्या केल्या जातात, बैलगाड्या सजतात, घुंगरांचा खळखळाट करत रस्त्याने धावतात, कष्टकरी आयुष्यात विरंगुळा येऊन जातो आणि देव यातच तर लोकांना भेटत असतो. थोडक्यात वीरची यात्रा म्हणजे निखळ नुसती वहिवटलेली परंपरा नसून तो एक आनंदाचा सोहळा असतो.
सहाजिकच शेकडो वर्षापासून चालत आलेली परिक्रमा अचानक थांबली आणि त्यावर कोणाचा काहीच इलाज चालत नाही त्यामुळं सगळ्यांची एक वेगळीच घुसमट झाली आहे. यातून आपल्याला नक्कीच काही गोष्टी शिकाव्या लागतील. शिस्त आणि आरोग्याचं महत्व समजून घ्यावं लागेल. बाकी देवाच्या मनात जे आहे तेच होईल, ते बावन बिरदांचे धनी आहेत ही आपली धारणा आहे त्यामुळे करोनाच्या संकटातून त्यांच्या कृपेने आपण सगळे लवकर बाहेर पडू अशी प्रार्थना करूयात.
लेखक - संगणक अभियंता व श्रीनाथ म्हस्कोबा भक्त अजय समगीर (बांदल)